लेयटे आखाताची लढाई
दिनांक | २३-२६ ऑक्टोबर, इ.स. १९४४ |
---|---|
स्थान | लेयटे आखात, फिलिपाइन्स |
परिणती | दोस्त राष्ट्रांचा निर्णायक विजय |
युद्धमान पक्ष | |
---|---|
अमेरिकेची संयुक्त संस्थाने, ऑस्ट्रेलिया | जपान |
सेनापती | |
विल्यम हाल्से जुनियर, थॉमस सी. किंकेड, क्लिफ्टन स्प्रेग, जेसी बी. ओल्डेनडॉर्फ, जॉन ऑगस्टीन कॉलिन्स | ताकेओ कुरिता, शोजी निशिमुरा, कियोहिदे शिमा, जिसाबुरो ओझावा, युकियो सेकी |
सैन्यबळ | |
८ विवानौका, ८ हलक्या विवानौका, १८ विवा संगतनौका, १२ बॅटलशिप, २४ क्रुझर, १४१ विनाशिका व विनाशिका संगतनौका, अनेक पाणबुड्या, गस्तनौका, रसदनौका, १,५०० विमाने | १ विवानौका, ३ हलक्या विवानौका, ९ बॅटलशिप, १४ मोठ्या क्रुझर, ६ छोट्या क्रुझर, ३५+ विनाशिका, ३०० विमाने |
बळी आणि नुकसान | |
अंदाजे ३,००० सैनिक व खलाशी, १ हलकी विवानौका, २ विवा संगतनौका, २ विनाशिका, १ विनाशिका संगतनौका, २००+ विमाने | अंदाजे १०,४०० सैनिक व खलाशी, १ विवानौका, ३ छोट्या विवानौका, ३ बॅटलशिप, १० क्रुझर, ११ विनाशिका, अंदाजे ५०० विमाने |
लेयटे आखाताची लढाई (मराठी नामभेद: लेयटे गल्फची लढाई ; इंग्लिश: Battle of Leyte Gulf, बॅटल ऑफ लेयटे गल्फ) ही दुसऱ्या महायुद्धादरम्यान दोस्त राष्ट्रे आणि शाही जपानी आरमार यांच्यात फिलिपिन्सजवळील लेयटे आखातात लढली गेलेली आरमारी लढाई होती. ही लढाई दुसऱ्या महायुद्धादरम्यानची सगळ्यात मोठी आरमारी लढाई होती आणि काही हिशोबाप्रमाणे ही जगाच्या इतिहासातीलच सगळ्यात मोठी आरमारी लढाई होती.[१]
ही लढाई चार टप्प्यांत चार ठिकाणी लढली गेली: सिबुयान समुद्राची लढाई, सुरिगाओ आखातची लढाई, समारची लढाई, केप एन्गान्योची लढाई.
यांशिवाय आसपासच्या प्रदेशात अनेक झटापटीही झाल्या.[२]
युद्धाच्या सुरुवातीस जपानने आग्नेय आशियातील अनेक प्रदेश हस्तगत करून तेथील तेलसाठे व खनिज संपत्ती मिळवलेली होती. जपानचे बरेचसे युद्धतंत्र या सामग्रीवर आधारित होती. येथून जपानकडे जाणारी ही रसद तोडण्यासाठी दोस्त राष्ट्रांना फिलिपिन्स जिंकून तेथे तळ उभारणे गरजेचे होते. यासाठी अमेरिकेने २० ऑक्टोबर रोजी लेयटे बेटावर चढाई केली. हे पाहताच जपानी आरमाराने आपली शक्ती एकवटून प्रतिहल्ला केला. पण अमेरिकन आरमाराच्या तिसऱ्या आणि सातव्या तांड्याने हा प्रतिहल्ला उधळून लावला. ही लढाई संपताना जपानकडे असलेल्या विमानांची संख्या अमेरिकेच्या युद्धनौकांच्या संख्येपेक्षाही कमी झाली. येथून पुढे जपानला समुद्रात लढायला बळच उरले नाही.[३] या लढाईत जपानी आरमाराचीही इतकी हानी झाली, की युद्धाच्या अंतापर्यंत ते यातून सावरलेच नाही [४][५].
या लढाईत जपानी वैमानिकांनी सर्वप्रथम कामिकाझे हल्ले चढवले.[४][६]
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
पार्श्वभूमी
[संपादन]ऑगस्ट १९४२ ते १९४४ च्या सुरुवातीपर्यंत अमेरिकन आरमाराने प्रशांत महासागरातून शाही जपानी आरमाराचे अनेक तळ उद्ध्वस्त करून उत्तर आणि पूर्वेकडे ढकलेले होते. १९४४ च्या मध्यास अमेरिकेच्या पाचव्या तांड्याने मेरियाना द्वीपसमूह काबीज केला. येथे उभारलेल्या तळावरून जपानची मुख्य भूमी त्यांच्या बोईंग बी-२९ सुपरफोर्ट्रेस प्रकारच्या विमानांच्या पल्ल्यात आली. जपानने चढवलेला प्रतिहल्ला अमेरिकन आरमाराने फिलिपाईन समुद्राच्या लढाईत अडवला व तेथे जपानी आरमाराच्या विमानांचा फडशा पाडला. यात तीन जपानी विवानौका आणि ६००पेक्षा अधिक विमाने गमावल्यावर जपानी आरमाराकडे लढाऊ विमाने व ते चालविण्यास सक्षम वैमानिकांची मोठी चणचण निर्माण झाली.[७]
पालावान पॅसेजमधील पाणबुड्यांची टेहळणी आणि झटापट
[संपादन]या सुमारास कुरिता आपला प्रचंड तांडा घेउन खुल्या समुद्राकडे निघाला. या तांड्यात पाच बॅटलशिप (यामातो, मुसाशी, नागातो, कोंगो आणि हरुना) दहा जड क्रुझरा (अतागो, माया, ताकेओ, म्योको, हागुरो, कुमानो, सुझुया, तोने आणि चिकुमा), दोन हलक्या क्रुझरा (नोशिगो आणि याहागी) तसेच १५ विनाशिका होत्या.[८]
हा ताफा २२-२३ ऑक्टोबर दरम्यानच्या मध्यरात्रीच्या सुमारास पालावान द्वीपाजवळून पसार होत असताना तेथे टेहळणीसाठी तैनात असलेल्या यूएसएस डार्टर आणि यूएसएस डाचे या दोन पाणबुड्यांना त्यांची चाहूल लागली. पहाटे ०१:१६ वाजता डार्टरने आपल्या रडारवर सुमारे ३० किमी लांबून या ताफ्याची चाहूल लागताच पुढे होउन थेट नजरेखाली घातला. दोन्ही पाणबुड्यांनी या ताफ्याचा लगेचच पाठलाग सुरू केला. डार्टरने आपल्याला हा ताफा दिसल्याची खबर तीन संदेशांतून मुख्यालयाकडे पाठवली. त्यांतील एक संदेश यामातोवरील रेडिओचालकाने ऐकला परंतु कुरिताने पाणबुडीविरोधी बंदोबस्त करण्याकडे दुर्लक्षच केले.[९]
डार्टर आणि डाचे या दोन्ही पाणबुड्यांनी आपल्या सुरक्षिततेचा विचार न करता पाण्यावरून अनेक तास भरधाव भरारी मारत कुरिताच्या ताफ्याला वळसा घातला आणि पहाटेला दबा धरून बसल्या. पहिल्या किरणांसह पाण्याखाली जाउन हल्ला करण्याचा त्यांचा बेत होता. त्यांनी केलेला हा हल्ला अनपेक्षितपणे सफल झाला. २३ ऑक्टोबरच्या पहाटे ०५:२४ वाजता डार्टरने सहा टोरपेडो कुरिताची ध्वजवाहक नौका असलेल्या अतागोवर सोडले. यांपैकी कमीत कमी चार टोरपेडोंनी आपले निशाण साधले दहा मिनिटांनी डार्टरने ताकेओ वर दोन दणके मारले. काही वेळाने ०५:५६ वाजता डाचेने मायाला टोरपेडोचे चार झटके दिले.[१०]
अतागो आणि माया झपाट्याने बुडाल्या. ताफ्याचा दर्यासारंग कुरिताला आपला जीव वाचविण्यासाठी पाण्यात उडी मारावी लागली. त्याला किशिनामी या विनाशिकेने वाचविले व नंतर यामातोवर पोचवले.[११] ताकेओ ने दोन विनाशिका घेउन ब्रुनेईकडे माघार घेतली. दोन्ही अमेरिन पाणबुड्यांनी त्यांचा पाठलाग सुरू ठेवला.
