विकिपीडिया:मासिक सदर/जून २००९
वासुदेव बळवंत फडके (नोव्हेंबर ४, १८४५:शिरढोण, महाराष्ट्र - फेब्रुवारी १७, १८८३:एडन) हे भारतीय क्रांतिकारक होते. त्यांना भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सशस्त्र क्रांतीचे जनक मानले जाते.
रायगड जिल्ह्यातील शिरढोण गावात जन्मलेल्या फडक्यांचे आजोबा नजीकच्या कर्नाळा किल्ल्याचे किल्लेदार होते. लहानपणीच फडक्यांना कुस्ती, घोडेस्वारी आणी तलवारबाजीचे प्रशिक्षण मिळाले. माध्यमिक शिक्षण संपल्यावर ते पुण्याला आले व सदाशिव पेठेतील नरसिंह मंदिराजवळ राहून इंग्रज सरकारच्या सैन्य लेखा सेवेत भरती झाले. येथे असताना त्यांच्यावर महादेव गोविंद रानड्यांचा प्रभाव पडला व भारताच्या खालावलेल्या आर्थिक परिस्थितीचे कारण ब्रिटिश धोरणे होती असे त्यांच्या लक्षात आले. त्याचवेळी फडके क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवेंच्याही प्रभावात होते. साळव्यांनी ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळवण्याचे महत्व फडक्यांना पटवले. त्यांनी मागासलेल्या जातींनाही या लढ्यात सामील करणे महत्वाचे असल्याचेही फडक्यांना पटवून दिले.
आपल्या अंथरुणाला खिळलेल्या मरणासन्न आईला भेटण्यासाठी फडक्यांनी रजा मागितली असता त्यांच्या इंग्रज अधिकार्याने टाळाटाळ केली. फडके रजा मिळून घरी जाई पर्यंत त्यांच्या आईचा स्वर्गवास झालेला होता. संतप्त झालेल्या फडक्यांनी आपली सरकारी नोकरी सोडून दिली व त्यानंतर ब्रिटिश सरकारच्या धोरणांविरुद्ध जाहीर भाषणे देण्यास सुरुवात केली. १८७०च्या दशकातील पडलेल्या दुष्काळाकडे सरकारचे दुर्लक्ष पाहून त्यांनी स्वतः दुष्काळग्रस्त भागात जाउन तेथील लोकांना मदत केली व त्याच वेळी सरकार उलथवून देण्याची भाषा करण्यास सुरुवात केली.
यानंतर त्यानी सरकारविरुद्ध सशस्त्र उठाव करण्याची तयारी सुरू केली. सुरुवातीला त्यांनी पुणे, मुंबई व इतर शहरातील सुशिक्षित व धनाढ्य भारतीयांकडे मदतीची मागणी केली परंतु त्याला प्रतिसाद मिळाला नाही. फडके अक्कलकोट स्वामी समर्थांकडे आशीर्वाद मागण्यासाठी गेले पण त्यांनी ही वेळ नाही. असे सांगून त्यांना निराश केले. फडक्यांनी मग महाराष्ट्रातील तथाकथित मागासलेल्या जातींमध्ये मदत शोधली. रामोशी, धनगर, कोळी आणि इतर अनेक समाजातून त्यांनी तरुण घेतले व त्यांना शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण देउन आपल्या 'सैन्यात' भरती केले. पुढे वाचा...