Jump to content

शोले (चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(शोले, हिंदी चित्रपट या पानावरून पुनर्निर्देशित)
उदयोन्मुख लेख
हा लेख २७ मार्च, २०१० रोजी मराठी विकिपीडियावरील उदयोन्मुख सदर होता. २०१०चे इतर उदयोन्मुख लेख


शोले
दिग्दर्शन रमेश सिप्पी
निर्मिती जी.पी. सिप्पी
कथा सलिम खान, जावेद अख्तर
प्रमुख कलाकार अमजदखान
संजीव कुमार
अमिताभ बच्चन
धर्मेंद्र
हेमामालिनी
जया भादुरी
संगीत राहुल देव बर्मन
देश भारत
भाषा हिंदी
प्रदर्शित १५ ऑगस्ट १९७५



शोले हा भारतामधील हिंदी भाषिक चित्रपटांच्या इतिहासातील सर्वाधिक यशस्वी मानला गेलेला चित्रपट आहे. हा चित्रपट १९७५ साली प्रदर्शित झाला. अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, हेमामालिनी, संजीव कुमारअमजदखान यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका होत्या. चित्रपट प्रदर्शित झाल्यावर अनेक टीकाकारांना तोंड द्यावे लागले त्यामुळे पहिल्या काही आठवड्यात या चित्रपटाला फ्लॉप चित्रपटाचा शिक्का बसला. परंतु जे प्रेक्षक हा चित्रपट पाहून आले, ते भारावून गेले व कर्णोपकर्णी प्रसिद्धीमुळे या चित्रपटाकडे लोक वळले व पाहता पाहता इतिहास घडला. मुंबईच्या मिनर्व्हा चित्रपटगृहात हा तब्बल २८६ आठवडे, म्हणजे ५ वर्षे ६ महिने, तळ ठोकून होता. उत्पन्नाचे त्या काळातील सर्व विक्रम या चित्रपटाने मोडले व आजच्या काळातील चलनवाढीचे गणित लक्षात घेतल्यास या चित्रपटाचे उत्पन्न २३६ कोटी ४५ लाख रुपये इतके होते. हा आजच्या काळातही विक्रम आहे. अजूनही हा चित्रपट एखाद्या चित्रगृहात लागला की तो बघायला प्रेक्षक गर्दी करतात, हे याचे वैशिष्ट्य आहे. चित्रपटाने नुसतेच उत्पन्नाचा विक्रम केला नाही, तर जनमानसात या चित्रपटाचे संवाद रुळले आहे. 'कितने आदमी थे', 'पचास पचास कोस जब बच्चा रोता है तब उसकी मां उसे ’'बेटा चुप हो जा नही तो गब्बर आ जायेगा’' ' असे अनेक संवाद हिंदी प्रेक्षकांच्या बोलीमध्ये म्हणी-वाक्प्रचारांसारखे रुळले आहेत. या चित्रपटाने आता पाठ्यपुस्तकात प्रवेश केला असून लहान मुलांना या चित्रपटाची महती सांगितली जाते. बी.बी.सी.ने या चित्रपटाची शतकातील एक सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून निवड केली, तर फिल्मफेर नियतकालिकाने त्यांच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात '५० वर्षांतील सर्वोत्कृष्ट चित्रपट' म्हणून या चित्रपटाला गौरविले.

कथानक

[संपादन]

चित्रपटाच्या सुरुवातीला एक पोलीस अधिकारी ठाकुर बलदेवसिंगाने बोलावल्यामुळे त्यांना भेटायला येतात. भेटीमध्ये ठाकुर पोलीस अधिकाऱ्याला आपला बेत सांगतो. काही वर्षांपूर्वी पोलीससेवेत असताना त्याने जय आणि वीरू नावाच्या दोन भुरट्या चोरांना पकडलेले असते. त्यांना तुरुंगात नेताना वाटेत पोलिसांवर डाकूंचा हल्ला होतो. जय व वीरू पोलिसांच्या बाजूने लढण्यासाठी आपले पाश सोडवण्याची विनंती करतात. ठाकुर आपल्या जोखमीवर दोघांना मोकळे करतो. जय, वीरू व ठाकुर असे तिघे मिळून डाकूंचा हल्ला परतवून लावतात. परंतु या चकमकीत ठाकुर घायाळ होतो. खरे तर, जय व वीरूंसाठी पळून जाण्यासाठी ही चांगली वेळ असते. परंतु ठाकुराला हॉस्पिटलात पोचवायचे की नाही यासाठी जय नाणेफेक करतो. नाणेफेकीचा निर्णय होकारात्मक ठरतो. त्याप्रमाणे ते दोघे ठाकुराला हॉस्पिटलात पोचवतात व त्याचा जीव वाचवतात. ठाकुराला ही गोष्ट आठवते. जय आणि वीरू हे दोघे गब्बरसिंग नावाच्या अतिशय क्रूर डाकूविरुद्ध झुंजण्यास लायक आहेत असे ठाकुराला वाटत राहते. म्हणून, या दोघांना हुडकून देण्याची विनंती ठाकुर भेटीला आलेल्या पोलीस अधिकाऱ्याला करतो.

