Jump to content

बंदे मातरम (वृत्तपत्र)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

प्रारंभ - दि.०६ ऑगस्ट १९०६ अखेर - ऑक्टोबर १९०८ [१]

बंदे मातरम (वृत्तपत्र)

२९ सप्टेंबर १९०७ च्या साप्ताहिक आवृत्तीचे मुखपृष्ठ
प्रकारसाप्ताहिक

मालकबिपिनचंद्र पाल
संस्थापक संपादकबिपिनचंद्र पाल
संपादकबिपिनचंद्र पाल
सहसंपादकश्यामसुंदर चक्रवर्ती, हेमेंद्र प्रसाद घोष, बिजॉय चटर्जी
स्थापना१९०६
राजकीय बांधिलकीराष्ट्रीय
भाषाइंग्रजी
प्रकाशन बंदऑक्टोबर १९०८
मुख्यालयकोलकाता


बंदे मातरम हे बिपिनचंद्र पाल यांनी प्रकाशित केलेले एक वर्तमान पत्र होते. इंग्लिश भाषेतील हे वर्तमान पत्र कोलकाता येथून प्रकाशित होत असे.[२]

०२ जून १९०७ पासून ते साप्ताहिक या स्वरुपात प्रकाशित होऊ लागले. [३] जून १९०७ ते सप्टेंबर १९०८ या कालावधीत ते साप्ताहिक स्वरुपात प्रकाशित होत असे. [१]

संपादक-मंडळ[संपादन]

प्रारंभी बिपिनचंद्र पाल हे या साप्ताहिकाचे संपादक होते. पण ते राजकीय दौऱ्यावर असताना श्रीअरविंद घोष यांनी या साप्ताहिकाची जबाबदारी सांभाळली होती. पुढे सह-संपादक असणाऱ्या श्यामसुंदर चक्रवर्ती आणि हेमेंद्र प्रसाद घोष यांचे बिपिनचंद्र पाल यांच्याशी मतभेद झाले आणि त्यामुळे १९०६ च्या अखेरीस पाल यांनी संपादक पदाचा राजीनामा दिला. [३]

कालावधी

बिपिनचंद्र पाल - ०६ ऑगस्ट १९०६ ते १५ ऑक्टोबर १९०६

श्रीअरविंद घोष (निनावी पद्धतीने) - २४ ऑक्टोबर १९०६ ते २७ मे १९०७) [४]

स्वातंत्र्यपूर्व काळात लाल, बाल आणि पाल ही त्रयी प्रसिद्ध होती. लाल म्हणजे पंजाबचे सिंह लाला लजपतराय, बाल म्हणजे लोकमान्य लोकमान्य बाळ गंगाधर टिळक तर पाल म्हणजे बंगालचे लेखक बिपिनचंद्र पाल. या तिघांनीही आपापल्या प्रांतात अनुक्रमे यंग इंडिया, केसरी (वृत्तपत्र) आणि 'बंदे मातरम्' ही वृत्तपत्रे चालविली. अरविंद घोष हेही मुख्य लेखक या नात्याने वंदे मातरम् मध्ये सहभागी झाले. 'बंदे मातरम्' या दैनिकाचे ते काही काळ संपादक म्हणूनही काम पाहत होते. १९०७ ते १९०८ या कालावधीमध्ये या साप्ताहिकाला अरविंद घोष संपूर्ण मार्गदर्शन करत होते, त्याचा खप भारतभरामध्ये होता. भारताच्या पुढील राजकारणावर यातील विचारसरणीचा ठसा स्पष्टपणे दिसून येतो.

धोरण[संपादन]

बंदे मातरमचे मूळ धोरण असे होते -

(१) हिंसेचा प्रतिकार हिंसेने करणे.

(२) स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आवश्यक असलेला उत्साह, चिकाटी आणि एकजूट टिकविण्यासाठी अन्यायाला विरोध करणे आवश्यक.

(३) प्रहाराच्या बदल्यात प्रहार करणे, आक्रमणाविरुद्ध उभे राहणे आणि राष्ट्रात पुरुषत्व जागृत करणे. पारतंत्र्यातील राष्ट्रासाठी हे खूप महत्त्वाचे असते.

(४) देशाचा विश्वासघात करणाऱ्या आणि बेफिकीरी बाळगणाऱ्यांना शिक्षा होणे आवश्यक असते. तशी शिक्षा झाली नाही तर या गोष्टी थांबणार नाहीत.

