एकनाथ आवाड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
एकनाथ आवाड
टोपणनाव: जीजा
जन्म: १९ जानेवारी १९५६ (1956-01-19)
मृत्यू: २५ मे, २०१५ (वय ५९)
हैदराबाद
धर्म: नवयान बौद्ध धर्म
प्रभाव: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
वडील: दगडू आवाड
आई: भागूबाई आवाड


एकनाथ दगडू आवाड (१९ जानेवारी १९५६ - २५ मे २०१५) हे दलित चळवळीचे नेते आणि मानवी हक्क अभियानाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. चळवळीत त्यांना जीजा नावाने ओळखले जाते. आवाडांचा जन्म १९५० किंवा १९५१ साली बीड जिल्ह्यातल्या वडवणी तालुक्यातील दुकडेगावातील (डुकरेगाव) एका गरीब मातंग समाजात झाला. त्यांचे कुटुंब पोतराज होते. एकनाथांच्या वडिलांचे नाव दगडू तर आईचे भागूबाई होते. शिक्षकांनी शाळेत दाखल करताना १९ जानेवारी १९५६ ही तारीख लिहिल्यामुळे तीच त्यांची अधिकृत जन्मतारीख झाली. घरात खायला दाणा नाही, वडील मागून आणतील त्यावर गुजराण करावी लागे. एकनाथाने पोतराजच व्हावे अशी वडिलांची इच्छा होती, पण आईने कडाडून विरोध केल्याने त्यांना शाळेत जायला मिळाले. शाळेत मागच्या बाकावर बसूनच ते शिकले. आव्हाडांनी घर सोडले, अंगमेहनत करून पैसे मिळवले आणि शिक्षण घेतले.

शिक्षण व समाजकार्य[संपादन]

एकनाथ आवाड ऊर्फ जिजा (जीजा) यांचे शालेय शिक्षण लऊळ येथे झाले तर महविद्यालयीन शिक्षण बीड आणि अहमदनगर येथे झाले. अहमदनगर येथील कॉलेजातून त्यांनी एल्‌एल.बी. केले. ते एकीकडे एम.एस.डब्ल्यू. झाले आणि दु्सरीकडे वकीलही झाले.

वडिलांचे केस कापून आवाड यांनी पोतराज प्रथेवर पहिला घाव घातला. घरातूनच संघर्ष सुरू करून त्‍यांनी पोतराजाच्या प्रथेतून शंभराहून अधिक कुटुंबांची सुटका केली.

शिकत असतानाच एकनाथ आव्हाड विद्यार्थी चळवळीत उतरले, विवेक पंडित यांच्या ’विधायक संसद’ नावाच्या युवकांच्या संघटनेत गेले आणि अस्पश्यता आणि जातिभेद यांविरुद्ध त्यांनी रान पेटवले. त्‍यांनी १९८० पासून वेठबिगार, पोतराज आदी प्रथांविरुद्ध लढा देणे सुरू केले; भूमिहीन दलितांना गायरान जमिनी ताब्यात घेऊन कसायची हिंमत दिली. त्यासाठी गायरान परिषदा घेतल्या. भूमिहीन महिलांचे त्यांनी बचत गट स्थापले. सावित्रीबाई फुले म्युच्युअल बेनिफिट ट्रस्ट स्थापून महिलांना पतपुरवठा केला. मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांत या ट्रस्टचे काम चालते. २०१५सालापर्यंत या ट्रस्टची उलाढाल दहा कोटी रुपयांवर पोचली होती.

१९९० साली त्यांनी मानवी हक्क अभियानाला सुरुवात केली. संगम नावाच्या गावात त्यांनी मानवी हक्क अभियान संघटनेची शाखा स्थापन केली.

२००१ साली युनोने आयोजित केलेल्या वंशभेदाविरोधातील परिषदेला आव्हाडांनी हजेरी लावली. भारतात अजून जातिभेद नष्ट झाला नाही असे त्यांनी तेथे प्रतिपादन केले. पुढे जिनिव्हा येथील मानवी हक्क संरक्षण संमेलनातही आव्हाडांनी ’जातिप्रथेला हद्दपार करण्याची’ त्यांची भूमिका आग्रहाने मांडली. त्यांनी उर्वरित सर्व आयुष्य चळवळीसाठी वाहिले.

'मानवी हक्क अभियान' या चळवळीच्या माध्यमातून आवाड यांनी मराठवाड्यातील सुमारे पन्नास हजार दलितांच्या जमिनी वाचविल्या. त्यांच्या या अभियानामुळे दलितांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक व सामाजिक स्वातंत्र्य मिळाले. गुलामीची प्रतीके असलेली गावकीची कामे दलितांनी सोडावीत आणि आत्मसन्मानाने जगावे हा आवाडांच्या चळवळींचा उद्देश होता. त्यासाठी त्यांनी सतत संघर्ष केला. या संघर्षातूनच 'जग बदल घालुनि घाव' हे त्यांचे आत्मकथन जन्माला आले. त्यांचे हे पुस्तक दलित चळवळीसाठी मार्गदर्शक ठरले आहे.

१९१५साली आवाड यांनी बहुजन समाज पक्षाच्या उमेदवारीवर उस्मानाबाद मतदार संघांतून प्निवडणूक लढवली होती. यातूनच त्यांचा माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांच्याश्वी संघर्ष वाढला.

पीएच.डी.चा विषय[संपादन]

एकनाथ आवाड यांच्या कामावर वेगवेगख्या संशोधकांनी ५ पुस्तके लिहिली आहेत. २७ जणांनी त्यांच्या कार्यावर पीएच.डी.साठी प्रबंध लिहिले आहेत.[ संदर्भ हवा ]

धर्मांतर[संपादन]

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर विश्वास असलेल्या एकनाथ आवाडांनी यांनी २ ऑक्टोबर २००६ रोजी नवयान बौद्ध धम्माचा स्वीकार करून अनेकांना बौद्ध धम्मात आणण्याचे काम केले. त्यासोबतच पारधी आणि इतर गुन्हेगारी जमात असा ठपका असलेल्या जातीतील कुटुंबाना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणले. दलित समाजातील अनेक जातीच्या लोकांना बौद्ध धम्माकडे वळण्याचे आवाहन ते करत होते.

निधन[संपादन]

सोमवार दि. २५ मे २०१५ रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास त्यांचे हैदराबाद येथे पोटातील अल्सरच्या दुखण्याने आव्हाडांचे निधन झाले.[१] मृत्युसमयी त्यांचे वय ६० होते. त्याच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली व पत्‍नी असा परिवार आहे.

लेखन[संपादन]

  • एकनाथ आवाड यांनी ’जग बदल घालुनि घाव’ या नावाचे आत्मकथनात्मक पुस्तक लिहिले आहे.

संदर्भ[संपादन]