Jump to content

मी टू मोहीम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मीटू मोहीम या पानावरून पुनर्निर्देशित)

मी टू मोहीम ही विविध क्षेत्रांत, कार्यालयीन वातावरणात अथवा कामाच्या ठिकाणी विशेषतः महिलांवरील होणाऱ्या लैंगिक अत्याचाराविरोधात प्रथम ट्विटरद्वारे #मीटू असा हॅशटॅग वापरून, आवाज उठवण्यासाठी सुरू झालेली मोहीम आहे. लैंगिक शोषणाला वाचा फोडण्यासाठी जगभरात सुरू असलेली 'मी-टू' (#me too) ही मोहीम आहे.

सुरुवात

[संपादन]
  • ५ ऑक्टोबर २०१७ रोजी न्यू यॉर्क टाइम्स या वृत्तपत्रात ॲशले जड (Ashley Judd) या अभिनेत्रीची मुलाखत प्रसिद्ध झाली. ॲशलेने प्रसिद्ध चित्रपट निर्माता हार्वे वेनस्टेईन यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले.[] हार्वे वेनस्स्टेईन यांनी प्लप फिक्शन, गुड विल हंटिंग, शेक्सपियर इन लव्ह अशा सुमारे सहा ऑस्कर पारितोषिक प्राप्त चित्रपटांची निर्मिती केली आहे.[] न्यू यॉर्क टाइम्सने केलेल्या अधिक चौकशीत अनेक अभिनेत्री तसेच हार्वे याच्या मीरामॅक्स कंपनीतील कर्मचारी स्त्रियांनी अशा अनेक घटना कथित केल्या. वृत्तपत्रांत आलेल्या या बातम्यांमुळे हार्वे यांची त्याच्या द वेनस्टेईन कंपनी मधून संचालक मंडळाने हकालपट्टी केली.
  • १२ ऑक्टोबर २०१७ रोजी इसा हॅकेट या दूरदर्शन निर्मातीने ॲमेझॉन स्टुडिओचे प्रमुख रॉय प्राईस यांच्यावर लैंगिक छळवणुकीचे आरोप केले. प्राईस यांनी केलेल्या छळाबद्दल केलेली तक्रार ॲमेझॉन स्टुडिओच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुर्लक्षित केली असाही आरोप इसा यांनी केला. या मुलाखतीमुळे रॉय प्राईस यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला.[]
  • १६ ऑक्टोबर २०१७ रोजी अलिसा मिलानो या अभिनेत्रीने ट्विटर या संकेतस्थळावर #MeToo हा हॅशटॅग वापरून तिने हॉलिवूड चित्रपट सृष्टीमध्ये होणाऱ्या लैंगिक शोषणाविरुद्ध वाचा फोडली. जर तुम्हालाही असा अनुभव आला असेल तर मी टू हा हॅशटॅग वापरा असे तिने आवाहन केल्यावर, एका दिवसात सुमारे ४०००० लोकांनी, ज्यात बहुतांश स्त्रिया होत्या, #MeToo हा हॅशटॅग (#) वापरला.[]
  • या नंतर अनेक अभिनेत्री आणि सामान्य स्त्रियांनी #मीटू (#MeToo) वापरून आपल्यावर झालेल्या लैंगिक शोषणाच्या कहाण्या सांगितल्या तसेच न्याय मागितला.
  • १८ ऑक्टोबर २०१७ला ऑलिम्पिक जिमनॅस्टिक्स खेळाडू मॅकायला मरोनी हिने अमेरिकन जिम्नॅस्टिक्स टीमचे डॉक्टर लॅरी नासर यांच्या विरुद्ध लैंगिक शोषणाला वाचा फोडली. जवळपास ३० वर्षाहून अधिक काळ टीमचे डॉक्टर असरे नास्सर सध्या बालकांच्या लैंगिक शोषणा संदर्भातील एका खटल्यात कारागृहात आहेत.
  • २९ ऑक्टोबर २०१७ रोजी ॲन्थनी रॅप याने केव्हिन स्पेसी या ऑस्कर पारितोषिकप्राप्त अभिनेत्याविरुद्ध शोषणाचे आरोप केले. या नंतर अनेक स्त्री तसेच बाल कलाकारांनी असेच आरोप केले आणि स्पेसी विरुद्ध जनमत तयार झाले.
  • यानंतर अनेक व्यवसायांतील बड्या धनदांडग्यांनी केलेल्या लैंगिक शोषणाचा बळी ठरलेल्या स्त्री पुरुषांनी आवाज उठवला आणि अनेक प्रकरणात स्टुडिओ आणि कंपन्यांना अशा लोकांविरुद्ध कारवाई करावी लागली.

