मोर शराटी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मोर शराटी, चिमणा अवाक
शास्त्रीय नाव Plegadis falcinellus (Linnaeus)
कुळ अवाकाद्य (Threskiornithidae)
अन्य भाषांतील नावे
इंग्लिश Glossy Ibis
संस्कृत कवाल
हिंदी छोटा बुज्जा

वर्णन[संपादन]

साधारण ६० सें. मी. आकाराचा मोर शराटी पक्षी दूर अंतरावरून काळा दिसत असला तरी प्रत्यक्षाता काळ्यासह हिरवट-तांबूस रंगाचा आहे. वीण काळातील नराचे रंग जास्त चमकदार असतात एरवी नर-मादी दिसायला सारखेच असतात. हे पक्षी पाणथळ भागात थव्याने राहतात.

वास्तव्य/आढळस्थान[संपादन]

मोर शराटी हा भारताच्या महाराष्ट्र, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, गुजरात, ओडिशा, आसाम, मणिपूर, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, केरळ या राज्यात प्रामुख्याने तसेच नेपाळ, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका या आशियाई देशात हिवाळी पाहुणे म्हणून युरोपमधून स्थलांतर करून येतात. दलदलीचे प्रदेश, सरोवरांच्या भागात आढळणारा हा पक्षी काळा अवाक, पांढरा अवाक तसेच बगळ्यांसह राहतो. सकाळ-संध्याकाळ एखाद्या झाडावर सर्व एकत्र जमतात. अशा जागेला सारंगागार म्हणतात.

उथळ पाण्यात चोच बुडवून एकट्याने आणि लहान-मोठ्या थव्याने हे पक्षी दिवसभर खाद्य शोधत फिरतात. सरडे, गोगलगाय, बेडूक, मासोळ्या, खेकडे वगैरे पाण्यात राहणारे जीव हे मोर शराटी पक्ष्याचे खाद्य आहे.

प्रजनन काळ[संपादन]

साधारणपणे नोव्हेंबर ते फेब्रुवारी-मार्च हा काळ चिमणा अवाक पक्ष्यांचा वीण काळ आहे. यांचे घरटे पाण्यात उभ्या असलेल्या किंवा जवळच्या झाडांवर, मोठ्या काटक्या वापरून केलेले असते. अशाच झाडांवर बहुधा बगळ्यांचे घरटेही असते. अवाक पक्ष्याची मादी एकावेळी २ ते ४ हिरवट निळया रंगाची अंडी देते. अंडी उबविण्यापासून पिलांच्या संगोपनाची सर्व कामे नर-मादी मिळून करतात.

चित्रदालन[संपादन]