केविन कार्टर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
केविन कार्टर

छायाचित्र सौजन्य: रिबेका हियरफिल्ड
पूर्ण नावकेविन कार्टर
जन्म १३ सप्टेंबर १९६०
जोहान्सबर्ग,दक्षिण आफ्रिका
मृत्यू २७ जुलै १९९४
जोहन्सबर्ग, दक्षिण आफ्रिका
कार्यक्षेत्र छायाचित्रकार, पत्रकार

केविन कार्टर (१३ सप्टेंबर १९६० - २७ जुलै १९९४) हे एक दक्षिण आफ्रिकी पत्रकार आणि छायाचित्रकार होते. तसेच ते बॅंग-बॅंग क्लब या छायाचित्रकारांच्या गटाचे सभासद देखील होते. १९९४ साली सुदान मध्ये पडलेला दुष्काळ दर्शवणाऱ्या त्यांच्या छायाचित्रासाठी  त्यांना पुलित्झर पुरस्कार मिळाला होता. २७ जुलै १९९४ रोजी वयाच्या ३३ व्या वर्षी त्यांनी आत्महत्या केली. त्यांच्या आयुष्यावर आधारीत असलेला, स्टीव्हन सिल्व्हर या दिग्दर्शकाचा, द बॅंग-बॅंग क्लब हा इंग्रजी चित्रपट, २०१० साली प्रदर्शित झाला, ज्यामध्ये टेलर किट्श या अभिनेत्याने केविन यांची भूमिका केली होती. [१]

पूर्वायुष्य[संपादन]

केविन कार्टर यांचा जन्म दक्षिण आफ्रिकेच्या जोहान्सबर्ग या शहरात, एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. ते एका श्वेतवर्णीयांच्या वस्तीमध्ये रहात असंत, जेथे इतर वर्णाच्या लोकांनी राहणे, बेकायदेशीर होते. अश्या वस्त्यांमध्ये राहणाऱ्या कृष्णवर्णीयांवर पोलिस सतत छापे घालत असत. लहान वयातच अशा अनुभवांतून गेलेले केविन पुढे प्रसिद्ध झाल्यानंतर एकदा असे म्हणाले होते की "मला कायम प्रश्न पडायचा, की इतर बाबतीत उदारमतवादी असणारे माझे कॅथलिक पालक, अशा वर्णभेदी धोरणांच्या बाबतीतच इतके निरुत्साही का?"

माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी औषधनिर्माणशास्त्राचे प्रशिक्षण घेतले, ते पूर्ण केल्यानंतर दक्षिण आफ्रिकी कायद्यानुसार त्यांना लष्करामध्ये भरती व्हावे लागले. पायदळाची नावड असल्यामुळे ते वायुदलामध्ये भरती झाले, जेथे त्यांनी एकूण चार वर्ष सेवा दिली. १९८० मध्ये लष्कराच्या भोजनगृहामध्ये बसलेले असताना, त्यांनी आपल्याच सैनिकांना एका कृष्णवर्णीय वाढप्याचा अपमान करताना पाहिले. केविन यांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता, सैनिकांनी त्यांनाच बेदम मारहाण केली. अशा वातावरणाला कंटाळून ते लष्करातून पळून गेले. नवे आयुष्य सुरू करण्याच्या हेतूने त्यांनी डेव्हिड या नावाने रेडिओ उद्घोषकाची नोकरी स्विकारली. परंतु ती जमत नसल्याने तेथूनही बाहेर पडले, आणि लष्कराची उरलेली सेवा करायला सुरुवात केली. १९८३ साली प्रिटोरियाच्या चर्च स्ट्रीट नावच्या रस्त्यावर झालेला बॉंबस्फोट पाहून त्यांनी पत्रकार आणि छायाचित्रकार होण्याचे ठरवले . [२]

आधीचे काम[संपादन]

१९८३ मध्ये कार्टर यांनी क्रीडा-छायाचित्रकार म्हणून काम सुरू केले. पुढे १९८४ मध्ये त्यांना दक्षीण-आफ्रीकेच्या द स्टार या वृत्तपत्रामध्ये छायाचित्रकाराची नोकरी मिळाली. या नोकरीदरम्यान, त्यांनी दक्षीण आफ्रीकेच्या वर्णभेदी कायद्याचा क्रूरपणा, छायाचित्रांच्या माध्यमातून लोकांसमोर आणला.

