Jump to content

फायब्रॉइड्‌स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

फायब्रॉइड्‌स म्हणजे काय

[संपादन]
डोळ्याच्या पापणीत तयार झालेली फायब्रॉइड्

फायब्रॉइड्‌स म्हणजे शरीरातल्या संयोजी उतकांमधील तंतुमय पेशींची होणारी अतिरिक्त बिगर कर्करोग प्रकारची वाढ होय. या उतकांतील वाढीमुळे अवयवाबाहेर किंवा अवयवात सामान्यतः गोळी सारखी दिसणारी वाढ दिसून येते. शरीरातील विविध अवयवांमध्ये ही वाढ होणे संभवनीय असते. गर्भाशयातील गाठी (युटेरिन फायब्रॉइड्‌स) म्हणजे गर्भाशयाच्या भिंतींमध्ये होणारी स्नायू, पेशी व इतर ऊतींची वाढ असते. फायब्रॉइड्‌सचा जरी गाठी असा उल्लेख केला असला तरी बहुतांश वेळा त्या कर्करोगाशी संबंधित नसतात. वैद्यकीय परिभाषेत फायब्रॉइड्‌सना युटेरिन लिओम्योमा(Uterine Leiomyoma) असे संबोधले जाते. फायब्रॉइड्‌सची वाढ एकेरी अथवा पुंजक्यात (समूहाने) होऊ शकते. त्या आकाराने अगदी लहान म्हणजे सफरचंदाच्या बी एवढया (एक इंचाहूनही कमी) किंवा द्राक्षाच्या फळाएवढया (आठ इंच अथवा त्याहून अधिक) मोठया असू शकतात.

फायब्रॉइड्‌सच्या अवयवात असण्यानुसार नामकरण केले जाते.
  • न्युरोफायब्रोमा (मज्जातंतुस असणारा फायब्रॉइड)
  • गर्भाशयातील गाठी (युटेरिन फायब्रॉइड्‌स)
  • डरमॅटो फायब्रोमा- त्वचेतील फायब्रॉइड्‌स
  • ॲंजिओफायब्रोमा- रक्तवाहिनीतील फायब्रॉइड्‌स

गर्भाशयातील गाठी (युटेरिन फायब्रॉइड्‌स)

[संपादन]
गर्भाशयातील गाठी (युटेरिन फायब्रॉइड्‌स)

गर्भाशयातील गाठी युटेरिन फायब्रॉइड्‌स ह्या प्रकारच्या सौम्य गाठी असणाऱ्या प्रजननक्षम महिलांचे समाजातले प्रमाण फार मोठे आहे, परंतु या गाठी होण्याची नेमकी कारणे कोणती याचा शोध अद्याप लागलेला नाही. जेव्हा त्या आपली लक्षणे दाखवू लागतात, तेव्हा त्यांसह जगणे असह्य होऊन जाते. फायब्रॉइड्‌स असणाऱ्या सर्वच स्त्रियांमध्ये अशी लक्षणे आढळत नाहीत, पण त्यापैकी काहींना वेदना आणि मासिक पाळीतील अतिरक्तस्राव यांना तोंड द्यावे लागते. फायब्रॉइड्‌समुळे मूत्राशयावर दाब पडून वारंवार लघवीला जावे लागण्याचा त्रासही होऊ शकतो.

गर्भाशयातील गाठी (युटेरिन फायब्रॉइड्‌स) होण्याचे शक्यता असणाऱ्या स्त्रिया

[संपादन]

फायब्रॉइड्‌सचा संभाव्य धोका कुणाला असू शकतो यावर अधिक संशोधन सुरू आहे. तरी सध्या उपलब्ध असलेल्या माहितीनुसार –

  • बहुतांश वेळा, प्रजननक्षम स्त्रियांच्या गर्भाशयाच्या भिंतींवर फायब्रॉइड्‌सची वाढ होते.
  • फायब्रॉइड्स असणाऱ्या स्त्रियांमध्ये आफ्रिकन अमेरिकन स्त्रियांचे प्रमाण इतर वंशीय स्त्रियांच्या तुलनेत जास्त आहे.
  • हा विकार असणाऱ्या आफ्रिकन अमेरिकन स्त्रियांचे वय इतर वंशीय स्त्रियांच्या तुलनेत कमी असते.
  • प्रमाणापेक्षा जास्त वजन असणाऱ्या महिलांमध्ये इतर स्त्रियांच्या तुलनेत फायब्रॉइड्‌स होण्याचा धोका किंचितसा जास्त असतो.
  • एकदा हे गर्भधारणा न झालेल्या (Nulliparous) स्त्रियांमध्ये गर्भाशयातील गाठी युटेरिन फायब्रॉइड्‌स होण्याचीशक्यता बाळंतपण होऊन गेलेल्या स्त्रियांपेक्षा होण्याचा धोका जास्त असतो.

