विकिपीडिया:मासिक सदर/ऑगस्ट २०१०
२०१० फिफा विश्वचषक ही जून ११ ते जुलै ११, इ.स. २०१० दरम्यान खेळली गेलेली जगातील अग्रणीय फुटबॉल स्पर्धा होती. दक्षिण आफ्रिकेत खेळली गेलेली ही स्पर्धा फिफा विश्वचषक स्पर्धेची १९वी आवृत्ती होती. ही स्पर्धा प्रथमच आफ्रिकेत खेळली गेली. या स्पर्धेत भाग घेण्यासाठी फिफाच्या २०८ सदस्य राष्ट्रांपैकी २०४ राष्ट्रांनी भाग घेतला. पात्रता फेरी ऑगस्ट २००७ पासून सुरू होती. स्पेनने अंतिम सामन्यात नेदरलँड्सवर १-० ने मात करुन विजेतेपद मिळवले.
स्पर्धेतील प्रत्येक संघाला सामने सुरू होण्याआधीच १० लक्ष अमेरिकन डॉलर देण्यात आले. साखळी सामन्यांनंतर बाहेर पडलेल्या संघांना प्रत्येकी ८० लाख डॉलर मिळाले. झाकुमी हा १५ वर्षे वयाचा मानवसदृश चित्ता २०१० फिफा विश्वचषक स्पर्धेचा प्रतिनिधी होता. अदिदास या कंपनीने तयार केलेला जबुलानी हा चेंडू स्पर्धेत वापरण्यात आला. इसिझुलू भाषेत जबुलानीचा अर्थ सगळ्यांना आनंदित करणारा असा होतो.
दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू सिफिवे शबलल याने स्पर्धेतील पहिला गोल स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात मेक्सिको (१-१) विरूध्द केला. स्पर्धेतील पहिला स्व गोल नेदरलँड्स (०-२) विरूध्दच्या सामन्यात डॅनिश मिडफिल्डर डॅनियल एगरकडून झाला. आर्जेंटिनाचा स्ट्रायकर गोंझालो हिगुएन याने स्पर्धेतील सर्वप्रथम हॅट्रीक दक्षिण कोरिया (४-१) विरूध्द केली. पुढे वाचा...