चर्चा:सौभाग्यालंकार
सौभाग्यवती (सुवासिनी) स्त्रियांनी वापरावयाच्या अलंकारांस सौभाग्यालंकार असे म्हणतात. मंगळसूत्र, गळसर (गळसरी), चुडे (बांगडी), नथ, जोडवी, गेंद (पायातील अलंकार), विरोल्या (विरोद्या), मासोळ्या इ. अलंकार हे सौभाग्यालंकार म्हणून गणले जातात. विवाहप्रसंगी वराने वधूच्या गळ्यात समंत्रक घालावयाच्या मांगल्यसूचक अलंकारास ‘मंगळसूत्र’ असे म्हणतात. ते एक अतूट नात्याचे पवित्र बंधन असते. सौभाग्यालंकारांतील सर्वांत श्रेष्ठ अलंकार म्हणून मंगळसूत्र सुवासिनी स्त्रिया नित्य धारण करतात. महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये हा अलंकार विशेष प्रचलित आहे.
काही अभ्यासकांच्या मते दक्षिण भारतातून म्हणजे द्रविड संस्कृतीतून तो कर्नाटक-महाराष्ट्रात आला असावा. केरळ, तमिळनाडू, आंध्र प्रदेश इ. राज्यांतील विविध जाति-जमातींमध्ये तसेच बहुतेक आदिवासींमध्ये वधूच्या गळ्यात ‘ताळी’ नावाचा सौभाग्यालंकार बांधण्याची प्रथा आहे. त्यामध्ये भौमितिक आकृतिबंध तसेच आंबा, नारळ, कोयरी इ. फळांच्या आकारांची पदके व काळे मणी असतात. साधारणतः काळ्या पोतीचे दोन सर, मध्यभागी सोन्याच्या दोन वाट्या, वाट्यांच्या मध्यभागी दोन व दोन्ही बाजूंना एकेक असे चार सोन्याचे मणी असे मंगळसूत्राचे सर्वमान्य स्वरूप आहे. काही ठिकाणी काळी पोत वाखाच्या दोऱ्यात, काळ्या गोफात किंवा सोन्याच्या तारेत गुंफून मंगळसूत्र तयार करण्याची प्रथा आहे. त्याच्यामधोमध एक मणी असतो, त्याला ‘सौभाग्यमणी’ असे म्हणतात. मण्याच्या दोन्ही बाजूंस दोन बारीक वाट्या असतात त्या चंद्रसूर्याची प्रतीके मानल्या जातात.
यावच्चन्द्रदिवाकरौ-वधूचे सौभाग्य शाश्वत राहावे, असा त्या मंगळसूत्रामागे गर्भितार्थ असतो. गाथासप्तशतीत याला ‘कनकदोरा’ असे म्हटले आहे. बंगालमध्ये मंगळसूत्रामध्ये पोवळे घालण्याची प्रथा आहे. अलीकडे मंगळसूत्र सोन्याच्या तारेत गुंफून त्याचे निरनिराळे प्रकार करण्याची पद्धतही रूढ असल्यामुळे सुवासिनी स्त्रिया त्यांच्या पसंतीच्या नक्षीकामात तयार केलेले मंगळसूत्र वापरतात
बांगडी हा अतिप्राचीन काळापासून वापरात असलेला आणि विशेषतः भारतीय स्त्रियांचा मनगटावर धारण करावयाचा एक अलंकार आहे. याला ‘चुडा'(सौभागय या अर्थी) असे म्हणतात. महाराष्ट्रात लग्नाच्या आधी वधूला भरावयाच्या बांगड्यांना ‘लग्नचुडा’ असे म्हणतात. तो मुख्यतः हिरव्या रंगाचा असतो. बंगालमध्ये प्रामुख्याने शंखांच्या बांगड्यांना सौभाग्यालंकार मानले आहे. तेथे विवाहप्रसंगी वधूला लाल व पांढज्या रंगांचा चुडा भरण्याची प्रथा आहे. विवाहानंतर वधू ज्यावेळी पहिल्यांदा सासरी येते, त्यावेळी नवऱ्या मुलाची आई वधूच्या डाव्या हातामध्ये एक धातूची बांगडी घालते, त्यास ‘वज्रचुडा’ असे म्हणतात. पंजाब, गुजरात व राजस्थानमधील सुवासिनी स्त्रिया सौभाग्यालंकार म्हणून हस्तिदंताच्या बांगड्या घालतात.