निर्माती

[संपादन]
  • ट्विटर संकेत स्थळावर जरी आलीस मिलानो हिने #मी टू (#MeToo)चा वापर प्रचलित केला असला तरी हे शब्द लैंगिक शोषणासंदर्भात वापरण्याचे श्रेय तराना बर्क या स्त्री हक्क कार्यकर्तीला जाते.
  • १९९७ साली एका तेरा वर्षाच्या लैंगिक शोषणाची शिकार बनलेल्या मुलीशी त्या बोलत होत्या. "तिला कसा प्रतिसाद द्यावा हेच मला सुचत नव्हते. 'मी सुद्धा' अशा अत्याचाराची शिकार आहे हे सुद्धा मी तिला सांगू शकले नाही. अनेक वर्ष हा प्रसंग माझ्या मनात घर करून राहिला."
  • या संभाषणानंतर १० वर्षांनी तराना बर्क यांनी 'जस्ट बी' (Just Be) या ना-नफा संस्थेची स्थापना केली. लैंगिक अत्याचाराची आणि हिंसेची बळी ठरलेल्या स्त्रियांच्या मदतीसाठी ही संस्था काम करते. तराना यांनी या चळवळीला "मी टू" नाव दिले.[]

भारतामध्ये मी टू मोहीम

[संपादन]
  • सप्टेंबर २०१८ मध्ये अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने झूम टी व्ही या दूरचित्रवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले.
  • २००९ मध्ये "हॉर्न ओके प्लीज" या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी नाना पाटेकर यांनी असभ्य वर्तन करून त्रास दिल्याचा आरोप तनुश्री दत्ता हिने केला. या आरोपानंतर भारतातील अनेक क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांनी त्यांच्या विरुद्ध झालेल्या लैंगिक शोषणाच्या कहाण्या जाहीर करण्यासा सुरुवात केली.
  • आलोकनाथ या चरित्र अभिनेत्याविरुद्ध त्यांच्या एका चित्रपटाच्या निर्मातीने, "विनता नंदा" यांनी, बलात्काराचे आरोप केले आहेत[]. ही घटना सुमारे १९ वर्षापूर्वी झाली होती.
  • भारताचे परराष्ट्र राज्यमंत्री व प्रख्यात पत्रकार एम. जे. अकबर यांच्याही विरुद्ध तुशिता पटेल या पत्रकार महिलेने असे आरोप केल्यावर अनेक इतरही महिला पत्रकार पुढे आल्या.[]. आरोपांच्या या गदारोळात एम. जे. यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा १७ ऑक्टोबर २०१८ रोजी दिला.
  • विनोद दुवा या ज्येष्ठ पत्रकाराविरुद्धही अशाच प्रकारचे आरोप केले गेले आहेत.

भारतातल्या मीटू चळवळीची २०१९सालची स्थिती

[संपादन]

एक वर्षात भारताती मीटू चळवळ मरणासन्न झाली. नाना पाटेकर, गौरांग दोशी, विकास बहल, सुभाष कपूर, अन्नू मलिक, साजिद खान, सुभाष घई, कैलाश खेर, राजकुमार हिरानी, विनोद दुआ, आलोकनाथ, रजत कपूर वगैरेंना मीटू चळवळ जेव्हा जोरात होती तेव्हा काही कामे मिळत नव्हती. ती मिळणे सुरू झाले.

