अनिल विश्वास

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(अनिल बिस्वास या पानावरून पुनर्निर्देशित)

अनिल बिस्वास (बंगाली : অনিল বিশ্বাস ; रोमन लिपी : Anil Biswas; मराठीत : अनिल विश्वास)) (जुलै ७, इ.स. १९१४; बारिसाल, पूर्व बंगाल, ब्रिटिश भारत - मे ३१, इ.स. २००३; नवी दिल्ली, भारत) हे बंगाली, भारतीय संगीतकार होते. प्रामुख्याने इ.स. १९३५ ते इ.स. १९६५ या कालखंडात संगीतकार म्हणून अनेक चित्रपटगीतांसाठी चाली बांधलेल्या बिस्वासांना भारतीय चित्रपटक्षेत्रात प्रथमच पाश्चात्त्य वृंदसंगीताचा वापर करण्याचे श्रेय दिले जाते[ संदर्भ हवा ].

जीवन[संपादन]

अनिल बिस्वास यांचा जन्म जुलै ७, इ.स. १९१४ रोजी वर्तमान बांगलादेशमधील बारिसाल गावी झाला. बारिसालमधेच जन्म झालेले बासरीवादक पन्नालाल घोष आणि ते जिवलग मित्र होते. प्रसिद्ध गायिका पारुल घोष ही अनिलदांची धाकटी बहीण आणि पन्नालाल यांची पत्नी होती.

कारकीर्द[संपादन]

कोलकाता येथे संगीतक्षेत्रात थोडे काम केल्यावर अनिलदा इ.स. १९३४ च्या सुमारास मुंबईला आले. इ.स. १९३५ पासून त्यांच्या संगीतकार म्हणून कारकीर्दीला प्रारंभ झाला. जागीरदार, अलीबाबा, औरत इत्यादी चित्रपटांना उत्तम संगीत देऊन त्यांनी १९४० पर्यंत छान ज़म बसवला. इ.स. १९४१ ते इ.स. १९५० या दशकात त्यांची प्रतिभा बहरत होती. सुरेंद्र, पारुल घोष, अख्तरी फ़ैज़ाबादी (बेगम अख्तर), अमीरबाई कर्नाटकी, खान मस्ताना, अरुण कुमार, पुढे सूफ़ी सन्त झालेले अश्रफ़ खान, सुरैया ही त्यांच्या संगीतावर गाणी गायलेल्या गायकांची ठळक नावे. स्वतः अनिलदा उत्तम गात. पाचव्या दशकाच्या उत्तरार्धात लता, मुकेश, तलत महमूद, मीना कपूर हे नवीन कलाकार त्यांच्या रचना गाऊ लागले होते. या कलाकारांबरोबर त्यांनी इ.स. १५५५-५६ पर्यंत अत्यंत दर्जेदार संगीत दिले. त्यानन्तर त्यांचा सिनेसृष्टीशी संबंध कमी होत गेला. इ.स. १९६०-६१ मधे मित्र पन्नालाल घोष, भाऊ सुनील बिस्वास, मुलगा प्रदीप बिस्वास यांच्या निधनामुळे अनिलदा खचले आणि मुंबई सोडून त्यांनी द्वितीय पत्नी मीना कपूर यांच्याबरोबर दिल्लीला मुक्काम हलवला. या दशकातल्या सौतेला भाई, छोटी छोटी बातें या चित्रपटांतल्या गाण्यांतही दादांच्या प्रतिभेचा प्रत्यय रसिकांना मिळतो. दिल्ली आकाशवाणीवर त्यांनी काही काळ काम केले.

मे ३१, इ.स. २००३ रोजी अनिल बिस्वास यांचे नवी दिल्ली येथे निधन झाले.

पगडा व प्रभाव[संपादन]

यशवंत देवांचे ते आवडते संगीतकार होतेच, शिवाय देवसाहेबांनी त्यांच्या मूळ हिंदी गाण्यांवर मराठी शब्द चढवून एक संग्रह काढला होता.

संकीर्ण[संपादन]

त्यांचे संगीतकार मित्र दत्ता कोरगावकर (के दत्ता) यांच्याकडे अनिल विश्वास यांची जन्मकुंडली होती, आणि तिच्यात त्यांची जन्मतारीख ७ जुलै, इ.स. १९१२ होती, असा उल्लेख आहे.

बाह्य दुवे[संपादन]

  • "अनिलबिस्वास.कॉम - स्मृतिपर संकेतस्थळ" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)