Jump to content

मृग (तारकासमूह)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मृग नक्षत्राचे चित्र - मृगाचे चार खूर ठळकपणे दिसतात
नक्षत्र
अश्विनी
भरणी
कृत्तिका
रोहिणी
मृग
आर्द्रा
पुनर्वसु
पुष्य
आश्लेषा
मघा
पूर्वाफाल्गुनी
उत्तराफाल्गुनी
हस्त
चित्रा
स्वाती
विशाखा
अनुराधा
ज्येष्ठा
मूळ
पूर्वाषाढा
उत्तराषाढा
श्रवण
धनिष्ठा
शततारका
पूर्वाभाद्रपदा
उत्तराभाद्रपदा
रेवती
अभिजीत

मृग (शास्त्रीय नाव: Orionis, ओरायन; इंग्लिश: Orion; ओरायन) हे खगोलीय विषुववृत्तावर वसलेले व पृथ्वीच्या सर्व भागांतून दिसू शकणारे एक प्रमुख नक्षत्र आहे. रात्रीच्या आकाशातले सर्वांत सहज ओळखू येणारे हे नक्षत्र आहे. खगोलशास्त्रानुसार मृगाचे दोन चरण वृषभ राशीत व उरलेले दोन चरण मिथुन राशीत येतात. (वृषभ राशीतील नक्षत्रांचे चरण - कृत्तिका-२, ३, ४ + रोहिणी + मृग-१, २. मिथुन राशीतील नक्षत्रांचे चरण - ग-३, ४ +आर्द्रा + पुनर्वसू-१, २, ३) असे असले तरी, फलज्योतिषानुसार मृग नक्षत्र हे मिथुन राशीचा घटक मानले जाते.

मृग हे जगभरातून दिसणारे एक महत्त्वाचे नक्षत्र आहे. रात्रीच्या आकाशात हे नक्षत्र अगदी पटकन ओळखता येते. या नक्षत्रात राजन्य, काक्षी, सैफ हे तारे आणि 'ओरायन' व घोड्याच्या डोक्यासारखा दिसणारा अश्वमुखी - 'हॉर्स हेड नेब्यूला' - हे दोन तेजोमेघ (अभ्रिका, निहारिका) आहेत. हे सर्व ठळक तारे आकाश निरीक्षकाचे लक्ष आपोआपच वेधून घेतात.

मिथुन राशीच्या जवळच असलेल्या वृषभ राशीत क्रॅब नावाचा तेजोमेघ आहे. हा तेजोमेघ पहिल्यांदा ४ जुलै १०५४ रोजी चिनी निरीक्षकांना दिसला. सन १७३१मध्ये जाॅन बेव्हिसने त्याचे निरीक्षण करून त्याचे अस्तित्त्व सर्वमान्य केले.

दंतकथा

[संपादन]

मृग तारकासमूहांच्या संदर्भात अनेक कथा प्रचलित आहेत.

ग्रीक दंतकथा

[संपादन]

ओरायन हा एक बलाढ्य शिकारी होता. जो मुक्तपणे जंगलात वावरत असे. याचे दोन कुत्रेही होते. मोठा कुत्रा कॅनिस मेजर आणि लहान कुत्रा कॅनिस मायनर. यांना आपण लुब्धक म्हणून ओळखतो. ओरायनला स्वतःच्या ताकदीचा इतका माज चढला, की तो देवांच्या स्त्रियांना भुरळ घालू लागला; अर्थातच देवांना ते आवडत नसे. त्यांनी ओरायनला मारायला टाॅरस- म्हणजे बैल - किंवा वृषभ याला पाठवलंले ओरायनने या बैलाच्या डोक्‍यावर गदा मारून त्याला ठार केले. मग देवांनी त्याच्या मागे स्कॉर्पिओ म्हणजे विंचवाला- वृश्‍चिकला धाडले. विंचवाने ओरायनच्या पायाला दंश करून त्याला ठार केले. हे बघून ओरायनचा मित्र सॅजिटेरियस (ज्याला आपण धनू म्हणून ओळखतो) आपला धनुष्यबाण घेऊन स्कॉर्पिओचा पाठलाग करू लागला.[]

दुसऱ्या एका ग्रीक कथेनुसार ह्या नक्षत्रास शिकारी व त्याच्या शेजारी असलेल्या व्याधाच्या ताऱ्यास त्या शिकाऱ्याचा कुत्रा अशी उपमा दिलेली आढळते. या शिकाऱ्याचे नाव 'ओरायन'. ह्या ओरायनने (Orion) जगभर सर्वश्रेष्ठ शिकारी म्हणून कीर्ती मिळवली. परंतु नंतर त्यास आपल्या कीर्तीचा गर्व झाला व त्यास त्याच्या गर्वाबद्दल शिक्षा म्हणून टुनो या ग्रीक देवतेने त्याच्यावर एक विंचू सोडला. अखेर विंचवाच्या दंशामुळे ह्या सर्वश्रेष्ठ शिकाऱ्याचा मृत्यू झाला. 'डायना' ह्या दुसऱ्या ग्रीक देवतेने ह्या विंचवास आकाशात ओरायनपासून दूर व विरुद्ध बाजूस जागा दिली.. तो विंचू म्हणजे बारा राशीतील वृश्चिक रास. ह्या राशीचा आकार तंतोतंत विंचवाशी मिळतो.