२ दिवस ताकेओच्या मागावर असताना डार्टर बॉम्बे शोल या प्रवाळखडकावर जाउन अडकली. स्वतःला सोडवून घेण्याचे सगळे प्रयत्न फसल्यावर त्यावरी सगळे खलाशी व अधिकाऱ्यांनी आपली पाणबुडी सोडून डाचेवर आसरा घेतला. डाचे, यूएसएस नॉटिलस आणि यूएसएस रॉक या पाणबुड्यांनी डार्टर जपान्यांच्या हातात पडू नये म्हणून तिच्यावर टोरपेडोंचा मारा केला परंतु हे सगळे टोरपेडो डार्टरला न लागता प्रवाळखडकावर आदळले. त्यानंतर डाचे आणि रॉक यांनी आपल्या तोफांनी तुफान मारा करून डार्टरला भंगारात काढले. पूर्णपणे वाताहत झालेल्या डार्टरकडे जपान्यांनी नंतर दुर्लक्ष केले
ताकेओने पुढे सिंगापूरला पळ काढला जानेवारी १९४५मध्ये अमेरिकेच्या आरमाराकडून मार खाल्लेली म्योको सुद्धा येथे आली. दोन्ही युद्धनौकांना सिंगापूरात नांगरून त्यांचा उपयोग विमानविरोधी तोफखाना म्हणून केला गेला.
सिबुयान समुद्राची लढाई
[संपादन]

अमेरिकेच्या तिसऱ्या तांड्यात अनेक बलाढ्य लढाऊ नौका असल्या तरीही त्याची स्थिती नाजूकच होती. पालावान द्वीपाजवळून यामातो आणि जपानी तांडा पसार होत असताना त्याच दिवशी इकडे ॲडमिरल हॅल्सीने विवानौकांचे दोन ताफे रसद आणि शस्त्रास्त्रांचा पुरवठा घेण्यासाठी ॲडमिरल राल्फ ई. डेव्हसन आणि ॲडमिरल जॉन एस. मॅककेन यांच्या कमानीखील उलिथीला पाठवले. यूएसएस डार्टरचा जपानी तांड्यांच्या टेहळणीचा संदेश हॅल्सीला मिळाल्यावर त्याने डेव्हिसनला लगेचच परत फिरायला सांगितले परंतु मॅककेनला उलिथीकडे जात राहण्यास सांगितले. दोन दिवसांनी जपानी तांड्याच्या शक्तीचा अंदाज स्पष्ट झाल्यावर २४ ऑक्टोबरला हॅल्सीने मॅककेनलाही माघारी बोलाविले परंतु दोन दिवसांचे अधिक अंतर असल्या मुळे मॅककेनचा टास्क फोर्स ३८ हा बलाढ्या ताफा त्यानंतर झालेल्या लढाईपासून दूरच राहिला. तिसऱ्या तांड्यातील ४०% लढाऊ विमाने मॅककेनकडे होती. २४ च्या सकाळी जेव्हा जपानी आणि अमेरिकन तांडे आमनेसामने आले तेव्हा अमेरिकनांकडे त्यांच्याकडील पाचपैकी तीन ताफे उपलब्ध होते. टास्क फोर्स ३८.२ हा त्यातलाही सगळ्यात दुर्बळ ताफा कुरिताच्या तांड्यावर हल्ला करण्यासाठी सर्वोत्तम ठिकाणी होता. त्यात फक्त यूएसएस इंट्रेपिड ही मोठी विवानौका, यूएसएस इंडिपेंडन्स आणि यूएसएस कॅबट या हलक्या विवानौका आणि त्यांच्याशी संलग्न छोटी लढाऊ जहाजे होती.[१२]

समुद्रात ही जुळवाजुळव होत असताना व्हाइस ॲडमिरल ताकिजिरो ओनिशीने लुझान शहरात स्थित आपल्या पहिल्या विमान तांड्याला रियर ॲडमिरल फ्रेडरिक शेर्मनच्या कमानीखालील टास्क ग्रुप ३८.३ वर प्रतिहल्ला करण्यास पाठविले. शेर्मनने आपल्या विमानांनिशी लुझानवरील जपानी विमानांना गुंतवून ठेवले होते ज्याने लेयटे आखातातील अमेरिकन रसद आणि व्यापारी जहाजांचा धोका कमी झाला. ओनिशीने ५०-६० विमानांचे तीन थवे शेर्मनवर धाडले.[१३] यांतील बव्हंश विमाने शेर्मनच्या विवानौकांवरील हेलकॅट विमानांच्या गस्तपथकांनी तोडून पाडली किंवा त्यांनी परत लुझानकडे पळ काढला. यूएसएस एसेक्सवरील दोन लढाऊ विमानांच्या थव्यांनी यात मोठी कामगिरी बजावली. त्यांच्यातील कमांडर डेव्हिड मॅककॅम्पबेलने एकाच उड्डाणात नऊ जपानी विमाने पाडली. त्यानंतर परतत असताना त्याचे इंधन संपले व त्याने यूएसएस लँग्ली या नौकेवर उतरण्यासाठी जागा नसतानाही इन एक्स्ट्रीमिस (अत्यंत धोकादायक परिस्थितीत) आपले विमान उतरवले.
तरीही एक जपानी योकोसुका डी४वाय३ (ज्युडी) प्रकारचे विमान अमेरिकनांच्या कचाट्यातून निसटले आणि त्याने थेट यूएसएस प्रिन्स्टन या विवानौकेवर हल्ला केला. ०९:३८ वाजता या विमानाने आपला २५० किग्रॅ वजनाचा चिलखतभेदी बॉम्ब प्रिन्सटनच्या डेकवर टाकला. प्रिन्स्टनच्या फ्लाइट डेकवर १० विमाने नुकतीच उतरली होती आणि त्याखालच्या डेकवर सहा ग्रुमान टीबीएम ॲव्हेंजर टोरपेडोवाहू विमाने इंधन भरून हल्ल्यासाठी बाहेर पडण्यास तयार होती. वरचे डेक भेदून आलेला बॉम्ब यांपैकी एकावर थेट पडला आणि विमानासह स्फोट पावला. याने जवळ उभी असलेली पाच विमानांचाही स्फोट झाला. येथे जवळच टोरपेडो आणि बॉम्ब ठेवलेले होते, त्यांचाही भडका उडाला.[१४][१५][१६] अशी आग विझवण्यासाठीचे स्वयंचलित फवारे निकामी झालेले असल्यामुळे ही आग झपाट्याने पसरली. काही काळाने ही आटोक्यात येत असतानाच दुपारी ३:२३ वाजता प्रिन्स्टनच्या मागील बाजूसच्या बॉम्बभांडारात प्रचंड मोठा स्फोट झाला. यावेळी प्रिन्स्टनच्या मदतीला आलेल्या यूएसएस बर्मिंगहॅम या नौकेवरही मोठी जीवितहानी (२४१ मृत, ४१२ जखमी) झाली.[१७] तरीसुद्धा बर्मिंगहॅमने मदतकार्य चालूच ठेवले.
यानंतर प्रिन्स्टनने ताफ्यातील आपली जागा सोडली व त्यावरील खलाशांनी आग विझवण्याकडे लक्ष केंद्रित केले. बर्मिंगहॅमखेरीज यूएसएस मॉरिसन आणि यूएसएस गॅटलिंग या नौकाही मदतीला धावून आल्या परंतु तोपर्यंत समुद्राला उधाण आले होते आणि या प्रिन्स्टनवर अनेकदा आदळल्या. त्यातल्या तात मोठी असलेल्या बर्मिंगहॅमने प्रिन्सटनला एका बाजूने दाबून धरले वर तिला स्थिरता देण्याचा प्रयत्न केला. या सगळ्यात बर्मिंगहॅमचेही मोठे नुकसान झाले व तिला माघार घेण्यास भाग पडले. याशिवाय यूएसएस रीनो, यूएसएस अर्विन आणि मॉरिसन यांनासुद्धा नुकसान पोचले.
अतोनात प्रयत्न करून सुद्धा प्रिन्सटन वाचविण्यात यश येत नाही हे पाहिल्यावर अमेरिकन अधिकाऱ्यांनी अंधार पडताना रीनोवरून टोरपेडो मारून प्रिन्सटनला जलसमाधी दिली.[१८] त्यावरील १०८ खलाशी व अधिकारी मृत्यू पावले तर १,३६१ लोकांना वाचविण्यात आले. नौकेबरोबरच त्यावरील १७ हेलकॅट आणि १२ ॲव्हेंजर विमानेही बुडाली.[१९] लेयटे आखाताची लढाई आणि त्या आधी व नंतरही या भागात बुडालेल्या अमेरिकन नौकांपैकी प्रिन्सटन सगळ्यात मोठी होती.