गर्भाशयातील गाठी (युटेरिन फायब्रॉइड्‌स)चे प्रकार

[संपादन]

बहुतेकदा फायब्रॉइईड्‌सची वाढ गर्भाशयाच्या भिंतींमध्ये होते. काही फायब्रॉइड्‌स गर्भाशयाच्या पृष्ठभागावर अथवा गर्भाशयाच्या पोकळीत वाढणाऱ्या देठाच्या आधाराने वाढतात. फायब्रॉइड्‌सची वाढ होण्याच्या जागेनुसार त्यांचे तीन गटांत वर्गीकरण केले जाते.

लक्षणे

[संपादन]

बहुतेक फायब्रॉइड्‌स कोणतीच लक्षणे दाखवीत नाहीत, परंतु काही स्त्रियांमध्ये फायब्रॉइड्‌समुळे खालील लक्षणे दिसू शकतात –

  • मासिक पाळी दरम्यान अतिरक्तस्राव अथवा प्रचंड वेदना,
  • दोन मासिक पाळ्यांच्या मधल्या काळात अनियमित रक्तस्राव,
  • ओटीपोटात भरून आल्यासारखे वाटणे,
  • वारंवार लघवीला लागणे,
  • लैंगिक संबंधाच्या वेळी वेदना,
  • पाठीत खालील बाजूस वेदना,
  • प्रजननातील अडचणी

गर्भाशयाच्या फायब्रॉइड्‌सची कारणे

[संपादन]

फायब्रॉइड्‌सची नेमकी कारणे ठामपणे अजूनतरी कोणासही सापडलेली नाहीत. संशोधकांची याबाबत काही मते आहेत. मुख्यत्वेकरून, फायब्रॉइड्‌स परस्परांवर क्रिया करणाऱ्या अनेक घटकांचा एकत्रित परिणाम आहेत. हे घटक संप्रेरकांशी संबंधित (इस्ट्रोजेन पातळीचा परिणाम), आनुवंशिक (कुटुंबात चालत आलेल्या) वातावरणाचा, अथवा या तीनही घटकांचा संयोग असू शकतात. फायब्रॉइड्‌सची नेमकी कारणे कोणीच ठामपणे सांगू शकत नसल्याने आपल्यालाही त्यांचा आकार वाढण्याची / कमी होण्याची कारणे कळू शकत नाहीत. बव्हंशी फायब्रॉइड्‌सचा आकार वाढण्याची / कमी होण्याची शक्यता रजोनिवृत्तीनंतर कमी होते. परंतु फायब्रॉइड्‌स असणाऱ्या सर्वच स्त्रियांबाबत हे खरे नाही.

फायब्रॉइड्‌स बहुतेक वेळा सौम्य, अथवा कर्करोगाशी संबंधित नसतात, आणि फारच क्वचित (०.१ टक्क्यांहूनही कमी वेळा) कर्करोगात परिवर्तित होतात. फायब्रॉइड्‌स असल्याने महिलेत गर्भाशयाच्या कर्करोगाची शक्यता असेलच असे नाही.

तपासणी पद्धती

[संपादन]

एखादी स्त्री डॉक्टरांना गर्भाशय, बीजकोश (अंडाशय) व योनिमार्ग यांच्या तपासणीसाठी भेटते तेव्हाच तिला गर्भाशयाच्या फायब्रॉइड्‌स असल्याचे डॉक्टर सांगू शकतील. अनेकदा, फायब्रॉइड्‌स किती लहान अथवा मोठे आहेत ह्याचे वर्णन डॉक्टर त्यांचा आकार स्त्रीने गर्भधारणा केल्यास होणाऱ्या वाढीव गर्भाशयाच्या आकाराशी तुलना करून सांगतात.

