फासेपारधी
फासेपारधी, पारधी हे एका आदिवासी जमातीचे नाव असून या जमातीचे लोक वन्यप्राण्यांची व पक्षांची शिकार करून त्यांचा खाद्य आणि विक्रीसाठी उपयोग करून जगत. आजही भारताच्या काही राज्यात फासेपारधी शिकार करण्याचे आपले परंपरागत काम करतांना दिसतात.
इंग्रजांच्या राज्यात विविध भटक्या जमातींना गुन्हेगार जमाती कायदा १८७१ नुसार गुन्हेगार ठरविण्यात आले होते. तेव्हापासुन आजतागायत या जमातींवरचा हा अन्यायकारक ठपका पुसल्या गेलेला नाही.[ संदर्भ हवा ]
फासेपारधी जरी वन्यप्राण्यांची व पक्ष्यांची शिकार करीत असले तरीही त्यांच्या शिकारीचे काही नियम आहेत जे पक्षांची संख्या कमी होऊ देत नाही असे दिसुन आले आहे. उदा.[१] पक्षांच्या कमी होत असलेल्या संख्येमुळे फासेपारधी शिकार सोडुन इतर व्यवसाय करू लागले आहेत.
"फासे पारधी" समाज हा भारतातील जंगलात शिकारी करून जगणाऱ्या समाजापैकी एक विशिष्ट समाज आहे.पारधी समाज हा आदिवासी आहे. इंग्रजांनी भारतातील जंगलातून शिकारींवर मोठ्या प्रमाणावर बंदी घालून जंगलाबाहेर काढलेला हा समाज, भारताच्या ग्रामीण भागाने मुख्य प्रवाहात सामील करून न घेतल्यामुळे, उपजीविकेसाठी गुन्हेगारीच्या मार्गास लागला. इंग्रजांनी विशेष कायदा करून त्यांना जन्मजात गुन्हेगारी जमात हा ठसा मारला. इंग्रजांच्या काळात त्यांच्याकडून दिवसा शासकीय वेठबिगारी कामे करून घेतली जात आणि रात्री कडा पहारा ठेवून त्यांना वस्तीबाहेर पडण्यास पूर्ण बंदी घातलेली असे. स्वातंत्र्यानंतर जवाहरलाल नेहरूंनी आदिवासींना जन्मजात गुन्हेगार ठेवणारे कायदे बंद करून त्यांचा अनुसूचित जमाती जमातीत समावेश केला. कागदोपत्री त्यांच्याकरता बऱ्याच योजना राबवल्या जाऊनही पोलीस आणि समाजाने त्यांना मुख्य प्रवाहात व्यवस्थितपणे सामावून घेतले नाही. बहुसंख्य पारधी समाज भटका असल्यामुळे मतदारयादीतील नोंदणी, रेशनकार्ड आणि त्यापरत्वे मिळणाऱ्या शासकीय सुविधंपासून आणि शिक्षणापासून वंचित रहात आला आहे. अनुसूचित जमाती जातिबांधवांचे पारधी समाज हे एक अंग आहे. त्या समूहात ५४ जमाती, जवळपास पावणेदोनशे पोटजमाती आणि त्यांच्यात सामावलेला सुमारे दोन-अडीच कोटींचा जनसमूह आहे.[२]
संस्कृती आणि इतिहास
[संपादन]ब्रिटिशांनी १८७१ साली एक कायदा करून भटक्यांच्या काही जातींना जन्मजात गुन्हेगार ठरवले. मुंबई इलाख्यात ५२ सेटलमेंट्स होती. सेटलमेंट म्हणजे गुन्हेगार मानलेल्या जमातींच्या वसाहती. ही सेटलमेंट्स खुली असली तरी तो एक प्रकारचा तुरुंग होता. त्या तुरुंगाचे नियम जाचक होते. या जेलमध्ये जन्मलेल्या बाळालाही ते नियम बंधनकारक असत. सेटलमेंट्समध्ये रोज सकाळी व संध्याकाळी हजेरी असायची. पुन्हा रात्री-बेरात्री पोलीस झोपडीत येऊन पांघरूण ओढून माणसे बघून जात. झोपलेल्यांना पोलीस कधीही उठवत. रोज सकाळी मोजदाद करून बाहेर कामावर सोडले जाई. इतर गावी जायचे असल्यास व्यवस्थापनाची परवानगी घेणे अनिवार्य होते. ज्या गावात जायचे तिथल्या पाटलाला व्यवस्थापकाने दिलेला पास द्यावा लागायचा. परतताना पाटलाकडून पास घेऊन येणे बंधनकारक होते.[३]
देश स्वतंत्र झाल्यानंतरही या सेटलमेंट तशाच होत्या. स्वातंत्र्यानंतरसुद्धा गुन्हेगार जमाती कायद्यानुसार हे लोक पोलिसांकडे हजेरीला जात होते. ‘गुन्हेगार’ ही ओळख तशीच होती. भीमराव जाधवांसारखे कार्यकर्ते त्या काळापासून प्रयत्नशील होते. त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री बाळासाहेब खेरांकडे निवेदनेही दिली होती. १९४५ साली पुण्यात काँग्रेसचे अधिवेशन झाले. गुन्हेगार जमातींना अनुसूचित जमातींमध्ये समाविष्ट करण्याचा ठराव झाला; पण काँग्रेस मंत्रिमंडळ याबाबत काहीच हालचाल करत नव्हते. १९४८ साली बाळासाहेब खेरांनी मुंबईत भीमराव जाधवांची पंडित नेहरूंशी भेट घडवून आणली. कर्मवीर भाऊराव पाटील, बोधक नगरकर व स्वतः भीमराव जाधव नेहरूंना भेटले. भेटीनंतर नेहरू स्वतः सोलापूरला आले.