या दरम्यान यूएसएस इंट्रेपिड आणि यूएसएस कॅबटवरील विमानांनी जपानी युद्धनौका नागातो, यामातो आणि मुसाशी वर हल्ले चढवले. त्यांनी जड क्रुझर म्योकोचे मोठे नुकसान केल्याने म्योकोने कोरोन बे मार्गे बॉर्नियोकडे पळ काढला. दुपारी इंट्रेपिड, एसेक्स आणि यूएसएस लेक्झिंग्टनवरील व्हीबी-१५ हेलडायव्हर आणि हेलकॅट विमानांनी पुन्हा एकदा हल्ले चढवून मुसाशीवर अजून १० दणके मारले. पाणी चढल्याने एका बाजूला वाकलेली मुसाशी रणांगणातून पळ काढत असताना यूएसएस एंटरप्राइझ आणि यूएसएस फ्रँकलिन वरून अधिक ११ बॉम्ब आणि ८ टोरपेडोंनी तिची चाळण उडवली. गलितगात्र झालेली मुसाशी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास बुडाली.[२०]
या लढाईत अमेरिकेच्या आरमाराने विमानांचा मुबलक वापर केला. एकूण सहा विवानौकांवरून हेलकॅट आणि ॲव्हेंजर प्रकारच्या लढाऊ विमानांनी २५९ उड्डाणे करून टोरपेडो आणि बॉम्बफेक केली परंतु त्यांना कुरिताच्या तांड्याला पूर्णपणे नामोहरम करता आले नाही. यांतील बरेचसे हल्ले मुसाशीवर झाले आणि तिला बुडविण्यात तसेच म्योकोलाही कायमचे जायबंदी करण्यात यश आले. कुरिताच्या उरलेल्या तांड्याने तात्पुरती माघार घेतली व पुन्हा अमेरिकनांच्या विरुद्ध चाल केली.[२०]
कुरिताचा तांडा पुन्हा बॉर्नियोच्या दिशेला अमेरिकन विमानांच्या पल्ल्यातून बाहेर गेला. जाताना त्यांनी बुडत असलेल्या मुसाशीला वळसा घातला. कुरिता माघार घेत असल्याचे पाहून हॅल्सीला वाटले की जपान्यांशी लगेचच पुन्हा दोन हात करावे लागणार नाहीत. पण कुरिता फार लांब गेला नाही. अंधार होत असताना सव्वा पाच वाजता त्याने पुन्हा एकदा दिशा बदलली आणि सान बर्नार्डिनो सामुद्रधुनीकडे त्याचा तांडा निघाला. हॅल्सीने त्याचा पाठलाग न करण्याचा निर्णय घेतल्याने तसेच त्याचे बेत त्याच्या अधिकाऱ्यांपर्यंत नीट न पोचल्यामुळे कुरिता तेथून निसटला आणि सकाळ पडताच समार द्वीपाजवळ दत्त म्हणून उभा राहिला. त्याच्या या जागेवरून लेयटे बेटांवरील अमेरिकन फौजा अचानक धोक्यात आल्या[२१]
सुरिगाओ सामुद्रधुनीची लढाई
[संपादन]
कुरिता आपला मुख्य तांडा घेउन लेयटे आखाताकडे निघाल्यानंतर २२ ऑक्टोबरला दुपारी ३:०० वाजता ॲडमिरल निशिमुरा आपले दक्षिणी पथक घेउन त्याच्या मागे निघाला. या पथकात दोन जुन्या विवानौका यामाशिरो आणि फुसो, एक जड क्रुझर मोगामी तसेच मिचिशिओ, असागुमो, शिगुरे आणि यामागुमो या चार विनाशिका होत्या.[२२] हे पथक ब्रुनेईमधून पूर्वेस सुलु समुद्राकडे गेले व तेथून ईशान्येकडे वळत नेग्रोस द्वीपाच्या दक्षिण टोकाला वळसा घालत मिंदनाओ समुद्रात आले. तेथून मिंदनाओ द्वीपाला डावी घालत निशिमुरा सुरिगाओ सामुद्रधुनीच्या दक्षिण तोंडावर आला. त्याचा बेत सामुद्रधुनी ओलांडून उत्तर मुखातून बाहेर पडत कुरिताच्या मदतीस जाण्याचा होता.
निशिमुराच्या संगाथीला व्हाइस ॲडमिरल कियोहिदे शिमाच्या नेतृत्त्वाखाली दुसरे आघात घटक होते. यांत नाची आणि अशिगारा या दोन जड क्रुझर, अबुकुमा ही हलकी क्रुझर तसेच अकेबोनो, उशिओ, शिरानुइ आणि कसुमी या विनाशिका होत्या. कडक रेडियो शांतता बाळगण्याच्या आदेशामुळे निशिमुराला शिमा आणि कुरिताशी समन्वय साधता आला नाही. निशिमुराे सुरिगाओ सामुद्रधुनीत दक्षिणेकडून प्रवेश केला तेव्हा शिमा सुमारे ५० किमी त्याच्या मागे होता तर कुरिता लेयटेच्या किनाऱ्यापासून अनेक तास लांब सिबुयान समुद्रात होता.
हे दक्षिणी पथक सुरिगाओ सामुद्रधुनीच्या दक्षिण मुखाशी आले तेव्हा अमेरिकनांनी त्याच्यासाठी रचलेल्या घातक सापळ्यात विनासायास सापडले. येथे रियर ॲडमिरल जेस्सी ओल्डेनडोर्फ त्याच्या ताज्या दमाच्या आरमारी शिबंदीनिशी त्याची वाटच पहात होता. ओल्डेनडोर्फकडे सुमारे १०० लढाऊ नौका होत्या --
- ६ बॅटलशिप -- वेस्ट व्हर्जिनिया, मेरीलँड, मिसिसिपी, टेनेसी, कॅलिफोर्निया आणि पेनसिल्व्हेनिया. यांच्याकडे ३६५ मिमी व्यासाचे बॉम्ब फेकणाऱ्या ४८ आणि ४०६ मिमी व्यासाचे बॉम्ब फेकणाऱ्या १६ उखळी तोफा होत्या.
- ४ जड क्रुझर -- लुईव्हिल (ओल्डेनडोर्फची ध्वजवाहक), पोर्टलँड, मिनीयापोलिस आणि श्रोपशायर. यांच्याकडे २०३ मिमी व्यासाचे बॉम्ब फेकणाऱ्या ३५ तोफा होत्या.
- ४ हलक्या क्रुझर -- डेन्व्हर, कोलंबिया, फीनिक्स आणि बॉइझी. यांच्याकडे १५२ मिमि व्यासाचे बॉम्ब फेकणाऱ्या ५४ तोफा होत्या.
- २३ विनाशिका आणि ३९ पॅट्रोल-टोरपेडो बोटी. यांच्याकडे लहान तोफा आणि टोरपेडो होते.