नाना पाटेकर यांच्या बाबतीत मुंबई पोलिसांनी कोर्टाला 'चौकशी बंद'चा रिपोर्ट सादर केला. तनुश्री दत्ता परदेशात जिथे होती, तिथे निघून गेली. जेव्हाजेव्हा भारतात येते तेव्हातेव्हा पत्रकारांना 'मी शेवटपर्यंत लढणार आहे'ची बातमी देऊन परत जाते.

ज्या गौरांग दोशीवर फ्लोरा सैनीने आरोप केले होते, त्याला अबू धाबीच्या शाही फॅमिलीकडून मोठी गुंतवणूक मिळाली.

२०१९ सालच्या सुरुवातीलाच 'सुपर 30' चित्रपट ज्या कंपनीने बनवला तिने 'अंतर्गत चौकशी चालू आहे'चा बहाणा करून दिग्दर्शक विकास बहाल याला 'क्लीन चिट' दिली.

आमिर खानसारख्या बड्या चित्रपट निर्मात्याने सुभाष कपूरला आपल्या चित्रपटांत घेतले आहे.

आमिर खानच्या कृतीचा परिणाम असा झाला की मीटूचे सर्वात गंभीर आरोप ज्याच्यावर आहेत तो अन्नू मलिक याच्यासाठी 'लाॅबीइंग' सुरू झाले. त्याला संगीत स्पर्धांमध्ये परत आणण्यात आले. अन्नू मलिकवर कोणत्याही कोर्टात दावा उभा न झाल्याचे या स्पर्धांच्या आयोजकांनी दाखवून दिले.

साजिद खानवर तीन अभिनेत्रींनी आरोप केले होते. त्याचे पुनःस्थापन करण्यावे प्रयत्न चालू आहेत. या प्रयत्नांची सुरुवात तमन्ना भाटियापासून झाली. चंकी पांडेनेही त्याला 'क्लीन चिट' दिली. जाॅन अब्राहम साजिद खानच्या एका चित्रपटाची निर्मिती करीत आहे.

सुभाष घई हे जॅकी श्राॅफ आणि अनिल कपूर यांच्याबरोबर 'रामचंद किशनचंद' नावाचा चित्रपट बनवत आहेत.

कैलाश खेर हे सरकारी कार्यक्रमांतून गाणी गात आहेत.

राजकुमार हिरानी 'मुन्नाभाई' मालिकेला तिसरा चित्रपट बनवण्यात दंग आहेत.

बाकी आरोपींचे वकील रेंगाळत चाललेल्या कोर्टांच्या कारवायांनंतर आरोपींची सोडवणूक करण्याच्या बेतात आहेत.

