वंदना घांगुर्डे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

वंदना रवीन्द्र घांगुर्डे (माहेरच्या वंदना मधुकर पटवर्धन) या एक संगीत नाटकांत काम करणार्‍या मराठी गायिका आहेत. त्यांचे वडील मधुकर दत्तात्रेय पटवर्धन हे इंजिनिअर असून रत्‍नागिरीतील एक उद्योजक होत. पाचवीच्या वर्गातर असताना असताना डॉ. वसंतराव देशपांडे यांचे कट्यार काळजात घुसली हे नाटक पाहून वंदनाला संगीतातच करियर करावेसे वाटू लागले. वडिलांनी शास्त्रीय संगीताचे प्राथमिक शिक्षण घेतले होते. पहाडी आवाजात ते भजने गात.

स्वातत्र्यवीर सावरकर रत्‍नागिरीत अकरा वर्षे स्थानबद्ध होते, तेव्हा ते पटवर्धनांच्या घरातच राहत असत. १९३१ साली बलवंत संगीत मंडळीच्या रत्‍नागिरीच्या मुक्कामात दीनानाथांच्या आग्रहामुळे सावरकरांनी पटवर्धनाच्या निवासस्थानी राहून ‘संन्यस्तखड्ग’ हे नाटक लिहिले. घांगुर्डे परिवाराने त्या नाटकाचे महाराष्ट्रभर प्रयोग केले आहेत.

वंदना घांगुर्डे यांना लहानपणापासूनच गाण्याचे आणि नाटकांचे संस्कार मिळाले. त्यांची आजी गोड आवाजात भजने गायची. आई विद्या पटवर्धन (माहेरच्या विद्या जोग) या वंदनाला गाण्याच्या कार्यक्रमांना व नाटकांना घेऊन जात. मामा-दामोदर जोग, कार्तिक महिन्यातल्या उत्सवात गद्य वा संगीत नाटकांत प्रमुख भूमिका करत, आणि नाटकांचे दिग्दर्शनही करीत.

संगीताचे प्राथमिक शिक्षण[संपादन]

वंदना पटवर्धन यांचे रत्‍नागिरीत सुगम संगीताचे प्राथमिक शिक्षण मिळाले. शालेय जीवनात त्यांनी गायन, नृत्य, नाट्य, वक्तृत्व स्पर्धांत अनेक बक्षिसे मिळवली. रत्‍नागिरी आकाशवाणी केंद्राच्या त्या बालकलाकार होत्या.

पुण्यात आगमन, शिक्षण आणि विवाह[संपादन]

घरच्या वडीलधार्‍या मंडळींचा विरोध डावलून वंदमा घांगुर्डे यांच्या आईने त्यांना पुण्यात एस.एन.डी.टी. कॉलेजात गाणे शिकायला पाठवले. महाविद्यालयात असताना वंदनाला अनेक गायकांच्या मैफिली आणि दुर्मीळ ध्वनिमुदिका ऐकायला मिळाल्या. त्या एस.एन.डी.टी. महाविद्यालयातून बी.ए. (संगीत) झाल्या, त्यांचा डॉ. रवींद्र घांगुर्डे या संगीत-ज्ञानी माणसाशी विवाह झाला आणि त्या पुण्याजवळील चिंचवड येथे रहायला आल्या. विवाहानंतर त्यांच्या संगीत कारकीर्दीला नवीन दिशा मिळाली. रवींद्र यांनी वसंतराव देशपांडे यांच्या गायकीचा अभ्यास करून त्यावर अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाची डॉक्टरेट मिळवली आहे. विवाहानंतर वंदना आपल्या पतीकडेच गायन शिकू लागल्या. पुढे डॉ. वीणा सहस्रबुद्धे आणि विकास कशाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी संगीत अलंकार ही पदवी मिळवली.