सुरिगाओ सामुद्रधुनीच्या उत्तर मुखाशी निशिमुराची वाट बघत दबा धरून बसलेल्या सहा अमेरिकन युद्धनौकांपैकी पाच पर्ल हार्बरमध्ये नुकसान पावलेल्या किंवा बुडालेल्या (कॅलिफोर्निया आणि वेस्ट व्हर्जिनिया) होत्या व दुरुस्त होउन किंवा नव्याने बांधल्या जाउन जपान्यांकडून पर्ल हार्बरचा वचपा काढण्यासाठी फिरत होत्या. सहावी युद्धनौका मिसिसिपी ही त्यावेळी आइसलँडजवळ इतर जहाजांची रक्षक म्हणून कामात असल्याने वाचली होती. सामुद्रधुनीच्या उत्तर मुखाशी आडव्या पट्ट्यात उभ्या असलेल्या या सहा प्रचंड लढाऊ नौका आणि आठ क्रुझरांशी दोन हात करण्याआधी निशिमुराला सामुद्रधुनीच्या दक्षिण आणि मध्य भागात पीटी बोटी आणि विनाशिकांचा सामना करणे भाग होते.[२३]
पहिली चकमक
[संपादन]रात्री २२:३६ वाजता पीटी बोट पीटर गॅडने जपान्यांची पहिली लढाऊ नौका पाहिली व तसा संदेश ओल्डेनडोर्फला पाठवला. त्यानंतर पीटर गॅड आणि इतर पीटी बोटींनी सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जपानी तांड्यावर हल्ले केले. भल्यामोठ्या जपानी नौकांवर या पिटकुल्या बोटींच्या हल्ल्याचा काहीही परिणाम झाला नाही. त्यांनी डागलेले टोरपेडोंचाही काही उपयोग झाला नाही परंतु हा तांडा पुढे सरकत असताना या पीटी बोटींनी ओल्डेनडोर्फला प्रत्येकीची तपशीलवार बित्तंबातमी दिली. ओल्डेनडोर्फ आता जपान्यांचा समाचार घेण्यास सज्ज होता.[२४]
निशिमुराचा ताफा पीटी बोटींना न जुमानता सामुद्रधुनीच्या उत्तर मुखाशी आला. तेथून झपाट्याने पुढे जात कुरिताला जाउन मिळण्याचा त्याचा बेत होता. ओल्डेनडोर्फने आपला ताफा सामुद्रधुनीच्या मुखाशी आडवा पसरून ठेवलेला होता, त्यात निशिमुरा आयता चालत गेला आणि आरमारी लढाईतील क्रॉसिंग द टी या विध्वंसक आणि अभेद्य डावपेचाचा शेवटचा प्रसंग सुरू झाला. या शिवाय दोन शत्रू बॅटलशिप एकमेकांशी थेट लढण्याचाही हा शेवटचाच प्रसंग होता. याआधी ग्वादालकॅनालच्या लढाईत यूएसएस वॉशिंग्टनने जपानी बॅटलशिप किरिशिमाशी झुंज देउन जपानी नौकेला जलसमाधी दिली होती.[२५][२६]
पीटी बोटींपासून दूर होत निशिमुरा जसा पुढे आला तसेच सामुद्रधुनीच्या दोनही बाजूंनी दबा धरून बसलेल्या अमेरिकन विनाशिकांनी त्याच्या तांड्यावर टोरपेडोंचा वर्षाव केला. पहाटे ३ च्या सुमारास दोन्ही जपानी बॅटलशिपना टोरपेडोचे दणके बसलेले होते. यामाशिरो तरीही पुढे जात राहिली परंतु यूएसएस मेल्व्हिनने टिपलेल्या फुसोला झालेले नुकसान मोठे होते आणि चाळीस मिनिटांनी फुसो बुडाली. याच बरोबर दोन जपानी विनाशिकाही बुडाल्या.[२७] निशिमुराचे घातक पथक जवळजवळ निकामी झाले.
उरलेला ताफा
[संपादन]पहाटे ३:१६ वाजता वेस्ट व्हर्जिनियाच्या रडारवर निशिमुराचा उरलेला ताफा ४२ किमी अंतरावर घुटमळत पुढे येत असलेला दिसला. वेस्ट व्हर्जिनियाने अर्धा-पाउण तास हल्ला न करता पूर्णपणे लपून राहून त्यांची वाट पाहिली व ३:५३ वाजता एका दमात आपल्या आठ ४०६ मिमी तोफांचा मारा यामाशिरोवर केला. वेस्ट व्हर्जिनियाने एकूण ९३ वेळा आपल्या तोफा डागल्या. दोन मिनिटांनी कॅलिफोर्निया आणि टेनेसी सुद्धा चालून आल्या. कॅलिफोर्नियाने ६२ तर टेनेसीने ६९ वेळा तोफांचा मारा केला. जपानी तांड्यावरील रडारयंत्रणा कुचकामी होती व त्यांना अमेरिकनांवर नेमके निशाण साधता आले नाही व ते फक्त मार खात राहिले व अंधारात सैरावैरा फिरत राहिले.[२३][२८]
इतर तीन अमेरिकन बॅटलशिपवरील रडारयंत्रणा पुढारलेली नसल्याने त्यांना जपान्यांवर लांबून मारा करता आला नाही. पेनसिल्व्हेनियाने एकदाही तोफा डागल्या नाहीत. मेरीलँडने अंधारात जवळ जाउन रडारशिवाय नेम साधला आणि ४८ वेळा तोफांचा मारा केला. मिसिसिपीने आपल्या १२ तोफांचा मारा फक्त एकदा केला. हा म्हणजे एका बॅटलशिपने दुसऱ्या बॅटलशिपवर केलेला शेवटचा हल्ला होय. यानिशी आरमारी युद्धातील एक महत्वाचे युग संपले.[२९]
अमेरिकन बॅटलशिपखेरीज क्रुझरांनीही जपान्यांवर तुफान मारा केला. अद्यतन रडारयंत्रणा असलेल्या या नौकांनी २,००० पेक्षा अधिक बॉम्ब डागले. ओल्डेनडोर्फची ध्वजवाहक असलेल्या लुईव्हिलनेही ३७ वेळा कडकडाट करीत ३३३ वेळा तोफांचा मारा केला. तोपर्यंत जपानी अधिकारी आणि सेनापतींना काहीही कळेनासे झाले होते आणि त्यांनी चेवात येउन चहूबाजूस अंदाधुंद प्रतिहल्ला सुरू केला.[३०] दरम्यान जपानी विनाशिका शिगुरेने तोंड फिरवून पळ काढण्याचा प्रयत्न केला परंतु हे करताना तिचा सुकाणू निकामी झाला आणि ती पाण्यात ठप्प झाली. ४:०५ वाजता यूएसएस बेनियन या विनाशिकेने यामाशिरोवर टोरपेडोने वर्मी घाव घातला. बघता बघता १५ मिनिटांत ती बलाढ्य बॅटलशिप बुडाली. तिच्याबरोबर निशिमुरानेही जलसमाधी घेतली.[३१][३२] मोगामी आणि शिगुरे या विनाशिकांनी कसाबसा उलट्या दिशेने पळ काढला. जपान्यांच्या तोफखान्याने अमेरिकन विनाशिक आल्बर्ट डब्ल्यू. ग्रँटला जायबंदी केले.
दक्षिणी ताफ्याचा दुसरा भाग निशिमुराच्या मागून येत होता. व्हाइस अॅडमिरल क्लायोहिदे शिमाच्या नेतृत्त्वाखालील हे दुसरे आघात पथक माको पासून निघून सुरिगाओ सामुद्रधुनीत पोचेपर्यंत निशिमुराच्या मागे ६४ किमी होता. शिमाचे हे पथक पानाओन द्वीपाजवळ ओहोटीत सापडून जमिनीवर अडकून पडता पडता वाचले. या भागात जपानी आणि अमेरिकन दोन्ही रडारयंत्रणा फारशा प्रभावशाली नव्हत्या. आसपासची अनेक बेटे, त्यांवरील डोंगर व झाडांवरून रडारलहरी इतस्ततः फैलावत असल्यामुळे नेमक्या दृश्याचा अंदाज येण्यास कठीण होते. पीटी बोटींवरील छोट्या आणि जुन्या यंत्रणा तर कुचकामीच होत्या तरीही पीटी-१३७ या बोटीने जपानी क्रुझर अबुकुमावर टोरपेडो घातलाच. या हल्ल्यात जायबंदी झालेली अबुकुमा पथकातून मागे पडली. उरलेले पथक पुढे होताच त्यांना सामुद्रधुनीच्या उत्तर भागात ओल्डेनडोर्फकडून सडकून मार खाल्लेला निशिमुराचा ताफा दिसला. शिमाला वाटले की निशिमुराच्या दोन्ही बॅटलशिप बुडल्या आणि हे पाहून त्याने आपल्या पथकाला तत्काळ उलटे फिरण्यास फर्मावले.[३३] या भाऊगर्दीत शिमाची ध्वजवाहक नौका नाची ही मोगामीशी धडकली. यात मोगामीचे सुकाणू निकामी झाले व ती सुद्धा पथकाच्या मागे पडली. उत्तरेकडून भक्ष्य शोधत आलेल्या अमेरिकन विवानौकांनी तिचे अजून लचके तोडले. सकाळपर्यंत जपान्यांनी मोगामी सोडून दिली व अकोबोनोने टोरपेडो मारून ही बुडवली.
