सात आसरा
सात आसरा या जलदेवता असून आसरा किंवा अप्सरा या नावानेही लोकसंस्कृतीत त्या प्रसिद्ध आहेत.मानवी आयुष्यातील कोणत्याही चांगल्या अथवा वाईट कार्यालाही प्रारंभ करताना या देवतांचे स्मरण करण्याची प्रथा लोक संस्कृतीत दिसून येते.[१]
समज आणि स्वरूप
[संपादन]सृजनाची अधिष्ठात्री देवता म्हणून यांना लोकसाहित्यात ओळखले जाते.[२] स्त्रीच्या सर्जन शक्तीचे प्रतीक असलेल्या योनीची पूजा पावित्र्याने केली जाते. या संकल्पनेचा संबंध सात आसरा किंवा सप्तमातृका यांच्याशी जोडलेला दिसून येतो.[३] तरुण मुली अथवा एकदोन मुले झालेल्या स्त्रिया यांनी काही कारणाने जर पाण्यात आत्महत्या केली, तर त्यांचे आत्मे या स्वरूपात भूतलावर पुन्हा वावरतात असा समज आहे. तसेच, एखादी स्त्री बाळंतपणाच्या काळामध्ये मृत्यू पावली तर ती पुन्हा या पिशाच्च-योनीमध्ये वावरते. याचाच अर्थ असा की, ही योनी पिशाच्च स्वरूपाची आहे, असा समज प्रचलित आहे. यांचे वास्तव्य विहिरी, तळी जलाशये इ. ठिकाणी असल्याने त्यांना काही ठिकाणी जलदेवता मानलेले आहे.[४] अमावास्या-पूर्णिमेला एखादा मनुष्य पाण्यात बुडाला तर त्याला आसरांनी ओढून नेले, अशी अंधश्रद्धा आहे.
या अप्सरा नेहमी सातच्या संख्येने वावरतात म्हणून त्यांना सात आसरा म्हणतात. यांची वस्ती जलाशयाच्या ठिकाणी असते तशीच ती तीन रस्ते अथवा तीन पायवाटा जेथे एकत्र मिळतात तिथेही असते असे मानले जाते. लढाईतील वीराला जे मरण प्राप्त होते त्याप्रमाणे या आसरांचे स्वरूप आहे. ही पिशाच्चे परद्वेष्टी असून त्यांना चंद्र देवतेप्रमाणे वागावयाचे असते, त्यामुळे त्यांना देवतेच्या मैत्रिणी संबोधिले जाते, असा समज आहे. दक्षिण भारतात यांना काही ठिकाणी ग्रामदेवता मानतात. या कुमारिका असून तळ्याचे रक्षण करतात. तळी किंवा जलाशय यांना जेथे भेगा पडण्याचा संभव असतो तेथे त्यांच्या मूर्ती बसवितात. दुर्गा भागवत यांच्या मते (लौकिक दंतकथा, नवभारत, नोव्हेंबर १९५९) या देवतांचे प्रतीक म्हणून सात दगड शेंदूरचर्चित करून त्यांची पूजा केली जाते. दक्षिण भारतात सात आसराना एक भाऊही असतो.[४]
इतिहास
[संपादन]स्वर्गामध्ये निवास करणाऱ्या स्त्रिया या अप्सरा होत. अथर्ववेदामध्ये याविषयी अधिक माहिती आढळते. विश्वावसु गंधर्व याच्यासह उर्वशी या अप्सरेचा संबंध दाखविला आहे. ऋग्वेदाच्या उत्तर काळात भूलोक व विशेषतः त्यावरील वृक्ष हे देखील यांच्या संचारक्षेत्रामध्ये अंतर्भूत केलेले आहेत. औदुंबर व पळस वृक्षावर यांचा निवास असतो, असे मानले जाते.
समाजात प्रचलित समज
[संपादन]या अप्सरा एकदम एखाद्या सावजावर झडप घालतात. यांचे सावज म्हणजे कमकुवत अथवा मृदू मनाची माणसे. त्या लहान मुलांनाही पछडतात. त्यामुळे अवसे-पौर्णिमेच्या त्यांच्या फिरण्याच्या दिवशी लहान मुलांना तिन्हीसांजेच्या वेळी अथवा रात्री बाहेर पाठवू नये. यांचे स्वरूप विचित्र असते. त्या कधी कुत्री, मांजर यांच्या स्वरूपातही असतात. काही ठिकाणी गाय अथवा म्हैस व्याली म्हणजे पहिल्या तीन दिवसांचे दूध या देवतांना अर्पण करण्यात येते नाहीतर दुभते जनावर आटून जाईल असा समज आहे. या आसरानी कोणाला त्रास देऊ नये म्हणून त्यांचे वार्षिक देणे ठराविक दिवशी त्या जागी ठेवले जाते. [५] ग्रामीण भागात भरघोस पीक यावे, विहिरीचे पाणी आटू नये, पिकावर रोग पडू नये म्हणून आसरांची पूजा करतात. अमावास्येला नारळ फोडतात.[६]
ज्योतीराव फुल्यांनी साती आसरा म्हणजे पुरातन राज्य संघ असल्याचे मत मांडले आहे. बळीच्या राज्य व्यवस्थेत महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याला 9 खंडात विभागले होते. या नऊ खंडाचे अधिकारी म्हणजे खंडोबा. बळीने या अधिकारी वर्गासोबत प्रशासकीय कार्यासाठी काही लोक दिले होते, तेव्हा जिल्हा पातळीवर कलेक्टर सारखे पद होते ते म्हणजे महासुभा म्हणजेच म्हसोबा, आणि यांचा सेवक भराडी. हे सुभे काहीसे स्वायत्त होते पण काही क्षेत्रपतीनी आपला कारभार हा सर्वश्री बळी कडेच दिलेला होता तो म्हणजे आपला अशे सात क्षेत्रपाल म्हणजे सात आश्रयीत राजे "सातीआसरा" [७] जसे कोरेगाव भीमा येथील ब्रिटिश अधिकारी कॅप्टन स्टीवर्ट (इष्टुर फाकडा) हा कालांतराने तेथील ग्रामदैवत बनले. तेच साती आसरा म्हसोबा खंडोबा यांच्या बाबतीत घडले.
