Jump to content

गझनीच्या महमूदची भारतावरील सहावी स्वारी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

गझनीच्या महमूदची भारतावरील सहावी स्वारी म्हणजेच गझनी येथील महमूदाने भारतावर इ.स. १००८-०९ मध्ये केलेली स्वारी होती. या स्वारीचा त्याचा उद्देश हिंदुशाही राज्याच्या विरोधात होता. सिंधुनदीकाठी दोन्ही सैन्यांमध्ये तुंबळ युद्ध झाले होते. युद्ध चालू असताना हिंदुशाही राजा आनंदपालचा जखमी झालेला हत्ती आनंदपालसह रणांगणावरून पळाला. त्यामुळे हिंदू सैनिक भयभीत झाले व राजाचे पलायन म्हणजे युद्ध संपल्याचे लक्षण मानत असल्याने त्याचे सैन्यही सैरावरा पळू लागले आणि महमूदच्या सैन्याचा विजय झाला. विजयी तुर्की सैन्याने वैहिंद आणि आणि त्याप्रदेशातील अन्य महत्त्वाची नगरे ताब्यात घेतली.

नागरकोटची लूट

[संपादन]

स्वतः महमूदने कांग्रा जिल्ह्यातील नागरकोट येथील हिंदू मंदिरावर हल्ला करून सात लाख सुवर्ण नाणी, सातशे मण सोने-चांदी, जडजवाहीर आणि वीस मण मोती आणि माणके एवढी लूट जमवली. खैबर खिंड आणि भारताच्या वायव्य सीमेवर ताबा मिळवून नागरकोटचे हिंदू मंदिर लूटल्यामुळे महमूदचे जगभरात नाव झाले. गझनीतील शाही महालाच्या हिरवळीवर नागरकोट येथे मिळालेल्या लूटीचे त्याने काही आठवडे प्रदर्शन मांडले होते. प्रदर्शनातील प्रचंड संपत्ती पाहण्यासाठी त्याने जवळपासच्या रहिवाशांना आमंत्रित केले होते.