पण तसे पाहता ग्रीक कथेपेक्षा आपल्या येथील कथेत व या नक्षत्राच्या मांडणीत बरेच साम्य आढळते. या नक्षत्रातील वरच्या दोन ताऱ्यांपैकी पूर्वेकडील ताऱ्याचे नाव काक्षी (बीटलग्यूज) व खालच्या दोन ताऱ्यांपैकी पश्चिमेच्या ताऱ्याचे नाव राजन्य (रिगेल) असे आहे.

भारतीय दंतकथा

[संपादन]

सृष्टीचा देव ब्रह्मदेव याचा मुलगा म्हणजे प्रजापती. हा स्वतःच्याच कन्येच्या म्हणजे रोहिणीच्या प्रेमात पडला, आणि मृगाचे रूप धारण करून तिच्या मागे लागला. या अक्षम्य वर्तनाला शिक्षा करण्यासाठी देवांनी व्याधाला (रुद्राला) म्हणजेच लुब्धकाला (शिकाऱ्याला) धाडले. तो व्याध मृगाचा पाठलाग करू लागला. एका क्षणाला धावताना मृगाने आपला मार्ग बदलला व तो उत्तरेकडे पळू लागला आणि त्याच क्षणाला व्याधाने मारलेला बाण मृगाच्या शरीरात घुसला. मृगातील ते तीन तारे म्हणजे मृगाला मारलेला बाण होय. ही कथा ऋग्वेदाच्या ऐतरेय ब्राह्मणात येते. (ऐ. ब्राह्मण. ३.३३). हीच कथा शतपथ ब्राह्मणातही आहे. उन्हाळ्यामध्ये रात्री अवकाश निरीक्षण केल्यास मृगाचे तोंड नेहमी उत्तरेकडे असल्याचे दिसते व या कथेचा प्रत्यक्ष पडताळा येतो. मृगाच्या शरीरामध्ये घुसलेल्या बाणाच्या रेषेत खाली व्याधाचा तेजस्वी तारा दिसतो.

सर्वसाधारणपणे, अवकाश निरीक्षण न करणाऱ्या व्यक्तीने देखील हा तारकासमूह आपल्या आयुष्यामध्ये एकदा तरी पाहिलेला असतोच. कारण या नक्षत्राचा आकारच काही असा आहे, की अवकाशात ह्या नक्षत्राकडे प्रत्येक निरीक्षक अथवा व्यक्ती थोडावेळ तरी पाहतच राहते.

'मृग' म्हणजे हरीण, ह्या नक्षत्राचा आकार त्याच्या नावाप्रमाणेच आढळतो. पुढे दोन व मागे दोन तारका त्याचे पुढील व मागील पाय असल्याचे सुचवितात. पुढील दोन तारकांमध्ये असलेला एक छोटासा तारकापुंज मृगाचे शिर (डोके) असल्याचे सुचवितो. ह्या मृगाच्या चार प्रमुख तारकांच्या मध्यभागी तीन ठळक तारका अशा काही सरळ रेषेत आहेत की बघताना असे वाटते की त्या हरणास बहुदा बाण लागला असावा तर बाणाच्या खालील बाजूस असलेल्या तीन-चार तारका ह्या मृगाची शेपटी असल्याचे भासतात. थोडक्यात सांगायचे झाल्यास ह्या नक्षत्रामध्ये असलेल्या तारकांचा आकार तंतोतंत मृगाच्या आकाराशी जुळत असल्यामुळेच कदाचित ह्या नक्षत्राचे नाव मृगशीर्ष असे पडले असावे.

एखाद्या अमावास्येच्या निरभ्र रात्री जर आकाशाचे निरीक्षण केल्यास आकाशगंगेचा चंदेरी पट्टा डोक्यावरून गेलेला दिसतो. हा पट्टा मृगशीर्षाच्या अगदी जवळून गेलेला आढळतो.

मृग हा बहुधा अतिप्राचीन काळापासून परिचित असलेला तारकासमूह असावा. खाल्डियनांना हा इ. स. पूर्व २००० किंवा त्यापूर्वीपासून माहीत असावा. ते त्याला तामूझ म्हणत. सीरियन व अरब लोकांनी त्याचे नाव दैत्य (जायंट) असे ठेवले. तर इजिप्शियन लोकांनी त्याला बालसूर्यदेव मानून त्याचे नाव होरस ठेवले.

हे सुद्धा पहा

[संपादन]
  1. ^ परांजपे, अरविंद. "तारकासमूहांच्या कथा". १४ मार्च, २०१६ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)[permanent dead link]