१९८० च्या दशकात दक्षीण आफ्रीकेमध्ये नेकलेसिंग नावाची जाहीर मृत्यूदंडाची प्रथा उदयाला आली होती, ही शिक्षा बेकायदेशिररित्या कोर्टाच्या बाहेर सुनावली जात असे. अशा जाहीर मृत्यूदंडाचे छायाचित्र घेणारा पहिला छायाचित्रकार म्हणून केविन कार्टर ओळखले जातात. आपल्या छायाचित्रांविषयी बोलताना एकदा केविन म्हणाले होते, "त्या लोकांचे क्रौय पाहून मी स्तब्ध झालो होतो, परंतु नंतर या छायाचित्रांमुळे किमान अशा विषयांवर चर्चा तरी सुरू झाल्या. त्यामुळे मला असं वाटतं की, अशा क्रूर घटणांचा साक्षीदार होणं, ही तितकीही वाईट गोष्ट नाही. "[३]

सुदान मधले पुरस्कार विजेते छायाचित्र[संपादन]

१९९३ च्या मार्च महिन्यामध्ये, सुदानच्या दौऱ्यावर गेले असताना, कुपोषणाने ग्रस्त झालेली एक लहान मुलगी, कार्टर यांना दिसली. ती मुलगी भुकेलेल्या अवस्थेमध्ये आहार वितरण केंद्राकडे खुरडत चालली होती, आणि अशा अवस्थेमध्ये एक गिधाड तीच्या मागावर होते. कार्टर यांनी या प्रसंगाचे छायाचित्र काढले, कारण तो त्यांच्या कामाचाच भाग होता. यानंतर ते तेथून निघून गेले. संसर्गजन्य रोग होउ नयेत म्हणून कोणत्याही मुलाला स्पर्ष न करण्याचा त्यांना आदेश होता. या छायाचित्राला पुलित्झर पुरस्कार मिळल्यानंतर तीन महिण्यांतच कार्टर यांनी आत्महत्या केली. [४]

द न्यू यॉर्क टाईम्स या वृत्तपत्राला विकलेले हे छायाचित्र, २६ मार्च १९९३ रोजी प्रथम प्रकाशित झाले. त्यानंतर ते जगभरातल्या बऱ्याच वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाले. शेकडो वाचकांनी वृत्तपत्राशी संपर्क साधून त्या मुली विषयी चौकशी केली. परंतू ती आहार केंद्रापर्यंत पोचली की नाही याची कोणतीही माहिती मिळू शकली नाही, वृत्तपत्राने तसे जाहीरही केले. १९९४ च्या एप्रिल महिण्यात या छायाचित्राला पुलित्झर पुरस्कार मिळाला. [४]

याच घटनेची वेगळी आवृत्ती[संपादन]

कार्टर सोबत सुदानला गेलेल्या होआव सिल्वा या दक्षीण आफ्रीकेत राहणाऱ्या, परंतू जन्माने पोर्तुगिज असलेल्या पत्रकाराने मात्र याच घटनेचे वेगळे वर्णन केलेले आहे. जपानच्या आकिओ फुजिवारा नावाच्या पत्रकार-लेखकाला दिलेल्या मुलाखती मध्ये सिल्वा यांनी हा वृत्तांत सांगितला. फुजिवारा यांनीच नंतर लिहिलेल्या "पोस्टकार्डांवर छापून आलेला मुलगा" (絵葉書にされた少年 -एहांनाकीनी सारेता शोअनेम्) [५] या पुस्तकामध्ये हे वर्णन आले आहे.

