Jump to content

चर्चा:बाळ सीताराम मर्ढेकर

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अनामिक मीत्रवर्य,

आपण खालील केलेले लेखन आपले स्वतःचे असल्यास अथवा प्रताधिकार रहित असल्यास लेख पानात घेण्यास हरकत नसावी.

समीक्षणात आपण वापरलेली श्री. धोंडांची व्यक्तिगत मतांचे संदर्भ इतरत्र लिहिलेले असल्यामुळे आणि तुम्ही स्वतः लिहिलेली नसल्यामुळे विकिपीडियात घेता येतात. परंतु खालील लेखनातील मुख्यत्वे स्ट्राईक केलेली मते विकिपीडिया संपादकाची व्यक्तिगत मते असल्यामुळे अनएनसायक्लोपेडीक[] आणि त्या दृष्टीने लेखात घेता येणारे नाहीत.(अर्थात आपली व्यक्तिगत मते समीक्षण स्वरूपाची असल्यामुळे ती आपण या चर्चा पानावर/विकिपीडिया:समसमीक्षा पानावर अथवा आपण विकिपीडिया सदस्य खाते उघडल्यास आपल्या व्यक्तिगत सदस्य पानावर ठेऊ शकता. आपण माझा हा प्रतिसाद वाचल्या नंतर <s>स्ट्राईक आउट</s> खूण काढून टाकावी ही नम्र विनंती.

याशिवाय तुम्ही व्यक्त म. वा. धोण्ड यांच्या बद्दलची व्यक्त केलेली मते इतरत्र (विकिपीडियात सोडून) प्रकाशित झाल्यास म. वा. धोण्ड यांच्याबद्दलच्या लेखात इतर संपादक देऊ शकतील. असे नियम काहीवेळा द्राविडी प्राणायाम वाटतात पण विश्वकोशाचा दर्जा सांभाळण्याच्या दृष्टीने आवश्यक आहेत हे आपण समजून घेऊ शकाल आणि आपले लेखन खालील लेखन लेख पानावर घेण्यास संमती द्याल अशी आशा आहे.

आपल्या उत्तराची अपेक्षा धन्यवाद.Mahitgar १५:०८, ३१ जुलै २००९ (UTC)

निनावी अंकपत्त्यावरून केले गेलेले लेखन

[संपादन]

मराठी साहित्यविश्र्वातील नवकवितेचे आद्य प्रवर्तक ! केशवसुतांनंतरचे मराठी साहित्यातील एक युगप्रवर्तक कवी म्हणून बा. सी. मर्ढेकरांचा मानाने उल्लेख केला जातो.[ संदर्भ हवा ] साहित्यातील पूर्वपरंपरा मोडून नवी वाट चोखाळणे, समकालीनांवर प्रभाव टाकणे आणि उत्तरकालीन लेखकांना नवी दिशा दाखवणे, असे तिहेरी कार्य करणारे विसाव्या शतकातील मराठी साहित्यातील समर्थ कवी, साहित्यिक म्हणजे बाळ सीताराम मर्ढेकर होत. मर्ढेकरांनी कवितेप्रमाणेच कलाविचार, समीक्षा, कादंबरी, नाटक या प्रांतांतही महत्त्वाचे योगदान दिले.

मर्ढेकरांचा जन्म खानदेशातील (जळगाव जिल्ह्यातील) फैजपूर येथे झाला. पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातून बी.ए. झाल्यानंतर त्यांनी काही काळ टाईम्स ऑफ इंडिया या इंग्रजी वृत्तपत्रात सहसंपादक म्हणून काम केले. पुढे काही काळ इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून काम केले. तसेच आकाशवाणीमध्ये केंद्र अधिकारी (१९३८) या पदावर त्यांनी काम केले.

शिशिरागम(१९३९), काही कविता(१९४७), आणखी काही कविता (१९५१) हे मर्ढेकरांचे तीन कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत. यात सर्व मिळून फक्त सव्वाशेच्यावर कविता असल्या, तरी त्यामध्ये गुणात्मक मूल्य एवढे होते की, त्यांनी मराठी साहित्यावर ‘युगप्रवर्तनात्मक’ असा प्रभाव पाडला. या उच्च दर्जाच्या व व्यापक आशयाच्या कवितांमध्ये मराठी साहित्यातील कोंडी फोडण्याचे सामर्थ्य दिसून येते.