कामिकाझे हल्ले
[संपादन]सुरिगाओ सामुद्रधुनीत ही मारामारी सुरू असताना पलीकडे समार द्वीपाजवळ अमेरिकेचा तिसरा टास्क फोर्स (टॅफी ३) हा जपान्यांशी झुंजत होता. तेथील विवानौकांवरील विमाने अंधारात बसून राहिली होती. उजाडताना सुरिगाओमधील जपानी आरमार पाठ दाखवून पळत सुटलेले होते. तोपर्यंत टॅफी ३मधील विमाने हळूहळू सज्ज होत होती तर जपानी विमाने बचावाला तयार होत होती. सकाळपर्यंत या चकमकीत जपान्यांचा सडकून पराभव होत असलेले स्पष्ट होत होते. यावेळी दाव्हाओ द्वीपावरुन पहिले कामिकाझे (आत्मघाती विशेष विमाने) वैमानिक आकाशात झेपावले. अमेरिकेची सॅन्टी त्यांचे पहिले लक्ष्य होते. दुसऱ्या महायुद्धातील पहिला कामिकाझे वैमानिक सॅन्टीवर आदळला आणि त्याने १६ अमेरिकन खलाशी आपल्याबरोबर यमसदनास नेले. या गोंधळात एक जपानी पाणबुडीने आपला टोरपेडोही सॅन्टीवर मारला. या हल्ल्यात ४ अॅव्हेंजर आणि २ वाइल्डकॅट विमाने नष्ट झाली
संरक्षक विवानौका सुवान्नी कामिकाझेंचे दुसरे लक्ष्य ठरली. येथे त्याने ७१ अमेरिकन खलाशी मारले. दुसऱ्या दिवशी सुवान्नीवरील अजून एक कामिकाझे हल्ला झाला व त्यात ३६ अधिक खलाशी मृत्यू पावले. या हल्ल्यांमध्ये आणि नंतर लागलेल्या व ९ तास चाललेल्या प्रचंड आगीत एकूण १०७ खलाशी ठार तर अधिक १५० खलाशी जखमी झाले. सुवान्नीवरील ५ अॅव्हेंजर आणि ९ वाइल्डकॅट विमानेही नष्ट झाली.[३४][३५][३६]
परिणाम
[संपादन]दक्षिणी ताफ्यातील निशिमुराच्या पहिल्या आघात पथकामधील सात मोठ्या लढाऊ नौकांपैकी फक्त शिगुरे फारसे नुकसान न होता निसटली. पुढे युद्धामध्ये तिला यूएसएस ब्लॅकफिन या पाणबुडीने २४ जानेवारी, १९४५ रोजी ब्रिटिश मलायातील कोटा भारू बंदराजवळ बुडवली. त्यावरी ३७ खलाशी यात मृत्यू पावले.[२८][पान क्र. हवा] शिमाच्या दुसऱ्या आघात पथकातील बव्हंश नौका पाठ फिरवून पळत सुटल्याने वाचल्या परंतु या सगळ्या पुढे लेयटेच्या आसपास बुडवल्या गेल्या. निशिमुराच्या या मोहीमेमुळे लेयटेवरील अमेरिकन लष्कराला पुढे कोणताही धोका राहिला नाही.
समारची लढाई
[संपादन]
सुरुवात
[संपादन]इकडे हॅल्सी आपल्या तिसऱ्या ताफ्यातील सगळ्या लढाऊ नौका घेउन उत्तरेकडे जपानच्या उत्तर ताड्यावर चालून गेल्यामुळे सान बर्नार्डिनोचा आखात पूर्णपणे असुरक्षित पडला. सातव्या ताफ्यातील किंकेड आणि इतर दर्यासारंगांना वटले की हॅल्सी टास्क फोर्स ३४ मधील बॅटलशिप तेथे ठेवून जाईल. परंतु तसे न होता ही सगळी शिबंदी हॅल्सीबरोबर उत्तरेस गेली.
२५ ऑक्टोबर रोजी पहाटे ३ वाजता कुरिताचा मध्य तांडा सान बर्नार्डिनोच्या आखाता कोणताही विरोध न होता समार बेटाच्या किनाऱ्यालगत दक्षिणेकडे निघाला. तेथे त्याला रोखण्यासाठी सातव्या ताफ्यातील फक्त ३ छोट्या विवानौका नौका होत्या टॅफी १, २ आणि ३ अशी सांकेतिक नावे असलेल्या या गटांमध्ये एकूण १६ अगदी छोट्या, मंदगतीच्या आणि चिलखत नसलेल्या लढाऊ नौका आणि त्यांच्यासोबत २८ लढाऊ विमाने होती. त्यांना संरक्षण म्हणून बिनचिलखती आणि जुजबी शस्त्रास्त्रे असलेल्या विनाशिका आणि त्यांहून छोट्या सोबती विनाशिका होत्या. पालावान आणि सिबुयान समुद्रातील चकमकींमध्ये मार खाल्ला असला तरीही जपानी मध्य तांडा आपल्या चार बॅटलशिप सह सुसज्ज होता. यात राक्षसी बॅटलशिप यामातो, ५ जड क्रुझर, २ हलक्या क्रुझर आणि ११ विनाशिका तैनात होत्या[३७][पान क्र. हवा]
लढाई
[संपादन]कुरिताने क्लिफ्टन स्प्रेगच्या नेतृत्त्वाखालील टास्क फोर्स ३ वर अचानक धाड घातली. स्प्रेगने आपल्या छोट्या विवानौकेवरील असतील नसतील ती सगळी विमाने आकाशात धाडली आणि जपान्यांना गुंतवून ठेवत पूर्वेला जमा होत असलेल्या वादळाकडे धूम ठोकली. त्याचवेळी आपल्या सोबती विनाशिकांना त्याने धूरांचा पडदा टाकण्यास सांगितले म्हणजे जपान्यांना त्याच्या हालचाली दिसणार नाहीत.
हॅल्सी आदल्या दिवशी ओझावाच्या गळाला अडकून उत्तरेला गेलेला होता पण कुरिताला याची कल्पना नव्हती. त्याला वाटले की स्प्रेगचा ताफा म्हणजे हॅल्सीच्याच ताफ्याचा छोटा भाग होता. लवकरच हॅल्सीचा पूर्ण ताफा स्प्रेगच्या बचावाला चालून येण्याचा त्याने अंदाज बांधला व आपल्या युद्धनौकांना त्याने हॅल्सीच्या विमानांविरुद्ध बचावाचा पवित्रा राखण्याचा हुकुम दिला. पण ही व्यूहरचना पूर्ण होते तो त्याने आपल्या ताफ्याला सर्वशक्तीनिशी हल्ला करण्याचे फर्मावले. यासाठी त्याच्या लढाऊ नौका अनेक गटांमध्ये विखुरल्या आणि स्प्रेगचा माग काढत फिरू लागल्या[३८][पान क्र. हवा]
यूएसएस जॉन्स्टन ही विनाशिका कुरिताच्या ताफ्यापासून सगळ्यात जवळ होती. कुरिताचे अनेक गट चालून आलेले पाहताच जॉन्स्टनच्या सेनापती लेफ्टनंट कमांड अर्नेस्ट ई. एव्हान्सने पळ न काढता आपली छोटीशी विनाशिका बलाढ्य जपानी तांड्याच्या अंगावर घातली. फ्लॅन्क स्पीड (सगळ्या इंजिनांच्या सगळ्या शक्तीनिशी) जपान्यांवर धावून जात त्याने जपानी जड क्रुझर कुमानो वर आपले टोरपेडो डागले. या हल्ल्यामुळे कुमानोचे मोठे नुकसान होउन ती व्यूहातून पाजूला पडली. हे पाहताच स्प्रेगने आपल्या ताफ्यातील किरकोळ नौकांनाही रणांगणात उतरण्याचा हुकुम केला. टास्क फोर्स ३ (टॅफी ३) मधील इतर दोन क्रुझर यूएसएस होएल आणि यूएसएस हीरमान तसेच विनाशिका सोबती नौका यूएसएस सॅम्युएल बी. रॉबर्ट्स यांनी आत्मघाती हल्ला चढवत जपान्यांचा तोफमारा स्वतःवर ओढवून घेतला. त्यांच्या या अनपेक्षित हल्ल्याने आश्चर्यचकित जपानी तांडा विस्कळित झाला आणि या वेडात धावलेल्या विनाशिकांचे टोरपेडो चुकवण्यासाठी त्यांनी आपली दिशा बदलली. अमेरिकन नौका जपान्यांच्या जवळ येत असताना सॅम्युएल बी. रॉबर्ट्सच्या सेनापती लेफ्टनंट रॉबर्ट कोपलंडने आपल्या सैनिकांना ध्वनिवर्धकावरून सांगितले की ही लढाई अतिप्रचंड शत्रू विरुद्ध निकराची लढाई आहे. यात विजयाची शक्यता जवळजवळ नाहीच आणि आपण जगण्या-वाचण्याची शक्यता बिलकुल नाही.[३९] तोपर्यंत सावरलेल्या जपानी नौकांनी या तीन पिटकुल्या अमेरिकन जहाजांवर कडाडून हल्ला चढवला. होएलअ' आणि रॉबर्ट्स यांवर अनेक बॉम्ब आणि टोरपेडोंचा वर्षाव झाला आणि दोन्ही लगेचच बुडाल्या. त्यांच्याबरोबर त्यांच्यावरील खलाशी व अधिकाऱ्यांपैकी बहुतेक सगळ्यांनी जलसमाधी घेतली. जॉन्स्टनने आपले सगळे टोरपेडो संपवले आणि नंतर आपल्या एकमेव ५ इंची तोफेसह झुंज चालू ठेवली. आपला दारुगोळा संपेपर्यंत लढत राहिलेल्या जॉन्स्टनला शेवटी जपानी विनाशिकांनी बुडविले.

