Jump to content

आनंद कुंभार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

आनंद नागप्पा कुंभार (२७ मे, १९४१ - २८ नोव्हेंबर, २०१९) हे एक मराठी शिलालेख संशोधक, इतिहास अभ्यासक आणि शिलालेख वाचक होते.[] त्यांनी भीमा नदीसीना नदी संगमावरील हत्तरसंग येथील प्राचीन संगमेश्वर मंदिरात असलेला मराठी भाषेतील सर्वात जुना मानला गेलेला शिलालेख शोधून काढला.[]

कुंभार यांचे शिक्षण सोलापुरातील डी. एच. खजिनदार स्कूल, नगरपालिकेची शाळा व नाईट हायस्कूल अशा तीन शाळांत झाले. १९६० ते १९६४ या काळात ते भारतीय सैन्यदलाच्या तोफखान्यात बिनतारी संदेशांच्या देवाणघेवाणीचे काम करीत होते. १९६५ ते १९६९ या काळात त्यांनी सोलापूरमधील तत्कालीन खासगी वीज कंपनीत रोजंदारीवर मीटर रीडरचे काम केले. घरी पिढीजात कुंभारकला असल्याने ते त्या कामात घरच्यांना मदत करीत असत.

कुंभार यांना पहिल्यापासूनच पुस्तके व नियतकालिके वाचण्याची आवड होती. त्यांनी लहानपणी विदर्भ संशोधन मंडळाच्या वार्षिकांतले इतिहास संशोधनविषयक लेख वाचले. डॉ. वा. वि. मिराशी यांचे ताम्रपट, शिलालेख व प्राचीन नाणी या विषयांवरील लेख वाचून ते मिराशींना भेटले आणि या विषयात काम करण्याची इच्छा व्यक्त केली. मिराशींनी त्यासाठी इंग्रजी भाषेत गती, संस्कृतचे ज्ञान व प्राचीन लिप्यांचा अभ्यास आवश्यक असल्याचे सांगितले. कुंभारांना यांतील काहीच येत नव्हते. मग ते आधी शाळाबाह्य रीतीने एस.एस.सी. उत्तीर्ण झाले, व ग्रंथांनाच गुरू मानून त्यांनी अभ्यास सुरू केला.[] पुण्याच्या भारत इतिहास संशोधक मंडळातील तात्यासाहेब खरे यांना ते भेटले आणि त्यांच्याकडून शिलालेखांचा अभ्यास कसा करावा व शिलालेखांचे ठसे कसे घ्यावेत याचे धडे घेतले.[]

सोलापूर क्षेत्राची निवड

[संपादन]

आपल्या पुराभिलेखांच्या अभ्यासासाठी कुंभार यांनी सोलापूर क्षेत्राची निवड केली.[] सोलापूर जिल्ह्यात एकूण ११ तालुके आहेत. दर शनिवार-रविवारी भटकंती करून कुंभारांनी ४ तालुक्यांत सर्वेक्षण करून शिलालेखांचे ठसे घेतले. मराठी, हिंदी, इंग्रजी, फारसीसंस्कृत भाषांचे कामचलाऊ ज्ञान मिळवून देवनागरीबरोबरच मोडी, कन्नडब्राह्मी लिपीतील मजकूर वाचू शकण्याइतपत त्यांनी प्रगती केली.[] कन्नड भाषेतील लेखांचे वाचन करण्यासाठी त्यांना धारवाड येथील कर्नाटक विद्यापीठातील डॉ. श्रीनिवास रित्ती यांची मोठी मदत झाली.[] दोघांच्या सहकार्यातून व प्रयत्नांतून अज्ञात ऐतिहासिक माहिती समोर आली. त्या माहितीवर आधारित 'इन्स्क्रिप्शन्स ऑफ सोलापूर डिस्ट्रिक्ट' (Inscriptions of Solapur District) हा संशोधनपर ग्रंथ कुंभार-रित्ती या जोडनावाने प्रसिद्ध झाला.[]

