सदस्य:वर्षा आठवले/धूळपाटी1

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

लीना मेहेंदळे या (जानेवारी ३१, इ.स. १९५० - हयात) महाराष्ट्र राज्याच्या माजी अतिरिक्त मुख्य सचिव, लेखिका, गोवा राज्याच्या माजी मुख्य माहिती अधिकारी[१] तसेच सामान्य प्रशासन विभागाच्या सदस्या आहेत.

जन्म[संपादन]

लीना मेहेंदळे यांचा जन्म जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथे ३१ जानेवारी १९५० रोजी झाला.[२]

कौटुंबिक माहिती[संपादन]

त्यांच्या आईचे नाव नीला असे होते. बिहार राज्यातील दरभंगा या जिल्ह्याच्या ठिकाणी त्यांचे वडील डॉ.बलराम सदाशिव अग्निहोत्री हे 'मिथिला संस्कृत संशोधन संस्थे'मध्ये तत्त्वज्ञान आणि संस्कृत या विषयांचे प्राध्यापक होते.

शिक्षण[संपादन]

त्यांनी अर्थशास्त्र या विषयात नागपूरच्या एस.एन.डी.टी.महाविद्यालयातून पदवी संपादन केली. १९७० साली त्यांनी पटना विद्यापीठातून भौतिकशास्त्र या विषयात एम.एस्सी.ची पदवी संपादन केली. १९८९ साली इंग्लंडमधील ब्रॅडफोर्ड विद्यापीठातून ‘प्रकल्प नियोजन’ या विषयात एम.एस्सी. पूर्ण केले. १९७४ साली भारतीय प्रशासकीय सेवेची परीक्षा त्या उत्तीर्ण झाल्या आणि त्यांना महाराष्ट्र कॅडर मिळाले.[३]

कारकीर्द[संपादन]

महसूल, प्रशासन, प्रशासकीय कायद्याची अंमलबजावणी, विकास प्रशासन, औद्योगिक विकास, प्रशिक्षण आणि मनुष्यबळ विकास, कार्यालयीन कामकाजात संगणक व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर अशा प्रशासनाच्या सर्वच क्षेत्रातील विषय त्यांनी हाताळले आहेत.

राज्य पातळीवरील काम[संपादन]

सांगली महानगर पालिकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, सांगलीच्या जिल्हाधिकारी, पश्‍चिम महाराष्ट्र विकास महामंडळ पुण्याच्या अध्यक्षा अशा विविध पदांवर त्यांनी काम केले. सांगली जिल्ह्यातील जत या तालुक्यात देवदासींची अनिष्ट प्रथा पाळली जात असे. त्यांनी देवदासींना व्यवसाय प्रशिक्षण देऊन सक्षम करण्याचा अभिनव उपक्रम अवलंबला. सांगलीच्या जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असताना त्यांनी एकात्मिक ग्रामविकास योजनेअंतर्गत देवदासींच्या आर्थिक पुनर्वसनाचे काम केले. जत तालुक्यातील सरकारी जमिनीवर देवदासींसाठी घरे बांधून देण्यात आली. त्यांच्या मुलांसाठी वसतिगृह सुरू करण्यात आले. देवदासींना यंत्रावर लोकरीचे विणकाम, लोकरीच्या कपड्याचे पॅकींग, मार्केटींग या सर्व गोष्टी शिकवण्यात आल्या. देवदासींनी तयार केलेल्या लोकरीच्या उत्पादनांना पश्‍चिम महाराष्ट्र विकास मंडळाच्या मार्फत बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात आली. लांबच्या गावातून प्रशिक्षणासाठी येणाऱ्या देवदासींना सायकली उपलब्ध करून देण्यात आल्या. या प्रकल्पाच्या माध्यमातून सरासरी २८ ते ४० वयोगटातील १५० महिलांचे आर्थिक पुनर्वसन करण्यात आले. जमाबंदी आयुक्त आणि नाशिकच्या जिल्हाधिकारी असताना लीना मेहेंदळे यांनी कार्यालयांचे संगणकीकरण घडवून आणले. तसेच जमिनींचे नकाशे, जमिनी संदर्भातील कागदपत्रांचे तपशील यांचेही संगणकीकरण करण्यात आले.[४]

राष्ट्रीय पातळीवरील काम[संपादन]

पेट्रोलियम कॉन्झर्वेशन रिसर्च असोसिएशन’मध्ये त्या संचालक होत्या.[५] ऊर्जा बचतीसंदर्भात जनजागृती निर्माण व्हावी यासाठी आकाशवाणी आणि दूरदर्शनवरून प्रसारित केल्या जाणाऱ्या साप्ताहिक मालिकांसाठी मार्गदर्शनाचे काम मेहेंदळे यांनी केले. एनर्जी ऑडिट विभागाची पुनर्रचना करून बायोडिझेल मंत्रालयासाठी नवीन योजना व कार्यक्रमांची आखणी केली. राष्ट्रीय महिला आयोगाच्या जॉईंट सेक्रेटरी या पदावर असताना लीना मेहेंदळे यांनी महाराष्ट्र, बिहार आणि राज्यस्थान या राज्यांमध्ये महिलांविरुद्ध घडणाऱ्या गुन्ह्यांचा अभ्यास केला. संयुक्त राष्ट्र संघटनेमध्ये ‘द कन्व्हेन्शन ऑन द एलिमिनेशन ऑफ ऑल फॉर्म्स ऑफ डिस्क्रिमिनेशन अगेन्स्ट वुमेन’ (सीइडीएडब्ल्यू) या विषयावर झालेल्या परिषदेमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. पुणे येथे १९८६ साली स्थापन झालेल्या ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथी’[६]चे देशव्यापी नेटवर्क त्यांनी तयार केले. अतिरिक्त मुख्य सचिव सामान्य प्रशासन विभाग या पदावरून त्या निवृत्त झाल्या. लीना मेहेंदळे या केंद्रीय प्रशासन लवादाच्या सदस्या म्हणून त्यांनी काम केलं आहे.

प्रकाशित साहित्य[संपादन]

चालू घडामोडींबरोबरच शिक्षण, विज्ञान, तंत्रज्ञान, बालवाङ्मय, संगणक, कायदा, लोकप्रशासन अशा विविध विषयांवर त्यांचे ५०० लेख आणि २३ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. लोकप्रशासनातील अनुभवांवर त्यांनी काही पुस्तके लिहिलेली आहेत.[७]

  1. संगणकाची जादूई दुनिया
  2. समाजमनातील बिंब
  3. सुप्रशासनाचे पहिले पाऊल
  4. नित्य-लीला

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ Maharashtra Times https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/article/inadequate-gauge-of-gdp/articleshow/68906378.cms. 2020-03-06 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  2. ^ www.kaushalamtrust.com http://www.kaushalamtrust.com/leena.htm. 2020-03-06 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  3. ^ Rashtram School of Public Leadership (इंग्रजी भाषेत) https://rashtram.org/team/leena-mehendale/. 2020-03-06 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  4. ^ महाराष्ट्र नायक (इंग्रजी भाषेत) https://maharashtranayak.in/maehaendalae-lainaa. 2020-03-06 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  5. ^ www.youtube.com https://www.youtube.com/watch?v=LDYyblhtEWc. 2020-03-06 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  6. ^ punenin.org http://punenin.org/. 2020-03-06 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  7. ^ www.bookganga.com https://www.bookganga.com/eBooks/Home. 2020-03-06 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)