Jump to content

हृदयाघात

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रक्तप्रवाह अवरुद्ध झाल्यामुळे हृदयाघात कसा होतो त्याचे चित्र

हृदयाघात म्हणजे ह्रदयाच्या स्नायूंना रक्तपुरवठ्यातील अडथळ्यांमुळे कार्यक्षमता कमी होऊन त्यांचे काम विस्कळीत होणे होय.

शरीरक्रिया व शरीरविकृती विज्ञान

[संपादन]

हृदय शरीराच्या वेगवेगळ्या भागांना रक्त पुरवठा करते. हृदयाला प्राणवायुयुक्त रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांना परिहृद् धमनी (काॅरोनरी आर्टरी) असे म्हणतात.

चरबीचा पापुद्रा तयार होऊन रक्तवाहिन्या चिंचोळ्या होण्यारे अथेरोस्क्लेरोसिस

माणूस जसाजसा मोठा असताना, त्याच्या शरीराच्या वेगवेगळ्या भागातल्या रक्त वाहिन्यांमध्ये आतून रक्तातील चरबी कोलेस्ट्रॉलचे थर साठू लागतात, ज्यात परिहृद् धमनी (काॅरोनरी आर्टरी)चा देखील समावेश असतो. त्याचा परिणाम म्हणजे रक्तपुरवठ्यात अडथळा येतो. रक्तवाहिन्यांच्या अशा पद्धतीने चरबीचा पापुद्रा तयार होऊन रक्तवाहिन्या चिंचोळ्या होण्याला अथेरोस्क्लेरोसिस म्हणतात. अशाच एखाद्या चिंचोळ्या परिहृद् धमनीत (काॅरोनरी आर्टरी) रक्तगुठळी अडकल्याने रक्तपुरवठा मंदावतो किंवा प्रसंगी खंडित होतो.

जर धमन्यांमध्ये अडथळे येऊ लागले तर हृदयाच्या स्नायूंना रक्त मिळत नाही व त्यातील पेशी मरतात व हृदयाचे कार्य मंदावते यालाच हृदयविकार म्हणतात.

हृदयविकारात धोक्याची पातळी हृदयाच्या स्नायूंना किती दुखापत झाली आहे यावर अवलंबून असते. मृत स्नायुंमुळे हृदयाला होणाऱ्या रक्त पुरवठ्याचा वेग कमी होतो, त्याला रक्तसंलयी हृदय विफलता (कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर) म्हणतात व त्यामुळे पावलांना घाम फुटून श्वसनाचा त्रास होतो.

जोखिमा

[संपादन]

महिलांपेक्षा पुरुषांमध्ये हृदयविकार जास्त प्रमाणात आढळतो. सामान्यत: महिला स्त्री-संप्ररके इस्ट्रोजन व प्रोजेस्टेरॉनमूळे सुरक्षित आहेत. ह्याचा प्रभाव कमीतकमी पाळी जाईपर्यंत तरी राहतो.

भारतासहित अनेक आशियाई विकासनशील देशांमध्ये हृदयविकाराचा धोका वाढलेला दिसून येतो. त्यात खालील कारणांचा समावेश आहे :

  • धूम्रपान करणे
  • मधुमेह
  • उच्च रक्तदाब
  • लठ्ठपणा
  • उच्च काॅलेस्ट्रॉल, आणि कमी एचडीएल व वाढीव काॅलेस्ट्रॉल
  • शारीरिक श्रमाची कमतरता
  • अनुवंशिकता
  • तणाव, रागीटपणा आणि चिंता
सूचना
खालील माहिती वैद्यकीय सल्ला नाही. कोणत्याही आजारासाठी आपल्या डॉक्टरकडूनच सल्ला घ्यावा.

लक्षणे

[संपादन]

काहीवेळा लक्षणे ओळखणे फार अवघड असते आणि अन्य लक्षणे दिसू शकतात. सामान्यतः

  • छातीच्या मध्यभागी खूप तीव्र वेदना होतात आणि श्वसनास त्रास होतो.
  • घाम येणे, मळमळ आणि चक्कर येणे ही देखील काही लक्षणे आहेत.
  • साधारणपणे या वेदना छाती व पोटाच्या मधोमध किंवा पाठीच्या मणक्यात असतात तिथून त्या मान किंवा डाव्या हातात जाऊ शकतात.
  • उलट्या
  • अस्वस्थता
  • कफ
  • कंप

अशी आहेत व ह्या वेदना सुमारे २० मिनिटापेक्षा जास्त काळ टिकतात. काही वेळा रुग्ण पांढरा पडलेला दिसतो, रक्तदाब एकदम कमी होऊन रक्तसंलयी हृदय विफलता येऊन मृत्यू येतो.

उपचार

[संपादन]

हृदयविकारावर झटकन उपचार मिळाल्यास जीवन वाचवता येते.

  • जोपर्यंत वैद्यकीय मदत मिळत नाही तोपर्यंत रुग्णाला आडवे झोपवावे व त्याचे सर्व घट्ट कपडे सैल करावे.
  • जर ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध असेल तर रुग्णाला त्वरित ऑक्सिजन द्यावा.
  • जर नायट्रोग्लीसरीन किंवा सॉरबिटरेटच्या गोळ्या उपलब्ध असतील तर त्वरित त्यातील एक गोळी जिभेखाली द्यावी.
  • पाण्यात ढवळून अ‍ॅस्पिरीन द्यावे.