मर्ढेकरांनी जीवनातल्या अशाश्र्वताचे आणि दु:ख-दैन्याचे भान कवितेतून तीव्रपणे व्यक्त केले. नव्या जाणिवेची, प्रयोगशील, चिंतनशील तर कधी भावोत्कट अशी त्यांची कविता त्यांच्या हयातीतच चर्चेचा विषय बनली. त्यांच्या कवितेवर अश्र्लीलतेचा आरोप करण्यात आला होता. त्यातून त्यांची निर्दोष मुक्तताही झाली. त्यांची कविता आशय अन् अविष्काराच्या बाबतीतही प्रयोगशील व क्रांतिकारक होती. सांकेतिक शब्दकळा तिने नाकारली. (उदा. `पिपांत मेले ओल्या उंदिर' ही पूर्णत: नवी शब्दरचना)

नव्या यंत्र युगातली माणसांची घुसमट, अस्वस्थता व्यक्त करण्यासाठी त्यांनी नव्या प्रतिमांचा आश्रय घेतला. (उदा. पंक्चरली जरि रात्र दिव्यांनी, तरी पंपतो कुणि काळोख, सर्वे जन्तु रूटिना: । सर्वे जन्तु निराशया:। सर्वे छिद्राणी पंचन्तु। या कश्र्चित दु:ख लॉग भरते।।)

अशी नवीन काव्यशैली अवलंबताना दुर्बोधतेचे व अनाकलनीयतेचे आव्हानही त्यांनी पत्करले. पण ते स्वत:च्या अनुभूतींशी कायम प्रामाणिक राहिले. नेहमीच्या निराश, उद्विग्न अवस्थेतील कवितांबरोबरच ‘पोरसवदा होतीस - किंवा `किती तरी दिवसांत- दवात आलिस भल्या पहाटे’ यांसारख्या प्रसन्न, नितांत सुंदर अशा कविताही त्यांनी लिहिल्या.

नवीनता ही संकल्पना त्यांनी समीक्षेत रुजवली. वाङ्‌मयीन महात्मता (१९४१), सौंदर्य आणि साहित्य (१९५५) ह्या समीक्षाग्रंथांतून उत्कृष्ट समीक्षालेखनाचा परिपाठ त्यांनी दिला. पाणी, तांबडी माती व रात्रीचा दिवस या तीन कादंबर्‍या, एक नाटक (नटश्रेष्ठ) व चार संगीतिका लिहून हेही साहित्यप्रकार मर्ढेकरांनी समर्थपणे हाताळले.

आशय आणि अभिव्यक्तीत अखेरपर्यंत नवता जोपासणार्‍या या मराठी युगप्रवर्तक कवीचा मृत्यू १९५६ मध्ये दिल्ली येथे झाला.

दुर्बोधता

[संपादन]

बा.सी. मर्ढेकर्रांच्या काव्यातील दुर्बोधतेविषयी मौज (मासिक), सत्यकथा (मासिक) इ. प्रतिष्ठीत मासिकातून वाद / चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यात जी. ए. कुलकर्णींनीसुद्धा भाग घेतला होता.

मर्ढेकरांच्या बाबतीत अगदी जाणकार समीक्षकांमधेही, त्यांच्या अनेक कवितांच्या नेमक्या अर्थाबाबत मतभेद होते. मर्ढेकर जाऊन अर्धशतक उलटलं तरी अद्यापही मर्ढेकरांची कविता संशोधक भाष्यकार आणि समीक्षकांना आव्हान देतेच आहे.[ संदर्भ हवा ]

गंगाधर गाडगीळ, द.भि. कुलकर्णी, श्री.पु.भागवत, विजया राजाध्यक्ष [मर्ढेकरांची कविता : स्वरुप आणि संदर्भ - खंड १ व २] इ. मान्यवरांनी खूप संशोधन आणि लिखाण केलं आहे. त्याच पंक्तीतले एक ख्यातकीर्त भाष्यकार म.वा. धोंड यांनी मर्ढेकरांच्या 'दुर्बोध' वाटणार्‍या सोळा कवितांविषयी सखोल संशोधन, विचार करून १९६७ ते १९९८ ह्या कालावधीत विविध प्रतिष्ठीत नियतकालिकांमध्ये एकूण १३ लेख लिहिले. त्यांचा संग्रह 'तरीहि येतो वास फुलांना' नावाने प्रकाशित झाला.[]

वाचल्यानंतर प्रथम हे जाणवतं की एखाद्या कवीच्या/ लेखकाच्या साहित्याचा मागोवा घेणं, त्यातल्या अर्थ-छटांचा सुसंगत अर्थ लावणं हे काम किती जिकिरीचं आणि संशोधकाच्या विद्वत्तेची, व्यासंगाची आणि चिकाटीची कसोटी पाहणारं असतं![ व्यक्तिगतमत ]

