जिग्नेश मेवाणी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जिग्नेश मेवाणी

विधानसभा सदस्य
वडगाम विधानसभा मतदारसंघात साठी
विद्यमान
पदग्रहण
२०१७

जन्म ११ डिसेंबर, १९८२ (1982-12-11) (वय: ४१)
अहमदाबाद, गुजरात
राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष अपक्ष
मागील इतर राजकीय पक्ष राष्ट्रीय दलित अधिकार मंच (संघटना)
वडील नटरवलाल मेवाणी
शिक्षण बॅचलर ऑफ आर्ट्स, बॅचेलर ऑफ लॉज
गुरुकुल गुजरात विद्यापीठ
व्यवसाय वकिली, सामाजिक कार्य
सही जिग्नेश मेवाणीयांची सही

जिग्नेश नटरवलाल मेवाणी (गुजराती : જિગ્નેશ નટવરલાલ મેવાણી) हे गुजरात मधील एक सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार व वकील आहेत. ते दलित समाजाचे तरुण नेते व आंबेडकरवादी कार्यकर्ते म्हणून प्रसिद्ध आहेत. ते २०१७ च्या गुजरात विधानसभा निवडणुकीत वडगाम विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून १८,१५० मतांनी निवडून गेले.

सुरुवातीचे जीवन[संपादन]

जिग्नेश यांचा जन्म ११ डिसेंबर १९८२ साली गुजरातच्या अहमदाबाद शहरात झाला. मेहसाणा जिल्ह्यातील मेऊ हे त्यांच्या परिवाराचे मूळ गाव आहे. त्यांचे शालेय शिक्षण अहमदाबादमधील स्वस्तिक विद्यालय व विश्व विद्यालय माध्यमिक शाळा येथे झाले. त्यांनी २००३ साली एच.के. आर्ट्स कॉलेज येथून इंग्लिश साहित्य या विषयात कला शाखेची पदवी मिळवली. २००४ साली त्यांनी पत्रकारिता व जनसंचार या विषयात डिप्लोमा प्राप्त केला. २००४ ते २००७ या काळात त्यांनी अभियान या गुजराती साप्ताहिकात वार्ताहर म्हणून काम केले. २०१३ साली त्यांनी डी.टी. लॉ कॉलेज, अहमदाबाद येथून एल.एल.बी. करून विधि शाखेची पदवी मिळवली.

चळवळ[संपादन]

२०१६ साली गुजरातच्या सौराष्ट्र भागातील उना गावात स्वतःला गोरक्षक म्हणवणाऱ्या एका गटाकडून काही दलित पुरुषांवर हल्ला झाला होता व ह्या घटनेची चित्रफीत काढून समाजमाध्यमांद्वारे प्रसारित करण्यात आली होती. ह्या घटनेचा गुजरातमध्ये तीव्र निषेध झाला. ह्याचाच एक भाग म्हणून अहमदाबाद ते उना या मार्गावरून दलित अस्मिता यात्रा काढण्यात आली. या यात्रेचे नेतृत्व जिग्नेश मेवाणी यांनी केले. १५ ऑगस्ट २०१६ रोजी यात्रेचा समारोप झाला. या कार्यक्रमात जवळपास २०,००० दलित लोक सहभागी झाले, ज्यामध्ये दलित महिलांचाही समावेश होता. सहभागी दलित जनतेने मेलेल्या गाई व ढोरे ओढून नेण्याचे त्यांचे पारंपरिक काम सोडून देण्याची प्रतिज्ञा घेतली. जिग्नेश यांनी दलितांच्या उत्थानासाठी त्यांना जमिनी मिळाव्या ही मागणी उचलून धरली.

हार्दिक पटेलअल्पेश ठाकोर यांसह जिग्नेश मेवाणी यांना गुजरातमधील राजकारणातील नवीन नेते समजले जाते.

२०१७ सालची विधानसभा निवडणूक[संपादन]

२०१७ सालच्या डिसेंबर महिन्यात झालेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून जिग्नेश मेवाणी यांनी वडगाम विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार विजय चक्रवर्ती यांचा १९,६९६ मतांनी पराभव केला आणि ते निवडून आले.

संदर्भ[संपादन]

'