Jump to content

सरिता पदकी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सरिता मंगेश पत्की (किंवा सरिता पदकी) (जन्म: १३ डिसेंबर, इ.स. १९२८; मृत्यू: अमेरिका, ३ जानेवारी, इ.स. २०१५) या मराठी भाषेत नाटके, कथा, कविता लिहिणाऱ्या एक लेखिका होत्या. त्यांनी सहा पुस्तकांचे अनुवाद केले आहेत तसेच बालवाङ्‌मयही लिहिले आहे. त्यांना महाराष्ट्र सरकारचे आणि भारत सरकारचे मिळून एकूण सात वेळा पुरस्कार मिळाले होते.

सरिता पदकी (माहेरच्या शांता कुलकर्णी) यांचा जन्म महाराष्ट्रातल्या ठाणे शहराजवळच्या आगाशी येथे झाला. वडील प्रागतिक विचाराचे शिक्षक होते. तीन भावंडांच्या पाठीवर मुलगी झाली म्हणून त्यांना शांती करायला सांगितली. पण तसे न करता त्यांनी मुलीचे नाव शांता ठेवले. सरिता पदकी यांचे प्राथमिक शिक्षण ठाण्यात, माध्यमिक शिक्षण साताऱ्यातल्या न्यू इंग्लिश स्कूलमधून, तर महाविद्यालयीन शिक्षण पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये झाले. एम.ए.(संस्कृत)च्या परीक्षेत त्या विद्यापीठात पहिल्या आल्या होत्या.

सरिता पदकी यांचे आईवडील कीर्तनात रमत, पद्यरचनाही करत. त्यामुळे सरिताबाईंना काव्याचे बाळकडू घरातच मिळाले. पुढे त्यांना रा.श्री. जोग, ग.प्र. प्रधान या प्राध्यापकांचे मार्गदर्शन मिळाले. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण शिष्यवृत्त्या, नादारी, आणि काही प्राध्यापकांच्या मदतीने झाले. सरिता पदकी तशा त्या वयाच्या आठव्या वर्षापासूनच कविता लिहीतच होत्या आणि त्या मुलांच्या मासिकांतून प्रसिद्ध होत हात्या. तीच सवय पुढे महाविद्यालयात शिकत असताना आणि अगदी शेवटपर्यंत राहिली. त्यांचे महाविद्यालयीन सहाध्यायी पुरुषोत्तम पाटील यांनी स्वहस्ते सरिताबाईंच्या कविता उतरवून काढल्या आणि साहित्य, अभिरुची आणि सत्यकथा या तीन प्रतिष्ठित नियतकालिकांकडे पाठवल्या. त्या तिन्हीकडेही प्रसिद्ध झाल्या, आणि सरिता पदकी यांना साहित्यवर्तुळात थोडे स्थान मिळाले. हे पुरुषोत्तम पाटील सरिताबाईंसारखेच प्राध्यापक आणि कवी होते.

सरिता पदकी पुण्याच्या डेक्कन कॉलेजमध्ये आणि फर्ग्युसन महाविद्यालयात काही वर्षे संस्कृतच्या प्राध्यापिका होत्या. त्यांनी अर्थविज्ञानवर्धिनीत आणि भारतीय शिक्षणशास्त्र संस्थेतही काही काळ वोकरी केली.

सरिता पदकी या ’रानवारा’ या मुलांच्या मासिकाच्या सल्लागार होत्या आणि पुण्याच्या साहित्यप्रेमी भगिनी मंडळाच्या संस्थापक सदस्य होत्या. ’सत्यकता’ या मराठी मासिकाचे लेखक आणि अर्थशास्त्रज्ञ मंगेश भगवंत पदकी (१९२३-१९९९) हे त्यांचे पती होत. त्यांची तीनही मुले अमेरिकेत आहेत. ’किशोर’ या मुलांच्या मासिकात सरिता पदकी यांनी १९७० च्या दशकात केलेले लेखन अतिशय लोकप्रिय झाले होते.

३ जानेवारी २०१५ रोजी त्यांचे अमेरिकेमध्ये वृद्धापकाळाने निधन झाले

पुस्तके

[संपादन]
  • अंगणात माझ्या (काव्यसंग्रह)
  • आधुनिक महाराष्ट्रातील प्रमुख विचारवंतांचे स्त्री जीवनविषयक संकलन (संपादित-मार्च १९९७)
  • कभी कभी
  • काळोखाची लेक (ब्राझीलच्या झोपडपट्टीत राहणाऱ्या करोलिना मारिया डी जीझस यांच्या ’चाइल्ड ऑफ डार्क’ या आत्मनिवेदनाचा मराठी अनुवाद)
  • खून पहावा करून (नाटक; अनुवादित, मूळ इंग्रजी नाटक - नॉट इन द बुक, लेखक ऑर्थर वॅटकिन)
  • घुम्मट (कथा संग्रह)
  • गांधीच्या जीवनातील अखेरचे पर्व (अनुवादित)
  • चैत्रपुष्प (काव्यसंग्रह)
  • पांथस्थ (यूजीन ओनील यांच्या नाटकाचा मराठी अनुवाद)
  • बाधा (नाटक) (१९५५)
  • बारा रामाचे देऊळ (कथासंग्रह, १९६३)
  • लगनगंधार (काव्यसंग्रह)
  • संशोधक जादूगार (वेस्टिंगहाउसच्या चरित्राचा मराठी अनुवाद)
  • सात रंगांची कमान माझ्या पापण्यांवर (जपानी कवितांचा मराठी काव्यानुवाद)
  • सीता (नाटक)
  • द हाउंड ऑफ बास्कर व्हील (अनुवादित)

बालवाङ्‌मय

[संपादन]
  • अक्कल घ्या अक्कल
  • करंगळ्या
  • गुटर्र गूं गुटर्र गूं (बालकविता)
  • जंमत टंपू टिल्लूची (बालकथा संग्रह)
  • नाच पोरी नाच (बालकविता)
  • छोटू हत्तीची गोष्ट
  • हसवणारे अत्तर