हृदयविकारावर झटकन वैद्यकीय उपचार व इस्पितळात भरती करणे गरजेचे असते. पहिले काही मिनिटे आणि तास जरा संकटपूर्ण असतात. प्राथमिक काळात काॅरोनरी आर्टरीमधील अडथळे विरघळवण्यासाठी औषधे दिली जातात.

  • डॉक्टर रुग्णाची सूक्ष्म तपासणी करतात आणि हृदयाची स्पंदने मोजतात आणि रक्तदाब पाहतात.
  • इलेक्ट्रोकार्डिओग्रॅम, ईसीजी घेतला जातो. त्याने हृदयाची विद्युतीय सक्रियता टिपली जाते.
  • ईसीजीमुळे हृदय किती व कसे स्पंदन करते ते कळते, त्यात काही असामान्य लय आहे का ते दिसते आणि जर ह्रदयविकारामुळे हृदयाच्या मांसपेशींचे नुकसान झालेले असल्यास ते दिसते. मात्र प्रारंभिक टप्प्यातल्या सामान्य ईसीजीमुळे हृदयविकाराची संभावना होत नाही हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. हृदयाच्या मांसपेशींचे नुकसान झालेले असल्यास ते रक्ताच्या परिक्षणात दिसून येते.
  • छातीचा एक्सरेदेखील घेतला जातो.
  • हृदयाच्या माहितीसाठी इकोकार्डिओग्रॅम करता येतो. ही एक प्रकारची स्कॅन चाचणी आहे ज्यात हृदयाच्या समुचित कार्याची माहिती मिळते.
  • काॅरोनरी वाहिकांमध्ये अडथळे पाहण्यासाठी काॅरोनरी अँजियोग्राम काढला जातो व हा निर्णायक शाबीत होतो.
  • हृदयाच्या स्पंदनांवर लक्ष ठेवले जाते व जर काही अनपेक्षित स्पंदने आढळली तर त्यावर उपचार केले जातात.
  • वेदना कमी करण्याची औषधे दिली जातात व रुग्णास आराम करण्यास व झोपण्यास सांगितले जाते.
  • जर रक्तदाब जास्त असेल तर रक्तदाब कमी करण्यासाठी औषधे दिली जातात.
  • प्रत्येक रुग्णाची व त्याला आलेल्या हृदयविकाराची गंभीरता, हृदयाचे नुकसान आणि अडथळ्यांचे प्रमाण व रुग्णाचे वय लक्षात घेऊन उपचार ठरवतात.
  • कित्येक वेळा अडथळे दूर करण्यासाठी काही निश्चित प्रक्रिया आवश्यक असते. ह्यात काॅरोनरी अँजियोप्लास्टी, फुग्याने वाहिकांचा अडथळा दूर करणे किंवा काॅरोनरी बायपास सर्जरी करतात.

Heart attack treatment in Marathi हृदयाघात उपचार विषयीची अधिक माहिती वाचा - https://healthmarathi.com/heart-attack-symptoms/

प्रतिबंध

[संपादन]

हृदयविकारापासून ज्यांना धोका आहे किंवा वाचायचे आहे त्यांनी खालील नियम पाळावेत :

  • जीवन शैलीत परिवर्तन:
  • आहार स्वस्थ ठेवा. त्यात चरबी आणि मीठ कमी असावे, फायबर आणि जटिल कर्बोदके उच्च मात्रेत असावीत.
  • वजन जास्त असणाऱ्यांनी वजन कमी करावे. शारीरिक व्यायाम रोज करण्याचीदेखील फार गरज आहे.
  • धूम्रपान करू नये व करत असल्यास त्वरित बंद करावे.
  • मधुमेह, रक्तदाब किंवा जास्त काॅलेस्ट्राॅल असणाऱ्यांनी त्यांची रोजची औषधे नियमित चालू ठेवून रोगास आटोक्यात ठेवावे.
  • अ‍ॅस्पिरीनच्या किंवा इतर रक्त पातळ करणाऱ्या गोळ्या.
  • स्टॅटिन प्रकारातील चरबी नियंत्रित ठेवणाऱ्या औषधी. (स्टॅटिनचा फायदा होतो की नाही यावर तज्ज्ञांमध्ये मतभेद असून मोठ्या क्लिनिकल ट्रायल्सनंतरच याबद्दलचे सत्य समजू शकते.)
  • आहारात संतृप्त चरबी ऐवजी असंतृप्त चरबीचे प्रकार वापरावे. (भारतात तसेच अनेक देशात त्रास (?) फॅटवर बंदी घालण्यात आली आहे.)

जागतिक स्थिती

[संपादन]

२००२ मधील जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार १२.५% मृत्यू हे हृदयाघातने होतात. अमेरिकेतील पाचांतील एक मृत्यू हा हृदयाघातने होतो.

भारतात २००७ साली ३२% मृत्यू हे हृदयाघातामुळे झाले होते1.