Jump to content

स्त्री पौरोहित्य

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
लग्न लावणारी महिला पुरोहित

स्त्रियांनी एखाद्या पूजाविधीसाठी केलेल्या मंत्रोपचारयुक्त मार्गदर्शनाला स्त्री पौरोहित्य असे म्हटले जाते.

वैदिक काल[संपादन]

स्त्री पौरोहित्याची पद्धत वैदिक काळात होती, पण पुढे ती लुप्त झाली. वैदिक साहित्यातील ऋग्वेदात स्त्रियांनी रचलेल्या सूक्तांचा समावेश आहे. वैदिक काळात मुलींनाही शिक्षण मिळत असावे. त्यांच्याही अभ्यासाची सुरुवात उपनयन संस्काराने होत असे. त्यांना गायत्री मंत्राचा उपदेश केला जाई. कन्यांचे उपनयन झाल्यावर त्या गुरुगृही राहून त्या वेदाध्ययन करीत असत. ब्रह्मचर्याचे पालन करून अध्ययन पूर्ण करणाऱ्या कन्येला सुयोग्य वराची प्राप्ती होते, असे अथर्ववेदात म्हटले आहे. ऋषिका जुहू ही बृहस्पतीची पत्नी होती. प्रमादामुळे त्याने पत्नीचा त्याग केला होता. तथापि वैदिक संहितांचे अध्ययन-अध्यापन करून तिने स्वतःचे उर्वरित जीवन व्यतीत केले. विश्वावरा आत्रेयी हिने स्वतःच यज्ञाचे पौरोहित्य केले व अन्य स्त्रियांनाही तसे करण्याचा उपदेश केला. अग्नीची पूजा करण्यास तत्पर आणि विद्वानांचे स्वागत करणाऱ्या विश्वावरेला यज्ञकर्ती म्हणून संबोधिले आहे.

ब्राह्मण ग्रंथ काळ[संपादन]

ब्राह्मणग्रंथ लेखनकाळात यज्ञ हा वैदिक धर्माचा मेरुदंड मानला जाई. कौशीतकी ब्राह्मणात पथ्यास्वस्ति ही स्त्री उत्तरेकडचा खडतर प्रवास करून अध्ययन करते व तिच्या पारंगततेबद्दल वाच् ही उच्च पदवी मिळविते असा संदर्भ आहे. व्याकरणकार पाणिनीच्या अष्टाध्यायी या ग्रंथात (सूत्र?) तसेच पतंजलीच्या महाभाष्यातही काही स्त्रिया आचार्य या नात्याने अध्यापन करीत, असे उल्लेख आढळतात.

उपनिषद काळ[संपादन]

गार्गी व मैत्रेयी यांच्या कथा बृहदारण्यक उपनिषदांत आल्या आहेत. कात्यायनी व मैत्रेयी या याज्ञवल्क्य ऋषींच्या दोघी पत्नी. कात्यायनीला प्रामुख्याने गृहकृत्याची आवड होती तर मैत्रेयी ही ब्रह्मवादिनी होती. याज्ञवल्क्यांनी संन्यास घेण्यापूर्वी मैत्रेयीला तिच्या इच्छेनुसार ब्रह्मज्ञान दिले. पृथ्वीवरील वैभवापेक्षाही अमरत्वाचे ज्ञान मैत्रेयीला अधिक महत्त्वाचे वाटले.

