मी टू मोहीम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

मी टू ही चळवळ कोणत्याही अर्थात सर्व क्षेत्रांत, कार्यालयीन वातावरणात अथवा कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक अत्याचाराविरोधात प्रथम ट्विटरद्वारे #मीटू असा हॅशटॅग वापरून, आवाज उठवण्यासाठी सुरू झालेली मोहीम आहे.


मी टू मोहिमेची सुरुवात[संपादन]

५ ऑक्टोबर २०१७ रोजी न्यूयॉर्क टाइम्स या वृत्तपत्रात ॲशले जड (Ashley Judd) या अभिनेत्रीची मुलाखत प्रसिद्ध झाली. ॲशलेने प्रसिद्ध चित्रपट निर्माता हार्वे वेनस्टेईन यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले.[१] . हार्वे वेनस्टेईन यांनी पल्प फिक्शन, गुड विल हंटिंग, शेक्सपियर इन लव्ह अशा सुमारे सहा ऑस्कर पारितोषिक प्राप्त चित्रपटांची निर्मिती केली आहे.[२]. न्यूयॉर्क टाइम्सने केलेल्या अधिक चौकशीत अनेक अभिनेत्री तसेच हार्वे याच्या मीरामॅक्स कंपनीतील कर्मचारी स्त्रियांनी अशा अनेक घटना कथित केल्या. वृत्तपत्रात आलेल्या या बातम्यांमुळे हार्वे याची त्याच्या द वेनस्टेइन कंपनी मधून संचालक मंडळाने हकालपट्टी केली.

१२ ऑक्टोबर २०१७ रोजी इसा हॅकेट या दूरदर्शन निर्मातीने ॲमेझॉन स्टुडिओचे प्रमुख रॉय प्राईस यांच्यावर लैंगिक छळवणुकीचे आरोप केले. प्राईस यांनी केलेल्या छळाबद्दल केलेली तक्रार ॲमेझॉन स्टुडिओच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुर्लक्षित केली असाही आरोप इसा यांनी केला. या मुलाखतीमुळे रॉय प्राईस यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. [३]

१६ ऑक्टोबर २०१७ रोजी अलिसा मिलानो या अभिनेत्रीने ट्विटर या संकेतस्थळावर #MeToo हा हॅशटॅग वापरून तिने हॉलीवूड चित्रपट सृष्टीमध्ये होणाऱ्या लैंगिक शोषणाविरुद्ध वाचा फोडली. जर तुम्हालाही असा अनुभव आला असेल तर मी टू हा हॅशटॅग वापरा असे तिने आवाहन केल्यावर, एका दिवसात सुमारे ४०००० लोकांनी, ज्यात बहुतांश स्त्रिया होत्या, #MeToo हा हॅशटॅग वापरला. [४] या नंतर अनेक अभिनेत्री आणि सामान्य स्त्रियांनी #मीटू वापरून आपल्यावर झालेल्या लैंगिक शोषणाच्या कहाण्या सांगितल्या तसेच न्याय मागितला.

१८ ऑक्टोबर २०१७ ला ऑलिम्पिक जिमनॅस्टीक खेळाडू मॅकायला मरोनी हिने अमेरिकन जिम्नॅस्टिक्स टीमचे डॉक्टर लॅरी नास्सर यांच्या विरुद्ध लैंगिक शोषणाला वाचा फोडली. जवळपास ३० वर्षाहून अधिक काळ टीमचे डॉक्टर असंरे नास्सर सध्या बालकांच्या लैंगिक शोषणा संदर्भातील एका खटल्यात कारागृहात आहेत.

२९ ऑक्टोबर २०१७ रोजी ॲन्थोनी रॅप याने केव्हिन स्पेसी या ऑस्कर पारितोषिकप्राप्त अभिनेत्याविरुद्ध शोषणाचे आरोप केले. या नन्तर अनेक स्त्री तसेच बाल कलाकारांनी असेच आरोप केले आणि स्पेसी विरुद्ध जनमत तयार झाले.