म. वा. धोण्ड यांनी आपल्या संशोधनाची पूर्वपिठीका स्पष्ट करताना म्हटलं आहे," १९४३ पासून मर्ढेकरांच्या कविता जसजशा प्रसिद्ध होत गेल्या, तसतशा मी वाचीत गेलो. काही सहज समजल्या, काही प्रयासाने उमगल्या तर काही अखेरपर्यंत दुर्बोधच राहिल्या. त्या दुर्बोधतेने मला अस्वस्थ केले. मी मराठीचा प्राध्यापक असूनही मला त्या कळू नयेत, हे अपमानास्पद वाटले. त्याहून बलवत्तर कारण म्हणजे त्यातील प्रतिमांनी मला खूळ लावले. .... दुर्बोधता हे मर्ढेकरांच्या कवितेचे व्यवच्छेदक लक्षण होऊन राहिले; त्यांची एखादी कविता सहज कळली, तर स्वतःला चिमटा घेऊ लागलो. ...या कवितांवरीलच नव्हे, तर समग्र मर्ढेकरांवरील इतरांचे लेख वाचून काढले.कुणाचा कुणाशी मेळ बसत नव्हता आणि तरीही प्रत्येकजण आपल्या अभिप्रायावर ठाम होता. मीच एक करंटा निघालो. 'सारे धन्वंतरी प्राज्ञ | मीच रोगी' असा प्रत्यय येऊ लागला. परंतु मर्ढेकरांच्या पकडीतून इतक्या सहजी स्वतःची सुटकाही करून घेता येईना. वेळी-अवळी त्यांच्या कवितेतले चरण आठवू लागले, त्यांतील प्रतिमा दिसू लागल्या... असा या प्रतिमांनी छळ मांडला. - आणि या छळवादातूनच तोवर दुर्बोध वाटलेल्या काही कविता अकल्पितपणे उलगडत गेल्या; संपूर्णपणे नव्हे, तर काहीशा. संपूर्ण उलगडा होण्यासाठी बरेच काही करावे लागले- खूप वाचावे लागले, स्वतःशीच वाद घालावा लागला, विचरपूर्वक मांडलेला व्यूह विस्कटून टाकावा लागला, नव्याने मांडणी करावी लागली, असे बरेच काही. यातून ज्या कवितांचा समाधानकारक अर्थ लागतगेला, त्यांच्यावर लिहीत गेलो. ... अजूनही काही कविता छळताहेतच. त्या केंव्हा प्रसन्न होतील ते पहायचे!" [][पॄ. १६६-१६७]

'पिपांत मेले ओल्या उंदिर' ही मर्ढेकरांची कविता फार गाजली. तीच्यावर अनेकांनी भाष्ये केली. स्वतः धोण्डांनीसुद्धा ऑगस्ट १९६७ च्या सत्यकथा अंकात एकनिरुपणात्मक लेख लिहला होता पण त्यांना स्वतःलाच त्यांचं 'ईंटरप्रिटेशन' बोचत राहिलं पुढे १९९३ मध्ये एका [दुसर्‍याच विषयावरच्या] लेखांत रॉबर्ट बर्न्स [१७५९-१७९६] च्या एका कवितेतल्या काही पंक्ती लेखकाने उद्ढृत केल्या होत्या. त्यांतल्या 'माईस अ‍ॅण्ड मेन' ह्या शब्दांच्या जोडीने त्यांचं लक्ष वेधून घेतलं. त्यावरून त्याना जॉन स्टाइनबेकच्या १९४० च्या सुमारास वाचलेल्या 'ऑफ माईस अ‍ॅण्ड मेन' ह्या कादंबरीची आठवण झाली. मग त्यानी बर्न्सचा कवितासंग्रह आणि स्टाइनबेकची ती कादंबरी मिळवली. त्यांच्यावरून सुरू झालेल्या विचार-शृंखलेतून त्यांना 'पिपात मेले ओल्या उंदिर' चा जो नवा अर्थ गवसला, तो अगदीच वेगळा होता. त्यावर त्यांनी १९९४ मधे 'पुन्हा एकदा पिपांत मेले' ह्या शीर्षकाचा लेख लिहला. ते दोन्ही लेख 'तरीहि येतो वास फुलांना!' ह्या पुस्तकांत वाचायला मिळतात!

मर्ढेकरांच्या काही 'दुर्बोध' कवितांना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे संदर्भ आहेत. पहिले आणि दुसरे महायुद्ध, ब्रम्हदेशावरील जपानी आक्रमण, कोरियातील युद्ध, आसाम मधला भूकंप यांसारख्या घटनांचे संदर्भ काही प्रतिमांना आहेत. हे लक्षात न आल्यामुळे, त्या देव आणि भक्त, शहरी धावपळ आणि ग्रामीण संथ जीवन, यंत्रयुग आणि मानव, यांसारख्या भलभलत्या संदर्भात वाचल्या गेल्या. मर्ढेकरांना अभिप्रेत असली संदर्भ शोधण्याकरता धोण्डांनी घेतलेले परीश्रम थक्क करणारे आहेत.