याच वेळी इतर अमेरिकन सोबती विवानौका आपली विमाने लढण्यासाठी तयार करीत होत्या. त्यांना आपल्याकडील सगळ्या तोफा (म्हणजे प्रत्येकी एक ५ इंची तोफ) घेउन रणांगणाकडे धाव घेतली. त्यांना आपल्याकडील शेंगदाणे मारणाऱ्या बंदुका घेउन मिळेल त्या जपानी लढाऊ नौकेशी झुंज देण्याचे आदेश होते. यूएसएस फॅनशॉ बे ने एका क्रुझरवर पाच गोळे टाकल्याची नोंद आहे. यूएसएस कालिनिन बे ने क्रुझर म्योको वर हल्ला केला आणि त्यावरील तोफांवर दोन फटके मारले. यूएसएस गॅम्बिएर बे ने अजुन एका क्रुझरवर तीन गोळे टाकले तर यूएसएस व्हाइट प्लेन्सने इतर जपान्यांवर हल्ले केले.[४०]
रिअर अॅडमिरल थॉमस एल. स्प्रेगने ताफ्यातील १६ सोबती विवानौकांना त्यांच्यावरील सुमारे ४५० विमाने तातडीने तयार करून लढाईत उतरवली. घाईघाईत या विमानांवर मिळेल ती शस्त्रास्त्रे आणि दारुगोळा चढवला गेला होता. काहींवर तर फक्त मशीन गन आणि डेप्थ चार्ज होते. ही विमाने पाणबुड्यांविरुद्ध लढण्यासाठी अधिक उपयोगी होती. हॅल्सीने जहाजांविरुद्ध लढणारी विमाने आपल्याबरोबर उत्तरेस नेलेली होती. समारजवळच्या या परिस्थितीत अमेरिकनांनी मिळेल ती हत्यारे जपानी तांड्यावर वापरली. जर अमेरिकनांकडे फारसा दारुगोळा नव्हता तर जपान्यांकडे विमानविरोधी तोफा किंवा चिलखत नव्हते आणि त्यांच्याकडील लढाऊ विमाने आधीच्या झटापटीत कामी आली होती. यामुळे स्प्रेगच्या विमानांना अनपेक्षितपणे मोकळे रान मिळाले. त्यांनी अविरतपणे जपान्यांवर हल्ले चालू ठेवले. टास्क फोर्स २ मधील फेलिक्स स्टम्प या विवानौकेवरील विमानांनी अधिक धुमाकूळ घातला.
जपानी युद्धनौकांची संख्या आणि आकार शेवटी अमेरिकनांना भारी पडू लागली. टास्क फोर्स ३ ने तुफान तोफमाऱ्यातून पळ काढला. त्यातील यूएसएस गॅम्बिएर बे ही नौका जपानी बॅटलशिप यामातोच्या कचाट्यात सापडली आणि सकाळी ९:०७ वाजता बुडाली. इतर विवानौकांना ही नुकसान पोहोचले परंतु त्यांना पळून जाण्यात यश आले.[४१]
कुरिताची माघार
[संपादन]
अमेरिकनांनी दिलेली ही निकराची झुंज पाहता कुरिताला आपला अंदाज खरा असल्याचे पटायला लागले. या छोट्या विवानौका आणि जुजबी इतर जहाजे म्हणजे अमेरिकेच्या तिसऱ्या ताफ्याचाच भाग होय असे त्याला पक्के वाटून त्याने आपला व्यूह बदलायला सुरुवात केली. याच वेळी यामातो टास्क फोर्स ३ च्या पाठलागावर उत्तरेकडे निघून गेली व तिचा मुख्य ताफ्याशी संपर्क तुटला.
कुरिताला उत्तरेकडून संदेश आला की तेथे अमेरिकेच्या ताफ्यातील मुख्य लढाऊ नौका दिसल्या आहेत. त्याने समारजवळच्या किरकोळ अमेरिकन जहाजांशी चाललेली झुंज अचानकपणे बंद केली व आपल्या ताफ्यातील सगळ्या नौकांना ताबडतोब माझ्या मागे २० नॉट गतीने या असे फर्मावले. यामुळे उरलेल्या अमेरिकन ताफ्याला जीवदान मिळाले आणि तेथे तग धरायला वेळ मिळाला. कुरिताने जर ही जहाजे बुडवली असती तर त्यानंतर लगेचच लेयटे मध्ये अमेरिकनांची उतरलेली कुमक त्याला रोखता आली असती. अमेरिकन मुख्य ताफ्याच्या मागावर असलेल्या कुरिताला काही तो सापडला नाही कारण हॅल्सी तेथून बराच लांब होता. कुरिताने परत दक्षिणेकडे मोर्चा वळविला व सान बर्नार्डिनो अखाताकडे तो निघाला. तोपर्यंतच्या लढाईत त्याच्या चार पैकी तीन बुडल्या होत्या आणि अमेरिकन आरमाराच्या निकराच्या झुंजीमुळे त्याला वाटले की अजून लढाई चालू ठेवली तर जपान्यांचे अधिक मोठे नुकसान होईल.
कुरिताकडील संदेशवहन यंत्रणा कमकुवत होती आणि त्याच्याकडील टेहळणीसाठी विमानेही उरली नव्हती. यामुळे त्याला रणांगणाचे पूर्ण चित्र कधीच स्पष्ट दिसले नाही. त्याला शेवटपर्यंत वाटत राहिले की समार जवळ त्याचा मुकाबला हॅल्सीच्या मुख्य ताफ्याशीच होता. त्याच्या लक्षात आले नाही की समोर दिसणारी किरकोळ अमेरिकन जहाजे म्हणजे त्यांची उरली सुरली शिबंदी होती. त्यांचा बीमोड केला असता कुरिताला लेयटेचा संपूर्ण प्रदेश काबीज करणे सहज शक्य होते परंतु हॅल्सीच्या बलाढ्य (पण जागेवर नसलेल्या) ताफ्यातील जहाजे आता आपल्याला वेढा घालून आपली गच्छंती करतील हाच समज करून घेत कुरिता बचावात्मक पवित्र्यात राहिला आणि नंतर त्याने पळ काढला.[३८][पान क्र. हवा]
हॅल्सीला कळून चुकले की ओझावा आपल्याला लेयटेपासून मुद्दाम दूर खेचत चालला आहे. त्याने आपला मोर्चा पुन्हा लेयटेकडे वळवला. तो येईपर्यंत कुरिता आपला उरलेला ताफा घेउन तेथून पसार झालेला होता. पाच बॅटलशिपसह आलेल्या कुरिताकडे फक्त यामातो आणि हरुना या दोनच शिल्लक होत्या तर नागातो आणि कोंगो या क्रुझर लंगडलेल्या होत्या.
समुद्रावरील ही प्राणपणाची लढाई संपत असताना व्हाइस अॅडमिरल ताकिजिरो ओनिशीने लुझोनमधून कामिकाझे विमाने अमेरिकन तांड्यावर सोडली. सुरिगाओ अखातानंतरचा हा दुसरा कामिकाझे हल्ला होता. या हल्ल्यांमध्ये यूएसएस सेंट लो ही सोबती विवानौका बुडाली तर कालिनिन बे, किटकुन बे आणि व्हाइट प्लेन्स या नौकांना मोठे नुकसान झाले.[४२]
केप एन्गान्योची लढाई
[संपादन]व्हाइस अॅडमिरल जिसाबुरो ओझावाच्या उत्तर तांड्यात अनेक जुनाट आणि कमकुवत नौका होत्या. यांमध्ये विवानौका झुइकाकु; हलक्या विवानौका झुइहो, चितोस, चियोदा; पहिल्या महायुद्धापासूनच्या बॅटलशिप ह्युगा आणि से तसेच तीन हलक्या क्रुझर ओयोदो, तामा आणि इसुझु होत्या. यांशिवाय ९ विनाशिकाही या तांड्यात होत्या. झुइकाकु ही पर्ल हार्बरवर धाड टाकणाऱ्या सहांपैकी एकमेव उरलेली विवानौका होती. हा तांडा म्हणजे अमेरिकनांना झुलवत लेयटे पासून दूर खेचत नेण्यासाठीचे आमिष होते. एकदा अमेरिकन आरमार दूर झाले की जपान्यांचा लेयटेवर मोठ्या प्रमाणात सैनिक उतरविण्याचा व्यूह होता. योगायोगाने यांच्यातील लढाई जेथे झाली त्या भूशिराच्या स्पॅनिश नावाचा एन्गान्यो अर्थ फसवणूक असाच होतो.

