Jump to content

सुनील कुलकर्णी (नाट्यगुरू)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सुनील कुलकर्णी ऊर्फ काका कुलकर्णी हे मराठीतील एक प्रसिद्ध नाट्यशिक्षक होते. ते महाराष्ट्र शासनाच्या सांख्यिकी विभागात कार्यरत होते तसेच नाट्यक्षेत्रातही सहभागी होते.

कुलकर्णी मूळ साताऱ्याचे होते. पुण्यात ते पीडीए नाट्यसंस्थेशी जोडले गेले. त्यानंतर डॉ. जब्बार पटेल, डॉ. मोहन आगाशे, सतीश आळेकर यांच्यासह थिएटर ॲकॅडमीच्या स्थापनेतही ते सहभागी होते. थिएटर ॲकॅडमीच्या घाशीराम कोतवाल, तीन पैशांचा तमाशा या नाटकांमध्ये त्यांनी छोट्या भूमिका केल्या. थिएटर ॲकॅडमीच्या सचिवपदाचीही जबाबदारी त्यांनी निभावली होती. प्रेमानंद गज्वी यांची घोटभर पाणी ही एकांकिका तसेच इतरही काही नाट्यप्रयोग त्यांनी दिग्दर्शित केले होते.

नाट्यशिक्षक कारकीर्द

[संपादन]

कुलकर्णी यांनी आपल्याकडे असलेले रंगभूमीचे ज्ञान नवीन पिढीला देण्यासाठी त्यांनी साताऱ्यात लोकरंगमंच ही संस्था स्थापन केली. त्यांनी राज्यभरात तरुण रंगकर्मींसाठी कार्यशाळा घेतल्या.

कुलकर्णी यांनी विविध देशांत जाऊन वैविध्यपूर्ण नाट्यसंस्कृती आणि रंगभूमीच्या शक्यता आजमावल्या. रंगभूमीला तळागाळापर्यंत नेण्यासाठी ग्रामीण भागात जाऊन त्यांनी निःशुल्क कार्यशाळा घेतल्या.

रंगभूमी, चित्रपट आणि दूरचित्रवाणी या तिन्ही माध्यमांत नावाजलेले अनेक कलाकार कुलकर्णी यांनी घडविलेले आहेत.

शिष्य

[संपादन]

चित्रपट, नाटक, मालिका यांमध्ये आघाडीवर असलेले सयाजी शिंदे, तुषार भद्रे, गिरीश पतके, सुबोध भावे, मुक्ता बर्वे, किरण यज्ञोपवीत, शशांक शेंडे, प्रवीण तरडे, अनिरुद्ध दिंडोरकर, शिल्पकार प्रमोद कांबळे ही सर्व मंडळी कुलकर्णींच्याच तालमीत घडली.