Jump to content

इलिनॉर ओस्ट्रॉम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

(७ ऑगस्ट १९३३ – १२ जून २०१२). अमेरिकन राजकीय अर्थशास्त्रज्ञ व अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार मिळविणाऱ्या पहिल्या महिला. ओस्ट्रॉम यांना निसर्गत: व वारसाने तसेच सामाईक व खाजगी मालमत्तेवर अधिकार असणाऱ्यांच्या आर्थिक विश्लेषणाबद्दल ऑलिव्हर इ. विल्यम्सन (Oliver E. Williamson) यांच्या बरोबरीने २००९ मध्ये अर्थशास्त्र विषयाचा नोबेल स्मृती पुरस्कार प्राप्त झाला.

ओस्ट्रॉम यांचा जन्म कॅलिफोर्निया राज्यातील लॉस ॲंजेल्स येथे झाला. वडिल ज्यू, तर आई प्रॉटेस्टंट पंथाची होती. १९५१ मध्ये बेवर्ली हिल्स हायस्कूलमधून त्यांनी माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. १९५४ मध्ये युनिव्हर्सिटी ऑफ लॉस ॲंजेल्ससमधून राज्यशास्त्र विषयात बी. ए. पदवी त्यांनी प्राप्त केली. पुढे त्याच विद्यापीठातून १९६२ मध्ये एम. ए. आणि १९६५ मध्ये पीएच. डी. या राज्यशास्त्र विषयातील पदव्या मिळविल्या. १९६३ मध्ये राज्यशास्त्रज्ञ विन्सेंट ओस्ट्रॉम यांच्याशी त्या विवाहबद्ध झाल्या.

राज्यशास्त्र प्रमुख विषय असलेल्या ओस्ट्रॉम यांची अर्थशास्त्राची सर्वेक्षण व चिकित्सा करण्याची पद्धत इतर अर्थतज्ज्ञांहून वेगळी होती. बहुसंख्य अर्थतज्ज्ञांची वास्तव परिस्थितीसंबंधी काही गृहीतके असतात. ते संशोधनाद्वारे ती तपासतात व निष्कर्ष काढतात; परंतु ओस्ट्रॉम यांनी प्रथमत: सर्वेक्षणाद्वारे वास्तव परिस्थितीचा अभ्यास केला व नंतर मिळालेल्या माहितीचे पृथक्करण केले. १९९० मध्ये आपल्या गव्हर्निंग दि कॉमन्स या पुस्तकातून सामाईक मालमत्तेसंबंधीचे आर्थिक विश्लेषण सामाजिक संघटनांच्या कार्यपद्धतीवर प्रकाश टाकू शकते, हे त्यांनी दाखवून दिले. त्यांच्या संशोधनाचा मोठा प्रभाव तत्कालिन राजकारणी व अर्थतज्ज्ञांवर पडला आहे.

अमेरिकेतील सेवांचे एकत्रीकरण करण्याच्या हालचालींना त्यांनी विरोध केला. शासकीय व्यवस्थेपेक्षा स्वयंसेवी संस्थांचे व्यवस्थापन अधिक परिणामकारक असते. सर्वच क्षेत्रात सहकाराचे महत्त्व विशद करताना शैक्षणिक क्षेत्रातही आंतरविद्या (Interdisciplinary) अभ्यासाचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. राज्यशास्त्र, भूविज्ञान, मानसशास्त्र, मानवशास्त्र या विषयांचा अभ्यास अर्थतज्ज्ञांना धोरणात्मक निर्णयासाठी उपयुक्त होते. तज्ज्ञांनी आपल्या अभ्यासाच्या विषयांना मर्यादा घालू नयेत, असे त्यांनी आग्रहपूर्वक सांगितले. त्यांनी स्वतः नेपाळमधील जंगले, स्पेनमधील पाणीपुरवठा योजना, स्वित्झर्लंड व जपानमधील डोंगरमाथ्यांवरील गावे, इंडोनेशियामधील मच्छालये अशा विविध ठिकाणांना भेटी देऊन आर्थिक व्यवस्थापनाचा अभ्यास केला.