इकडे जय व वीरू अजूनही भुरट्या चोऱ्या करून आपले जीवन व्यतीत करत असतात. दरम्यान त्यांची मैत्री अजूनच गाढ होते. पोलीस अधिकाऱ्यांना हे दोघेजण एका तुरुंगात आढळतात. त्यांची ज्या दिवशी सुटका होते त्या दिवशी पोलीस त्यांची गाठ ठाकुराशी घालून देतात. ठाकुर आपला इरादा त्यांना सांगतो व गब्बरसिंगाला पकडून दिल्यास त्यांच्यातर्फे २० हजारांचे व सरकारचे ५० हजार रुपयांच्या इनामाचे आमिष त्यांना दाखवतो. या आमिषापोटी जय व वीरू गब्बरसिंगाला जिवंत पकडून देण्याचे आव्हान स्वीकारतात.

गब्बरसिंगाची दहशत

[संपादन]

गब्बरसिंग हा ठाकुराच्या रामगढ या गावाच्या जवळपासच्या गावात आपल्या दहशतीच्या जोरावर गावकऱ्यांकडून पाहिजे तशी खंडणी वसूल करत असतो. गब्बरसिंगाला ठाकुराने एकदा पकडलेले असते व त्याचा सूड उगवण्यासाठी म्हणून गब्बरसिंग ठाकुराच्या संपूर्ण कुटुंबाला ठार मारतो व ठाकुराचे दोन्ही हात छाटून टाकतो. तेव्हापासून ठाकुर आपले हात शाल पांघरून सतत झाकून ठेवीत असतो. गब्बरसिंग कुठल्याही थरापर्यंत जाऊ शकत असल्याने त्या परिसरात गब्बरसिंगाबद्द्ल गावकऱ्यांच्या मनांत जबरदस्त दहशत असते. आया आपल्या मुलांना गब्बरसिंग येईल असे सांगून झोपवत असत. गब्बरसिंगाच्या टोळीत अनेक जण होते. कालिया, सांभा यांसारखे लोक गब्बरसिंगाच्या आदेशावर कोठेही जाऊन धुमाकूळ घालत. एकदा कालिया व अन्य काही डाकू रामगढात येऊन धान्याची खंडणी मागतात. काही गावकरी खंडणी देतात; परंतु ठाकुर कोणताही गावकरी गब्बरसिंगाला खंडणी देणार नाही, असे कालियाला ठणकावून सांगतात व आता रामगढाच्या सुरक्षेसाठी दोन शूर शिलेदार आले आहेत असा इशारा देतात. जय व वीरू दोघेही चांगले नेमबाज असतात. त्यामुळे कालियाला परतावे लागते.

इकडे कालिया आपल्या इतर दोन साथीदारांसह रिकाम्या हातांनी परत आल्यामुळे गब्बरसिंगाचा राग अनावर होतो व असे होणे त्याच्या दबदब्याच्या दृष्टीने घातक असते. या अपयशाची शिक्षा म्हणून गब्बरसिंग कालिया व इतर दोघांना ठार मारतो. या प्रसंगादरम्यान घडणारा संवाद हिंदी चित्रपटसृष्टीतील एक इतिहास बनला आहे. गब्बरसिंग स्वतः डाकूंची टोळी घेऊन रामगढावर होळीच्या दिवशी हल्ला करायचे ठरवतो.

ठरवल्याप्रमाणे गब्बरसिंग होळीच्या दिवशी गावात सण साजरा होत असताना हल्ला करतो. गब्बरसिंगाचे साथीदार व जय-वीरू यांच्यामध्ये जोरदार चकमक झडते. गब्बरसिंग जयाला ओलीस ठेवतो व सर्वांना शस्त्रे खाली टाकायला सांगतो. जय स्वतःहून गब्बरसिंगापुढे झुकत असल्याचे दाखवत असतानाच गब्बरसिंगाच्या डोळ्यांत धूळ टाकून पारडे आपल्या बाजूस वळवतो व पाहता पाहता जय आणि वीरू गब्बरसिंगाला पळवून लावतात. परंतु या धुमश्चक्रीत प्रत्यक्ष मदत न केल्याबद्दल वीरू ठाकुरावर चिडतो. तेव्हा ठाकुर गब्बरसिंगाने आपले हात छाटल्याचे उघड करतो. जय-वीरू यांच्या मनांत ठाकुराबद्दलचा आदर दुणावतो.

