Jump to content

संततिनियमन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(संततीनियमन या पानावरून पुनर्निर्देशित)

संततिनियमन म्हणजे गर्भधारणा टाळणे.

भारतातील संतति नियमन आवश्यकता

[संपादन]
मुख्य पान: कुटुंबनियोजन

भारतीय लोकसंख्येचा विचार केला तर लोकसंख्या स्फोट, वाढती महागाई आणि अपुरी साधनसंपत्ती यामुळे एकत्र कुटुंब पद्धती हळू हळू नाहिशी होत आहे. लहान कुटुंबामध्ये एक किंवा दोन मुलांचा सांभाळ दांपत्य करू शकते. संततिनियमन केल्याने दोन अपत्यामध्ये पुरेसे अंतर ठवणे आणि आर्थिक स्तिति सुधारली म्हणजे इच्छित वेळी मूल होऊ देण्याकडे विवाहित जोडप्यांचा कल वाढतो आहे.

संततिनियमनाचे फायदे

[संपादन]

केल्याने गर्भधारणेची भीति शिल्लक रहात नाही. संततिनियमनाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे अकारण गर्भपातास तोंड द्यावे लागत नाही. संततिनियमनामुळे दोन मुलामध्ये हवे ते अंतर ठेवून दोन्ही मुलाना स्वतंत्रपणे आपल्या सोयीनुसार वाढण्याची संधी देता येते. स्त्रीच्या आरोग्यास बाधा येत नाही. जगभरात आता नियोजनपूर्वक मूल जन्मास घालण्याचा पुरस्कार सुशिक्षित स्त्रियामध्ये केला जात आहे. भारतातील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये निरोगी आणि पुरेशा अंतराने मूल जन्मास घालण्यासाठी दांपत्याना कुटुंबनियोजन सल्ला आणि साधने मोफत उपलब्ध करून दिली जातात. प्रौढ जोडप्यामध्ये सुरक्षित शरीरसंबंध,पत्नीवर मातृत्व न लादणे व लैंगिक रोगापासून बचाव ही कुटुंबनियोजनाची त्रिसूत्री आहे.

संततिनियमन हे जोडप्यामधील कोणत्याही एकाने पुरेशी काळजी घेतली तरी साध्य होणारी गोष्ट आहे.

पुरुषासाठी संततिनियमन उपाय

[संपादन]

ब्रम्हचर्य, निरोध, शुक्रवाहिनीची शस्त्रक्रिया, शरीरसंबंध खंडित करणे व शुक्राणू निरोधक जेली किंवा क्रीम वापरणे यांचा पुरुष संततिनियमन उपायात समावेश होतो. भारतीय पद्धतीमध्ये विवाहपूर्व काळात ब्रम्हचर्याची पुरस्कार केलेला आहे. पण विवाहोत्तर ब्रम्हचर्य पाळणे हे प्रत्येकाच्या मानसिकतेवर अवलंबून आहे. त्याऐवजी आधुनिक काळात नैसर्गिक (लॅटेक्स)रबरापासून बनवलेले निरोध हे प्रभावी संततिनियमनाचे साधन प्रचारात आहे. शरीरसंबंधाआधी उत्थापित शिस्नावर निरोध उलगडून बसवावे लागते. निरोधच्या पुढील बाजूस असलेल्या एका लहान फुग्यासारख्या पोकळीत वीर्य साठते.वीर्यातील शुक्राणूंचा अंडपेशीशी संपर्क येत नाही त्यामुळे फलन/निषेचन होत नाही. शरीरसंबंधानंतर निरोध काढताना वीर्य स्त्री जननेंद्रियामध्ये न पडण्याची काळजी घ्यावी लागते. शरीरसंबंध चालू असता अपघाताने निरोध फाटले तर संततिनियमनासाठी इतर पद्धत त्वरित वापरावी म्हणजे गर्भधारणा टळते.

निरोध वापरताना शुक्राणू प्रतिबंधक जेली किंवा क्रीम वापरले तर अपघाताने निरोध फाटून होणाऱ्या गर्भधारणेचा धोका टळतो. निरोध आणि शुक्राणू प्रतिबंधक जेली एकाच वेळी वापरल्यास 90 ते 98% परिणामकारक ठरते. प्रत्येक वेळी निरोध वापरताना क्वचित एकदा निरोध न वापरण्याने गर्भधारणेचा धोका मात्र वाढतो. निरोध वापरल्याने कर्करोग होत नाही. सध्या स्त्रियानी वापरता येतील असे निरोध उपलब्ध आहेत.यास फेमिडोम असे म्हणतात. शरीरविक्रय करणाऱ्या स्त्रियाना लैंगिक रोगापासून मुक्त ठेवण्यासाठी हे उपयुक्त साधन आहे.

पुरुषांचे कायमचे संततिनियमन करावयाचे असल्यास रेतोवाहिन्या (व्हास डेफरन्स) शस्त्रक्रियेने बंद करता येते. यास नसबंदी हे प्रचलित नाव आहे. वृषणातून बाहेर येणा-या रेतोवाहिन्या जांघेच्या त्वचेजवळ पृष्ठ्भागाजवळ आलेल्या असतात. दोन्ही वृषणातून आलेल्या रेतोवाहिन्या शस्त्रक्रियेने कापून त्यामध्ये एक सेमी अंतर ठेवून बांधून टाकतात. रेतोवाहिन्यामध्ये शुक्राणू सहा महिन्यापर्यंत निषेचनक्षम रहातात. त्यामुळे नसबंदी झाल्यानंतर सहा महिन्यापर्यंत इतर संततिनियमनाची साधने वापरण्याचा सल्ला दिला जातो. स्त्री नसबंदीपेक्षा पुरुष नसबंदी सोपी आणि परिणामकारक आहे. पुरुष नसबंदीनंतर नेहमीची कामे करण्यास कोणताही अडथळा येत नाही. रुग्णालयात स्थानिक वेदनानाशकाच्या प्रभावाखाली केवळ वीस ते तीस मिनिटात ही शस्त्रक्रिया बहुतेक सर्व ग्रामीण रुग्णालयात केली जाते.