सिल्वा यांच्या म्हणण्यानुसार, कार्टर आणि सिल्वा, संयुक्त राष्ट्र संघाच्या एका हवाई मदतकार्यामध्ये सहभागी झाले होते. या कार्याअंतर्गत ते ११ मार्च १९९४ रोजी दक्षीण सुदानच्या एका खेड्यामध्ये उतरले. संयुक्त राष्ट्र संघाकडून त्यांना असे सांगण्यात आले होते, की ३० मिनिटात येथील लोकांना खाद्यपदार्थांचे वितरण करून, त्यांचे विमान येथून जाणार आहे. हे ऐकून सर्व छायाचित्रकार पटापट छायाचित्रे काढण्यासाठी आजूबाजूला पसरले. आणि संयुक्त राष्ट्र संघाचे कर्मचारी मक्याचे धान्य वितरीत करू लागले. ते धान्य घेण्यासाठी खेड्यातील स्त्रीया आपापल्या घरांमधून बाहेर येऊ लागल्या. सिल्वा यांना सुदानी बंडखोरांची छायाचित्रे काढायची असल्याने ते त्यांना शोधू लागले, परंतू कार्टर विमानाच्या आसपासच घुटमळत होते.

याच घटणेचे वर्णन करताना सिल्वा पुढे म्हणाले, दुष्काळाचे खरे स्वरूप पहिल्यांदाच पहात असल्याने कार्टरना बराच धक्का बसला होता. त्यामुळे ते फक्त दुष्काळग्रस्त मुलांचीच छायाचित्रे काढत होते. यानंतर सिल्वांनीही मुलांची छायाचित्रे काढायला सुरुवात केली, ज्यामध्ये अनेक रडणाऱ्या मुलांची छायाचित्रे होती. ही छायाचित्रे कधीही प्रकाशीत केली गेली नाहीत. या मुलांचे पालक धान्य घेण्यात मग्न असल्याने त्यांचे मुलांकडे थोडे दुर्लक्षच झाले होते. कार्टर यांच्या छायाचित्रातील मुलगी सुद्धा याच मुलांमधलीच एक होती. जेव्हा गिधाड, त्या मुलीच्या मागे उतरले, कार्टर सावकाश तिच्या जवळ गेले. त्यांना मुलगी व गिधाड दोघेही एकाच चौकटीमध्ये घ्यायचे होते. गिधाड घाबरून उडून जाऊ नये म्हणून, त्यांनी साधारण १० मीटर अंतरावरून त्यांचे छायाचित्र काढले. त्यानंतर त्यांनी आणखीही काही छायाचित्रे काढली, आणि त्या गिधाडाला उडवून लावले.

साधारण त्याच वेळी, होजे मारिया लुइ आरेंझाना आणि लुइ दा विला या नावांचे दोन स्पॅनिश पत्रकार सुद्धा त्याच परिसरामध्ये होते. त्यांना कार्टरच्या छायाचित्राविषयी काहीही माहित नव्हते, त्यांनीही या प्रसंगाचे छायाचित्र घेउन ठेवले आहे. यानंतरही बऱ्याच प्रसंगामध्ये असे सांगितले गेले आहे, की प्रत्यक्ष्यात ते आहार वितरण केंद्र असल्याने बाजूच्या उकिरड्यावरून तेथे गिधाडे गोळा झाली होती.

