सांगत्ये ऐका (मराठी चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(सांगत्ये ऐका या पानावरून पुनर्निर्देशित)
सांगत्ये ऐका
दिग्दर्शन अनंत माने
निर्मिती चेतना चित्र
कथा गो. गं. पारखी
पटकथा व्यंकटेश माडगूळकर
प्रमुख कलाकार
संवाद व्यंकटेश माडगूळकर
संकलन गंगाराम माथफोड
छाया ई. महंमद
कला बाळासाहेब थत्ते
संगीत वसंत पवार
पार्श्वगायन आशा भोसले, मधुबाला जव्हेरी, विठ्ठल शिंदे, पंडित विधाते
नृत्यदिग्दर्शन लीला गांधी, बाळासाहेब गोखले
वेशभूषा एस. कर्णे टेलर्स, गणपत तांदळे, बकस साहेब
रंगभूषा राम यादव
देश भारत
भाषा मराठी
प्रदर्शित २२-५-१९५९


सांगत्ये ऐका हा एक मराठी भाषेतील कृष्णधवल चित्रपट असून मराठी चित्रपट सृष्टीतील सर्वात जास्त काळ, म्हणजे सलग १३१ आठवडे चाललेला चित्रपट आहे.[१]

गो. गं. पारखी यांनी इ.स. १९५५ मध्ये 'सांगते ऐका' नावाची एक कादंबरी लिहिली होती. कादंबरी लिहिण्या पूर्वी याच कथेवर पारखी यांनी सिनेमा काढण्याचा एक असफल प्रयत्न केला होता. नंतर अनंत माने यांनी या कादंबरीवर हा चित्रपट निर्माण केला. कादंबरीची दुसरी आवृत्ती १९६१ मध्ये प्रकाशित झाली. नंतर मात्र ही कादंबरी पुन्हा प्रकाशित आणि उपलब्ध झाली नाही. शेवटी ही कादंबरी ५८ वर्षांनी परत एकदा प्रसिद्ध झाली.[२]

हा चित्रपट पुणे येथील विजयानंद या चित्रपटगृहात सलग १३१ आठवडे चालला होता. मराठी चित्रपट सृष्टीतील हा विक्रम अजूनही कुणीही मोडला नाही. चित्रपटातील ‘बुगडी माझी सांडली ग जाता साताऱ्याला’ या लावणीला संगीतकार राम कदम यांनी चाल दिली होती. त्यावेळेस कदम हे संगीतकार वसंत पवारचे सहाय्यक होते. मात्र या लावणीने त्यांना एक वेगळी ओळख निर्माण करून दिली. या चित्रपटापासून मराठी चित्रपट सृष्टीत लावणीपटाची लाट सुरू झाली होती.[३]

कथानक[संपादन]

राजुरी या गावचा महादेव पाटील हा पैसा आणि अहंकार यामुळे गावाला अतिशय तापदायक पद्धतीने वागवत असतो. त्याची पत्नी जानकी मात्र याउलट सगळ्यांची काळजी घेणारी असते. या गावात सखाराम आणि हौसा हे सामान्य जोडपे राहत असते. गावात एकदा बैलांची शर्यत होणार असते. महादेव पाटलाला सखारामच्या खिलारी जोडीची भीती वाटते. आपल्या माणसाच्या, सावळ्याच्या मदतीने पाटील सखारामची झोपडी जाळतात. त्यात सखाराम आणि त्याचे बैल मरण पावतात. पाटलीन बाई हौसाला आपल्या घरी आणून ठेवतात. एक दिवस संधी साधून पाटील हौसावर बलात्कार करतो. त्यातून हौसाला दिवस जातात. हौसा वणवण फिरत असताना तमासगीरांच्या फडात आश्रयाला जाते. शेवटी तेथे एका मुलीला जन्म देऊन हौसा मरण पावते. ही मुलगी तमाशात नाचायला लागते. महादेव पाटलाचा मुलगा मोठा होतो आणि तो या मुलीच्या प्रेमात पडतो. शेवटी सत्य सामोरे येते आणि पाटलाची हत्या देखील एका शत्रूच्या हातून होते.[३]

कलाकार[३][संपादन]

गीते [३][संपादन]

 1. अरें अरें नंदाच्या पोरा,
 2. दिली कोंबड्याने बांग,
 3. धौम्य ऋषी सांगतसे रामकथा पांडवा,
 4. काल रात सारी मजसी झोप नाही आली,
 5. राम राम घ्या दूर करा जी भवतीचा घोळका,
 6. बुगडी माझी सांडली ग जाता साताऱ्याला,
 7. चंद्र पाहता सखी प्रीतीचा तरुण मना का येते?,
 8. सांगा या वेडीला,
 9. डोळ्या देखतची ही कथा नव्हं भूलथापाची

संदर्भ[संपादन]

 1. ^ सांगत्ये ऐका
 2. ^ मराठी पुस्तक सांगत्ये ऐका
 3. ^ a b c d "'सांगत्ये ऐका'च्या हीरक महोत्सवाच्या निमित्ताने..." bytesofindia.com. Archived from the original on १५ एप्रिल २०२२.

बाह्य दुवे[संपादन]

इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील सांगत्ये ऐका चे पान (इंग्लिश मजकूर)