सेटलमेंटसमोरच्या मैदानात मोठी सभा झाली, आणि तारेच्या कुंपणातून गुन्हेगार जमाती मुक्त झाल्याचे पंडितजींनी जाहीर केले. या जमातींना ‘विमुक्त’ हे विशेषण तेव्हापासूनच लावले जाते. म्हणून ३१ ऑगस्ट १९५२ हा दिवस पूर्वाश्रमीच्या गुन्हेगार मानलेल्या जमातींसाठी खरा स्वातंत्र्यदिन मानला जातो. ब्रिटिशांनी केलेला कायदा बाद झाला खरा, पण त्याऐवजी ‘हॅबिच्युअल ऑफेंडर्स अॅक्ट’ (सराईत गुन्हेगार कायदा) लागू झाला. पूर्वीचा कायदा संपूर्ण ‘जमातींना’ गुन्हेगार ठरवणारा होता. नंतरचा केवळ ‘व्यक्तींना’ लागू झाला. पण या व्यक्तीही कमी-अधिक फरकाने विशिष्ट जमातीच्याच होत्या. शिवाय पूर्वी ब्रिटिशांनी त्यांच्या कायद्यात या जमातींना काही सवलती दिल्या होत्या, त्या भारत सरकारने जुन्या कायद्यासोबत रद्दबातल ठरवल्या. उदा. सोलापूरच्या कापड गिरणीत या जमातींना रोजगारासाठी सवलत होती ती गेली. भारत सरकारने या जमातींच्या पुनर्वसनासाठी भरीव काहीही केले नाही. त्यामुळे आगीतून फुफाट्यात पडल्यासारखे झाले. त्यांच्या उपेक्षित जीवनाची गुंतागुंत स्वातंत्र्यानंतर अधिकच वाढली. कारण अपेक्षाही उंचावल्या होत्या. पूर्वी परकीयांनी कुंपण घातले होते. आता स्वकीयांचे कुंपण शेत खाऊ लागले.
पारध्यांमधले गट
[संपादन]पारधी समाजातील गावपारधी या पोट जातीमधे अजून उपप्रकार पडतात. त्यामध्ये कोरब, खोडियार, चावंड, डाभी, पिपळाज, विसोत, हरखत असे उपप्रकार आहेत. गावपारधी यांच्यातील
देवाचा कार्यक्रम ३ ते ६ दिवस चालतो. देवाच्या कायक्रमाला उभारलेल्या मंडपाला पाल असे म्हनतात, तर कार्यक्रमाला 'जोहरण' असे म्हंटले जातेे. प्रत्येक पोटजातीचे वेगवेगळे देवघर असते, त्यात चांदीची,अथवा इतर धातूंची देवदेवतांची प्रतिमा असलेली धातूंचे पत्रे ठेवलेले असतात, असे पत्रे देवघरात बांधून ठेवलेले असतात त्याला पारधी भाषेत तरांगड म्हणतात. पूजेच्या वेळी अथवा नवरात्रीत पूजा वेळी ते पत्रे उतरवून भक्तिभावाने पूजा केली जाते. प्रत्येक पोटजातीच्या देवघराप्रमाणेच त्यांच्या कुलदेवीनुसार एक किंवा दोन भगत असतात. डोक्यावर पांढऱ्या रंगाचे फेटा बांधलेले भगत आपल्याला बहुतांशी पारधी समाजात पाहायला मिळतात. हे भगत देवपूजक असून जादूटोणा, भूतबाधा उतरविण्याची प्रसिद्धी करणाऱ्या इतर भगतांप्रमाणे कुठलीही भोंदूगिरी करीत नाहीत.