मृत्यू[संपादन]

२७ जुलै १९९४ रोजी कार्टर आपल्या गाडीमध्ये बसून, जोहान्सबर्ग जवळच्याच पार्कमोर नावाच्या उपनगरामध्ये गेले, येथीलच अभ्यास केंद्राच्या आसपासच्या परिसरामध्ये त्यांचे बालपण गेले होते. येथेच त्यांनी गाडीचा धूर नळीच्या सहाय्याने गाडीच्या आतमध्ये सोडला, आणि स्वतः आतमध्ये बसून गाडी बंद केली. यातच त्यांचा मृत्यू झाला, कार्बन मोनॉक्साईडची विषबाधा हे त्यांच्या मृत्यूचे कारण ठरले. मृत्यूसमयी त्यांचे वय ३३ वर्षांचे होते. आत्महत्येपूर्वी त्यांनी मागे ठेवलेल्या चिठ्ठीच्या काही भागाचे भाषांतर पुढील प्रमाणे;

"मी मनापासून क्षमा मागतो. जगण्याची वेदनाच इतकी आहे की आनंदाचा अंश सुद्धा शिल्लक नाही...मी खिन्न आहे...माझ्याजवळ टेलीफोन नाही...घरभाडे देण्यासाठी पैसा नाही...मुलांबाळांसाठी पैसा नाही...कर्ज फेडण्यासाठीही नाही...पैसा!!! आत्तापर्यंतच्या सगळ्या आठवणींची चित्रे माझ्या डोळ्यासमोर स्पष्टपणे तरळत आहेत, नरसंहारांची, प्रेतांची, भुकेल्या मुलांच्या राग-लोभ-यातनांची, त्यांच्या जखमांची, बंदुकीचा चाप ओढण्यास सदैव तयार असलेल्या माथेफिरूंची, पोलिसांची, खूनी-जल्लादांची... मी चाललो आहे, माझ्या नशिबात असेलच तर माझी केनशी भेट होइल" [४]

इतर सांस्कृतिक संदर्भ[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ a b द बॅंग-बॅंग क्लब (चित्रपट), दिग्दर्शक:स्टीव्हन सिल्व्हर, साल: २०१० The Bang-Bang club
  2. ^ द बॅंग-बॅंग क्लब (पुस्तक), लेखक: ग्रेग मारिनोविच आणि होआव सिल्वा, साल: २००० The Bang-Bang club
  3. ^ लेखक: टिम पोर्टर Covering war in a free society Archived 2015-07-16 at the Wayback Machine.
  4. ^ a b c टाईम साप्ताहिक, दिनांक: १२ सप्टेंबर १९९४, खंड: १४४, अंक: ११, लेखक: स्कॉट मॅकलॉईड The Life and Death of Kevin Carter
  5. ^ पोस्टकार्डांवर छापून आलेला मुलगा, लेखक: आकिओ फुजिवारा, साल: २०१० 絵葉書にされた少年
  6. ^ द लाईफ ऑफ केविन कार्टर: कॉजॅलिटी ऑफ द बॅंग-बॅंग क्लब (माहितीपट), दिग्दर्शक: डॅन क्राऊस [१]
  7. ^ केविन कार्टर (गाणे), संगीतकार: मॅनिक स्ट्रीट प्रीचर्स, साल: १९९६ एव्हरीथिंग मस्ट गो
  8. ^ केविन कार्टर (गाणे), संगीतकार: बॅंड ऑफ एंजल्स, साल: १९९६ बॅंड ऑफ एंजल्स
  9. ^ पोएट्स ॲंड मॅडमेन (गाणे), संगीतकार: सव्हाटेज, साल: २००१ सव्हाटेज
  10. ^ हाऊस ऑफ लीव्हज् (पुस्तक), लेखक: मार्क डॅनियेलवस्की, साल: २००० हाऊस ऑफ लीव्हज्
  11. ^ द डिस्टन्स बिटवीन अस (पुस्तक), लेखिका: माशा हॅमिल्टन, साल: २००४ द डिस्टन्स बिटवीन अस
  12. ^ स्टिल इन रोम (गाणे), संगीतकार: ब्लिंकर द स्टार, साल: २००१ स्टिल इन रोम