ओझावाचा तांडा अमेरिकनांना २४ ऑक्टोबरला संध्याकाळी दिसला. तोपर्यंत ते लुझॉनवरून आलेल्या विमानांपासून बचाव करण्यात आणि सिबुयान समुद्रातील चकमकींमध्ये अडकलेले होते. हॅल्सीच्या मागावर निघालेला तांडा आणि ओझावामध्ये मिळून असलेल्या या ताफ्यापेक्षा अमेरिकनांकडचे बळ बलाढ्य होते. अमेरिकनांकडे इंट्रेपीड, फ्रँकलिन, लेक्झिंग्टन, एंटरप्राइझ आणि एसेक्स या विवानौका, इंडिपेन्डन्स, बेलो वूड, लँग्ली, कॅबट आणि सान जेसिंटो या हलक्या विवानौका; अलाबामा, आयोवा, मॅसेच्युसेट्स, न्यू जर्सी, साउथ डकोटा आणि वॉशिंग्टन या आधुनिक बॅटलशिप आणि शिवाय दोन जड क्रुझर, सहा हलक्या क्रुझर आणि ४१ विनाशिका होत्या. यांच्यात मिळून ६००-१,००० विमानेही होती.[४३]
सातव्या तांड्याची मदतीची हाक
[संपादन]२५ ऑक्टोबरला पहाटे हॅल्सीने आपल्या ६ बॅटलशिपभोवती टास्क फोर्स ३४ उभा केला आणि त्यांना मुख्य तांड्याच्या पुढे पाठविले. काही तासांतच ओझावाने आपल्या उरलेल्या ७५ विमानांसह अमेरिकनांवर हल्ला केला. त्यांची वाटच पहात असलेल्या अमेरिकन वैमानिकांनी बव्हंश शत्रुविमानांना टिपले आणि उरलेले जपानी वैमानिक कसेबसे लुझॉन येथे जमिनीवर उतरले. उजाडल्यावर अमेरिकन विमानांनी ओझावाच्या तांड्यावर कडाडून हल्ला चढवला. १८० विमानांनी ५२७ वेळा झेपावत जपानी विमानांची धूळधाण उडवली व दिवसभर अविरत हल्ले करीत झुइकाकु ही विवानौका; चितोसे आणि झुइहो या हलक्या विवानौका आणि अकिझुकी ही विनाशिका बुडवली. प्रत्येक जहाजाबरोबर शेकड्यांनी जपानी सैनिक समुद्रात मृत्यू पावले. खुद्द ओझावा असलेली क्रुझर तामा सुद्धा जायबंदी झाल्यावर ओझावाने आपला कमानध्वज ओदोयो या हलक्या क्रुझरवर हलवला.
अमेरिकन विमानांचा ओझावावर हल्ला सुरू होण्याच्या आधी पहाटे पासूनच त्यांच्या सातव्या तांड्याकडून हॅल्सीला तातडीचे संदेश येऊ लागले. असे अनेक संदेश हॅल्सीच्या ध्वजनौकेवर येउन पडत होते परंतु तेथील भाऊगर्दीमध्ये हे कधीही कोणतेही अनुक्रमाबाहेर त्याच्या स्वतःकडे जात होते. सुरिगाओच्या आखातात निशिमुराशी लढत असलेल्या थॉमस किंकेडने माझी परिस्थिती अगदी बिकट आहे. जलद बॅटलशिप आणि विमानांची कुमक मिळाली तरच माझ्या विवानौका वाचतील आणि शत्रूला लेयटेपासून लांब ठेवता येईल. असा संदेश पहाटे २:०० वाजताच पाठवला होता. लढाईच्या गोंधळात हा संदेश त्याला जवळजवळ ८ तासांनी १०:०० च्या सुमारास मिळाल. हे वाचून हॅल्सीला धक्का बसला. त्याला अंदाज होता की किंकेडची परिस्थिती चांगली नसल्याचा अंदाज होता पण इतकी गंभीर असेल असे त्याला वाटले नव्हते.
सुरिगाओची लढाई संपत असताना किंकेडने स्वतःकडील दारुगोळा संपत असल्याचे हॅल्सीला कळवले. वस्तुतः असे नव्हते[४४] पण हॅल्सीला हे माहिती होण्याचा वाव नव्हता. असा तातडीचा संदेश मिळाल्यावरही हॅल्सीने ओझावाचा पाठलाग थांबवून सुरागाओकडे मोर्चा वळवला नाही किंवा स्वतःकडील जहाजांपैकी काही किंकेडच्या मदतीला पाठवली नाहीत.[४५][४६][४७]
द वर्ल्ड वंडर्स
[संपादन]लेयटे आखातात ही धुमश्चक्री सुरू असताना ५,००० किमी लांब पर्ल हार्बरमध्ये अॅडमिरल निमित्झला किंकेडचे संदेश दिसत होते. त्यावर काहीही हालचाल होत नाही असे दिसून निमित्झने थेट हॅल्सेला एक तिरसट संदेश पाठवला. या संदेशाने लढाईचे चित्र तर बदललेच पण आणीबाणीमधील संवादांमध्ये हा संदेश एक शिकवण ठरला.
निमित्झचा (इंग्लिश) संदेश होता -- "टर्की ट्रॉट्स टू वॉटर जीजी फ्रॉम सिंकपॅक अॅक्शन कॉम थर्ड फ्लीट इन्फो कॉमइंच सीटीएफ सेव्हेंटी-सेव्हेन व्हेर इज रिपीट व्हेर इज टास्क फोर्स थर्टी फोर आरआर द वर्ल्ड वंडर्स."
यातील पहिले चार आणि शेवटचे तीन शब्द मुद्दामहून असंबद्ध होते. शत्रुच्या हेरांच्या हाती लागलेल्या संदेशांचा अर्थ लावणे अवघड व्हावे म्हणून असे शब्द नेहमी घातले जात. मुख्य संदेशाच्या आधी आणि संपल्यावर लगेच नेहमी दोन व्यंजने (उदा., जीजी आणि आरआर) असत. हॅल्सीच्या रेडियो वाहकाने नेहमीप्रमाणे पहिले शब्द (टर्की ट्रॉट्स टू वॉटर जीजी) वगळले परंतु शेवटचे तीन शब्द (द वर्ल्ड वंडर्स) चुकीने काढले नाही. हे शेवटचे शब्द निमित्झच्या रेडियोवाहकाने बहुधा स्वतःच निवडले होते. हे शब्द आल्फ्रेड लॉर्ड टेनिसनच्या द चार्ज ऑफ द लाइट ब्रिगेड या कवितेतून घेतले असावेत.[४८] योगायोगाने २५ ऑक्टोबर रोजी बालाक्लाव्हाच्या लढाईला ९० वर्षे झाली होती. या लढाईत इंग्लंडच्या एका ब्रिगेडने केवळ वरिष्ठांनी सांगितल्यावरून रशियनांवर आत्मघातकी हल्ला केला होता. जरी निमित्झला हे सगळे सुचवून हॅल्सीला डिवचायचे नव्हते तरीही त्याला वाटले की निमित्झने त्याच्यावर सडकून टीका केली आहे आणि त्याच्या व्यूहावर शंका व्यक्त केली आहे आणि तो प्रचंड संतापला. त्याने आपली टोपी फेकून दिली आणि अद्वातद्वा शिव्या देऊ लागला. त्यावेळी त्याच्या मुख्य मदतनीस रॉबर्ट कार्नीने त्याला हटकले आणि त्याला हा तमाशा बंद करून स्वतःवर नियंत्रण मिळवण्यासाठी तंबी दिली.
हॅल्सीची माघार
[संपादन]निमित्झचा संदेश मिळाल्यानंतर ११:१५ वाजता शेवटी हॅल्सीने ओझावाचा पाठलाग करणे थांबवायचे ठरवले. आपल्या टास्क फोर्स ३४ला त्याने उलटपावली समारकडे जाण्यास फर्मावले. या सुमारास ओझावा व्हाइस अॅडमिरल लीच्या माऱ्यात आलेला होता पण त्याला अनायासे जीवनदान मिळाले. त्यानंतर अडीच तास इंधन भरून घेण्यात गेले.[४९] अशाच इतर अडथळ्यांना पार करीत हॅल्सी आणि त्याचा टास्क फोर्स सुरिगाओ आणि समारपाशी आला. परंतु तोपर्यंत तेथील लढाई संपलेली होती आणि कुरिता तेथून सान बर्नार्डिनोच्या आखातामार्गे निसटलेला होता. हॅल्सीच्या जहाजांना फक्त या लढाईतील वाचलेल्या आणि पाण्यात तरंगत असलेल्या खलाशांना उचलून घेण्याचे काम उरले होते.