पंजाबमध्ये वधूला लाल व पांढऱ्या रंगाचा चुडा भरतात. वधूला भरावयाच्या लग्नचुड्यासाठी पंजाबमध्ये ‘चुडाचंदन’ व राजस्थानमध्ये ‘इचुरा’ असे कार्यक्रम साजरे केले जातात. गुजरातमध्ये वधूच्या हिरव्या व लाल काचेच्या बांगड्या भरतात. त्याला ‘चुडो’ असंम्हणतात. उत्तर भारतात काचेच्या व लाखेच्या चुड्यांना सौभाग्यालंकार मानले जाते. साधारणपणे काचेच्या, शंखांच्या, सोन्याच्या, पितळेच्या अशा विविध प्रकारच्या बांगड्या भारतातील अनेकविध प्रदेशांतील सुवासिनी स्त्रिया मुख्य अलंकार म्हणून नित्यनेमाने वापरतात. कंगण, कंकण, चुडा, पाटली, बिलवर, गोट, धातूचे कडे इ. नावे बांगड्यांच्या विविध प्रकारांना आहेत.
यजुर्वेदामध्ये सोन्याच्या बांगड्या विवाहप्रसंगी घालाव्यात, असा निर्देश आहे. संस्कृत साहित्यात कंकणाचा वारंवार उल्लेख आढळतो. लग्नामध्ये वधूवर एकमेकांच्या हातात बांधतात, ते कंकण सुताचे असते. त्याला ‘सूत्रकंकण’ असे म्हणतात. चूड व अर्धचूड हे कंकणाचेच प्रकार. चूड म्हणजे सोन्याच्या तारेचे मोठे कंकण व अर्धचूड म्हणजे बारीक कंकण. चूड यालाच मराठीत चुडा असे म्हणतात.
आपला चुडा अर्थात कंकण वज्राचे व्हावे म्हणजेच आपले सौभाग्य अभंग राहावे, अशी प्रत्येक सुवासिनीची आकांक्षा असते. त्यासाठी ती व्रतेही करते. भारतातील नानाविध प्रदेशांच्या लोकगीतांतून सुवासिनींची चुड्याविषयीची आसक्ती मनोभावे व्यक्त झाली आहे.
‘नथ’ हा नासिकाभूषणांतील एक महत्त्वाचा सौभाग्यालंकार. दहाव्या शतकानंतरच्या संस्कृत साहित्यात नथ या शब्दाऐवजी नासाग्रमौक्तिक, नासाग्रमुक्ताफल वा मौक्तिक नासिकायाम् असे उल्लेख आढळतात. त्यामुळे नवव्या-दहाव्या शतकांनंतरच नथ हा अलंकारप्रकार मुसलमानांच्या संपर्काने आला असण्याची शक्यता काही अभ्यासकांनी वर्तविली आहे. नथ हा शब्द संस्कृतमधील नाथ म्हणजे वेसण या शब्दावरून आलेला असावा.