नाट्यकारकीर्द[संपादन]

गांगुर्डे कुटुंबाने १९५५ साली डॉ. वसंतराव देशपांडे वर्षिक स्मृती महोत्सवात अन्य काही कलाकारांना घेऊन संगीत मानापमान नाटकाचा प्रयोग केला.आणि वंदना घांगुर्डे यांची नाट्यकारकीर्द सुरू झाली. त्यासाठी त्यांनी ‘नादब्रह्म परिवार’ नावाची संस्था स्थापन केली आणि पुढील काही वर्षांत अभिजात संगीत नाटकांचे पुनरुज्जीवन, निर्मिती आणि प्रयोग सादरीकरण करायला सुरुवात केली. या संस्थेचे कट्यार काळजात घुसली, मत्स्यगंधा, मानापमान, रणदुंदुभी, विद्याहरण, संन्यस्त खड्ग, संशयकल्लोळ, स्वयंवर आदी संगीत नाटकांच्या सादरीकरणाबरोबरच शास्त्रीय संगीत आणि नाट्यसंगीताचे कार्यक्रम करणे चालू आहे.

वंदना आणि डॉ. रवीन्द्र घांगुर्डे यांनी सादर केलेले अन्य कार्यक्रम[संपादन]

  • दीनानाथ मंगेशकरांच्या गायकीचे स्नरण करून देणारा ‘दिना-रंग’ हा कार्यक्रम याचे एका वर्षात (१९९९-२०००) ५०हून अधिक प्रयोग झाले आहेत.
  • संगीत मानापमान या नाटकाचे एका वर्षात ५०हून अधिक प्रयोग.
  • ई-टीव्ही दूरचित्रवाणी वाहिनीवरून सावरकरांच्या संन्यस्तखड्ग या नाटकाचे सादरीकरण.
  • नादब्रह्म परिवारातर्फे दरवर्षी साजरा होणारा दीनानाथ मंगेशकर हा संगीत नाट्यमहोत्सव (इ.स. १९९६पासून)

मुंबईच्या मराठी साहित्य संघात संन्यस्तखड्ग सादर करण्याचे आवाहन संघाचे डॉ. बाळ भालेराव यांनी केले. पण बाल गंधर्वांची भामिनी, रुक्मिणी, सुभद्रा, करावयास तयार असणार्‍या मराठीतील नामवंत अभिनेत्री-गायिकांना दीनानाथांनी भूमिका केलेल्या रणदुंदुभीमधील तेजस्विनी, राजसंन्यासमधील शिवांगी, सुलोचना या नायिकांची कामे करण्याची हिंमत झाली नाही. शेवटी वंदना घांगुर्डे यांनी संन्यस्तखड्गमधील सुलोचनेची भूमिका स्वतःच करायचे ठरवले. या नाटकाचे ४५हून अधिक यशस्वी प्रयोग झाले आहेत. दीनानाथांची गायकी पेलवणार्‍या त्या बहुधा एकुलत्या एक अभिनेत्री-गायिका आहेत.

‘मास्टर दीनानाथ मंगेशकर यांचे संगीत रंगभूमीवरील योगदान-एक चिकित्सक अभ्यास’ हा विषय घेऊन वंदना घांगुर्डे यांनी पीएच.डीसाठी प्रबंध सादर केला आहे. त्यांनी दीनानाथ मंगेशकर यांचे जीवन व संगीत यांवर ‘ब्रीद तुझे जगी दीनानाथ’ हे विश्लेषणात्मक पुस्तक लिहिले आहे.

अन्य[संपादन]

गायिका सावनी रवींद्र या वंदना घांगुर्डे यांच्या कन्या आहेत.

पुरस्कार[संपादन]

  • वंदना घांगुर्डे यांच्या नादब्रह्म संस्थेला मा. दीनानाथ आनंदमयी पुरस्कार (२००४)
  • वंदना घांगुर्डे यांना पुणे महापालिकेचा बालगंधर्व पुरस्कार (२०१३)
  • आचार्य अत्रे पुरस्कार (२०१४)
  • पुण्याच्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेकडून डॉ. रवींद्र घांगुर्डे व वंदना घांगुर्डे यांना 'लक्ष्मी नारायण दांपत्य' पुरस्कार (२०१५)