जपानची ३१वी डिव्हिजन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

जपानची ३१वी डिव्हिजन (第31師団; दै-सांजुइची शिदान) ही जपानच्या शाही सैन्याची एक तुकडी होती. याला चवताळलेली डिव्हिजन (烈兵団 रेत्सु हैदान) असे नामाभिधान होते. या डिव्हिजनची रचना दुसऱ्या महायुद्धादरम्यान २२ मार्च, १९४३ रोजी बॅंगकॉक येथे करण्यात आली. यात कावागुची दल आणि १३, ४० आणि १६१व्या डिव्हिजनमधील सैनिकांची भरती करण्यात आली. रचनेनंतर ३१व्या डिव्हिजनला जपानच्या १५व्या सैन्यदलात शामिल केले गेले.

कामगिरी[संपादन]

जपानच्या ब्रिटिश भारतावरील आक्रमणांतर्गत चालू असलेल्या उ-गो मोहिमेत ३१व्या डिव्हिजनला म्यानमारमध्ये पाठविण्यात आले. तेथून म्यानमार पार करीत नागालॅंड व तेथून पुढे इंफाळवर चाल करुन जाण्याचे या डिव्हिजनला आदेश होते. लेफ्टनंट जनरल रेन्या मुतागुचीचा हा व्यूह डिव्हिजनच्या सेनापती कोताकु सातोला पसंत नव्हता परंतु आपल्या आदेशाचे त्याने पालन केले व १५ मार्च, १९४४ रोजी ३१व्या डिव्हिजनने चिंदविन नदी पार करुन होमालिन शहराजवळ मोठी फळी उभारली. १०० किमी रुंदीची ही चाल म्यानमार पार करीत असताना डाव्या बाजूला सांग्शाक येथे भारताच्या ५०व्या हवाई छत्री ब्रिगेडशी भिडली. ब्रिटिश भारतीय लश्कराने जपान्यांना सहा दिवस रोखून धरले व नंतर माघार घेतली.

३ एप्रिलच्या सुमारास ३१वी डिव्हिजन कोहिमाच्या सीमेवर येउन पोचली. पुढे तीन दिवस हळूहळू शहराभोवती वेढा आवळत सातोने कोहिमाचा रसदपुरवठा बंद केला. ८ एप्रिलपासून जपानी सैन्याने कोहिमावर थेट हल्ले सुरू केले. कोहिमातील ब्रिटिश सैन्य माघार घेत अगदी छोट्या आवारत कोंडले गेले. १७ एप्रिलपर्यंत त्यांची दुर्दशा चालू राहिली. १८ एप्रिल रोजी ब्रिटिशांनी आपल्या उरलेल्या सगळ्या तोफा एकत्र करुन ३१व्या डिव्हिजनवर भडिमा केला. अचानक सुरू झालेल्या या तुफान हल्ल्यामुळे जपानी सैन्य थबकले. वेगाने म्यानमार पार करताना त्यांनी आपल्या तोफा मागेच सोडल्या होत्या. ज्या काही छोट्या तोफा होत्या त्यांसह हल्ला करीत त्यांनी ब्रिटिशांना कोंडून धरले होते. त्याचवेळी रॉयल एर फोर्स ब्रिटिशांच्या मदतीला आले व त्यांनी हवाई रक्षण नसलेल्या ३१व्या डिव्हिजनचे मोठे नुकसान केले. यामुळे कोहिमा ते दिमापूर रस्ता मोकळा झाला व ब्रिटिशांनी हळूहळू रसद आणण्यास सुरुवात केली.

३१व्या डिव्हिजनने लगेच माघार घेतली नाही. पुढील महिनाभर त्यांनी कडवी झुंज चालू ठेवली. १५मेच्या सुमारास त्यांनी काढता पाय घेतला. पळ न काढता लढण्याचे आदेश धुडकावून लावल्याबद्दल कोताकु सातोला ३१व्या डिव्हिजनच्या सेनापतीपदावरुन बरखास्त करण्यात आले व हे पद उचितारोउ कावादाला देण्यात आले.

यानंतर ३१व्या डिव्हिजनच्या उरल्यासुरल्या तुकड्यांनी म्यानमारमध्ये ब्रिटिशांशी चकमकी सुरू ठेवल्या परंतु कोहिमाच्या लढाईत या डिव्हिजनचा अंत झालेला होता.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  • मादेज, डब्ल्यू. व्हिक्टर. जॅपनीझ आर्म्ड फोर्सेस ऑर्डर ऑफ बॅटल, १९३७०१९४५ २ खंड ॲलनटाउन, पेनसिल्व्हेनिया: १९८१
  • लुई ॲलन, बर्मा: द लॉंगेस्ट वॉर १९४१-४५, जे.एम. डेंट ॲंड सन्स, लि.: १९८४, ISBN 0-460-02474-4
  • जॉन लॅटिमर, बर्मा: द फरगॉटन वॉर, लंडन: जॉन मरे, २००४. ISBN 978-0-7195-6576-2
  • फील्ड मार्शल सर विल्यम स्लिम, डिफीट इनटू व्हिक्टरी, न्यू यॉर्क: बकानीयर बूक्स ISBN 1-56849-077-1, कूपर स्क्वेअर प्रेस ISBN 0-8154-1022-0; लंडन: कॅसेल ISBN 0-304-29114-5, पॅन ISBN 0-330-39066-X.
  • United States War Department (1991) [reprint of 1944 edition]. Handbook on Japanese Military Forces. David Isby (Introduction) and Jeffrey Ethell (Afterword). बॅटन रूज आणि लंडन: Louisiana State University Press. ISBN 0-8071-2013-8.