सरोद पिंपरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सरोद पिंपरी हे महाराष्ट्र राज्याच्या नाशिक जिल्ह्यातल्या इगतपुरी तालुक्यातील एक गाव आहे.

सदानंद महाराजांची समाधी[संपादन]

जव्हार संस्थानचे धार्मिक गुरू सदानंद महाराज यांनी सन १३३९मध्ये भाद्रपद महिन्यातल्या षष्ठीला सरोद पिंपरी या गावी संजीवन समाधी घेतली. म्हणून जव्हार संस्थानाचे महादेव कोळी राजे धुळाबा (नेमशाह) यांनी पिंपरीच्या सदानंद महाराज समाधीच्या देवस्थानास शहापूर तालुक्यातील 'काळभोंडे' व 'पाटोळ' ही दोन गावे इनाम म्हणून दिली. या गावातील ९०० एकर जमीन सदर देवस्थानास खर्च भागवण्यासाठी व व्यवस्था करण्यासाठी देण्यात आली आहे. सरोद पिंपरी हे गाव नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीच्या पूर्वेला २ किमी वर वसलेले आहे. गावाच्या पूर्वेस पिठ्या डोंगर आहे. हे गाव एका छोट्याशा टेकडीवर वसले असून गावाच्या मध्यभागी सदानंद महाराजांची (सध्या सरोद्दिन बाबा दर्गा) समाधी आहे. या समाधीच्या पूर्वेस सदानंद महाराजांची मानलेली आई यमाई (यमम्मा)ची समाधी आहे. यमाईला अनेक लोक नवस करतात. भाद्रपद महिन्याच्या १९ तारखेपासून पुढे ३ दिवस सरोद पिंपरी येथे यात्रा (उरूस) भरते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक येथे येतात. [१]

दुधबावडी[संपादन]

यमाईच्या समाधिस्थळाच्या पूर्वेस दगडी पायऱ्या उतरून गेल्यानंतर दुधबावडी लागते. यमाईने दिलेल्या वांझ गाईस सदानंद गुराख्यांबरोबर पिठ्या डोंगरावर चरावयास नेत असत एके दिवशी महाराजांनी मुलांच्यासाठी त्या वांझ गाईस दुधाच्या धारा काढून दाखवल्या, असे म्हणतात. दूध संपता संपेना. ते वाहत वाहत पाण्याबरोबर विहिरीत पडले, अशी आख्यायिका आहे. ही विहीर पिठ्या डोंगराच्या पश्चिम भागात आहे. या विहिरीचे पाणी दुधामुळे पांढरे झाले होते. त्यामुळे या विहिरीस दुधबावडी असे म्हणतात. यात्रेदरम्यान या देवस्थानाची पूजा करण्याचा पहिला मान जव्हारच्या राजाचा असतो..

जव्हारचे तत्कालीन राजे धुळाबा, देवबा, कृष्णशाह, विक्रमशाह, पतंगशाह, ते यशवंतराव मार्तंडराव मुकणे यांच्यापर्यंत सर्व राजे नियमितपणे सरोद पिंपरीला येऊन महाराजांची प्रथम पूजा करीत असत.

सध्या पिंपरीला 'सरोद पिंपरी' आणि सदानंद महाराज यां देवस्थानाचे 'सदरोद्दिन बाबा दर्गा' असे नामकरण झाले आहे. हिंदू मुसलमान या दोन्ही धर्माचे लोक मनोभावे या धार्मिक स्थळास भेट देतात. या गावात कधीही जात, धर्म यावरून भांडणतंटे झालेले नाहीत.

पहा :- पिंप्री

संदर्भ[संपादन]

  1. ^ पुस्तक: जव्हार दर्शन, लेखक :दयानंद मुकणे आवृत्ती जुलै २००४.