मर्ढेकरांच्या कवितेत एकीकडे वाचकाला झपाटून टाकण्याचं सौंदर्य आणि सामर्थ्य असलेल्या प्रतिमा आहेत तर दुसरीकडे दुर्बोधताही आहे. त्या तथाकतित 'दुर्बोध' कवितांचा अर्थ लावताना मर्ढेकरांच्या व्यक्तिगत जीवनातले चढ-उतार, त्यांच्या भावविश्वावर झालेले आघात इत्यादिंचा अभ्यास आणि विचार आधार-साधने म्हणून करायचा का असा प्रश्न म.वा.धोण्डांनाही पडला होता. याच मार्गाने जाऊन त्यांना सहा कवितांचा अर्थ उलगडता आला. त्यासंदर्भात ते म्हणतात, " कवीच्या वैयक्तिक जीवनाच्या संदर्भात कविता वाचणे, हे अनेक समीक्षकांना गैर वाटते. कविता ही स्वतंत्र आणि स्वयंभू कलाकृती मानूनच तिचा आस्वाद घ्यावा, असे ते म्हणतात. मलाही त्यांचे म्हणणे पटते... कवीचे वैयक्तिक जीवन सर्वज्ञात नसते आणि ते जाणून घेण्याच्या खटपटीत वाचक कवितेपासून दूर दूर जाण्याचा धोका असतो. परंतु, कवितेला भेटण्याचे सर्वच राजमार्ग खुंटतात, तेंव्हा असे आडमार्गाला वळणे प्राप्तच होते. ते गैर असेल तर त्याला कारण खुद्द कवीच. त्यांनीच जर स्वतःच्या वैयक्तिक जीवनाच्या संदर्भात कविता लिहिली नाही, तर वाचकालाही या आडमार्गाला लागण्याची पाळी येणार नाही."[] [पॄ.१७१].

मर्ढेकरांच्या हयातीत त्यांच्या कवितेतील दुर्बोधतेवर बरीच टीका झाली होती पण त्या टीकेला त्यांनी कधीच उत्तर दिले नाही. मात्र त्यांच्या काही कवितांवर अश्लीलतेचा आरोप ठेवून त्यांच्यावर मोरारजीभाईंच्या मुंबई सरकारने खटला गुदरला होता [आज आपल्याला वाटते की हा एक मोठ्ठाच विनोद होता पण [ व्यक्तिगतमत ]मर्ढेकरांना त्या दिव्यांतून बाहेर पडताना तीन-चार वर्षे अतोनात मनःस्ताप झाला, न झेपणारी आर्थिक झळ सोसावी लागली, आकाशवाणीसारख्या सरकारी खात्यांतल्या नोकरीतही त्यांचा भरपूर छळ झाला, त्यातून ते शरीराने आणि मनानेही खचले.[ संदर्भ हवा ]] त्यावेळी नाईलाजाने मर्ढेकरांना चार-पाच कवितांचे अर्थ स्पष्ट करावे लागले होते. तेवढा एकुलता एक अपवाद वगळता, मर्ढेकरांनी त्यांच्या कवितेवर निरूपण कधीच केलं नाही. श्री. पु. भागवतांनी लिहून ठेवलेल्या एका आठवणीत म्हटले आहे, " .. एकदा गप्पा मारताना मी त्यांना विचारले, 'तुमची 'झोपली ग खुळी बालके' ही कविता मला नीटशी कळली नाही. ती कशाबद्दल आहे? ते म्हणाले, 'देन द पोएम डझ नॉट एक्झिस्ट फॉर यू अ‍ॅट ऑल'."

मर्ढेकरांच्या नितंत सुंदर परंतु दुर्बोध कवितांचे अर्थ समजण्यासाठी आणि त्यांचा आस्वाद घेण्यासाठी म.वा.धोण्डांचं पुस्तक अत्यंत उपयुक्त आहे, हे तर झालंच. पण त्या पुढे जाऊन, संशोधक समीक्षकाला किती कष्ट घ्यावे लागतात, किती विविध अंगांनी कलाकृतीचा वेध घ्यावा लागतो याचं यथार्थ दर्शन आपल्याला घडतं. हे साध्य करण्यासाठी प्रकांड विद्वता, व्यासंग, चौफेर वाचन तर हवंच ; पण संशोधकाला 'खूळ' लागल्याशिवाय त्याच्या हातून असं काम पार पडत नाही, हेही आपल्या मनावर ठसतं.[ व्यक्तिगतमत ]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ विकिपीडिया:तटस्थ दृष्टीकोन
  2. ^ a b c 'तरीहि येतो वास फुलांना' (प्रकाशक: राजहंस प्रकाशन (पुणे) १९९९)

नोंदी

[संपादन]