स्त्रियांसाठी संततिनियमन उपाय

[संपादन]

शुक्राणू आणि अंड वाहिनीमधील अंड निषेचनासाठी एकत्र न येऊ देणे हा संततिनियमनाचा मुख्य हेतू आहे. गर्भाशयमुखावर बसणा-या डायफ्रॅमचा शोध या गरजेपोटी लागला. नैसर्गिक रबरापासून बनविलेले डायफ्रॅम 50-105 मिमि एवढ्या आकाराचे उपलब्ध आहेत. वैद्यकीय अधिकारी गर्भाशय मुखाच्या आकारावरून योग्य त्या आकाराचा डायफ्रॅम सुचवू शकतो. डायफ़्रॅम गर्भाशयमुखावर बसवावा लागतो. बसवण्याच्या आधी त्यावर शुक्राणू रोधक जेली लावल्यास गर्भ राहण्यापासून अतिरिक्त संरक्षण मिळते. सध्या उपलब्ध असलेल्या संततिनियमनाच्या उपायातील सर्वात स्वस्त उपाय म्हणजे गर्भनिरोधक गोळ्या. या गोळ्यामध्ये प्रोजेस्टेरॉनचे थोडे अधिक प्रमाण असल्याने अंडविमोचन होत नाही. अंडविमोचन झाल्यास गर्भाशयामध्ये रोपण होत नाही. मासिक पाळी व्यवस्थित होते. गोळ्यांचे पाकीट तीस दिवसांचे असते. यामध्ये फक्त बावीस गोळ्या संप्रेरकाच्या असतात. आठ गोळ्या समाधानक (प्लॅसीबो) द्रव्याच्या – ग्लूकोज किंवा लोहाच्या असतात. मासिक पाळीच्या शेवटच्या दिवसापासून तीन आठवडे संप्रेरक असलेली गोळी दररोज ठराविक वेळी घेण्याचा सल्ला दिला जातो. शेवटच्या आठवड्यात लोहाची गोळी आठवडाभर घ्यायची म्हणजे दररोज गोळी घ्यायची याची आठवण होते. शरीरसंबंध झाला नाही म्हणून गोळी न घेतल्यास गर्भधारणेचा धोका वाढतो.

गोळ्या न घेता दोन मुलांच्यामध्ये अंतर ठेवायचे असल्यास गर्भाशयामध्ये तात्पुरते बसवण्याचे एक शरीरावर परिणाम न होणारे एक साधन बसवता येते. भारतात यास तांबी (कॉपर टी) असे म्हणतात. इंग्रजी टी या आकाराचे हे साधन मासिक पाळीनंतर गर्भाशयमुखातून गर्भाशयामध्ये बसवतात. ‘टी’ आकाराच्या दांडीस 200 मिग्रॅ. तांब्याच्या तारेचे वेटोळे असते. तांबी बसवल्याने गर्भाशयामध्ये बीजांडरोपण होत नाही. आणि गर्भधारणा टळते. याची परिणामकारकता 98% आहे. दुसऱ्या संततिनियमनाच्या साधनाची आवश्यकता नाही. तांबीच्या गर्भाशय बाह्य टोकास एक नायलॉनचा धागा असतो. जोडप्यास मूल व्हावे असे वाटल्यास गर्भाशयाबाहेर असलेला नायलॉनचा धागा ओढून तांबी बाहेर काढता येते. यानंतर परत गर्भधारणा होते. गर्भधारणा खंडित करण्याचा हा सोपा आणि सुरक्षित उपाय आहे. तीन वर्षानंतर तांबी काढून काहीं महिन्यानंतर दुसरी बसवण्याचा सल्ला दिला जातो.

एक किंवा दोन मुले झाल्यानंतर स्त्रीस मूल नको असेल तर अंडवाहिनी बंद करण्याची शस्त्रक्रिया करून घेता येते. पूर्वी यासाठी पोटावर मोठा छेद घ्यावा लागतअसे. आता दुर्बिणीतून एक सेमी छेदामधून अंडवाहिन्या बंद करण्याची शस्त्रक्रिया करून घेता येते.या तंत्राला स्त्री नसबंदी ‘लॅप्रोस्कोपी’ असे म्हणतात. अशा शस्त्रक्रियेनंतर अंड गर्भाशयापर्यंत पोहोचू शकत नाही. इतर संततिनियमनाची साधने वापरावी लागत नाहीत.

जगभर सुरक्षित परिणामकारण,पार्श्व परीणाम नसणारी सुलभ संततिनियमनाची साधने शोधण्यावर सारखे संशोधन होत आहे. शरीरात बसवता येईल आणि पुरुष किंवा स्त्रियाना संततिनियमनासाठी उपयोगी पडतील अशी अंतक्षेपणे किंवा त्वचेखाली बसवता येतील अशी उपकरणे पाश्चिमात्य बाजारात उपलब्ध झालेली आहेत. ती भारतीय उपखंडात प्रचलित नाहीत.

संदर्भ

[संपादन]

मासिक पाळीची सर्व माहिती Archived 2020-04-22 at the Wayback Machine. https://marathidoctor.com/masik-pali-मासिक-पाळी-ची-सर्व-माहित.html/ Archived 2020-04-22 at the Wayback Machine.