अमरनाथ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
अमरनाथ येथील गुहा

अमरनाथ भारतातील जम्मू आणि काश्मीर राज्यातील पवित्र तीर्थस्थळ असून येथे नैसर्गिक गुहा आहे. ही गुहा जम्मू-काश्मीर राज्यामध्ये असून श्रीनगर पासून साधारणपणे १३५ किमी वर समुद्रसपाटी पासून १३६०० फूट उंचीवर आहे. येथील गुहेमध्ये बर्फाचे शिवलिंग तयार होते. ते पहायला दरवर्षी उन्हाळ्यात हजारो- लाखो भाविक येथे भेट देतात. हे शिवलिंग साधारणपणे ८ ते १० फूट उंचीचे असते परंतु लिंगाचा आकार हवामानाप्रमाणे कमी जास्त होत असतो. असेही मानले जाते की शिवलिंगाचा आकार चंद्राच्या कलेप्रमाणे कमी जास्त होत असतो. गुहे मध्ये अजून काही लहान हिमखंड आहेत त्यांना गणेश -पार्वतीचे रुप समजले जाते. मुख्य लिंगाच्या वर नैसर्गिक पाण्याची घळ आहे, त्या घळीमधून पाणी टपकत असते व त्यामुळे हे शिवलिंग तयार होते.

दंतकथा[संपादन]

असे मानले जाते की भगवान शिवशंकरांनी पार्वतीला या जागी अमरत्वाचे रहस्य समजावले होते व ही कथा ऐकवताना दोन कबुतरांनी पण ऐकली ज्यामुळे ही कबुतरे देखील अमर झाली. आजही असे मानतात की या कबुतरांचे दर्शन या गुहे जवळ काही जणांना होते.

अमरनाथ यात्रा[संपादन]

जम्मू-काश्मीर राज्यातील हा भाग अतिरेकी कारवायांच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील आहे. काश्मीरमधील दहशतवादी कारवाया ज्यावेळेस मोठ्या प्रमाणावर होत्या (९० च्या दशकात) त्यावेळेस ही यात्रा जवळपास स्थगित झाली होती. परंतु भारतीय सरकार व लष्कराच्या मदतीने ही यात्रा पुन्हा सुरु करण्यास यश आले आहे व दरवर्षी येथे भेट देणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. दरवर्षी अतिरेक्यांच्या हिंसाचारात काही भाविक मारले जातात परंतु तरीही मोठ्या प्रमाणावर भाविक येतात.

गुहेकडे जाण्यासाठी मुख्यत्वे दोन रस्ते आहेत. पहिला मार्ग सोनमर्ग - बालताल- अमरनाथ च्या बाजूने आहे. हा रस्ता फक्त १३ किमी चा असून बहुंताशी भाविक याच मार्गाने येणे पसंत करतात.

दुसरा मार्ग पहेलगाम - चंदनवाडी- पिस्सुटॉप- शेषनाग-पंचतरणी- अमरनाथ असा आहे. हा मार्ग ४५-५० किमीचा असून जास्त खडतर आहे. परंतु हिमालयाचे विलोभनीय दर्शन या मार्गात होते म्हणून अनेक जण हा मार्ग निवडतात.

यात्रेच्या मार्गामध्ये भाविकांची सोय चांगली आहे. श्वसनाचा त्रास होत नसलेला कोणीही या यात्रेत सहभागी होउ शकतो. ज्यांना या यात्रेत चालता येत नाही त्याच्यासाठी पालखी, घोडा, खेचर यावरुन वाहून नेण्याची व्यवस्था आहे. बहुतांशी लोक घोडा व खेचर पसंत करतात. याचे दोन दिवसाचे भाडे १५०० ते २००० रुपये पर्यंत असू शकते. रस्त्याम्ध्ये भाविकांची अनेक ठिकाणी जेवणाची रहाण्याची व्यवस्था केली जाते. बहुतांशी ठिकाणी ही व्यवस्था स्वयंसेवी संस्थांतर्फे होते. यांना लंगर असे म्हणतात. जेवणाची व्यवस्था बहुतांशी मोफत असते राहण्याच्या व्यवस्थेला १००- १००० रुपयांपर्यंत मोजावे लागतात.