विदेह देशाच्या राजा जनकाने बहुदक्षिण यज्ञ केला व आवाहन केले की सर्वश्रेष्ठ ब्रह्मज्ञानी ब्राह्मणाने शिंगाना सोने बांधलेल्या एक हजार गाई न्याव्यात. याज्ञवल्क्य ऋषींनी पुढाकार घेतल्यावर अन्य ब्राह्मणांनी त्यांच्याशी शास्त्रचर्चा केली परंतु याज्ञवल्क्य ऋषींनी त्यांना निरुत्तर केले. त्यानंतर गार्गी वाचक्नवी पुढे आली आणि तिने याज्ञवल्क्य ऋषींशी शास्त्रचर्चा केली. गार्गी मर्यादेचे उल्लंघन करून प्रश्न विचारते आहे असे मानून याज्ञवल्क्य ऋषींनी तिला धमकी दिली की तुझे मस्तक गळून पडेल. पण गार्गीला त्याचे भय वाटले नाही. आपल्याला धमकी देऊन आपल्याशी असभ्यपणे वर्तन करणा-या याज्ञवल्क्य ब्रह्मज्ञानी म्हणून घोषित केलेले दिसते. ज्याप्रमाणे पुरुष ब्रह्मचारी राहून तप, स्वाध्याय, योग इत्यादी द्वारे ब्रह्मपद प्राप्त करीत असत त्याप्रमाणे स्त्रियाही परमार्थाची वाटचाल करीत असत.

रामायणाचा काळ[संपादन]

रामायण काळातील स्त्रियांना धर्मशिक्षण दिले जात असे. .[१] सीता, कौसल्या, तारा, वेदवती, स्वयंप्रभा यांना वैदिक शिक्षण दिले होते. सीतेचे उपनयन झाले असून ती सायंसंध्या करीत असल्याचे उल्लेख सापडतात. श्रीराम व लक्ष्मण यांना विश्वामित्रांबरोबर पाठविण्यापूर्वी कौसल्येने त्यांचे स्वस्त्ययन केले होते. वालीची पत्नी तारा ही मंत्रविद् म्हणून ओळखली जात असे. मतंग मुनीच्या आश्रमात राहून ज्ञानार्जन करणारी शबरी सर्वांना परिचित आहे.

महाभारत काळ[संपादन]

महाभारतातील सुलभा-जनक संवाद प्रसिद्ध आहे. सुलभा ही एक कुमारी संन्यासिनी असून प्रधान नावाच्या राजाची कन्या होती. संन्यास आणि योगमार्गाचे आचरण करणाऱ्या विदुषी सुलभेने मिथिलेचा राजा जनक याच्याशी कर्मयोग, गृहस्थाश्रम यासारख्या विषयांवर शास्त्रचर्चा केली आहे. (म.शां. ३०८ ) महाभारतातील स्त्रिया स्थालीपाकयज्ञ व त्यासदृश यज्ञ करीत असत. उत्तम स्त्रियांनी पांडव पत्नी द्रौपदीप्रमाणे वेदाध्यान केले पाहिजे असे महाभारत निर्णय या ग्रंथात सांगितले आहे.

पुराण काल[संपादन]

स्कंद पुराणातील प्रभास खंडात सावित्रीचे चरित्र आले आहे तेथेही ती अग्नीला मंत्रपूर्वक आहुती देताना दिसते. भविष्य पुराणात म्हटले आहे की उत्तम आचरण करणाऱ्या विधवा स्त्रीने वेदमंत्रांना ग्रहण करावे तसेच सधवा स्त्रियांनी आपल्या पतीचे अनुमोदन घेऊन वेदमंत्रांचे अध्ययन-अध्यापन करावे.

स्त्रियांचे उपनयन[संपादन]

वैदिक काळापासूनच स्त्रियांचे उपनयन होत असे. संहिता, ब्राह्मणे, आरण्यके व उपनिषदे यामध्ये स्त्रियांच्या उपनयनाचे संदर्भ आढळतात. संस्कार रत्नमालेच्या उपनयन प्रकरणात हारीतस्मृतीतल्या वाचनाला धरून स्त्रियांचे दोन प्रकार सांगितले आहेत. ब्रह्मवादिनी- ब्रह्मतत्त्वाचे अध्ययन करू इच्छिणारी ती ब्रह्मवादिनी. तिचे उपनयन करून तिला वेदाध्ययन करू द्यावे. २. साद्योवधू - संसाराची इच्छा बाळगणारी असेल ती साद्योवधू. तिचे उपनयन करून लगेच तिचा विवाह करावा, असे सांगितले आहे. आर्यसमाजी लोक आजही मुलींचे उपनयन करतात. [२]

या संकल्पनेचा लोप होण्याची कारणे[संपादन]

