विटाळ
मासिक पाळीबद्दल अंधश्रद्धा[permanent dead link]
कुरमा
[संपादन]गडचिरोली जिल्ह्यात गोंड आदिवासी आणि त्याच्या काही उपजातींमध्ये कुरम्या'सारखी प्रथा मात्र अद्याप टिकून आहे. कुरमा म्हणजे पालापाचोळ्याची वस्तीबाहेर बांधलेली झोपडी. मासिक पाळीच्या काळात प्रत्येक महिलेने या कुरम्यांत राहावे, अशी ही प्रथा आणि तसा दंडकही.[१]
चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात गोंड समाज आणि त्याच्या उपजाती असलेल्या माडियासारख्या जातींमध्ये वर्षानुवर्षे ही प्रथा आहे. काळानुसार तिच्यात थोडाफार बदल होत असला, तरी मूळ प्रथा कायम ठेवण्याकडे समाजाचा कल आहे. महिलेची मासिक पाळी सुरू झाल्यानंतर चार-पाच दिवस तिला कुरम्यांत मुक्काम करण्यासाठी पाठवले जाते. या काळात ती कुटुंबातल्या कुणाला स्पर्श करत नाही. तसे झाल्यास तो विटाळ मानला जातो. या कालावधीत कुरम्यांत राहणाऱ्या महिलेला तिच्या कुटुंबातील सदस्य स्पर्श न करता बाहेरून अन्न-पाणी पुरवतात. या काळात तिचा व समूहाचा संपर्क तोडला जातो.
पूर्वी पालापाचोळा गोळा करून आणि श्रमदान करून कुरमा उभारला जात असे. पाड्यालगतच तो असतो. उन्हा-पावसापासून, थंडीपासून संरक्षण होणेही कठीण बनत असे. आता त्यात सुधारणा होत आहे. लोकसंख्या वाढल्याने कुरम्यांची संख्याही वाढते आहे. शासकीय मदत घेऊन, ग्रामसभेत तसा ठराव आणून बांधकामाचे कुरमे उभे करण्याचे प्रयत्नही काही काही ठिकाणी सुरू आहेत.
कुरम्यात राहण्याविषयी महिलांची तक्रार सहसा दिसत नाही. कुरमा चांगला असावा, साप-विंचू व वन्यप्राण्यांचा त्रास होऊ नये, अशी त्यांची इच्छा आहे.
संस्कृतीचा एक भाग म्हणून पाळली जात असलेली किंवा पाळण्यास भाग पाडली जात असलेली ही प्रथा बंद होणार की नाही आणि त्यासाठी कोण पुढे येणार, हा प्रश्न आहे. असे प्रयत्न या समाजात अद्याप तरी पाहावयास मिळत नाहीत.
समर्थन आणि टीका
[संपादन]कुरमा म्हणजे विटाळ नव्हे, तर विहार आहे, असे आधुनिक विश्लेषणही काही मंडळी करू लागली आहेत. कष्टापासून, नेहमीच्या रहाडग्यापासून ती निवांतपणे चार-सहा दिवस स्वतंत्र राहते. यात वाईट काय आहे, असे प्रतिप्रश्नही विचारले जातात. पण, मासिक पाळीचे वय संपल्यावर अशा आरामाची व्यवस्था महिलांसाठी आहे का, यावर कुणाकडेच उत्तर नसते. बऱ्याच वेळेला एका कुरमात अनेक महिला असतात. कुरम्यातील वातावरण तसे आरोग्यदायी नसते. कुरम्यात एखादी महिला गंभीर आजारी पडली की पूर्वी वैदू तेथे जाऊन दुरून उपचार करायचा. आता दवाखान्यात नेण्याचा प्रयत्न होतो. काही ठिकाणी कुरम्यात राहणारी महिला या विजनवासात आजूबाजूच्या विहिरी, नदी, नाल्यांनाही स्पर्श करीत नाही. जेव्हा केव्हा ही प्रथा सुरू झाली असेल, तेव्हा "विटाळ' हेच कारण प्रमुख असावे आणि नंतर आरामाचे कारण जोडले असावे, असे मानले जाते.