मराठीतील पहिल्या शिलालेखाचा शोध

[संपादन]

सोलापूरजवळ हत्तरसंग येथे भीमा व सीना नदी संगमावर हजाराहून अधिक वर्षे अस्तित्वात असलेल्या संगमेश्वर मंदिरातील मराठी शिलालेख सर्वप्रथम कुंभार यांनी शोधून काढला.[] इतिहासात मराठीतील पहिला शिलालेख कर्नाटकातील श्रवणबेळगोळ येथील बाहुबली मंदिरात असल्याचा सार्वत्रिक समज होता. परंतु हत्तरसंग येथील संगमेश्वर मंदिरातील मराठीतील हा शिलालेख शके ९४० कालयुक्त संवत्सर माघ शुद्ध प्रतिपदा म्हणजेच फेब्रुवारी १०१९ मधील असल्याचे स्पष्ट झाले.[] "वांछितो विजया हाऐवा" ही मराठी भाषेतील ओळ या शिलालेखावर सापडली.[]

घर आणि ग्रंथालय

[संपादन]

आनंद कुंभार यांचे सोलापुरातील राहते घर पन्हाळी पत्र्यांचे छत असलेले अत्यंत साधेसुधे होते. त्या घरात कुंभार यांनी सुमारे सत्तर हजार दुर्मीळ पुस्तकांचा खजिना जतन करून ठेवला होता.[] त्यांच्या सुमारे सहा दशकांच्या काळातील शिलालेखांच्या संशोधनातील उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना अनेक मानाचे पुरस्कार व सन्मान मिळाले.[]

प्रकाशित साहित्य

[संपादन]
  • इन्स्क्रिप्शन्स ऑफ सोलापूर डिस्ट्रिक्ट (इंग्रजी ग्रंथ - डॉ. श्रीनिवास रित्ती यांच्या सहकार्याने)[]
  • संशोधन तरंग (देवनागरीतील शिलालेखांच्या माहितीवरील स्फुट लेखसंग्रह) - या पुस्तकाला यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने दिला जाणारा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला.[]
  • बाराव्या शतकातील शिवशरण सिद्धरामेश्वर (सोन्नलिगे) यांच्याशी संबंधित चार महत्त्वपूर्ण लेख प्रकाशात आणले.[]
  • गिरिजा कल्याण ऊर्फ विवाहपुराण नावाचा शिलालेखित ग्रंथ शोधून काढला. या शोधामुळे कलचुरी सम्राट बिज्जलदेव (दुसरा) याच्या पट्टराणीचे नाव रंभादेवी असल्याचे प्रथमच स्पष्ट झाले.[]
  • देवगिरीचा शेवटचा राजा सिंघणदेव (तिसरा) ऊर्फ शंकरदेव याचा लेख मोहोळ येथे शोधला.[]
  • कलचुरी राजघराण्यातील शासक महामंडलेश्वर अमुलगी याचे तीन लेख शोधून काढले.[]

पुरस्कार आणि सन्मान

[संपादन]
  • सोलापूर विद्यापीठ आणि सोलापुरातील विविध सांस्कृतिक व सांस्कृतिक संस्थानांकडून जाहीर नागरी सत्कार.[]
  • महाराष्ट्र राज्य शासनाचा 'यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कार' ('संशोधन तरंग' ग्रंथासाठी).[]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. "ज्येष्ठ इतिहास संशोधक आनंद कुंभार यांचे निधन". लोकसत्ता. २९ नोव्हेंबर २०१९. १६ ऑगस्ट २०२६ रोजी पाहिले.
  2. 1 2 3 4 5 6 7 चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; "loksatta" नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही
  3. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 "इतिहास संशोधक आनंद कुंभार यांचे संशोधन कार्य". सकाळ. २९ नोव्हेंबर २०१९. १६ ऑगस्ट २०२६ रोजी पाहिले.