Jump to content

शतपथ ब्राह्मण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

प्रत्येक वेदाच्या संहिता सारख्या असल्या तरी त्यांचे ब्राह्मणनामक ग्रंथ व आरण्यके निराळी आहेत. उदाहरणार्थ, ऋग्वेदाचे ऐतरेय ब्राह्मण व आरण्यक, कौषीतकी ब्राह्मण व आरण्यक, कृष्ण यजुर्वेदाचे तैत्तिरीय ब्राह्मण व आरण्यक आणि शुक्ल यजुर्वेदाचे शतपथ ब्राह्मण व बृहदारण्यक, सामवेदाचे पंचविंश ब्राह्मण, षत्‌विंश ब्राह्मण, जैमिनीय ब्राह्मण, जैमिनीय उपनिषद ब्राह्मण इत्यादी.

यजुर्वेदाच्या १०१ शाखांपैकी सहाच शाखा आज उपलब्ध आहेत. या वेदाचे कृष्ण यजुर्वेद व शुक्ल यजुर्वेद असे मुख्य दोन भेद. तैत्तिरीय, काठक, मैत्रायणी व कापिष्ठल या कृष्ण यजुर्वेदाच्या तर काण्व व माध्यंदिन या शुक्ल यजुर्वेदाच्या शाखा. कृष्ण यजुर्वेदाच्या चारही शाखांच्या संहिता संमिश्र, म्हणजे मंत्र आणि ब्राह्मणे यांचे मिश्रण झालेल्या आहेत. त्यांच्यामधून विशेषतः तैत्तिरीय शाखेच्या संहितेतून व आरण्यकसहित ब्राह्मणातून वेगळा केलेला मंत्रात्मक भाग म्हणजे शुक्ल यजुर्वेद. हे काम वाजसनीचा पुत्र योगीश्वर-याज्ञवल्क्य/ याज्ञवल्क्य ऋषीने केले. कृष्णवेदातील ब्राह्मणभाग बाजूला सारल्यामुळे उरलेल्या मंत्रप्रधान शुक्लसंहितेसाठी निराळाच ब्राह्मणग्रंथ याज्ञवल्क्य मुनींच्या पंपरेत तयार झाला. हाच शतपथ ब्राह्मण होय.[ संदर्भ हवा ]

यजुर्वेदामध्ये पुरुषरूप अग्नीची अग्निचयन नामक पूजा सांगितली आहे. परमपुरुष किंवा विश्वपुरुष अग्नीच आहे अशी भावना अग्निचयनात आहे. तैत्तिरीय संहिता, काठक संहिता, कापिष्ठल संहिता, मैत्रायणी संहिता, वाजसेनीय संहिता, तैत्तिरीय ब्राह्मण, तैत्तिरीय आरण्यक व शतपथ ब्राह्मण यात अग्निचयनाचा विधी विस्ताराने वर्णिला आहे. अग्निचयनात वैश्वानरहोम सांगितला आहे या वैश्वानराचे स्वरूप भू, अंतरिक्ष व द्युलोक म्हणजे त्रैलोक्य होय, असे शतपथ ब्राह्मणात (९।३।१।३) वर्णिले आहे. अग्निरहस्य नामक शतपथ ब्राह्मणाचे दहावे कांड आहे. त्यात अग्निचयनातील वैश्वानराचे स्वरूप सांगितले आहे. ते असे:--"द्युलोक त्याचे शिर, आदित्य त्याचा चक्षु, वायु त्याचा प्राण, आकाश त्याचे शरीर, जल त्याची वस्ती व पृथ्वी त्याचे पाय होत."[ संदर्भ हवा ]

इतिहासपुराणांचा आरंभ अथर्ववेदकालापासून झाला असे सांगता येते. ब्र्ह्मयज्ञात करावयाच्या इतिहास व पुराण यांच्या पठणाचे फल शतपथ ब्राह्मणात (११।५।७।९) सांगितले आहे. महाभारताला (जय नावाचा) इतिहास ही संज्ञा आहे. अश्वमेघ यज्ञात पारिप्लवाख्याने सांगण्याचा विधी (१३।४।३)येथे वर्णिला आहे. त्यावरून पुराणांची उत्पत्ती यज्ञमंडपात यज्ञाचे अंग म्हणून कशी झाली ते नीट रितीने समजून येते. अश्वमेधात अश्व सोडल्यापासून तो दिग्विजय करून परत येईपर्यंत मध्ये वर्षाचा काळ जातो. या काळात ही आख्याने यजमानास सांगावयाची असतात. अश्व सोडल्यावर वेदीच्या भोवती ऋत्विज बसतात, सोनेरी जरीच्या गादीवर 'होता', ब्रह्मा व उद्गाता हे बसतात, सोनेरी कूर्चावर यजमान बसतो व अर्ध्वर्यू सोनेरी चौरंगावर बसतो. हे सर्वजण बसल्यावर अर्ध्वर्यू होत्यास 'भूतानि आचक्ष्व । भूतेषु इमं यजमानम्‌ अध्यूह ।'--'इतिहास सांग, इतिहासामध्ये या यजमानाला रमव' अशी सूचना देतो. या इतिहासालाच पारिप्लवाख्याने म्हणजे पुनः पुनः सांगावयाच्या कथा असे म्हणतात. वीणेवर श्लोकात्मक चरित्र गाणाऱ्यांना 'होता' पहिल्या दिवसाचा कथाविषय दर्शित करतो; आणि त्यांना सांगतो की यजमानाला प्राचीन सत्कर्म करण्याऱ्या राजांचे गुणगान करून दाखवा. अशा तऱ्हेने ते गातात की की त्या भूतकाळाच्या राजांबरोबर यजमान एकात्मता अनुभवतो. संध्याकाळी हवन चालू असता वीणेवर गाणारा क्षत्रिय उच्च स्वरात स्वतः तयार केलेली तीन युद्धवर्णनपर गाणी गाऊन दाखवतो. असा हा कार्यक्रम रोज वर्षभर चालतो. शतपथ ब्राह्मणात पारिप्लवाची विस्तृत व्याख्या सांगितली आहे.