ओस्ट्रॉम यांनी १९५७ – १९६१ या काळात पर्सोनेल अनलिस्ट युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया येथे सहसंचालक; १९७३ – २००९ या काळात वर्कशॉप इन पोलिटिकल थिअरी ॲण्ड पॉलीसी ॲनालिसीस, इंडियाना युनिव्हर्सिटी येथे अध्यक्ष; १९८० – १९८४ व १९८९-९० या काळात डिपार्टमेंट ऑफ पोलिटिकल सायन्स इंडियाना युनिव्हर्सिटी; १९६५ – १९९१ या काळात राज्यशास्त्र विभाग, इंडियाना युनिव्हर्सिटी येथे प्राध्यापक; १९९६-९७ मध्ये अमेरिकन पोलिटिकल सायन्स असोशिएशनचे अध्यक्ष; १९८२ – १९८४ या काळात पब्लिक चॉईस सोसायटीचे अध्यक्ष; विविध शासकीय व शैक्षणिक संस्थां यांचे सल्लागार मंडळ सदस्य. त्यांनी जगातील बहुसंख्य देशांना भेटी देऊन तेथील राजकीय, आर्थिक बाबींसंबंधी सर्वेक्षणे केले. अमेरिकेतील विविध प्रतिष्ठित जर्नलच्या संपादक मडळावर तसेच अनुदान संस्थांचा प्रकल्प संचालक म्हणून त्यांनी काम केले.

ओस्ट्रॉम यांनी स्वतंत्रपणे तसेच सहलेखक म्हणून लिहिलेले ग्रंथ पुढीलप्रमाणे : कम्युनिटी ऑर्गनायझेशन ॲण्ड दि प्रोव्हिजन ऑफ पोलीस सर्व्हिसेस (१९७३), डिसिजन -रिलेटेड रिसर्च ऑन दि ऑर्गनायझेशन ऑफ सर्व्हिस डिलिव्हरी इन मेट्रोपोलिटन एरियाज : पोलीस प्रोटेक्शन (१९७८), पॅटर्न्स ऑफ मेट्रोपोलिटन पोलिसींग (१९७८), गव्हर्निंग दि कॉमन्स (१९९०), क्राफ्टींग इन्स्टिट्यूशन फॉर सेल्फ – गव्हर्निंग इरिगेशन सिस्टीम (१९९२), इन्स्टिट्यूशनल इन्सेंटिव्ह्ज ॲण्ड सस्टेनेबल डेव्हलपमेंट : इन्फ्रास्ट्रक्चर पॉलिसिज इ पर्स्पेक्टिव्ह्ज (१९९३ – सहलेखक), रूल्स गेम्स ॲण्ड कॉमन पूल रिसोर्सेस (१९९४), कॉम्पिटेशन ॲण्ड को-ऑपरेशन (१९९९), पिपल ॲण्ड फॉरेस्ट्स (२०००), प्रोटेक्टिंग दि कॉमन्स (२००१), एड इन्सेंटिव्ह्ज ॲण्ड सस्टेनॅबिलिटी : ॲन इन्स्टिट्यूशनल ॲनालिसिस ऑफ डेव्हलपमेंट कूपरेशन :मेन रिपोर्ट (२००२), ट्रस्ट ॲण्ड रेसिप्रोसिटी (२००३), अंडरस्टॅडिंग इन्स्टिट्यूशनल डायव्हर्सिटी (२००५), अंडरस्टॅडिंग नॉलेज ऑफ कॉमन्स (२००७), वर्किंग टूगेदर (२०१०), इम्प्रुव्हिंग इरिगेश इन एशिया : सस्टेनेबल परफॉर्मन्स ऑफ इननोव्हेटीव इंटरव्हेन्शन इन नेपाल (२०११- सहलेखक), प्रापर्टी इन लँड ॲण्ड अदर रिसोर्सेस (२०११), फ्यूचर ऑफ दि कॉमन्स : बियॉण्ड मार्केट फेलर ॲण्ड गव्हर्नमेंट रेग्युलेशन (२०१२). शिवाय त्यांचे असंख्य शोधनिबंध प्रसिद्ध झालेले आहेत.