श्रीराम गुंदेकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

श्रीराम रावसाहेब गुंदेकर तथा डॉ. श्रीराम गुंदेकर, (जन्म : आंबेसावळी-बीड, १२ ऑक्टोंबर १९५५; मृत्यू : १२ जानेवारी २०१८) हे मराठीतले एक ग्रामीण साहित्यिक, समीक्षक, सत्यशोधकी साहित्याचे अभ्यासक, संशोधक व भाष्यकार होते. बीड जवळील आंबेसावळी येथे एका शेतकरी त्यांचा कुटुंबात जन्म झाला. महात्मा फुले यांच्या विचारांच्या साहित्यप्रभावातून त्यांचे वाङ्मयीन व्यक्तिमत्त्व घडत गेले.

१९७५ साली ते युक्रांद चळवळीचा एक हिस्सा होते. याच काळात त्यांनी महात्मा फुले यांच्या साहित्यावर पीएच. डी. संपादन केली.

२००१ साली सोनवड (सांगली जिल्हा) येथे गुंदेकरांनी ’सत्यशोधकी साहित्य व संस्कृती परिषद' स्थापन केली. गुंदेकर या परिषदेचे अध्यक्ष आहेत. गुंदेकरांनी लिहिलेल्या ‘उचल’(१९९०) या पहिल्या कथासंग्रहात अठरा कथांचा समावेश असून त्यांत शिक्षण, राजकारण, दुष्काळ, सहकारी साखर कारखाना यांच्यात पिचलेला गावगाडा यांचे संघर्षमय जगणे हे विषय हाताळले आहेत. पुस्तकातल्या ‘उचल’ या कथेचा फ्रेंच, हिंदी आणि तेलगू भाषांत अनुवाद झाला आहे. त्यांच्या ‘आम्ही आमचे वाली’ या कथेचे नाट्यररुपांतर नाटककार व्यंकटेश काकनाटे यांनी केले आहे.

‘लगाम’ (१९९९) या कथासंग्रहात वीस कथा आहेत. वेगवेगळे विषय घेऊन या कथा येतात. त्यांत कार्यकर्त्यांचे चित्रण येते. कार्यकर्ते विशिष्ट विचाराने भारावलेले असतात त्यामुळे खोटी दांभिक, स्वार्थी कार्ये आणि कार्यकर्त्यांची सोंगे घेतलेली माणसे उघडी पडतात. किंबहुना त्यांचा खोटेपणा उघड करणे हा श्रीराम गुंदेकरांच्या कथांमधला एक महत्त्वाचा अनुभव असतो. कार्यकर्त्यांच्या जगाबरोबर सामान्य माणसांचे एक प्रामाणिक जगही त्यांना आकर्षित करते. म्हणूनच सामान्य माणसांची सुख दु:खे त्यांनी फार समरसून रेखाटलेली आहेत. गुंदेकरांच्या कथेतून मराठी कथेला न गवसलेले अनेक विषय येतात. शोषण करणारा वर्ग आणि शोषित वर्ग यांच्यातील अंत:संघर्ष कमालीच्या सामर्थ्याने आणि टोकदारपणे त्यांची कथा टिपते.

‘ग्रामीण साहित्य : प्रेरणा आणि प्रयोजन’ (१९९९) या ग्रंथात ग्रामीण साहित्याची प्रेरणा व प्रयोजन याविषयी भाष्य करून ग्रामीण साहित्याची चळवळ, तिच्या विकासाची भूमिका गुंदेकरांनी मांडली आहे.

‘महात्मा जोतिबा फुले : विचार आणि वाङ्मय - भाग : १ आणि २’ (१९९२), ‘सत्यशोधकी साहित्य : परंपरा आणि स्वरूप’ (२००३), ‘महाराष्ट्राचे शिल्पकार सम्यक क्रांतीचे प्रणेते सत्यशोधक म. जोतिबा फुले’ (२००४) , ‘महात्मा फुले यांची अखंडरचना : म. फुले स्मृतिव्याख्यानमाला’ (२००५), ‘म. जोतिबा फुले : साहित्य आणि साहित्यमूल्ये’ (२००२) या संशोधनपर ग्रंथांतून म. फुले यांच्या विचारातून भारतीय समाजाची पुनर्मांडणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पहिल्या प्रकरणात म.फुले यांच्या नाटकाचे विवेचन केल्यानंतर पुढच्या तीन प्रकरणातून गुंदेकरांनी म.फुले यांच्या विविध प्रकारच्या काव्यलेखनाचे स्वरूप स्पष्ट केले आहे. म. फुले यांनी लिहिलेला ‘छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा पवाडा हा अनेक दृष्टीने स्वतंत्रपणे अभ्यास करण्याएवढा महत्त्वाचा अभ्यासविषय आहे. फुल्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांकडे गोब्राह्मण प्रतिपालक अशा संकुचित दृष्टिकोनातून पाहण्याऐवजी सर्व समाजाचे हित करणारा कल्याणकारी राजा, या दृष्टीने त्यांनी त्यांच्याकडे पाहिले आहे. त्यांची ही दृष्टी ऐतिहासिक वास्तव स्पष्ट करणारी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांकडे सरदाराचा व सरंजामदाराचा पुत्र म्हणून पाहण्याऐवजी ‘कुळवाडीभूषण’ म्हणून पाहिले. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वसामान्य लोकांना जवळ करून त्यांच्या जिवाला जीव लावून राज्य उभे केले. हे पाहता म. फुले यांनी लावलेला शिवाजी महाराजांच्या जीवनाचा हा अन्वयार्थ अगदी योग्य आहे हे गुंदेकरांच्या लेखनावरून स्पष्ट होते.

