योहान्स क्लिमन
योहान्स क्लिमन | |
---|---|
Johannes Kleiman | |
जन्म |
१७ ऑगस्ट १८९६ कूग आन दे झान, नेदरलँड्स |
मृत्यू |
२८ जानेवारी, १९५९ (वय ६२) अॅम्स्टरडॅम, नेदरलँड्स |
राष्ट्रीयत्व | डच |
पेशा | ओपेक्टातील कर्मचारी |
योहान्स क्लिमन (डच: Johannes Kleiman) (१७ ऑगस्ट, इ.स. १८९६ – २८ जानेवारी, इ.स. १९५९) हे एक डच नागरिक होते. त्यांनी अॅन फ्रॅंक व तिच्या कुटुंबाला दुसऱ्या महायुद्धादरम्यान लपण्यास मदत केली होती. अॅन फ्रॅंकने लिहिलेल्या द डायरी ऑफ अ यंग गर्ल या पुस्तकात त्यांचा उल्लेख श्री कूफिअस या टोपणनावाने केला गेला होता.
त्यांचा जन्म नेदरलँड्समधील कूग आन दे झान येथे झाला. इ.स. १९२३मध्ये त्यांची ऑटो फ्रॅंकशी ओळख झाली. तेव्हा ऑटो अॅम्स्टरडॅम येथे मायकल फ्रॅंक बँकची शाखा उघडण्याचा प्रयत्न करत होते. मे, इ.स. १९२४मध्ये त्यांना बँकेचा प्रतिनिधी म्हणून नियुक्त करण्यात आले व नंतर डिसेंबरमध्ये त्यांना बँक बुडण्याच्या थोडाच काळ आधी त्यांना सर्वाधिकार देण्यात आले. इ.स. १९३३मध्ये फ्रॅंक कुटुंब नेदरलँड्सला स्थलांतरित झाल्यावर क्लिमन फ्रॅंक कुटुंबाचे जवळचे मित्र बनले. नंतर इ.स. १९३८मध्ये ऑटो फ्रॅंकने त्यांना ओपेक्टा व पेक्टाकॉन कंपनीत हिशोबनीसाच्या पदावर घेतले.
व्हिक्टर कुग्लर, बेप वॉस्कुइल, मीप व जान खीस यांच्या सोबत योहान्स क्लिमन यांनी फ्रॅंक कुटुंबाला लपण्यास मदत केली. ऑगस्ट, इ.स. १९४४ मध्ये ते पकडले गेल्यावर योहान्स व व्हिक्टर यांनाही त्यांना मदत करण्याच्या अपराधाखाली अटक करण्यात आली. त्यांची रवानगी अॅमर्सफूट येथील श्रम छावणीत केली गेली. ते जवळपास सहा अठवडे नाझी कैदेत होते. नंतर रेड क्रॉसच्या मध्यस्तीने त्यांच्या अस्वास्थ्याच्या कारणावरून त्यांना सोडून देण्यात आले.
द डायरी ऑफ अ यंग गर्लच्या प्रकाशनानंतर ते नियमीतपणे पत्रकारांना फ्रॅंक कुटुंब लपलेल्या घरात घेऊन जात असत. अॅन फ्रॅंक फाउंडेशनच्या स्थापनेतही ते सहभागी होते. पण इ.स. १९६०मध्ये ते अॅन फ्रॅंक हाउस संग्रहालयाच्या स्वरूपात उघडण्याआधीच दिनांक २८ जानेवारी, इ.स. १९५९ रोजी त्यांचा मृत्यू झाला.