Jump to content

गझनीच्या महमूदाने भारतावर केलेल्या स्वाऱ्या

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

गझनीच्या महमूदाने भारतावर केलेल्या स्वाऱ्या म्हणजेच इ.स. १००० ते १०२७ या काळात गझनीच्या महमूदाने लूटमारीसाठी भारतावर केलेल्या स्वाऱ्या होत. या कालखंडात त्याने भारतावर एकूण सतरा स्वाऱ्या केल्या. यांतील प्रत्येक स्वारीचे नेतृत्व त्याने स्वतःच केले होते. साधारणपणे सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात तो गझनीहून स्वारीसाठी निघत असे, कारण तो येईपर्यंत भारतातील पावसाळा संपून हिवाळा सुरू झालेला असे. भारतातील हिवाळा अफगाणिस्तानप्रमाणे कडाक्याचा नसल्याने तो सर्वत्र लूटमार आणि विध्वंस करीत असे. मिळालेल्या लुटीसह तो मार्च-एप्रिल महिन्यात अफगाणिस्तानला परत जाई. परत जाताना लुटीमध्ये मिळालेले सोने-चांदी, किंमती रत्ने, घोडे, हत्ती, सर्व प्रकारच्या किंमती वस्तू आणि तुर्की सैनिकांनी पकडलेले हजारो स्त्री-पुरुष गुलाम आपल्याबरोबर नेत असे. अफगाणिस्तानच्या प्रवासात त्या गुलामांतील अनेकजण उपासमार आणि थकव्यामुळे मृत्युमुखी पडत असत.