गणेश हरी खरे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ग.ह. खरे या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search

गणेश हरी खरे ‍‌‍‍‍‍‍‍‍‍(जन्म १० जानेवारी १९०१ - मृत्यू ०५ जून १९८५)[१] हे महाराष्ट्रातील इतिहाससंशोधक होते. दक्षिणेचा मध्ययुगीन इतिहास, शिवकालीन महाराष्ट्र, महाराष्ट्रातील दैवते, मूर्तिविज्ञान इ. विषयांवर त्यांनी संशोधनपर स्वरूपाचे विपुल लेखन केले आहे. तसेच मराठी, फार्सी इत्यादी भाषांतील ऐतिहासिक काळातील कागदपत्रांची संपादनेही केली आहेत. संशोधकाचा मित्र, मूर्तिविज्ञान, महाराष्ट्राची चार दैवते इ. त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत.

आयुष्यक्रम व कार्य[संपादन]

ग. ह. खरे ह्यांचा जन्म पनवेल इथे झाला. त्यांचे माध्यमिक शिक्षण द्रविड हायस्कूल, वाई येथे झाले. १९२० साली मॅट्रिक झाल्यावर त्यांनी सांगली येथील विलिंग्डन महाविद्यालयात प्रवेश घेतला.

असहकारितेच्या चळवळीतील सहभाग[संपादन]

महाविद्यालयात शिक्षण घेत असताना पहिल्याच वर्षी महात्मा गांधी ह्यांच्या असहकारितेच्या चळवळीत सहभागी होऊन त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण सोडले. कोयना धरणामुळे विस्थापित होणाऱ्यांचे पुनर्वसन व्हावे आणि त्यांना योग्य ती भरपाई मिळावी ह्यासाठी खरे ह्यांनी प्रचाराची मोहीम राबवली. परिणामी त्यांचे सहकारी वि. ना. आपटे ह्यांच्यासह खरे ह्यांच्यावर अशांतता माजवत असल्याचा आरोप ठेवण्यात आला आणि असहकारितेच्या तत्त्वाप्रमाणे जामीन द्यायचे नाकारल्याने त्यांना १२ ऑगस्ट १९२२ पासून १ वर्ष बंदीवासाची शिक्षा देण्यात आली.[१]

बंदीवासातून ११ ऑगस्ट 1923 रोजी सुटका झाल्यावर खरे ह्यांनी सातारा जिल्ह्या काँग्रेसचे एक चिटणीस म्हणून वर्षभर काम केले. १९२४च्या उत्तरार्धापासून १९२९च्या प्रारंभापर्यंत साताऱ्याच्या राष्ट्रीय शाळेत शिक्षक म्हणून त्यांनी नोकरी केली.[१]

ह्या काळात खरे ह्यांनी इतिहाससंशोधनासाठी आवश्यक पूर्वतयारी केली. शिलालेखांचे ठसे घेण्याचे काम ते स्वतःच अभ्यास करून शिकले. तसेच त्यांनी ब्राह्मी आणि उर्दू ह्या लिप्यांचेही अध्ययन करून त्या आत्मसात केल्या. त्या लिप्यांतील साहित्य त्यांना वाचता येऊ लागले.

भारत-इतिहास-संशोधक मंडळातील काम[संपादन]

साताऱ्याच्या राष्ट्रीय शाळेतील नोकरी सोडल्यावर खरे पुणे येथे आले. भारत-इतिहास-संशोधक मंडळाच्या शिवचरित्र-कार्यालयात मोडी कागदपत्रांच्या लिप्यंतराचे काम त्यांनी काही काळ केेले. ६ महिन्यांनतर त्यांची नेमणूक शिवचरित्र-कार्यालयात करण्यात आली. १९३० साली त्यांची नेमणूक भारत-इतिहास-संशोधक मंडळात करण्यात आली.

भारत-इतिहास-संशोधक मंडळात काम करत असताना खरे ह्यांनी स्वतःच पुस्तकांच्या व फार्सी जाणकारांच्या साहाय्याने फार्सी भाषा व लिपी आत्मसात केली. तसेच कानडी भाषा व लिपी ह्यांचाही अभ्यास केला. जुनी कानडी भाषाही (हळे कन्नड) त्यांना कळू लागली.