ब्रह्म हे अंतिम सत्य आहे या अथर्ववेदीय विचाराचा ऐतरीय ब्राह्मण (४०।५), शतपथ ब्राह्मण (१०।३।५; ११।२।३) व तैत्तिरीय ब्राह्मण (२।८।८।९; २।८।९।७) यांच्यावर खोल परिणाम झालेला दिसून येतो.

नैतिक जबाबदारीच्या कल्पनेच्या मुळाशी वेदांत सांगितलेली ऋण ही कल्पना आहे. तैत्तिरीय संहितेत (६।३।१०।५) म्हटले आहे की, "जन्माला येणारा ब्राह्मण तीन ऋणांसह जन्मतो. ऋषीचे ऋण ब्रह्मचर्याने, देवांचे यज्ञाने व पितरांचे ऋण प्रजोत्पादनाने फेडता येते." शतपथ ब्राह्मणात (१।७।२।१) हाच सिद्धांत ब्राह्मण शब्दाऐवजी मनुष्यमात्रांबद्दल सांगितला आहे. त्यात दुसरी सुधारणा अशी की या तीन ऋणांशिवाय मनुष्यऋण असे चौथे ऋण असल्याचे म्हटले आहे. --"जो अस्तित्वात येतो तो ऋणी असतो. देव, ऋषी, पितर व मनुष्य यांचे ऋण त्याला जन्मतः असते. देवांचे ऋण यज्ञाने व होमाने फिटते. अध्ययन केल्याने ऋषींचे ऋण फेडता येते. (विद्वानास ऋषींचा निधिरक्षक असे म्हणतात). संतत व अविच्छिन्‍न प्रजेची निर्मिती झाल्याने पितरांच्या ऋणातून मुक्ती मिळते. माणसांना अन्‍न व वस्त्र यांचे दान केल्याने मनुष्यऋण फिटते. जो ही सर्व कर्तव्ये करतो तो कृतकृत्य होतो. त्याने सर्व मिळवले, सर्व जिंकले असेच म्हटले पाहिजे.(१।७।२।१।-६)

वैदिककाळी भूमीची वाटणी होत नसे. राजालासुद्धा भूदानाचा अधिकार नव्हता. विश्वकर्मा भौवन या राजाने सर्वमेध केला तेव्हा तो कश्यप ऋषीस भूमिदान करू लागला. तेव्हा भूमी त्यास सांगते, " मला कोणताही मर्त्य देऊ शकत नाही. तू मूर्ख आहेस. तुझी मला कश्यपास दान देण्याची प्रतिज्ञा मिथ्या आहे. तू माझे दान केल्यास मी पाण्यात बुडून जाईन."--(ऐतरेय ब्राह्मण (३९।७), शतपथ ब्राह्मण (१३।७।१।१५).

शरीरशास्त्र, गर्भविज्ञान आणि निदानासह आरोग्य चिकित्सा या तीन शाखांचा वेदकाली प्रारंभ झाला होता. याची गमके वैदिक ब्राह्मणात सापडतात. शतपथ ब्राह्मण (कांड १० व ११) आणि अथर्ववेद (१०-२) यात मानवी शरीराची हाडे व अवयव पद्धतशीर रितीने मोजून सांगितले आहेत. शतपथ ब्राह्मणात माणसाच्या शरीरात ३६० अस्थी असतात असे सांगितले आहे. यजुर्वेद संहितांमध्ये शरीराच्या अवयवांची तपशीलवार नावेही सांगितली आहेत.

ग्रीक व रोमन संस्कृतींना दशांश पद्धत माहीत नव्हती. प्राचीन भारतीय गणिती आसा यांनी शून्याच्या संकल्पनेचा वापर करून अंकलेखनाच्या दशमान पद्धतीची निर्मिती केली. भारतीयांनी दशांश पद्धतीच्या योगाने अंकगणितात अधिक प्रावीण्य प्राप्त केले होते. गणितशास्त्रात शून्य या कल्पनेने क्रांती केली. इतकी प्रभावी कल्पना दुसरी कोणतीही नाही असे गणितवेत्ते म्हणतात. शून्य हा शब्द रिकामे किंवा पोकळ या अर्थी वेदांत (शतपथ ब्राह्मण २।३।१।९; तैत्तिरीय ब्राह्मण २।१।२।२) उपयोगात आणला आहे. 'शून्य आवसथ' म्हणजे रिकामे घर असा तेथे प्रयोग केला आहे. ब्रह्म म्हणजे अनंत. गणितातील अनंत या कल्पनेचा उल्लेख पूर्ण या संज्ञेने शतपथ ब्राह्मणात (१४।८।१) व बृहदारण्यक उपनिषदात (५।१) आला आहे. ब्रह्माचे वर्णन करताना अनंताचे गुणधर्म या श्लोकात सांगितले आहेत. असे म्हटले आहे की 'हे पूर्ण आहे, ते पूर्ण आहे, पूर्णातून पूर्ण बाहेर येते; पूर्णातून पूर्ण वजा केले की पूर्ण शिल्लक राहते.' [ संदर्भ हवा ]

ओम्‌ पूर्णमदः पूर्णमिदम्‌, पूर्णात्पूर्णमुदच्यते।

पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते॥'