‘रा.ना. चव्हाण यांचे विचारविश्व’ (२०१४) या लेखसंग्रहात सत्यशोधक रा.ना. चव्हाण यांच्या कार्याचा वेध घेतलेला आहे.

‘सत्यशोधकी साहित्याचा इतिहास : खंड १ (प्रारंभ ते १९२०)’ (२०१०). ह्यात सत्यशोधकी साहित्याने वर्णजाती स्त्रीदास्य व्यवस्थेला नकार दिला. साहित्याने जनद्रोही जीवन मूल्यांना आणि साहित्य मूल्यांनाही नकार दिला. सत्यशोधकांनी जनसामान्यांना आपल्या साहित्याचा नायक नवले. म्हणून सर्वार्थाने हा साहित्यप्रवाह क्रांतिकारक आहे. या प्रवाहात वेदना, विद्रोह आणि नकार या प्रेरणा आहेत. या सर्वांची मांडणी या खंडात केलेली आहे. सत्यशोधकी साहित्याच्या प्रारंभ काळाचे मूल्यात्मक नोंद तपशीलासह व संदर्भासह या खंडातून येते.

‘सत्यशोधकी साहित्याचा इतिहास : खंड २, भाग १ व २ (इ.स.१९२१ -१९५०)’ (२०१३) या ग्रंथात सहासष्ट लेखकांच्या सत्यशोधकीय लेखनाचा विचार केला आहे. महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक जडणघडणीत या सर्व सत्यशोधकी लेखकांचा, नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा सिंहाचा वाटा आहे.याची मांडणी या ग्रंथातून केलेली आहे.

‘ढगाची तहान’ (१९९९) हा बालकविता संग्रह व ‘श्रेष्ठ कोण माणूस की मांजर’ (१९९९) हा गुंदेकरांनी लिहिलेला प्रौढसाहित्य ग्रंथ आहे.

गुंदेकरांनी ‘बळीबा पाटील : कृष्णराव भालेकर यांची कादंबरी’ (१९९८), ‘ढढ्ढाशास्त्री परान्ने : मुकुंदराज पाटील यांची कादंबरी’ (२००१), ‘देशभक्त लीलीसार : मुकुंदराव पाटील यांचे खंडकाव्य’ (२००३), ‘सत्यशोधकी निबंध’ (२००१) इत्यादी ग्रंथांचे संपादनही केलेले आहे.

डॉ. श्रीराम गुंदेकर हे पहिल्या पिढीतील ग्रामीण कथाकार, समीक्षक म्हणून ओळखले जातात. त्यांनी सत्यशोधकी साहित्याचा इतिहास लेखनाचा चार खंडांचा बृहत् लेखनप्रकल्प सुरू केला आणि तो पूर्णत्वास नेला. ‘सत्यशोधकी साहित्याचा इतिहास : खंड : ३, भाग १,२ व ३ (१९५१ - १९९०)’लिहून पूर्ण असला तरी अप्रकाशित आहे. ‘सत्यशोधकी साहित्याचा इतिहास : खंड :४’ हा हस्तलिखित स्वरूपात आहे. हे दोन्ही खंड लवकरच प्रकाशित होतील, असे सांगितले जाते..

संदर्भ (श्रीराम गुंदेकर यांची पुस्तके)[संपादन]

 • उचल (कथासंग्रह)
 • ग्रामीण साहित्य प्रेरणा व प्रयोजन (समीक्षाग्रंथ)
 • ढगाची तहान (बालकविता संग्रह, १९९९)
 • महात्मा जोतिबा फुले : विचार आणि वाङ्मय - भाग : १ आणि २
 • महात्मा फुले- साहित्य आणि साहित्यमूल्ये
 • रा.ना. चव्हाण यांचे विचारविश्व (लेखसंग्रह, २०१४)
 • लगाम (कथासंग्रह)
 • श्रेष्ठ कोण माणूस की मांजर (लेखसंग्रह, १९९९)
 • सत्यशोधकी महात्मा फुले (चरित्र ग्रंथ)
 • सत्यशोधकी साहित्य : परंपरा आणि स्वरूप
 • सत्यशोधकी साहित्याचा इतिहास : खंड १ (प्रारंभ ते १९२०)
 • सत्यशोधकी साहित्याचा इतिहास : खंड २, भाग १ व २ (इ.स.१९२१ -१९५०)
 • सत्यशोधकी साहित्याचा इतिहास : खंड ३ - भाग १ ते ३ (१९५१ - १९९०) व खंड ४ (प्रकाशनाधीन)

सन्मान[संपादन]

 • परभणी येथे ८-९ फेब्रुवारी २०१४ या तारखांना झालेल्या १२व्या विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद.
 • गोडोली (सातारा जिल्हा) येथे झालेल्या ६व्या सत्यशोधक साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद.

सन्मान[संपादन]

 • श्रीराम गुंदेकर हे अखिल भारतीय सत्यशोधकी साहित्य संशोधन परिषदेचे काही काळ अध्यक्ष होते.

पहा : सत्यशोधकी साहित्य संमेलन; ओबीसी साहित्य संमेलन; विद्रोही साहित्य संमेलन; मराठी साहित्य संमेलने