शेला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


अंगावर घ्यावयाचे उंची भरजरी वस्त्र अथवा रेशमी, भरजरी उपरणे. हे अरूंद, एकेरी, लांबट वस्त्र असून, स्त्री-पुरूष ते अंगावरून पांघरतात वा कमरेभोवती गुंडाळतात. शेला हा पूर्वी चार पट्ट्या एकत्र करून तयार करीत. बहुमानाच्या पोशाखात त्याचा समावेश होत असे. प्राचीन साहित्यात त्याचे अनेक उल्लेख आढळतात. शेला व पागोटे ही वस्त्रे बहुमानार्थ, अहेरा-दाखल देण्याची पद्घत होती.

          महाराष्ट्रात अठराव्या-एकोणिसाव्या शतकांत शेला-पागोटे हा पुरूषी वेशभूषेचा एक खास वैशिष्ट्यपूर्ण व प्रतिष्ठानिदर्शक प्रकार होता. सामान्य पुरूष अंगावर उपरणे वा शेला घेत, तर सरदार व इतर श्रीमंत लोक शेला कमरेभोवती गुंडाळत. शेला व पागोटे यांवरून पुरूषाचा सामाजिक दर्जा सूचित होई. शेल्यासारखे उंची वस्त्र पांघरणे, हे सामान्यतः श्रीमंतीचे व प्रतिष्ठेचे लक्षण मानले जात असे. सर्वसामान्य व भिक्षुक वर्गांत नित्यप्रसंगी साधे उपरणे वापरण्याची पद्घत होती. स्त्रियाही विशेष प्रसंगी शेला परिधान करीत.

             स्त्रिया पूजाविधी, धार्मिक समारंभ, विवाह अशा विशेष प्रसंगी शालू , पैठणी, काळी चंद्रकळा अशी ठेवणीतली रेशमी वस्त्रे नेसून, त्यांवरून भरजरी शेला पांघरत. वर व वधू यांनी लग्नप्रसंगी भरजरी, रंगीत शेला पांघरण्याची प्रथाही काही ठिकाणी रूढ होती. कर्नाटकातही पुरूषांनी अंगावर शेला (शल्ये) घेण्याची प्रथा आहे. पुढे विसाव्या शतकात शेला वापरण्याचे प्रमाण कमी होत गेले.