यानन्तर अनेक व्यवसायातील बड्या धेंडानी केलेल्या लैंगिक शोषणाचा बळी ठरलेल्या स्त्री पुरुषांनी आवाज उठवला आणि अनेक प्रकरणात स्टुडीओ आणि कंपन्यांना अशा लोकांविरुद्ध कारवाई करावी लागली.

मी टू ची निर्माती[संपादन]

ट्विटर संकेत स्थळावर जरी आलीस मिलानो हिने #मी टू चा वापर प्रचलित केला असला तरी हे शब्द लैंगिक शोषणासंदर्भात वापरण्याचे श्रेय तराना बर्क या स्त्री हक्क कार्यकर्तीला जाते. १९९७ साली एका तेरा वर्षाच्या लैंगिक शोषणाची शिकार बनलेल्या मुलीशी त्या बोलत होत्या. "तिला कसा प्रतिसाद द्यावा हेच मला सुचत नव्हते. 'मी सुद्धा ' अशा अत्याचाराची शिकार आहे हे सुद्धा मी तिला सांगू शकले नाही. अनेक वर्ष हा प्रसंग माझ्या मनात घर करून राहिला."

या संभाषणानंतर १० वर्षांनी तराना बर्क यांनी 'जस्ट बी' या ना-नफा संस्थेची स्थापना केली. लैंगिक अत्याचाराची आणि हिंसेची शिकार बनलेल्या स्त्रियांच्या मदतीसाठी ही संस्था काम करते. तराना यांनी या चळवळीला नाव दिले "मी टू".[५]

भारतामध्ये मी टू मोहीम[संपादन]

सप्टेंबर २०१८ मध्ये अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने झूम टी व्ही या दूरचित्रवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले. २००९ मध्ये हॉर्न ओके प्लीज या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी नाना पाटेकर यांनी असभ्य वर्तन करून त्रास दिल्याचा आरोप तनुश्री दत्ता हिने केला. या आरोपानंतर भारतातील अनेक क्षेत्रात काम करणार्‍या महिलांनी त्यांच्या विरुद्ध झालेल्या लैंगिक शोषणाच्या कहाण्या जाहीर करण्यासा सुरुवात केली.

आलोकनाथ या चरित्र अभिनेत्याविरुद्ध त्यांच्या एका चित्रपटाच्या निर्मातीने, विनता नंदा यांनी बलात्काराचे आरोप केले आहेत[६]. ही घटना सुमारे १९ वर्षापूर्वी झाली होती.

भारताचे परराष्ट्र राज्यमंत्री व प्रख्यात पत्रकार एम. जे. अकबर यांच्याही विरुद्ध तुशिता पटेल या पत्रकार महिलेने असे आरोप केल्यावर अनेक इतरही महिला पत्रकार पुढे आल्या.[७]. आरोपांच्या या गदारोळात एम. जे. यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा १७ ऑक्टोबर २०१८ रोजी दिला.

विनोद दुवा या ज्येष्ठ पत्रकाराविरुद्धही अशाच प्रकारचे आरोप केले गेले आहेत.

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Harvey Weinstein Paid Off Sexual Harassment Accusers for Decades" (en मजकूर). 2018-10-22 रोजी पाहिले. 
  2. ^ "Harvey Weinstein". IMDb. 2018-10-22 रोजी पाहिले. 
  3. ^ "Amazon TV Producer Goes Public With Harassment Claim Against Top Exec Roy Price (Exclusive)". The Hollywood Reporter (en मजकूर). 2018-10-22 रोजी पाहिले. 
  4. ^ Ohlheiser, Abby. "Meet the woman who coined 'Me Too' 10 years ago — to help women of color". chicagotribune.com (en-US मजकूर). 2018-10-22 रोजी पाहिले. 
  5. ^ "The Woman Who Created #MeToo Long Before Hashtags" (en मजकूर). 2018-10-22 रोजी पाहिले. 
  6. ^ "Vinta Nanda files police complaint against Alok Nath". The Indian Express (en-US मजकूर). 2018-10-18. 2018-10-22 रोजी पाहिले. 
  7. ^ Patel, Tushita. "MJ Akbar, stop with the lying. You sexually harassed me too. Your threats will not silence us". Scroll.in (en-US मजकूर). 2018-10-22 रोजी पाहिले.