Jump to content

विकिपीडिया:मासिक सदर/ऑगस्ट २०१३

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
२,२५० वर्षांपूर्वीचा मौर्य साम्राज्याचा विस्तार

मौर्य साम्राज्य हे प्राचीन भारताच्या इतिहासातील एक प्रमुख साम्राज्य होते. त्यावर इ.स.पू. ३२१ ते इ.स.पू. १८५ पर्यंत मौर्य वंशाने राज्य केले होते. गंगेच्या खोऱ्यामधील मगध राज्यापासून उगम झालेल्या या साम्राज्याची राजधानी पाटलीपुत्र (आजचे पाटणा) ही होती. हे साम्राज्य इ.स.पू. ३२२ मध्ये चंद्रगुप्त मौर्य याने स्थापन केले. त्याने नंद घराण्याला पराभूत करून आपले साम्राज्य प्रस्थापित केले. त्याने भारतातील सत्तांच्या विघटनाचा फायदा उठवून आपल्या साम्राज्याचा पश्चिमेकडे व मध्य भारतात विस्तार केला. इ.स.पू. ३२० पर्यंत या साम्राज्याने अलेक्झांडरच्या प्रांतशासकांना (क्षत्रप) हरवून पूर्णपणे वायव्य भारत ताब्यात घेतला होता.

५०,००,००० वर्गकिमी एवढा प्रचंड प्रदेश ताब्यात असलेले मौर्य साम्राज्य हे तत्कालीन सर्वांत मोठ्या साम्राज्यांपैकी एक, व भारतीय उपखंडातील सर्वांत मोठे साम्राज्य होते. आपल्या सर्वोच्च शिखरावर असताना हे साम्राज्य उत्तरेला हिमालय, पूर्वेला आसाम, पश्चिमेला पाकिस्तान, अफगाणिस्तानइराणचे काही भाग इतके पसरले होते. भारताच्या मध्य व दक्षिण प्रदेशांमध्ये चंद्रगुप्तबिंदुसार यांनी कलिंग (सध्याचा ओरिसा) हा प्रदेश वगळता विस्तार केला. कलिंग नंतर सम्राट अशोकाने जिंकून घेतला. अशोकाच्या मृत्यूनंतर साठ वर्षांनी मौर्य साम्राज्याचा अस्त झाला. इ.स.पू. १८५ मध्ये शुंग साम्राज्याने मौर्यांना पराभूत करून मौर्य साम्राज्य संपुष्टात आणले.

चंद्रगुप्ताने आपल्या कारकीर्दीत सिंधू नदीपलीकडील अलेक्झांडरच्या साम्राज्याचा प्रदेश जिंकून घेतला. चंद्रगुप्ताने सेल्युकस निकेटर याला पराभूत करून इराणचेही काही भाग जिंकून घेतले.

कलिंग युद्धानंतर सम्राट अशोकाच्या कारकीर्दीत कलिंग युद्धानंतर साम्राज्याने ५० वर्षे शांतता व सुरक्षितता अनुभवली. अशोकाने बौद्ध धर्माचा स्वीकार करून या धर्माचा श्रीलंका, आग्नेय व पश्चिम आशिया तसेच युरोपमध्ये प्रसार केला. अशोकाचे सारनाथ येथील स्तंभशीर्षावरील सिंह व अशोकचक्र हे भारताचे राष्ट्रचिन्ह आहे.

या साम्राज्याची लोकसंख्या अंदाजे ५ ते ६ कोटी इतकी असून हे साम्राज्य हे जगातील लोकसंख्येनुसार मोठे साम्राज्य होते. पुढे वाचा... मौर्य साम्राज्.