आनंद शिंदे
आनंद शिंदे | |
---|---|
आयुष्य | |
जन्म | २१ एप्रिल १९६५ |
जन्म स्थान | भारत |
व्यक्तिगत माहिती | |
धर्म | बौद्ध धर्म |
नागरिकत्व | भारतीय |
मूळ_गाव | मंगळवेढा,सोलापूर |
देश | भारत |
भाषा | मराठी |
पारिवारिक माहिती | |
वडील | प्रल्हाद शिंदे |
जोडीदार | विजया |
अपत्ये | आदर्श शिंदे, उत्कर्ष शिंदे, हर्षद |
नातेवाईक | मिलिंद शिंदे (भाऊ) |
संगीत साधना | |
गायन प्रकार | लोकसंगीत, भीमगीत गायन |
संगीत कारकीर्द | |
पेशा | गायकी |
गौरव | |
पुरस्कार | डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार (२०१९) |
स्वाक्षरी |
आनंद प्रल्हाद शिंदे हे एक मराठी गायक आहेत. त्यांनी हजाराहून अधिक गाणी आणि २५० चित्रपटांत पार्श्वगायन केले आहे. शिंदे भीमगीते व लोक गीतांसाठी सुद्धा प्रसिद्ध आहेत. या शिंदे कुटुंबाच्या पाच पिढ्या गायन क्षेत्रात असून लोकगीत गायन करणारे हे महाराष्ट्रातील एक कुटुंब आहे.
प्रख्यात गायक प्रल्हाद शिंदे यांच्याकडून मिळालेला लोकसंगीताचा वारसा आनंद शिंदे यांनी जोमाने चालवला आहे. वडिलांसोबत कोरसमध्ये जाणारा मुलगा ते महाराष्ट्राचा बुलंद आवाज हा ४० वर्षांचा प्रवास. चित्रपटसृष्टी ते बॉलीवूडपर्यंत त्यांची गाणी प्रसिद्ध आहेत.
बालपण
[संपादन]आनंद शिंदे यांचे आजोबा भगवान शिंदे उत्कृष्ट पेटीवादक, तर आजी सोनाबाई तबलावादक होत्या. सदाशिव, नारायण आणि प्रल्हाद या तीन मुलांनी देखील संगीत क्षेत्राची सेवा केली. त्यांचे घराणे मूळचे सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथील होय. परंतु त्यांचे बालपण मुंबईमध्ये गेले. लहानपणापासून ते वडिलांसोबत कोरसमध्ये गाणी म्हणायला जायचे. कव्वालीचे मुकाबले त्यांना फार आवडायचे. शाळेत मात्र त्यांचे मन फारशे रमले नाही. शाळेत शिकण्यापेक्षा गॅदरिंगमध्ये गाणी म्हणायला त्यांना आवडायचे. नववीत नापास झाल्यावर शाळा थांबली आणि हातात तबला आला. वडिलांचा मार, बोलणे खात तबला शिकले. कव्वालीच्या मुकाबल्यात आनंद आणि मिलिंद शिंदे हे भाऊ ढोल वाजवायचे, वडिलांच्या गैरहजेरीत तेच कार्यक्रम करत होते.
लग्न
[संपादन]इ.स. १९८२ मध्ये सातवीत शिकणाऱ्या विजया यांचे आनंद यांच्यासोबत लग्न झाले. विजया देखील मंगळवेढ्याच्या होत्या. लग्नावेळी दोघांचेही वय कमी होते. शेजारी राहत असल्यामुळे विजया-आनंद यांच्या आजी मुक्ताबाई यांच्या आवडीच्या होत्या. विजयालाच घरची सून बनवायची, असे आजीचे मत होते. लग्नानंतर आनंद आणि विजया यांनी एकमेकांच्या आवडी-निवडी जाणून घेत एकमेकांना मदत केली. संगीताविषयी असणारे प्रेम विजया यांना ज्ञात असल्याने त्यांनी प्रोत्साहन देण्याचे काम केले. आनंद आजही प्रत्येक गाणे विजया यांच्याकडून क्रॉसचेक करून घेतात. त्यांचा होकार मिळाल्यावरच ते गाणे लिहिले जाते. कार्यक्रम सुरू करण्याआधी विजयांना फोन करतात. त्यांनी शुभेच्छा दिल्यावरच ते गायनाला सुरुवात करतात.
लग्नावेळी आनंद यांची आर्थिक स्थिती हलाखीची होती. त्यामुळे लग्नात विजया यांना बनावट मंगळसूत्र द्यावे लागले होते. पण ही परिस्थिती बदलायचीच असा त्यांचा दृढनिश्चय होता. जिद्द आणि परिश्रमाच्या बळावर त्यांनी आर्थिक संपन्नता आणली. आर्थिक सुबत्ता जशी आली तशी त्यांनी विजया यांना सोन्याच्या अनेक वस्तू भेट दिल्या. नखशिखांत सोन्याने मडवण्याचे त्यांचे स्वप्न त्यांनी सत्यात उतरवले. पायातदेखील सोन्याची जोडवी घालण्यास दिली. यावर आनंद यांचे नातेवाइकांनी सौभाग्यवती बाईने पायात सोने घालू नये. लक्ष्मी जाते, पतीलाही धोका असतो, असा सल्ला दिला. मात्र आनंद यांनी विजया हीच माझी लक्ष्मी आहे. तिच्या रूपातच माझ्या घरी लक्ष्मी आली आहे, असे उत्तर दिले.
अपत्य
[संपादन]आनंद आणि विजया यांना हर्षद, उत्कर्ष आणि आदर्श ही तीन मुले आहेत. हर्षद अॅनिमेशन इंजिनिअर असून उत्कर्ष डॉक्टर (एमडी) आहे. सर्वात धाकटा असलेला आदर्श हा प्रसिद्ध गायक असून तो परिवाराचा संगीत परंपरेचा वारसा पुढे घेऊन जात आहे. तिन्हीही मुलांना गायनाची आवड आहे. उत्कर्षने ‘पावर’ चित्रपटाला संगीत दिले. त्याचप्रमाणे उत्कर्ष आणि आदर्शने मिळून गौरव महाराष्ट्राचा, आवाज महाराष्ट्राचा या कार्यक्रमाचे थीम सॉंग तयार केले. समाजाने खूप काही दिले त्याची परतफेड करण्याच्या उद्देशाने आनंद यांनी उत्कर्षला डॉक्टर बनवले. ‘स्वरसम्राट प्रल्हाद शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट’ची स्थापना केली असून या संस्थेच्या माध्यमातून गरीब रुग्णांची मोफत सेवा केली जाते.[१]