खरे ह्यांनी शिवचरित्रसाहित्य खंड ६ (१९३७), खंड ११ (१९५८), खंड १२ (१९६४), खंड १३ (१९६५) ह्यांचे संपादन केले. तसेच त्यांनी ऐतिहासिक फार्सी साहित्याचे ६ खंड संपादित केले. तसेच त्यांचे इतिहाससंशोधनपर लेखन विविध नियतकालिकांतून प्रकाशित झाले. खरे ह्यांनी विविध ठिकाणी भ्रमंती करून कागदपत्रे व इतर ऐतिहासिक वस्तू ह्यांचा संग्रह करून तो भारत-इतिहास-संशोधक मंडळाला मिळवून दिला. ह्यात सुमारे २०,००० पोथ्या, ५००० नाणी, १५० चित्रे आणि ३० ताम्रपट व शिलालेख ह्यांचा समावेश आहे.[१] त्यांनी ५०हून अधिक पुस्तके आणि इंग्लश व मराठी ह्या भाषांत मिळून सुमारे ३५० लेख लिहिले आहेत.[१]

मानसन्मान[१][संपादन]

 • इंडियन हिस्टॉरिक कमिशनवर भारत-इतिहास-संशोधक मंडळाचे प्रतिनिधी म्हणून ३० वर्षे सहभाग
 • इंडियन हिस्टरी काँग्रेसच्या १९५१च्या अधिवेशनात मध्ययुगीन शाखेचे अध्यक्षपद
 • पुणे विद्यापीठाच्या इतिहास विभागाद्वारे डॉक्टरेट पदवीसाठीचे मार्गदर्शक व परीक्षक
 • न्युमिस्मॅटिक सोसायटी ऑफ इंडिया ह्या संस्थेच्या १९७४च्या अधिवेशनाचे अध्यक्षपद
 • पुणे विद्यापीठाद्वारे १९८४ साली सन्माननीय डी लिट् पदवी
 • जानेवारी १९८५च्या धारवाड येथील पुराभिलेख परिषदेत सत्कार

ग्रंथसंपदा[संपादन]