प्रांतानुसार नावे
[संपादन]भारताच्या विविध भागात प्रचलित नावे अशी-
- गुजरात- शंखिणी
- म्हैसूर- अक्कागारू
- मद्रास-आसकनिकल
- पंजाब-जलपरी /जोगिनी
विहिरी, तळी, पाणवठे या ठिकाणी त्यांची वस्ती असल्याने त्यांना जलयोगिनी असेही म्हणतात असे जेम्स धर्मकोशात पृष्ठ ७१८ वर नोंदविले आहे.
महाराष्ट्र ज्ञानकोशकरांच्या मते आसरा हा शब्द अप्सरा या शब्दाचा अपभ्रंश आहे. या देवता जलामध्ये राहतात ,म्हणून त्यांना जलदेवता असेही म्हणले जाते.
सात आसरांची जी नावे प्रचलित आहेत, ती जलचराच्या नावावरूनच आलेली दिसतात.
- नावे
- मत्स्यी - माश्याचे रूप असलेली
- कूर्मी -कासवाचे रूप असलेली
- कर्कटी -खेकड्याचे रूप असलेली
- दर्दुरी -बेडकाचे रूप असलेली
- जतुपी?
- सोमपा?
- मकरी - मगरीचे रूप असलेली
महाराष्ट्रात काही भागात त्यांना "माऊल्या" असेही म्हणतात.[८]
मंदिरे
[संपादन]भारतातील प्राचीन मंदिरांमध्ये साती आसारा किंवा सप्त मातृका यांची मंदिरे दिसतात. यांच्यात नारसिंही हे रूप दाखवले असेल तेंव्हा त्यांना अष्ट मातृका म्हणले जाते. कोल्हापूर जवळील खिद्रापूर तसेच प्रसिद्ध वेरूळ लेणी येथे यांची शिल्पे दगडामध्ये अंकित केलेली दिसतात.[९]
यात्रा
[संपादन]जालना जिल्ह्यातील जाफ्राबाद तालुक्यातील नेरखेड जवळच्या जीवरेखा नदीत तसेच औरंगाबाद जवळील कचनेर विहिरीत आसरांची यात्रा भरते.[६]
आदिवासी संस्कृतीत
[संपादन]गोंड साहित्यात यांच्या उत्पत्तीविषयी एक रम्य कथा आहे. गोंड त्यांना दौगन गुरूच्या कन्या मानतात.
संदर्भ
[संपादन]- ^ टीम, इनमराठी. "भारतातलं एकमेव देवीचं मंदिर जे फक्त दिवाळीच्या दिवसांमध्ये दर्शनासाठी उघडलं जातं". www.inmarathi.com (इंग्रजी भाषेत). 2022-02-09 रोजी पाहिले.
- ^ "सृजनाची अधिष्ठात्री". Maharashtra Times. 2022-02-09 रोजी पाहिले.
- ^ नारे- पवार, संध्या. "योनिपुजा ते योनिशूचिता". दैनिक दिव्य मराठी.
- ^ a b प्रभुदेसाईप्र.कृ. देवीकोश खंड ३, १९६८
- ^ प्रभुदेसाई, देवीकोश खंड ३, पृष्ठ २१०
- ^ a b डॉ. लोहिया शैला, भूमी आणि स्त्री ,२००२
- ^ महात्मा फुले,गुलामगिरी, पुष्ठ क्रमांक ३४-३८
- ^ प्रभुदेसाई प्र.कृ. देवीकोश खंड ३, १९६८
- ^ टीम, इनमराठी. "भारतातलं एकमेव देवीचं मंदिर जे फक्त दिवाळीच्या दिवसांमध्ये दर्शनासाठी उघडलं जातं". www.inmarathi.com (इंग्रजी भाषेत). 2022-02-09 रोजी पाहिले.