सम्यक साहित्य संमेलन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सम्यक साहित्य संमेलन हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीतर्फे आयोजित केले जाते.

पहिल्या सम्यक साहित्य संमेलनाचे आयोजन इ.स. २०१० साली करण्यात आले होते. दीनानाथ मनोहर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या संमेलनाचे उद्घाटन कांचा आयलया यांच्या हस्ते झाले होते. परशुराम आठवले हे या संमेलनाचे स्वागताध्यक्ष होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक समिती व पुणे विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टडीज विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने, पुणे विद्यापीठाच्या एका सभागृहात, १४-१६ डिसेंबर २०१२ या काळात ३रे सम्यक साहित्य संमेलन झाले. संमेलनाध्यक्ष संजय पवार, स्वागताध्यक्ष परशुराम वाडेकर आणि कार्याध्यक्ष डॉ. विजय खरे आणि अविनाश महातेकर होते. संमेलनाचा समारोप गंगाधर पानतावणे यांच्या भाषणाने झाला.

संमेलनात पास झालेले ठराव : १. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात यावा.
२. महात्मा फुले आणि सावित्री फुले यांना भारतरत्‍न पुरस्कार द्यावा.
३. शाहू-आंबेडकर-फुले यांच्यावरील धड्यांचा पाठपुस्तकात समावेश करावा, आदी.

संजय पवार यांच्या भाषणातून

"या तिसऱ्या सम्यक साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आपण फुले-शाहू-आंबेडकरांचा गजर, ब्राह्मणी व्यवस्थेवर टीका, बहुजनवाद, राजकीय नेतृत्वावर टीका, हा नेहमीचा सिलॅबस बाजूला ठेवून अंतर्मुख होऊ या."

आतापर्यंतची सम्यक साहित्य संमेलने[संपादन]

  • १ले सम्यक साहित्य संमेलन पुण्यात ११ ते १३ एप्रिल २०१० या कालावधीत भरले होते. दीनानाथ मनोहर हे त्या संमेलनाचे अध्यक्ष होते.
  • २रे संमेलन पुण्यात १ ते ३ एप्रिल २०११ या काळात झाले होते; संमेलनाध्यक्ष नामदेव ढसाळ होते.
  • ३रे सम्यक साहित्य संमेलन १४-१६ डिसेंबर २०१२ या काळात पुणे शहरात झाले. संमेलनाध्यक्ष संजय पवार होते
  • ४थे संमेलन पुणे शहरात १३-१५ डिसेंबर २०१३ या काळात झाले. अध्यक्षस्थानी कवयित्री नीरजा होत्या. या संमेलनात साहित्यिक रा.ग. जाधव यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला.
  • ५वे संमेलन पुणे शहरात १७-१८-१९-२० डिसेंबर २०१५ या काळात झाले. रावसाहेब कसबे संमेलनाध्यक्ष होते. या संमेलनात डॉ. आ.ह. साळुंखे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला. ब्राह्मणांनी सर्व संतांचे ब्राह्मणीकरण केले अशी टिप्पणी कसबे यांनी केली.

साहित्य क्षेत्रात पुरस्कार देताना परस्पर मैत्रभाव, आत्मीयता, हितसंबंधांना प्राधान्य दिले जाते. साहित्यकृतीचा दर्जा, गुणवत्ता, लेखनक्षमता यांचा विचारच केला जात नाही. अनेकदा त्याला जातीय संदर्भही असतो असा सूर या सम्यक साहित्य संमेलनात व्यक्त झाला.

  • ६वे सम्यक साहित्य संमेलन २०१७ सालच्या एप्रिल महिन्यात झाले. स्थळ-अध्यक्ष माहीत नाहीत.
  • एक ६वे सम्यक साहित्य संमेलन ११-१२-१३-१४ जानेवारी २०१८ या काळात पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिरात झाले.. प्रा. यशवंत मनोहर संमेलनाध्यक्ष होते. हे संमेलन विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती, आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाच्या वतीने आयोजित करण्यात आले.होते. संमेलनात भीमशाहिरी गीतांचे कार्यक्रम झाले. संमेलनातील यशवंत मनोहर यांच्या साहित्यिक अध्यक्षीय भाषणाचा सारांश :- "’त्यांच्या’कडे वेगवेगळी शस्त्रे असतील, पण ’आपल्याकडे’ शाहू-फुले-आंबेडकर आणि संविधान आहे. ’पेशवाई’ आणि त्याही आधीच्या व्यवस्थेकडे ’आपल्याला’ ढकलले जात आहे. ’आपल्या’ या शब्दाची व्याख्या विस्तृत करा. मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, भटके विमुक्त, आदिवासी, मराठा, डावे, समाजवादी अशा (ब्राह्मण सोडून) सर्वांना समान मुद्द्यांवर आणा, क्रांतीचा कार्यक्रम आणा. हे जर शक्य झाले तर ’आपण’ अराजकाच्या तावडीत सापडणार नाही. देशाचे नवे रूप निर्माण करू शकू. ’संघा’ची ताकद वाढेल अशी ’आपली’ कुठलीही उक्ती किंवा कृती असता कामा नये. उलट ’आपल्या’तले जे लोक ’त्यांच्या’जवळ गेले आहेत त्यांना परत आणा, ’आपल्या’तील ताकद आता गोठू देऊ नका." त्यानंतर यशवंत मनोहर यांनी भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यावर निशाणा साधला. राज्य शासनाने भिडे वाड्याचे स्मारक करावे नाहीतर पुण्यात मोठी चळवळ उभारण्यात येईल अशी धमकी संमेलनाचे मुख्य संयोजक परशुराम वाडेकर यांनी दिली.
  • ७वे सम्यक साहित्य संमेलन पुणे शहरात २० ते २४ फेब्रुवारी २०१९; संमेलनाध्यक्ष - जी.के. ऐनापुरे)

अन्य माहिती[संपादन]

ही सम्यक साहित्य संमेलने दरवर्षी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती आयोजित करते.

हे संमेलन आणि, सम्यक साहित्य संसद भरवते तो ’सम्यक साहित्य मेळावा’ भिन्न आहे.

त्याचप्रमाणे नागपूरच्या सम्यक थिएटरतर्फे इ.स.२००० पासून दरवर्षी भरणारे ’सम्यक थिएटर पारिवारिक संमेलन’ही वेगळे आहे.

आरग (मिरज) येथे २००४साली एक पारिवारिक साहित्य संमेलन भरले होते. संमेलनाध्यक्ष प्रा.डाॅ. रवींद्र ठाकूर होते.

दिल्लीत तालकटोरा स्टेडियममध्ये होतात ती सम्यक बौद्ध संमेलने वेगळी आहेत. या संमेलनात दरवर्षी 'गीतोंभरी शाम बाबासाहेब के नाम' नावाचा भीमगीतांचा कार्यक्रम असतो.




पहा : मराठी साहित्य संमेलने; दलित संस्था