(५) ज्या राष्ट्राला स्वतंत्र व्हायचे आहे त्यांनी अत्याचार आणि छळ सहन करण्यास तयार असले पाहिजे. [१]

ब्रिटिश सरकारचा रोष[संपादन]

'बंदे मातरम' मधून देशप्रेमाचा आणि परकीय सत्तेच्या गुलामीविरुद्धचा संदेश दिला जात असे पण त्याची शब्दयोजना अशी असे की त्यावर कोणताही कायदेशीर आक्षेप घेणे ब्रिटिश सरकारला शक्य होत नव्हते.[५]

३० जुलै १९०७ रोजी बंदे मातरम् कार्यालयावर छापा टाकण्यात आला.[१] श्रीअरविंद यांनी सुमारे चार महिने संपादकपदाची जबाबदारी सांभाळली होती असे दिसते. परन्तु त्यांच्या नावाचा उल्लेख करण्यात येत नसे. [१] एकदाच श्रीअरविंद घोष यांचे नाव संपादक म्हणून घेण्यात आले होते पण तसे करण्यात येऊ नये अशी ताकीद नंतर त्यांनी दिली होती. [३]

'बंदे मातरम्'चे खरे संपादक कोण याचा शोध घेण्यासाठी सरकारने बिपिनचंद्र पाल यांची साक्ष काढली. आपण खरे बोललो तर अरविंद घोष यांना शिक्षा होण्याची शक्यता होती म्हणून पाल यांनी साक्षच देणे नाकारले. त्याबद्दल त्यांना सहा महिन्यांची शिक्षा झाली पण ती त्यांनी आनंदाने स्वीकारली.[६]

वास्तविक ब्रिटिश सरकार श्रीअरविंद घोष यांना अटक करू इच्छित होते. युगांतर या नियतकालिकामधील लेखाच्या भाषांतराच्या पुनर्प्रकाशानाच्या आरोपाखाली हा खटला चालविण्यात आला. श्रीअरविंद परंतु श्रीअरविंद घोष यांच्यावरील आरोप सिद्ध करता न आल्यामुळे, या वृत्तपत्राच्या मुद्रकाला - अपूर्व बोस यांना अटक करण्यात आली. [३]

योगदान[संपादन]

 • 'बंदे मातरम्'ने देशासमोर बहिष्कार, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण, निष्क्रिय प्रतिकार ही चतुःसूत्री ठेवली. समांतर सरकार स्थापन करण्याच्या आदर्शही समोर ठेवण्यात आला होता. [१]
 • निष्क्रिय प्रतिकाराचा सिद्धांत मांडणारी 'द डॉक्ट्रिन ऑफ पॅसिव्ह रेझिस्टन्स' नावाची श्रीअरविंद घोष लिखित लेखमाला यामध्ये प्रकाशित करण्यात आली होती. [१] ११ ते २३ एप्रिल १९०७ या कालावधीत या मालिकेचे सात भाग प्रकाशित झाले होते. [४]
 • बंदे मातरमच्या खटल्यामुळे श्रीअरविंद घोष प्रथमच देशाच्या राजकीय पटलावर उजेडात आले. तोपर्यंतचे त्यांचे सर्व लेखन व कार्य निनावी पद्धतीने चालत असे. [१]
 • श्रीअरविंद घोष लिखित 'पर्सियस द डिलिव्हरर' हे नाटक प्रथमच प्रकाशित करण्यात आले. प्रकाशन कालावधी - ३० जून ते १३ ऑक्टोबर १९०७ [१]
 • श्रीअरविंद घोष लिखित विदुला हे काव्य ०९ जून १९०७ मध्ये बंदे मातरम्'मध्ये 'द मदर टू हर सन' या नावाने प्रकाशित झाले.[१]
 • श्रीअरविंद घोष लिखित 'ऋषी बंकिम चंद्र' हा लेखही बंदे मातरम्' मध्येच प्रथम प्रकाशित करण्यात आला. प्रकाशन दिनांक - १६ एप्रिल १९०७ [१]

वृत्तपत्रकारितेमधील स्थान[संपादन]