'मी टू' मोहीम सुरू करणाऱ्या महिलेवरच खटला

[संपादन]
  • लैंगिक शोषणाला वाचा फोडण्यासाठी जगभरात सुरू असलेली 'मी-टू' (#me too) ही मोहीम फ्रान्समध्ये सुरू करणं सॅंड्रा म्युलर या पत्रकार महिलेला महागात पडलं आहे.
  • या प्रकरणी एका व्यक्तीनं सॅंड्रा म्युलर या पत्रकार महिलेवर मानहानीचा खटला दाखल केला आहे.
  • तक्रारकर्त्यानं तिच्याकडं ५० हजार युरोंच्या नुकसानभरपाईचीही मागणी केली आहे.[]
  • म्युलर हिनं गेल्या वर्षी १३ ऑक्टोबरला #balancetonporc असं लिहून एक ट्वीट केलं होतं. वृत्तवाहिनीत तिच्यासोबत काम करणाऱ्या एरिक ब्रायन या सहकाऱ्यावर तिनं या ट्विटद्वारे काही आरोप केले होते.
  • एरिकनं याबद्दल आपली जाहीर माफी मागितल्याचंही तिनं ट्विटमध्ये म्हटलं होतं. तिच्या ट्विटनंतर एरिकनं एका वृत्तपत्रात लेख लिहून म्युलरचे आरोप मान्य केले होते.
  • म्युलरनंही ही लढाई अखेरपर्यंत लढण्याची तयारी केली आहे. या खटल्यामुळं लैंगिक अत्याचाराचा मुद्दा ऐरणीवर येईल. अशा प्रकारांचा सामना कसा करायचा, यावर व्यापक चर्चा झडेल, अशी आशा तिनं व्यक्त केली आहे. लैंगिक अत्याचारावर सडेतोड मत मांडल्याबद्दल 'टाइम्स' मासिकानं तिचा 'सायलेन्स ब्रेकर' म्हणून गौरव केला होता. तसंच, तिचा समावेश २०१७ च्या 'पर्सन ऑफ द इअर'च्या यादीत केला होता.[]