गावातील आयुष्य

[संपादन]

दरम्यान जय व वीरू हे गावकऱ्यांमध्ये मिळून-मिसळून राहू लागतात. त्यांच्या मनमिळाऊ स्वभावामुळे ते गावकऱ्यांच्या गळ्यांतील ताइत होतात. दरम्यान वीरूला बसंती या टांगेवालीबद्दल आकर्षण वाटू होते व तो तिच्यासंगे संसार थाटण्याचे मनसुबे रचू लागतो. कोणत्याही मार्गाने वीरू तिच्याशी जवळीक साधायचा प्रयत्न करत असतो. वीरूची सोयरीक घेऊन बसंतीच्या मावशीशी बोलणी करायला गेलेला जय अश्या पद्धतीने बोलणी करतो, की मावशी ठणकावून सांगते - "भले बसंती माझी पोटची पोर नसेल, तरी तिचे लग्न एक वेळ नाही झाले तरी चालेल पण वीरूशी कदापि करून देणार नाही". यामुळे चिडलेला वीरू बसंतीशी आपले लग्न न झाल्यास आत्महत्या करण्याची धमकी गावकऱ्यांना देतो. या धमकीला घाबरून गावकरी बसंतीला व तिच्या मावशीला लग्नासाठी राजी होण्याची गळ घालतात. दरम्यान जय व ठाकुराची विधवा सून राधा या दोघांमध्ये 'शब्देवीण संवाद' चालला असतो व दोघांनाही एकमेकांबद्दल ओढ वाटू लागली असते. ठाकुराला या गोष्टीची सुगावा लागतो व तो स्वतःहून राधेच्या वडिलांशी तिचे आयुष्य जयाबरोबर पुन्हा वसवण्यासाठी बोलणी करतात. त्यास त्यांना होकारही मिळतो.

गावातील इमामाचा मुलगा अहमद जबलपूरला नोकरीसाठी जात असताना गब्बरसिंगाच्या हाती सापडतो. गावकऱ्यांना चिथवण्यासाठी गब्बरसिंग अहमदाला ठार मारतो व रामगढाच्या लोकांना धमकी म्हणून त्याचे शव पाठवून 'जय-वीरूला गावाबाहेर न हाकल्यास प्रत्येक घरात असेच शव येईल', अशी धमकी देतो. इमाम पोटचा पोरगा गेला, तरी गावकऱ्यांना जय-वीरू गावाच्या भल्यासाठी गावातच राहावेत असे समजावतो. या घटनेचा सूड घेण्यासाठी जय-वीरू गब्बरसिंगाचे आणखी चार साथीदार मारतात व त्यांचे कलेवरे गब्बरसिंगाच्या अड्ड्यावर धाडतात.

शेवटचा संघर्ष

[संपादन]

चार साथीदारांची कलेवरे व त्यासोबत धाडलेल्या धमकीमुळे गब्बरसिंग अतिशय संतापतो. एके दिवशी बसंती तळ्याकाठी बसली असताना डाकू तिच्यावर हल्ला करतात. बसंती तेथून पळ काढते. वीरू तिच्या मदतीला धावतो; परंतु ते दोघेही गब्बरसिंगाच्या ताब्यात सापडतात. गब्बरसिंग वीरूला ओलीस धरून बसंतीला सर्वांपुढे नाचायला फर्मावतो. सर्वजण नृत्य पाहताना गुंगले असताना जय एकट्याने आक्रमण करतो व गब्बरसिंगाला गोळीच्या टप्प्यात पकडतो. गब्बरसिंगाला वीरू व बसंती या दोघांना सोडावे लागते. जय, वीरू व बसंती तिघेही गब्बरसिंगाच्या साथीदारांचा सामना करत गोळ्या चुकवत पुलापाशी पोचतात व दरम्यान त्यांचाकडील गोळ्यादेखील संपत आलेल्या असतात. जय जखमी होतो; परंतु तो वीरूला तसे कळू देत नाही. जय वीरूला सांगतो, की तो इथेच राहून बचाव सांभाळेल व तोपर्यंत वीरूने गावात जाऊन गोळ्या आणाव्यात. परंतु वीरू त्याला एकट्याला सोडून जाण्याचे नाकारतो. जय-वीरू यांच्यात पुन्हा एकदा तणाव निर्माण होतो व पुन्हा एकदा ते नाणेफेक करतात. त्यात जय जिंकतो. वीरू व बसंती गावात जातात. जय जखमी अवस्थेतही गब्बरसिंगाच्या साथीदारांना थोपवून धरतो. त्यांचा कायमचा बंदोबस्त तो पुलाखाली न फुटलेला बाँब फोडून करतो. गब्बरसिंगाचे बहुसंख्य साथीदार या स्फोटात मारले जातात. जय गंभीर रित्या जखमी होतो.