पारधी आडनावे
[संपादन]- भोसले(राठोड):- सिसोदिया,सूर्यवंशी
- चव्हाण :- चामळ्या, पिंजाऱ्या, काठोक्या, मधल्या, बहात्तर महाल्या, कटक्या, लेंढावाला, लहान बाळ (?), वाघलावाला, दुल्लावाला, बताफा दखन्या, कावळ्या
- दाभाडे :- दाभाडे, शेल्या, उखाया, ठेंगावाला, उमतावाला
- डाबेराव:-कुवारे
- पवार :- कुमाऱ्या, नवापुऱ्या, नेमाळ्या, भरगळ्या, कलतीखाया, दुधया, शेले
- माळे, शिसव, शिसोदे :- मालपुऱ्या
- शिंदे :- मालपुऱ्या
- साळुंके:-वडाऱ्या, मावया, नवापुऱ्या, पालपुऱ्या, सातचारण्या, कटक्या, वांदरहिय्या, गोधाया
- सूर्यवंशी :- उखाया
- सोनवणे :- भाल्या, सातचारण्या
- पोट प्रकार :- १ अंब्रुसकर २ महाले ३ बोरसे ४ मावया (मावळा) ५ कुमाऱ्या, ६ शेल्या, ७ नवापुऱ्या, ८ नेमाळ्या, ९ भरगळ्या, १० कलतीखाया, ११ दुधया
पारधी समाजाची देवस्थाने
[संपादन]१ तुळजाभवानी (नवकोड) :- तुळजापूर ( महाराष्ट्र)
२ईखई माता :- सिराजगड
३ सप्तशृंगी माता :- वणीगड (नाशिकजवळ)
४ पावापती :- पावागड (गुजरात)
५ मेलडी :- मईलागड
६ चोकटी :- हिमालय पर्वत
७ खोडीयार माँ:- माटेल (गुजरात)
८ माहेला :- बिकानेर
९ मवाय साहेब :- अहमदाबाद
१० माऊली :- दहेगाव
११ खखत :- देवमोगरा
प्रथा आणि परंपरा
[संपादन]पारधी लोक पश्चिम दिशेकडे पाय करून झोपणे टाळतात. परपुरुषाने पारधी महिलेला स्पर्श केल्यास ‘बाट झाला’ असे मानून स्त्रीला समाजाबाहेर काढणे अथवा वाळीत टाकण्याची शिक्षा पूर्वी दिली जात होती. पारधी स्त्रिचा प्रवासात परपुरुषाला साधा स्पर्श झाला तरी तिला जात पंचायत दोषी ठरवत होती.
घाणवट (गहाणवट) ही फासे पारधी समाजातील पद्धत अशी आहे, की कर्ज वगैरे घेतले असेल, तर जातीतच बायको गहाण ठेवायची. कर्ज फेडले, की तिला घरी परत न्यायचे. असे समाजाविषयी जाणीवपूर्वक गैरसमज पसरवणारे चित्रपट सुद्धा आलेले आहेत. [४]
गुन्हेगारी आणि सामाजिक परिवर्तन
[संपादन]हाल्या करणे किंवा जत्रा करणे
[संपादन]हाल्या करणे किंवा जत्रा करणे म्हणजे मोठे रेडकू किंवा बकरे मारणे. पारधी समाजात देवीचा नवस फेडायची ही एक रीत आहे. पारधी वस्तीजवळच्या टेकडीवर हाल्या करायला सगे-सोयरे जमतात. मारलेल्या प्राण्याचे मांस संपेपर्यंत दोन-चार दिवस कुणीच टेकडीखाली उतरत नाही. एकत्र येण्याचे-गाठीभेटीचे, सोयरीक जुळवण्याचे हे एक माध्यम. पण पोलीस यंत्रणा हाल्या करण्याच्या प्रथेला पारध्यांची गुन्ह्यांची नियोजन करण्याची रीत मानते. मोठ्या दरोड्याचे यश पारधी हाल्या करून साजरे करतात असे पोलिसांना वाटते. तसे ट्रेनिंगच त्यांना दिले जाते. ब्रिटिशांनी तयार केलेला अभ्यासक्रमच पोलिसांना आजही शिकवला जातो. त्यामुळे पोलिसही त्याच नजरेने यांच्याकडे पाहतात. अशा हाल्याच्या कार्यक्रमांवर ते लक्ष ठेवून असतात.[५]
पारधी समाजाची वसतीस्थाने
[संपादन]पारधी लोक ज्या जागेत रहातात त्या जागेस पाल असे म्हणतात [ चित्र हवे ].