स्टेटसमनचे संपादक, एस.के. रॅटक्लिफ यांनी डिसेंबर १९५० मध्ये (श्रीअरविंद यांच्या देहान्तानंतर) मँचेस्टर गार्डियनला कळविले होते की, "ते अरबिंदो घोष यांना एक क्रांतिकारी राष्ट्रवादी आणि भारतीय दैनिक पत्रकारितेमध्ये एक नवीन स्वर बनलेल्या ज्वलंत वृत्तपत्राचे संपादक" म्हणून ओळखतात. या साप्ताहिकाचे पुढे वर्णन करताना, रॅटक्लिफने लिहिले: "पूर्ण आकाराच्या हिरव्या कागदावर बंदे मातरम् सुस्पष्टपणे छापले जात असे. हे साप्ताहिक इंग्रजीमध्ये लिहिलेल्या अग्रगण्य आणि विशेष लेखांनी भरलेले असे. त्या लेखांच्या भाषेतील तिखटपणा आणि ओजस्वीपणा हा भारतीय वृत्तपत्रसृष्टीस आजवर अज्ञात होता. आपण ज्याला अतिरेकी राष्ट्रवाद म्हणत होतो त्याचा तो सर्वात प्रभावी आवाज होता.'' [३]

स्वतः बिपिनचंद्र पाल यांनी बंदे मातरम् मधील श्रीअरविंद यांच्या योगदानाविषयी सांगितले होते की, त्यांच्या लेखणीची धाडसी वृत्ती, तिची ज्वलंत विचारसरणी, स्पष्ट कल्पना, शुद्ध आणि शक्तिशाली शब्दरचना, ज्वलंत व्यंग्ये आणि शुद्ध विनोदबुद्धी यांची बरोबरी देशातील कोणत्याही भारतीय किंवा अँग्लो-इंडियन दैनिकाला करता आली नाही.[३]

या साप्ताहिकामधील दीर्घ उतारे टाईम्स ऑफ लंडनमध्ये पुनर्प्रकाशित केले जात असत.

आर्थिक बाजू[संपादन]

या साप्ताहिकाची आर्थिक बाजू नीट सांभाळता यावी या दृष्टीने 'बंदे मातरम् कंपनी' तयार करावी अशी सूचना श्रीअरविंद घोष यांनी केली आणि त्यानुसार दि. १३ ऑक्टोबर १९०६ रोजी ही कंपनी स्थापन झाली. [३] [१]

जोपर्यंत श्रीअरविंद सक्रियपणे कार्यरत होते तोपर्यंत त्यांनी पेपर चालवण्यासाठी पुरेसा सार्वजनिक पाठिंबा मिळवून दिला होता पण पुढे जेव्हा त्यांना अलीपूर बॉम्बकेस प्रकरणात अटक करण्यात आली आणि एक वर्ष तुरुंगात ठेवण्यात आले, तेव्हा बंदे मातरमची आर्थिक परिस्थिती खालावली. साप्ताहिक आर्थिक कारणाने बंद करण्याची नामुष्की पत्करण्याऐवजी वीरमरण स्वीकारावे अशी भूमिका इतर संपादकांनी घेतली. ज्यासाठी सरकार निश्चितपणे पेपरचे प्रकाशन थांबवेल असा एखादा प्रक्षोभक लेख लिहिण्याची जबाबदारी बेजॉय चॅटर्जी यांना देण्यात आली. युक्ती यशस्वी झाली आणि श्रीअरविंदांच्या अनुपस्थितीत बंदे मातरमचे जीवन संपुष्टात आले. [१]

संदर्भ[संपादन]

 1. ^ a b c d e f g h i j k l m A.B.Purani (2013). Life of Sri Aurobindo (5th ed.). Pondicherry: Sri Aurobindo Ashram Publication Department. ISBN 978-9352100521.
 2. ^ "'Bande Mataram' English Newspaper - Sri Aurobindo (1906-1910)". Sri Aurobindo Institute of Culture (इंग्रजी भाषेत).
 3. ^ a b c d e f g K.R.Srinivasa Iyengar (1945). Sri Aurobindo - A biography and a history (5th ed. 2006 ed.). Pondicherry: Sri Aurobindo International Centre of Education. ISBN 81-7058-813-8.
 4. ^ a b Sri Aurobindo (2002). THE COMPLETE WORKS OF SRI AUROBINDO. 06 and 07. Pondicherry: Sri Aurobindo Ashram Publication Department.
 5. ^ A.B.Purani (1959). Evening Talks with Sri Aurobindo. Pondicherry: Sri Aurobindo Ashram Trust. p. 550. ISBN 81-7060-093-6.
 6. ^ स्फूर्तिकथा - लेखक व संकलक भा.द.लिमये आणि विमल भिडे, श्रीअरविंद आश्रम प्रकाशन