वीरू व गावातील अनेक साथीदार तोवर येतात. पण जय अखेरचे श्वास मोजत असतो. जय वीरूच्या कुशीत आपला जीव सोडतो. चिडलेला वीरू गब्बरसिंगावर चालून जातो व गब्बरसिंगाचे उरलेले साथीदार लोळवून गब्बरसिंगाला मार-मार मारतो. तो गब्बरसिंगाला जिवानिशी मारणार, इतक्यात ठाकुर दिलेल्या वचनाची आठवण करून देतो व गब्बरसिंगाला त्याच्यासाठी जिवंत सोडण्याची मागणी करतो. जयाने दिलेल्या वचनाखातर वीरू गब्बरसिंगाला ठाकुराच्या हवाली करतो. ठाकुर हात नसले, तरी खास खिळे असलेल्या जोड्यांनी गब्बरसिंगाला पुन्हा मार मार मारतो व शेवटी पोलीस येऊन हस्तक्षेप करतात व गब्बरसिंगाला अटक करतात.

चित्रपटाच्या शेवटी जयाच्या चितेला अग्नि देऊन वीरू एकटा परत चाललेला असतो व त्या वेळेस उद्विग्न वीरूला ठाकुर बसंतीचा हात देतात व दुःखी वीरूचे हास्य परत येते.

त्रिमीतीत आवृत्ती (3डी )

[संपादन]

चित्रपट निर्माता केतन मेहरा यांच्या माया डीजीटल या कंपनीने या चित्रपटाचे 3डी आवृत्ती तयार केलेली असून 3 जानेवारी 2014[काळ सुसंगतता?]ला प्रदर्शित केला जाईल.

भूमिका

[संपादन]
भूमिका कलाकार
वीरू धर्मेंद्र
जयदेव अमिताभ बच्चन
ठाकुर बलदेवसिंग संजीव कुमार
बसंती हेमामालिनी
राधा जया भादुरी
गब्बरसिंग अमजदखान
सहभूमिका कलावंत
भूमिका कलाकार
रामलाल सत्येन कप्पू
इमाम ए.के. हंगल
अहमद सचिन (कलाकार)
मौसी लीला मिश्रा
सांबा मॅक मोहन
कालिया विजू खोटे
सूरमा भोपाली जगदीप
जेलर असराणी
वंजारी नर्तिका हेलन
वंजारी गायक जलाल आगा
हरिराम न्हावी केश्तो मुखर्जी

प्रसिद्ध संवाद

[संपादन]

अनेक अजरामर संवाद हे या चित्रपटाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. चित्रपटातील प्रत्येक भूमिकेने आपल्या भूमिकेला साजेल अश्या लकबीने संवाद म्हणले तसेच त्यांचे टायमिंग अफलातून होते. आज अभिनय प्रशिक्षणसंस्थांमध्ये शोलेचे संवाद हे अभ्यासाचे विषय बनले आहेत.

चित्रपटातील काही अजरामर संवाद

[संपादन]
  • कितने आदमी थे?
  • पचास पचास कोस दूर गाव मे जब बच्चा रोता है, तब उसकी मां कहती है, बेटा सो जा, नही तो गब्बर आ जायेगा.
  • लोहा गरम है, मार दो हतोडा.
  • इतना सन्नाटा क्युं है भाई?
  • ये हाथ नही फासी का फंदा है.
  • ये हाथ मुझे दे दे ठाकूर.
  • जो डर गया, समझो मर गया.
  • जानते हो दुनिया मे सबसा बडा बोझ कोनसा है? बाप के खंदे पे बेटे का जनाजा.
  • अरी ओ सांबा
  • बसंती, इन कुत्तो के सामने मत नाचना.

विनोदी संवाद

[संपादन]
  • हम अंग्रेज के जमाने के जेलर है.
  • आधे दाये जाओ, आधे बाये जाओ, बाकी मेरे पीछे आओ.
  • तुम्हारा नाम क्या है बसंती?
  • अग्रेंज लोग जब मरते है तब उसे 'सुसाईड' कहते है.

गाणी

[संपादन]
क्रमांक गाणे गायक/गायिका कालावधी
जब तक है जान, मै नाचूंगी. लता मंगेशकर ०६:०४
कोई हसीना किशोर कुमार आणि हेमामालिनी ०४:१४
होली के दिन दिल मिल जाते है किशोर कुमार आणि लता मंगेशकर ०५:२७
ये दोस्ती हम नही छोडेंगे किशोर कुमार आणि मन्ना डे ०५:२५
मेहबूबा, मेहबूबा राहुल देव बर्मन ०३:४३
हा जब तक है जान लता मंगेशकर ०५:२९

शोले ३ D रूपात

[संपादन]

शोले डिसेंबर २०१३[काळ सुसंगतता?] साली ३ D रूपात आला आहे.

संदर्भ

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]