वांद्रे टर्मिनस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

वांद्रे टर्मिनस (नामभेद: बांद्रा टर्मिनस) हे मुंबई महानगरातील एक प्रमुख रेल्वे टर्मिनस आहे. मुंबईत एकूण ५ रेल्वे टर्मिनस आहेत - मुंबई सेंट्रल आणि बांद्रा टर्मिनस ही पश्चिम रेल्वेवरील रेल्वे टर्मिनस आहेत, तर मुंबई सी.एस.टी, लोकमान्य टिळक टर्मिनस (कुर्ला टर्मिनस) आणि दादर ही मध्य रेल्वेवरील टर्मिनस आहेत. मुंबई सेंट्रल स्थानकावरील वाढती गर्दी विकेंद्रित करण्याच्या दृष्टीकोनातून 'वांद्रे टर्मिनस' इ.स. १९९० च्या दशकात विकसित करण्यात आले. प्रामुख्याने पश्चिम रेल्वेवरील गुजरात, राजस्थान आणि उत्तर भारताकडे ये-जा करणाऱ्या गाड्या येथून सुटतात.

मुंबईतील महत्त्वपूर्ण आर्थिक व्यवहारांशी संबंधित वांद्रे-कुर्ला संकुल, तसेच मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यांपासून जवळ असल्यामुळे वांद्रे टर्मिनस हे मुंबईतील प्रमुख स्थानक आहे.

येण्या-जाण्याची सुविधा[संपादन]

वांद्रे टर्मिनस हे वांद्रे रेल्वे स्थानकालगत असून मुंबईतील पश्चिम रेल्वेवरील समस्त शीघ्र आणि धिम्या लोकल येथे थाबतात. लोकल सेवेची उपलब्धता उत्तम असून साधारण दर ३ मिनिटांनी चर्चगेट आणि बोरीवली स्थानकांकडे जाणाऱ्या लोकलगाड्या मिळू शकतात. याव्यतिरिक्त वांद्रे स्थानक हार्बर मार्गाने सी.एस.टी. स्थानकाशी जोडले असून दर १५ मिनिटांनी लोकल उपलब्ध आहेत. तथापि, सकाळी आणि सायंकाळी लोकलगाड्यांना गर्दी असते.

बेस्ट परिवहन सेवेची वांद्रे टर्मिनस आणि वांद्रे पश्चिम ही दोन बसस्थानके वांद्रे टर्मिनसशी संलग्न आहेत. साधारण पहाटे ४.३० ते रात्री १ पर्यंत लोकल उपलब्ध असतात आणि सकाळी ५:३० ते रात्री ११:३० /१२:०० पर्यंत बससेवा उपलब्ध आहे. तसेच येथून रिक्षासुद्धा उपलब्ध आहेत.

इ.स. २०१० पासून कार्यान्वित झालेल्या वांद्रे-वरळी सागरी सेतूमुळे वरळीपासून वांद्रे टर्मिनसाचे वाहतुकीचे अंतर कमी झाले आहे.