अमरनाथ मार्गाच्या एका भागाचे चित्र

पहलगामपासून मार्गातील अंतर असे (कंसात उंची फूट): चंदनवाडी १६ कि. मी. (९५००), पिस्सू टॉप ३ कि. मी. (११०००), शेषनाग ११ कि. मी. (११७३०), महागुना स्टॉप ४.६ कि. मी. (१४०००), पंचतरणी ९.४ कि. मी. (१२०००), संगम ३ कि. मी., पवित्र अमरनाथ गुहा ३ कि. मी. (१३००० फूट). सोनमर्ग (बालताल) पासून बराडी ५ कि. मी., संगम ४ कि. मी. पवित्र गुंफा ३ असे १४ किलोमीटर अंतर आहे.

यात्रेचा कालावधी[संपादन]

जुलै पहिला आठवडा ते ऑगस्ट शेवटचा आठवडा. साधारणपणे ४५ दिवस, हिंदू तीथींप्रमाणे

यात्रेच्छुकांसाठी सूचना[संपादन]

घातपाताची शक्यता सतत असल्याने मार्गामध्ये जागोजागी भारतीय लष्कराचे जवान तैनात असतात. तसेच वेळोवेळी ते झडती देखील घेतात. यात्रेकरूंनी जवानांना सहकार्य करावे तसेच घोडा, खेचर अथवा पालखी वाहणारे वाहक अधिकृत आहेत की याची देखील चौकशी करावी. अधिकृत वाहकांपाशी ओळखपत्र असते. अधिकृत लंगर व राहण्याची व्यवस्था असलेल्या ठिकाणीच रहावे अथवा भोजन नाष्टा करावा. लष्कराच्या सूचनांप्रमाणेच मार्गाक्रमण करावे. पाऊस, हिमवर्षेची शक्यता असल्याने जरुरी गरम कपडे व रेनकोट घेउन जावेत. साधारणपणे १०००० फुटावरती श्वसनाचा त्रास होउ शकतो, मळमळणे, डोके दुखणे, उलटी होणे या गोष्टी होऊ शकतात. आपल्या डॉक्टरांना याबाबत विचारावे व जरुरी औषधपाणी घेउन जावे. अश्या प्रकारचा त्रास कमी होण्यासाठी, यात्रा सुरु करण्यापुर्वी सोनमर्ग, बालताल, पहेलगाम किंवा चंदनवाडी येथे एखाद दुसरा दिवस अतिरिक्त व्यतीत करावा तसेच यात्रा देखील टप्या टप्याने पार पाडावी.पहेलगाम कडून जाताना जरी पालखी अथवा घोडा भाड्याने घेतला असेल तरी साधारणपणे अतिदुर्गम ठिकाणी १.५ ते २ किमी चालावे लागतेच. याची तयारी असावी. साध्या वातावरणात श्वसनाचा त्रास असणाऱ्यांना यात्रेबाबत विचार करावा.

अमरनाथ यात्रेसंबंधी पुस्तके[संपादन]

  • अनंत (अनुवादित; अनुवादक माधवी कुंटे, मूळ लेखक : वेद राही) :

श्री अमरनाथ यात्रेशी संबंधित जनआंदोलन ही अर्वाचीन इतिहासातील एक अभूतपूर्व अशी घटना आहे. अशा प्रकारच्या पार्श्वभूमीवर लिहिलेली कादंबरी.

  • श्री अमरनाथ यात्रा (पुष्पलता कढे)
  • हिमालय दर्शन (डॉ. स्वाती कर्वे)

हे सुद्धा पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

अधिकृत संकेतस्थळ