महाराष्ट्रातील वस्त्यांची यादी आणि लोकसंख्या
[संपादन]- नांदेड , यवतमाळ, जालना, पुणे, नाशिक,नागपूर धुळे,सोलापूर,कोल्हापूर, नंदुरबार ,परभणी ,अकोला ,औरंगाबाद
- (तालुका : नांदगाव खंडेश्वर) [६]अमरावती जिला मध्ये एकूण 48 बेेेडे डी (उस्मानाबाद जिल्हा)[७]
- फणसवाडी (खारघर) [८]
- मजरा (रै.) गावठाण, टोला तालुका, वरोरा ७० उंबरठे असलेल्या या गावाची लोकसंख्या २३८(सन २००८) आहे. यातील ६८ कुटुंबे दारिद्ऱ्यरेषेखाली आहेत. गावात पुरुषांपेक्षा महिलांचे प्रमाण किंचित जास्त म्हणजे १२३ टक्के आहे.[९]
- मंगरूळ चव्हाळा,ता. नांदगाव खंडेश्वर (अमरावती जिल्हा)
- धुळे जिल्ह्यात तिन गाव आहेत, 1)आजनाळे, 2)हेंकळवाडी (सडगाव), 3)जामदे,
यातील काही पारधी समाज खानदेशात जळगाव, धुळे, अमळनेर, चोपडा, पारोळा, इत्यादी भागात वस्तीत राहतात जिल्हा वाशिम मालेगाव रिसोड़ शिरपुर रहतात
साहित्य आणि चित्रपट
[संपादन]- उपरा (कादंबरी) (लक्ष्मण माने)
- ३१ ऑगस्ट १९५२ : भटक्या विमुक्तांचा हुंकार (पुस्तक, लेखक - प्रशांत पवार, साकेत प्रकाशन) [१०]
- दैना (लेख, भास्कर भोसले) [११]
- पारधी (लेख, गिरीश प्रभुणे) [१२]
- पारधी समाज-लोकजीवन आणि लोकसंस्कृती (पुस्तक, लेखक - बाळासाहेब बाबुराव बळे)
- वकिल्या पारधी (लक्ष्मण गायकवाड)
- विंचवाचं तेल : पारधी समाजातील मी, माझी ही ज्वलंत जिंदगानी (सुनीता भोसले; शब्दांकन प्रशांत रूपवते)
संदर्भ
[संपादन]- ^ "फासेपारधी आणि तणमोर (in Marathi) | Vikalp Sangam". vikalpsangam.org. 2020-12-18 रोजी पाहिले.
- ^ जळणारे पारधी अन् कुलूपबंद संवेदना अरुण करमरकर, लोकसत्ता
- ^ नाल मारलेले, नाळ सुटलेले लोक Archived 2018-07-23 at the Wayback Machine. युनिक फीचर्ससंकेतस्थळाचे पान ९ ऑगस्ट २०११ रोजी रात्रौ ९ वाजता जसे दिसले
- ^ महाराष्ट्र टाइम्समधले पारध्यांवर बेतलेल्या 'घाणवट' चित्रपटाचे परीक्षण...' २५ जून २०११ Archived 2017-06-17 at the Wayback Machine. संकेतस्थळ दिनांक ९ ऑगस्ट रात्रौ ९.३० वाजता जसे दिसले
- ^ नाल मारलेले, नाळ सुटलेले लोक Archived 2018-07-23 at the Wayback Machine. युनिक फीचर्ससंकेतस्थळाचे पान ९ ऑगस्ट २०११ रोजी रात्रौ ९ वाजता जसे दिसले
- ^ http://newsportal.deshonnati.com/php/detailednews.php?id=AmarawatiEdition-7-1-23-10-2009-9f1f0&ndate=2009-10-23&editionname=amarawati[permanent dead link]
- ^ "संग्रहित प्रत". 2016-03-12 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-04-21 रोजी पाहिले.
- ^ http://72.78.249.107/esakal/20110713/4721381193606492784.htm[permanent dead link]
- ^ "संग्रहित प्रत". 2011-01-20 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-04-21 रोजी पाहिले.
- ^ http://www.loksatta.com/lokrang-news/marathi-book-review-17-1121910/
- ^ http://www.loksatta.com/vruthanta-news/daina-novel-21-edition-published-356247/
- ^ http://www.loksatta.com/balmaifalya-news/read-perfect-1051141/