नथीचे अनेक प्रकार आढळतात, तथापि सोन्याची एक मोठी कडी व तिच्यात गुंफलेले वा जडवलेले मणी किंवा मौलिक खडे असे तिचे सर्वसामान्य स्वरूप असते. महाराष्ट्रात प्रचलित असलेल्या मोतीजडित नथीचे स्वरूप सामान्यतः सोन्याचा फासा असलेल्या तारेत सात किंवा अधिक मोती व मधोमध बसविलेली लाल रत्ने असे असते
नथीला ‘मुखरा’ अशीही संज्ञा आहे. नथ ही सामान्यतः एकाच नाकपुडीत घालतात. सौभाग्याची निदर्शक म्हणून विशेषतः सुवासिनी स्त्रियाच फक्त नथ वापरतात. दक्षिण भारतामध्ये मुक्कुकुट्टी हा नासिकालंकार स्त्रियांचा मुख्य सौभाग्यालंकार मानला जातो. मौनरिया हे राजस्थानी स्त्रियांचे नासिकाभूषण म्हणजे मोठ्या आकाराचे गोल कडेच असून त्याचा आकार व सजावट पुष्पगुच्छसदृश असते. विवाहसमारंभप्रसंगी याचा वापर फक्त विवाहित स्त्रियाच करतात. हिमाचल प्रदेशामध्ये नथ हा सुवासिनी स्त्रियांचा प्रमुख अलंकार आहे.
सौभाग्यालंकारांतील आणखी एक महत्त्वाचा अलंकार म्हणजे पदांगुलीतील ‘जोडवी’ किंवा ‘बिछवा’ (टो रिंग). ती म्हणजे पायाच्या अंगठ्याजवळच्या बोटात घालावयाची चांदीची किंवा इतर धातूंची वळी असतात. प्राचीन काळापासून सुवासिनी स्त्रिया याचा वापर करत असाव्यात. वाल्मीकिरामायणामध्येही ‘वलय’ या अर्थी जोडव्यांचा उल्लेख आढळतो. जुट्-जुड् या धातूपासून जोडवी हा शब्द बनला असून त्याचा अर्थ बंधन असा आहे. हा अलंकार विवाहोत्तर घालावयाचा असल्याने सौभाग्याचे किंवा पातिव्रत्याचे बंधन असाही त्याचा एक अर्थ मानला जातो. जोडवी संपूर्ण भारतातील स्त्रियांच्या नित्य वापरात आहेत. तथापि प्रदेशपरत्वे त्यांना नावे मात्र वेगवेगळी आढळतात. उदा., महाराष्ट्रामध्ये जोडवी तेलुगूमध्ये मीत्तिलु तमिळमध्ये मीत्ती कर्नाटक, उत्तर प्रदेश, बिहारमध्ये बिछवा किंवा बीछीया इत्यादी. सुवासिनी स्त्रियांचा हा पदांगुलीतील अत्यंत महत्त्वाचा सौभाग्यालंकार मानला जातो. जोडव्यांबरोबरच विरोल्या (विरोद्या) नावाचा आणखी एक चांदीचा अलंकार पायाच्या बोटात घालण्याची प्रथा आहे. मात्र हे जोडव्यासारखे पूर्णवर्तुळाकृती वळे नसते, तर अर्धवर्तुळाकृती वळ्याला निम्मे उभे बोट झाकले जाईल असा लंबवर्तुळाकृती पत्रा असतो. यास विरवदी-विरवधी, विरवली असेही म्हटले जाते. माशाच्या आकाराचा, पायाच्या करंगळी शेजारील बोटात घालावयाचा सुवासिनी स्त्रियांचा आणखी एक सौभाग्यालंकार म्हणजे मासोळी. पदांगुलीत घालावयाचे हे सौभाग्यालंकार बहुशः चांदीचे बनविलेले असतात.
विवाहाच्या वाङ्निश्चयप्रसंगी वराने वधूच्या बोटात मष्ठअंगठी घालण्याची प्रथा पाश्चात्त्य देशांत रूढ आहे. लिलिअन एच्लर याने द कस्टम्स ऑफ मॅनकाइंड (१९२५) या ग्रंथात विवाहाची शपथ म्हणून अंगठीचा उपयोग करण्याची प्रथा ईजिप्तमधील लोकांनी सुरू केली, असे म्हटले आहे. अंगठी वाटोळी असते आणि वर्तुळाला शेवट नसतो म्हणून विवाहबद्ध होणाऱ्या वधुवरांचे प्रेम चिरकाल टिकावे या हेतूने ही वाङ्निश्चयाची अंगठी देण्याची प्रथा पडली असावी. यासंदर्भात अनेक दंतकथा प्रचलित आहेत.