शेवटच्या चकमकी
[संपादन]संध्याकाळी साडेचारच्या सुमारास हॅल्सीने आपल्या दोन सगळ्यात वेगवान बॅटलशिप आयोवा आणि न्यू जर्सी यांना कुरिताचा पाठलाग करण्याकरता धाडले.[५०] त्यांच्याबरोबर विनाशिका व इतर जहाजेही होती. कुरिता तोपर्यंत लांब गेलेला होता. जरी अमेरिकनांनी त्याला गाठले असते तरी कुरिताच्या उरल्यासुरल्या शक्तीला ते पुरून उरले नसते.[५१] अमेरिकनांना कुरिताची लंगडलेली एक विनाशिका नोवाकी दिसली आणि सर्वशक्तीनिशी तिला बुडवून टाकले. नोवाकी वरील सगळे खलाशी, सैनिक आणि अधिकारी समुद्रात बुडले. त्यांनी वाचविलेल्या चिकुमावरील लोकांचाही यात समावेश होता.
परिणती
[संपादन]लेयटे आखातातील झालेल्या आरमारी लढाईतीव विजयामुळे अमेरिकेच्या सहाव्या सैन्याला लेयटेच्या पुळणींवर पाय रोवता आला. पूर्ण बेट जिंकण्यासाठी त्यांना अजून दोन महिन घनघोर लढाई करावी लागली. जपान्यांनी विमान आणि जहाजांद्वारे तेथे कुमक पाठवणे चालू ठेवले होते. अमेरिकनांनी त्यांनी थोपवून धरत ऑरमॉक आखाताच्या लढाईद्वारे अजून सैनिक बेटावर आणले आणि शेवटी ते जिंकून घेतले.[५२]
लेयटे आखाताच्या लढाईतील पराभव शाही जपानी आरमाराच्या इतिहासातील सगळ्यात मोठा होता. यानंतर संपूर्ण फिलिपिन्स जपानाच्या हातातून निसटले आणि जपानचा त्यांनी जिंकून घेतलेल्या सिंगापूर, ब्रह्मदेश आणि आग्नेय आशियातील मोठ्या भागाशी संपर्क तुटला किंवा अवघड झाला. तेथून येणारी युद्धसामग्रीची रसद थांबल्याने जपानमधील कारखाने थंडावले. विशेषतः इंडोनेशियामधून खनिज तेल मिळणे बंद झाल्याने जपान्यांची विमाने आणि युद्धनौकांच्या वापरावर थेट परिणाम झाला. लेयटेच्या आखातातील पराभवाने अमेरिकांना ओकिनावावर चढाई करणे आणि नंतर रायुक्यु बेटांवर आक्रमण करणे शक्य झाले.[५३][५४]
लेयटे आखातातील लढाई नंतर शाही जपानी आरमाराची धूळधाण उडाली. तेथून वाचलेल्या युद्धनौका लगेचच जपानी बंदरांत नांगरल्या गेल्या आणि दुसरे महायुद्ध संपेपर्यंत वापरल्याच गेल्या नाहीत. याला अपवाद म्हणजे बॅटलशिप यामातो आणि इतर काही नौकांनी चढवलेला आत्मघातकी हल्ला होय, ज्यात अमेरिकनांनी यामातोसह सगळ्या जपानी नौकांना सहज समुद्रार्पण केले.
आरमारी नुकसान
[संपादन]दोस्त राष्ट्रे
[संपादन]या लढाईमध्ये अमेरिकेने ११ युद्धनौका गमावल्या:
- १ हलकी विवानौका: यूएसएस प्रिन्सटन [५५]
- २ सोबती विवानौका: यूएसएस गॅम्बएर बे, यूएसएस सेंट लो (कामिकाझे हल्ल्यात)[५६]
- २ विनाशिका: यूएसएस होएल, यूएसएस जॉन्स्टन[५६]
- १ विनाशिका सोबती: यूएसएस सॅम्युएल बी. रॉबर्ट्स[५७]
- १ पीटी बोट: यूएसएस पीटी-४९३
- यूएसएस डार्टर, एचएमएएस ऑस्ट्रेलिया सह ४ नौकांना मठे नुकसान[५८]
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ वूडवार्ड, सी. व्हॅन. द बॅटल फॉर लेयटे गल्फ (इंग्लिश भाषेत). न्यू यॉर्क.CS1 maint: unrecognized language (link)
- ^ "बॅटल ऑफ लेयटे गल्फ". दुसऱ्या महायुद्धाच्या हकीगती. २०१४-०१-१७ रोजी पाहिले.
- ^ थॉमस, एव्हान. सी ऑफ थंडर: फोर कमांडर्स अँड द लासट ग्रेट नेव्हल कॅम्पेन, १९४१-१९४५ (इंग्लिश भाषेत). न्यू यॉर्क.CS1 maint: unrecognized language (link)
- ^ a b फुलर, जॉन एफ.सी. द डिसाइझिव बॅटल्स ऑफ द वेस्टर्न वर्ल्ड. लंडन.
- ^ मॉरिसन, सॅम्युअल ई. हिस्टरी ऑफ युनायटेड स्टेट्स नेव्हल ऑपरेशन्स इन वर्ल्ड वॉर २ (इंग्लिश भाषेत). बॉस्टन.CS1 maint: unrecognized language (link)
- ^ मॉरिसन, सॅम्युएल ई. (1956). "Leyte, June 1944 – January 1945". History of United States Naval Operations in World War II (इंग्लिश भाषेत). XII. बॉस्टन.CS1 maint: unrecognized language (link)
- ^ Fuller 1956a, पान. 234.
- ^ Morison 1958, पाने. 160, 171.
- ^ Morison 1958, p. 170; Hornfischer 2004, pp. 119–120.
- ^ Morison 1958, पाने. 170–172.
- ^ Morison 1958, p. 172; Cutler 1994, p. 100; Hornfischer 2004, p. 120.
- ^ Morison 1958, पाने. 175, 184.
- ^ Morison 1958, पान. 177.
- ^ BuShips 1947.
- ^ Bernstein, Marc D. (October 2009). "'Hell Broke Loose' at Leyte Gulf". Naval History. Vol. 25 no. 3. 12 March 2024 रोजी पाहिले.
- ^ Morison 1958, पाने. 178–183.
- ^ DANFS Princeton.
- ^ a b Morison 1958, पान. 186.
- ^ L, Klemen (1999–2000). "Rear-Admiral Takeo Kurita". Forgotten Campaign: The Dutch East Indies Campaign 1941–1942. 2020-10-08 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2025-01-30 रोजी पाहिले.
- ^ Morison 1958, पान. 431.
- ^ a b Morison 1958, पाने. 223–224.
- ^ Morison 1958, पाने. 207–208, 212.
- ^ Morison 1958, पाने. 240–241.
- ^ Sauer 1999, पान. 155.
- ^ Morison 1958, पाने. 215–217.
- ^ a b Sauer 1999.
- ^ Morison 1958, पाने. 224, 226, 241.
- ^ Woodward 2007, पान. 100.
- ^ Holloway 2010.
- ^ Bates 1958, पान. 103.
- ^ Morison 1958, पाने. 230–233.
- ^ Cox, Samuel J. "H-038-2: The Battle of Leyte Gulf in Detail". Naval History and Heritage Command. 4 March 2020 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 1 January 2022 रोजी पाहिले.
- ^ "Oral Histories – Battle of Leyte Gulf, 23–25 October 1945". Naval History and Heritage Command. 24 November 2015 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 1 January 2021 रोजी पाहिले.
- ^ "USN Overseas Aircraft Loss List October 1944". aviationarchaeology.com. 20 August 2008 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 1 January 2022 रोजी पाहिले.
- ^ Hornfischer 2004.
- ^ a b Thomas 2006.
- ^ Woodward 2007, पान. 164.
- ^ Woodward 2007, पाने. 173–174.
- ^ AAIR 2007.
- ^ Morison 1958, p. 302; Hornfischer 2004, pp. 352–354; AAIR 2007.
- ^ Morison 1958, पाने. 424–428.
- ^ Morison 1958, पान. 295.
- ^ Fuller 1956b, पान. 614.
- ^ Morison 1958, पाने. 293–294.
- ^ Woodward 2007.
- ^ Morison 1958, पान. 292.
- ^ Morison 1958, पाने. 329–330.
- ^ Vego 2006, पान. 284.
- ^ Morison 1958, पान. 330.
- ^ Morison 1958, पाने. 361–385.
- ^ Fuller 1956a, पान. P. 346..
- ^ Morison 1958, पाने. 397, 414.
- ^ Morison 1958, पान. 426.
- ^ a b Morison 1958, पान. 421.
- ^ Morison 1958, पाने. 420, 421.
- ^ Morison 1958, पाने. 421, 422, 429.