शिक्षणाच्या अधिकारामुळे स्वतःला ब्रह्मपदी नेण्याचा अधिकार असलेल्या स्त्रीच्या सामाजिक अधःपतनाला उत्तर वैदिक काळात सुरुवात झालेली दिसते. भारतातील भौतिक समृद्धीचा मोह पडून अनेक परकीय आक्रमकांचे आघात भारताला झेलावे लागले. त्यामुळे स्त्रियांच्या विशेषतः मुलींच्या संरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला. मनुस्मृतीमध्ये मनूने नोंदविले आहे की विवाह हाच मुलीचा उपनयनसंज्ञक विधी मानावा. पतिसेवा हीच तिची गुरूसेवा आणि गृहकृत्ये हेच तिचे यज्ञकृत्य होय. स्त्रिया, शूद्र व अधर्मी वृत्तीच्या लोकांच्या जीवनाचे व नीतीचे नियमन करण्यासाठी पुराण साहित्याची रचना केली गेली कारण स्त्रिया, शूद्र आणि कुळहीन ब्राह्मण लोकांचा वेद ऐकण्याचा अधिकार काढून घेतला गेला. लहान वयात मुलींच्या विवाहाची पद्धत सु झाल्याने त्यांच्या शिक्षणाच्या हक्कावर घाला घातला गेला. या साऱ्याचा परिपाक म्हणून पुरुषसत्ताक समाजव्यवस्था अस्तित्वात आल्याने विधवा स्त्रियांना सामाजिक व कौटुंबिक आदर नाकारला गेला. स्त्रीच्या मासिक धर्माचे निमित्त पुढे करून तिला अपवित्र ठरविले गेले आणि धार्मिक कृत्यातही तिचे अधिकार नाकारले गेले.[३]

आधुनिक काळ[संपादन]

वैदिक कालापासून स्त्रियांचे धार्मिक क्षेत्रातील स्थान हिंदू परंपरेने जोपासलेले दिसून येते. भारतावर झालेली आक्रमणे, चातुर्वर्ण्याची प्रसृत झालेली संकल्पना यामुळे स्त्रियांना शैक्षणिक अधिकार नाकारले गेले, त्यांचे धार्मिक क्षेत्रातील अधिकारही काढून घेतले गेले. तथापि महादेव गोविंद रानडे, गोपाळ गणेश आगरकर, धोंडो केशव कर्वे, रघुनाथ धोंडो कर्वे, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या व अशा अनेक सुधारकांनी केलेल्या कार्यामुळे स्त्रियांना स्वतःचा विकास करण्याचे व शिक्षणाचे अधिकार मिळाले. आर्य समाजाचे संस्थापक स्वामी दयानंद सरस्वस्ती यांनीही महिलांना धार्मिक कृत्यांमध्ये पौरोहित्य करण्याचे अधिकार दिलेले दिसतात. पुण्यामध्ये शंकर सेवा समिती आणि ज्ञान प्रबोधिनी या संस्थांमध्ये महिलांना पौरोहित्य शिकविले जाते व समाजात त्या सर्वदूर पौरोहित्य करतात. शिर्डीजवळ साकुरी येथेही महिलांना पौरोहित्य शिकविले जाते. भारतातही काही ठिकाणी अशा पद्धतीने महिलांना पौरोहित्य शिकविण्यास सुरुवात झालेली दिसते.[४] [५] काही प्रमाणात आजही स्त्रिया पौरोहित्य करताना दिसतात.

संदर्भ[संपादन]

  1. ^ डॉ.जोशी आर्या,समयनय दिवाळी अंक (२०१७)
  2. ^ आचार्य शर्मा श्रीराम, इक्कीसवी सदी-नारी सदी,१९९६,अखंड ज्योती संस्थान, मथुरा
  3. ^ डॉ.जोशी आर्या,समयनय दिवाळी अंक (२०१७)
  4. ^ मी पुरोहित बोलतोय-ज्ञान प्रबोधिनी प्रकाशन (२००५)
  5. ^ जोशी आर्या - स्त्री-पौरोहित्य (प्रबंध) २००७, पुणे विद्यापीठ