Jump to content

आसा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

आसा हे वैदिक काळाच्या आरंभी होऊन गेलेले भारतीय गणितज्ञ होते. ते वायव्य भारतात राहत होते. त्यांनी जगात सर्वप्रथम दशमान पद्धतीची संकल्पना मांडली. आसांच्या पूर्वी एक ते नऊ हे अंक वापरले जात होते. तसेच शतपथब्राह्मण(२।३।१।९) या ग्रंथात शून्याची कल्पनाही मांडलेली होती. परंतु, अंकाच्या स्थानावरून त्याची किंमत ठरेल ही संकल्पना कोणालाही सुचलेली नव्हती. ही कल्पना आसांना सुचली. दिलेला अंक हा नुसता लिहिला तर त्याची जेवढी किंमत होते त्याच्या दहापट किंमत तो अंक अन्य अंकाच्या डाव्या बाजूला लिहिल्यास होते, असे मानावे, ही दशमान पद्धतीची पायाभूत कल्पना आहे. उदा. ५ हा अंक शून्याच्या डाव्या बाजूला लिहिल्यास म्हणजेच पाचावर शून्य (५०) असे लिहिल्यास त्याची किंमत पाचाच्या दहापट म्हणजे पन्नास इतकी होते. तर ५५ या आकड्यात उजवीकडच्या म्हणजेच एककस्थानाच्या ५ची किंमत पाचच असते, पण डावीकडच्या म्हणजेच दशकस्थानाच्या ५ची किंमत मात्र पन्नास असते. आणि पाच आणि पन्नास यांच्या बेरजेने एकूण आकड्याची पंचावन्न ही किंमत ठरते. आज ही कल्पना आपल्या खूप परिचयाची असल्याने ती फारच सोपी भासते. पण जगातल्या विविध संस्कृतींमध्ये अंकांचा शोध लागूनही अंकाची किंमत ही त्याच्या स्थानानुसार बदलेल, ही कल्पना कोणालाही सुचली नव्हती. त्यामुळे साधे गुणाकार-भागाकार करणेही खूप अवघड जात असे. [ संदर्भ हवा ]

अंकांच्या स्थानानुसार त्याची किंमत बदलेल या आसांनी मांडलेल्या संकल्पनेतून जगाला अंकलेखनाच्या दशमान पद्धतीची देणगी मिळाली. अशा रितीने लिहिलेले आकडे हिंदासा (हिंद देशातील आसा) या नावाने ओळखले जाऊ लागले. आसांच्या या शोधामुळे गणिताची प्रगती वेगाने होण्याला हातभार लागला.[ संदर्भ हवा ]

संदर्भ

[संपादन]

शोधांच्या जन्मकथा - भाग १, लेखिका- नंदिनी थत्ते, ग्रंथघर प्रकाशन, आवृत्ती - १९८९, पान ४ - ७, पान ५३.