  • सोनोग्राफी - ओटीपोटाची सोनोग्राफी करून गर्भाशयाच्या गाठीचा आकारमान व स्थान निश्चित केले जाते.
  • एमआरआय- चुंबक व रेडिओ लहरींचा चित्र घेण्यासाठी वापर करून गर्भाशयाच्या गाठीचा आकारमान व स्थान निश्चित केले जाते.
  • क्ष-किरण- शरीराच्या अंतर्भागात पाहण्यासाठी व चित्र घेण्यासाठी एक प्रकारच्या उत्सर्जनाचा वापर केला जातो.
  • सीटी स्कॅन- परिपूर्ण प्रतिमा मिळविण्यासाठी वेगवेगळ्या कोनांतून शरीराची अनेक चित्रे घेऊन गर्भाशयाच्या गाठीचा आकारमान व स्थान निश्चित केले जाते.
  • लॅप्रोस्कोपी- भूल देऊन केली जाणारी शस्त्रक्रिया, ज्यात डॉक्टर तुमच्या पोटाला बारीकसा छेद करतात आणि आत फायब्रॉईड्‌स आहेत का याची पाहणी करण्याकरिता [एंडोस्कोपी|लहानशी नळी]] सोडतात.
  • हिस्टेरोस्कोपी- या शस्त्रक्रियेत डॉक्टर आत फायब्रॉइड्‌स आहेत का याची पाहणी करण्याकरिता कॅमेरा जोडलेली एक लांब नळी योनिमार्गातून थेट गर्भाशयात सोडतात व गर्भाशयात सलाइन अथवा कार्बन डायॉक्साइड भरतात. डॉक्टरांबरोबरच रूग्णालाही गर्भाशयात फायब्रॉइड्‌सची झालेली वाढ व समस्या हिस्ट्रोस्कोपीद्वारे दाखवता येते. नंतर हिस्ट्रोस्कोप काढून टाकला जातो. हे काम १ ते दोन मिनिटांत होते. गर्भाशय अस्तराचा नमुना घेण्यासाठी प्लास्टिकची नळी वापरली जाते.

उपचार पद्धती

[संपादन]

स्त्रियांनी फायब्रॉइड्‌सवरील सर्वोत्तम उपचाराकरिता. उपचारांचा पर्याय निवडण्यास मदत करण्याकरिता ते अनेक बाबी विचारात घेतात. त्यापैकी काही बाबी खालीलप्रमाणे -

  • स्त्रिचे वय
  • फायब्रॉइड्‌सची काही लक्षणे आहेत का?
  • स्त्रीस गर्भधारणा हवी आहे काय?
  • फायब्रॉइड्‌सचा आकार
  • फायब्रॉइड्‌सचे स्थान

एखाद्या महिलेस एकाहून अधिक प्रकारचे गर्भाशय फायब्रॉइड्‌स असणे यात काही विशेष नाही. फायब्रॉइड्सचे प्रकार, याबरोबरच त्यांचे आकार व त्यांचे स्थान या बाबी उपचारांचा सर्वोत्तम पर्याय ठरविण्यासाठी विचारात घेतल्या जातात. जर एखादीला फायब्रॉइड्‌स असतील, परंतु त्यापासून काही त्रास नसेल, तर तिला कुठल्याही उपचारांची गरज नसू शकते. तिचे डॉक्टर नियमित तपासणीच्या वेळी त्यांचा आकार वाढला आहे काय याची पाहणी करतीलच.

औषधोपचार

[संपादन]
  • जर स्त्रीमध्ये युटेराइअन फायब्रॉइड्‌स असतील आणि त्यांची सौम्य लक्षणे जाणवत असतील, डॉक्टर दाह कमी करणारी आयबुप्रोफेन, किंवा अ‍ॅसिटामिनोफेन सारखी इतर वेदनाशामके औषधे सुचवू शकतात. ही सौम्य वेदनांवर वापरली जाऊ शकतात. वेदनांची तीव्रता जास्त असल्यास याहून आधिक शक्तिशाली औषधे वापरले जातात.
  • फायब्रॉइड्‌सचा इलाज करणारी इतर औषधे म्हणजे गोनॅडोट्रॉपिन रिलिजिंग हार्मोन अ‍ॅगोनिस्ट (GRHAघ्न्ह्ृा). ही औषधे फायब्रॉइड्‌सचा आकार कमी करतात. काही वेळा शस्त्रक्रिया सुलभ व्हावी म्हणून या औषधांचा वापर शस्त्रक्रियेच्या आधी फायब्रॉइड्सचा आकार कमी करण्याकरिता केला जातो.
  • या औषधांमुळे कधीकधी उष्णतेचा उद्रेक, नैराश्य, झोप न येणे, लैंगिक आवेग कमी होणे आणि सांधेदुखी होऊ शकते.
  • मिफेप्रिस्टोन या नावाने ओळखले जाणारे संप्रेरक-विरोधी औषध, हे देखिल फायब्रॉइड्सची वाढ थांबवू शकते वा वाढीचा वेग कमी करू शकते. मात्र, ही औषधे फायब्रॉइड्‌सच्या वेदनांपासून तात्पुरता आराम देतात व तुम्ही औषधोपचार थांबवले असता फायब्रॉइड्‌स वाढण्यास पुन्हा सुरुवात होते.