 1. लाठी शिक्षक भाग १; सातारा; वि. शं. वैद्य; आनंद; सातारा; शके १८४९ (१९२८)
 2. शिवकालीन पत्रसारसंग्रह खंड १ (अंशतः) (१९३०)
 3. शिवकालीन पत्रसारसंग्रह खंड २ (अंशतः) (१९३०)
 4. शिवचरित्र खंड ३ (अंशतः) (१९३०)
 5. दक्षिणेच्या मध्ययुगीन इतिहासाची साधने खंड १; पुणे; द. वा. पोतदार; गं. ना. मुजुमदार; आर्यभूषण; पुणे; १९३०; भारत-इतिहास-संशोधक मंडळ स्वीय ग्रंथमाला : ३४
 6. श्रीक्षेत्र आळंदी; पुणे; श्रीपाद रघुनाथ राजगुरू; राजगुरू; पुणे; शके १८५३ (१९३१); भारत-इतिहास-संशोधक मंडळ पुरस्कृत ग्रंथमाला : २७
 7. मंडळांतील नाणीं; पुणे; द. वा. पोतदार; आर्यभूषण; पुणे; १९३३; भारत-इतिहास-संशोधक मंडळ स्वीय ग्रंथमाला : ३७
 8. दक्षिणेच्या मध्ययुगीन इतिहासाची साधने खंड २; पुणे; चिटणीस, भारत-इतिहास-संशोधक मंडळ; आर्यभूषण; पुणे; १९३४; भारत-इतिहास-संशोधक मंडळ स्वीय ग्रंथमाला : ४१
 9. ऐतिहासिक फार्सी साहित्य खंड १; पुणे; द. वा. पोतदार; गं. ना. मुजुमदार; आर्यभूषण; पुणे; १९३४; भारत-इतिहास-संशोधक मंडळ स्वीय ग्रंथमाला : ४०
 10. भोर संस्थान, ऐतिहासिक वस्तुसंग्रहालय प्रदर्शिका; पुणे; द. वा. पोतदार; आर्यभूषण; पुणे; १९३५
 11. शिवचरित्रसाहित्य खंड ६ (१९३७)
 12. ऐतिहासिक फार्सी साहित्य खंड २; पुणे; द. वा. पोतदार; गं. ना. मुजुमदार; आर्यभूषण; पुणे; १९३७; भारत-इतिहास-संशोधक मंडळ स्वीय ग्रंथमाला : ४६
 13. श्रीविठ्ठल आणि पंढरपूर; पुणे; गणेश हरि खरे; प्रतिभा; पुणे; शके १८६० (१९३८)
 14. ऐतिहासिक फार्सी साहित्य खंड ३; पुणे; चिटणीस, भारत-इतिहास-संशोधक मंडळ; आर्यभूषण; पुणे; १९३९; भारत-इतिहास-संशोधक मंडळ स्वीय ग्रंथमाला : ५१
 15. मूर्तिविज्ञान; पुणे; गणेश हरि खरे; जनार्दन सदाशिव; पुणे; १९३९
 16. शिवचरित्रवृत्तसंग्रह खंड २ (फार्सी विभाग); पुणे; चिटणीस, भारत-इतिहास-संशोधक मंडळ; आर्यभूषण; पुणे; १९३९; भारत-इतिहास-संशोधक मंडळ स्वीय ग्रंथमाला : ५२
 17. शिवचरित्रवृत्तसंग्रह खंड ३ (फार्सी विभाग); पुणे; चिटणीस, भारत-इतिहास-संशोधक मंडळ; आर्यभूषण; पुणे; १९४१; भारत-इतिहास-संशोधक मंडळ स्वीय ग्रंथमाला : ५३
 18. ऐतिहासिक आख्यायिका; पुणे; वि. गं. केतकर; लोकसंग्रह; पुणे; १९४४; स्वाध्यायमाला (प्रथमविभाग)
 19. हिंगणे दप्तर खंड १; पुणे; चिटणीस, भारत-इतिहास-संशोधक मंडळ; जनार्दन सदाशिव; पुणे; १९४५; भारत-इतिहास-संशोधक मंडळ स्वीय ग्रंथमाला : ७०; श्रीमंत बाबासाहेब इचलकरंजीकर स्मारक ग्रंथमाला : क्र. १; पर्ण १
 20. भोर संस्थान ऐतिहासिक-स्थल-दर्शन; भोर; स्टेट प्रेस; स्टेट प्रेस; भोर; १९४५
 21. पंढरपूरचा विठोबा; पुणे; वि. गं. केतकर; लोकसंग्रह; पुणे; १९४७; स्वाध्यायमाला (प्रथमविभाग) पुष्प १२०वे
 22. हिंगणे दप्तर खंड २ (१९४७)
 23. तुलादानविधि; पुणे; रा. ज. देशमुख; आर्यभूषण; पुणे; १९४८
 24. सिंहगड (इतिहास, वर्णन, उपसंहार); पुणे; वि. सि. चितळे; जनार्दन सदाशिव; आर्यभूषण; मौक्तिक; पुणे; १९४८
 25. दक्षिणेच्या मध्ययुगीन इतिहासाची साधने; खंड ३; पुणे; भारत-इतिहास-संशोधक मंडळ; आर्यभूषण; पुणे; १९४९; भारत-इतिहास-संशोधक मंडळ स्वीय ग्रंथमाला : ७६
 26. ऐतिहासिक फार्सी साहित्य खंड ४; पुणे; चिटणीस, भारत-इतिहास-संशोधक मंडळ; आर्यभूषण; पुणे; १९४९; भारत-इतिहास-संशोधक मंडळ स्वीय ग्रंथमाला : ७७
 27. शनिवारवाडा; पुणे; वि. सि. चितळे; जनार्दन सदाशिव; आर्यभूषण; मौक्तिक; पुणे; १९४९

संदर्भ[संपादन]

 1. a b c d e f मेहेंदळे, गजानन भास्कर; संशोधकांचे मित्र; समाविष्ट : खरे, गणेश हरी; संशोधकाचा मित्र; पुनर्मुद्रण २०१०; भारत इतिहास संशोधक मंडळ, पुणे; पृ. एक-दहा.