'मी टू' पासून 'यू टू?' पर्यंत

[संपादन]
  • बिल कॉस्बी हे नाव तसं जगभर प्रसिद्ध आहे. हॉलिवूड आणि अमेरिकन टेलीव्हिजनवर दीर्घकाळ छाप असलेला एक प्रतिभावंत कॉमेडियन म्हणून कॉस्बीची ख्याती सर्वत्र आहे.
  • आपल्या पदाचा गैरवापर करून फसवणुकीने अंमली पदार्थ सेवन करायला लावून त्याने बलात्कार केल्याच्या तक्रारी अनेक महिलांनी कॉस्बीच्या विरोधात केल्या होत्या आणि त्यातील तीन प्रकरणांची सुनावणी पूर्ण होऊन न्यायालयाने कॉस्बीला प्रत्येक गुन्ह्यापोटी दहा-दहा वर्षांची, म्हणजे जवळपास तीस वर्षे कारागृहाची शिक्षा सुनावली आहे.
  • गेली अनेक वर्षे एकेक करत धीर गोळा करून उभ्या राहिलेल्या महिलांना उशिरा का होईना, पण न्याय मिळाल्याची भावना आहे,तर कॉस्बीच्या वकिलांनी अर्थातच वरिष्ठ न्यायालयात अपिलात जाण्याचे सूतोवाच केले आहे.
  • कॉस्बी ही खरंतर कोणी व्यक्ती नव्हे, ती प्रवृत्ती आहे सुद्धा धारणा कॉस्बीविरोधात दाखल झालेल्या तक्रारींचे तपशील पाहून पक्की होत जाते. कॉस्बीच्या या विकृत धटिंगणशाहीला प्रथम आव्हान दिले, ते फिलाडेल्फियाच्या अँड्रिया कॉन्स्टॅंड या टेम्पल युनिव्हर्सिटीच्या बास्केटबॉल टीमची संयोजक असलेल्या कर्मचारी महिलेने. ती स्वतः एकेकाळी स्टार ॲथलिट होती.
  • क्रीडाविषयक कार्यासाठी कॉस्बीकडून मोठ्या आदर व विश्वासाने मदत व मार्गदर्शन घेण्यासाठी त्याला अधुनमधून भेटणाऱ्या अँड्रियावर झालेल्या बळजबरीतून तिला बाहेर पडायला काही काळ जावा लागला. मात्र नंतर ती निर्धाराने उभी राहिली. खालच्या कोर्टात अक्षरशः गाळात गेलेला खटला तिने जिद्दीने वरच्या कोर्टापर्यंत खेचला.[१०]
  • अँड्रियाच्या म्हणण्याला दुजोरा देण्यासाठी गेले दशकभर चाललेली 'मी टू' (# Me too movement) मोहीम ही हॉलिवूडच्या अनेक प्रख्यात अभिनेत्री, अमेरिकन टेलीव्हिजनवरील लोकप्रिय महिला ॲंकर आणि समाजातल्या प्रतिष्ठित महिलांच्या पुढाकाराने चाललेली वर्तमानातील अतिशय महत्त्वाची मोहीम ठरली. हा हॅश टॅग जणू स्त्रीसन्मानाच्या संघर्षाची खूण बनला.
  • जाहीर कार्यक्रमांत, टेलीव्हिजन शोमध्ये या निमित्ताने हॉलिवूड आणि अन्य क्षेत्रांतीलही कास्टिंग काऊचला वाचा फुटली. अंगी कर्तृत्त्व आणि प्रतिभा असूनही 'बाईपणा'ची किंमत चुकवणे, आपणच किंमत चुकवलेली असूनही मानहानीच्या किंवा पुढे जाण्याच्या संधी कायमच्या हुकतील या भीतीपोटी गप्प बसणाऱ्यांत अगदी नामवंत महिलांचाही समावेश असतो आणि तोही प्रगत आणि उदारमतवादी समजल्या जाणाऱ्या अमेरिकन समाजात, ही कटु वस्तुस्थिती संघर्षाच्या वास्तवात बदलणाऱ्या या मोहिमेने ज्यांच्या वाट्याला असे घृणास्पद अपमान आले, अशा स्त्रियांना 'मीही बळी ठरले होते' असे जाहीर बोलण्याचे बळ देते झाले. * अँड्रियाच्या लढ्यामागे उभे राहत जवळपास ६० महिलांनी आपल्या तक्रारी नोंदवल्या, तेव्हा झगमगाटी आणि प्रतिष्ठित आवरणाखाली चालणाऱ्या या लैंगिक शोषणाने किती व्यापक प्रमाणावर आणि खोलवर हातपाय पसरलेत आणि ते किती बेगुमान आहे हेच उघड झाले. अनेकांची नावे पाहून तर 'यू टू?' असे आश्चर्योद्गार बाहेर पडले.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Harvey Weinstein Paid Off Sexual Harassment Accusers for Decades" (इंग्रजी भाषेत). 2018-10-22 रोजी पाहिले.
  2. ^ "Harvey Weinstein". IMDb. 2018-10-22 रोजी पाहिले.
  3. ^ "Amazon TV Producer Goes Public With Harassment Claim Against Top Exec Roy Price (Exclusive)". The Hollywood Reporter (इंग्रजी भाषेत). 2018-10-22 रोजी पाहिले.
  4. ^ Ohlheiser, Abby. "Meet the woman who coined 'Me Too' 10 years ago — to help women of color". chicagotribune.com (इंग्रजी भाषेत). 2018-10-22 रोजी पाहिले.
  5. ^ "The Woman Who Created #MeToo Long Before Hashtags" (इंग्रजी भाषेत). 2018-10-22 रोजी पाहिले.
  6. ^ "Vinta Nanda files police complaint against Alok Nath". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2018-10-18. 2018-10-22 रोजी पाहिले.
  7. ^ Patel, Tushita. "MJ Akbar, stop with the lying. You sexually harassed me too. Your threats will not silence us". Scroll.in (इंग्रजी भाषेत). 2018-10-22 रोजी पाहिले.
  8. ^ Szpiner, Francis. "Woman behind 'French #MeToo' found guilty of defaming media executive". lawyer (इंग्रजी भाषेत). 2018-10-22 रोजी पाहिले.
  9. ^ Chrisafis, Angelique. "Woman behind 'French #MeToo' found guilty of defaming media executive". is the Guardian's Paris correspondent. (इंग्रजी भाषेत). 2019-09-25 रोजी पाहिले.
  10. ^ Schonberg, Harold C. "For City Hall, #MeToo Becomes #YouToo - The New York Times". The Editorial Board (इंग्रजी भाषेत). 2018-04-27 रोजी पाहिले.