वाङ्निश्चयाची ही अंगठी प्रथम साधी व लोखंडाची असे, पण दुसऱ्या शतकापासून ती सुवर्णाची बनविण्यात आली आणि नंतर तिचा विवाहाच्या धार्मिक विधीतही समावेश झाला. तर्जनीत (अंगठ्याजवळील बोट) सोन्याची अंगठी घालावी व अनामिकेत (करंगळीजवळील बोट) रुप्याची अंगठी घालावी, असा धार्मिक संकेत आहे. कोकणात लग्नाच्या दुसऱ्या दिवशी वधु-वरांच्या अंगठीचा खेळ खेळला जातो.
कानात घालावयाचा तालपत्र अलंकार सौभाग्याचे प्रतीक समजला जातो. या अलंकारावरून तो वापरणाऱ्या स्त्रीचा पती हयात आहे असे समजले जाते.
भारताच्या निरनिराळ्या प्रदेशांत प्रचलित असलेले सौभाग्यालंकार अलीकडे आकर्षक अशा वेगवेगळ्या पारंपरिक तसेच आधुनिक आकृतिबंधांत (डिझाइन्स्) केले जातात. त्यामुळे सुवासिनी स्त्रिया स्वतःच्या आवडीनिवडींनुसार आकर्षक सौभाग्यालंकार बनवून घेतात व नित्य धारण करतात.
बिंदीला सौभाग्यचिन्ह मानतात. प्राचीन काळापासून बिंदीचा वापर चालत आला आहे. द. भारतात सोळा शृंगारांमध्ये बिंदीची गणना होते. बंगालमधील सौभाग्यवती स्त्रिया स्नान होताच प्रथम सिंदुराची बिंदी लावतात. सांप्रत विविध रंगांच्या बिंदी प्रचलित असून, त्या काच, मेण किंवा प्लास्टिक यांच्यापासून तयार करतात. त्याचप्रमाणे सौभाग्यवती स्त्रिया एक सौभाग्यचिन्ह म्हणून कुंकवाचा वापर करतात. हिंदू स्त्रिया त्यास अहेव लेणे मानतात. कुंकवाच्या बरोबरीने सौभाग्यकारक हळदही असते. सौभाग्यवृद्धीसाठी सुवासिनी स्त्रिया एकमेकींना हळद-कुंकू लावतात. हळदी-कुंकू समारंभही करतात. तसेच हल्ली परिधान केलेल्या वेशभूषेला अनुरूप अशा त्या त्या रंगांच्या बिंदी, टिकल्या यांचा वापर करण्याकडे सुवासिनी स्त्रियांचा कल आहे. त्यामुळे त्यांची गणनाही सौभाग्यलंकारांमध्ये होऊ लागली आहे.
शरीर आकर्षक, शोभिवंत करणे याबरोबरच जीविताचे संरक्षण, देवतांची कृपा, पिशाचांचे निराकरण असे अनेक हेतू विविध अलंकार धारण करण्याच्या मुळाशी दिसतात. अलंकारांचा संबंध जादुविद्येशीही कमी-अधिक प्रमाणात जोडला जातो. सामान्यतः शरीरावरचे सर्व अलंकार हे ताईतवजाच असल्याचे मानले जाते. त्यामुळे सुवासिनी स्त्रियांनी वापरावयाच्या अलंकारांमध्येही त्यांच्या संरक्षणाचा सूचितार्थ दडला असावा, असे म्हटले जाते.
Start a discussion about सौभाग्यालंकार
Talk pages are where people discuss how to make content on विकिपीडिया the best that it can be. You can use this page to start a discussion with others about how to improve सौभाग्यालंकार.