शस्त्रक्रिया

[संपादन]

मध्यम अथवा तीव्र स्वरूपाच्या वेदनांसह फायब्रॉइड्‌स असतील तर शस्त्रक्रिया हा त्यांच्यावरील उपचाराचा सर्वोत्तम मार्ग असू शकतो. यातील शस्त्रक्रियांचे खालील प्रकार आहेत.

मायोमेक्टोमी- गर्भाशयाच्या गाठी काढण्याची शस्त्रक्रिया

मायोमेक्टोमी

[संपादन]

गर्भाशयातील निरोगी पेशी न घेता गर्भाशयातील फायब्रॉइड्‌स काढण्याची शस्त्रक्रिया. ही शस्त्रक्रिया स्त्रीरोगशल्यविशारद (गायनक सर्जन) अनेक प्रकारे करू शकतात. ती (पोटाच्या छेदासह केली जाणारी) मोठी शस्त्रक्रिया अथवा किरकोळ स्वरूपाची शस्त्रक्रियाही असू शकते. फायब्रॉइड्‌सचा प्रकार, आकार व स्थान यावरून कोणत्या प्रकारची क्रिया करायची हे ठरविले जाते. या शस्त्रक्रिया प्रकारानुसार शल्यविशारद ठरवतात. ही शस्त्रक्रिया एंडोस्कोपी किंवा खुल्या पद्धतीने केली जाते. स्त्रीची प्रजनन क्रिया व्यवस्थित ठेवण्याकरिता गर्भाशय न काढता फक्त गाठी काढण्यात येतात.

गर्भाशय काढण्याची शस्त्रक्रिया. ही शस्त्रक्रिया गर्भाशयातील फायब्रॉइड्‌स बरे करण्याचा एकमेव खात्रीचा मार्ग आहे. जेव्हा महिलेचे फायब्रॉइड्‌स लांब असतील, किंवा तिला अतिरक्तस्राव होत असेल आणि ती रजोनिवृत्तीच्या जवळपास असेल अथवा तिची रजोनिवृत्ती उलटून गेली असेल आणि तिला अपत्यप्राप्तीची गरज नसेल अशा वेळी ही शस्त्रक्रिया केली जाते. हिस्टेरेक्टोमीचे त्यातील भेदकपणाच्या वैविध्यानुसार अनेक प्रकार आहेत. काही वेळा, जर फायब्रॉइड्‌स लांब असतील तर महिलेला अशा हिस्टेरेक्टोमीची गरज असते. या शस्त्रक्रियेत पोट छेदून गर्भाशय काढावे लागते. जर फायब्रॉइड्‌स लहान असतील तर, सर्जनला पोटाला छेद घेण्याऐवजी योनिमार्गाद्वारेही गर्भाशयापर्यंत पोचणे शक्य होते.

एन्डोमेट्रिअल अ‍ॅब्लेशन

[संपादन]

गर्भाशयच्या पोकळीत पिशवी टाकली जाते, त्यात उच्च तापमानाचा द्रव सोडला जातो. उच्च तापमानामुळे गर्भाशयातील अस्तर नाहीसे होते. गर्भाशयाच्या अंतर्भागातील अस्तर नष्ट झाल्याने अतिरक्तस्त्राव आटोक्यात आणता येतो, पण भविष्यात महिलेला अपत्यप्राप्ती होऊ शकत नाही.

मायोलिसिस

[संपादन]

या क्रियेत फायब्रॉइड्‌सना रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या नष्ट करण्यासाठी पोटावर लहानसा छेद घेऊन गर्भाशयात विद्युत्‌भारित सुई सरकवली जाते.

युटेरिन फायब्रॉइड एम्बोलायझेशन (यूएफ्ई)

[संपादन]

युटेरिन फायब्रॉईड एम्बोलायझेशन (यूएफ्ई)ने गर्भाशय व फायब्रॉइड्‌सना रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या तोडल्या जातात. असे केले की गाठींचा आकार घटतो. यूएफ्ई ही पद्धत हिस्टेरेक्टोमी व मायोमेक्टोमीला प्रभावी पर्याय ठरत आहे. बरे होण्याचा कालावधी तुलनेने कमी असून, त्या शस्त्रक्रियांमधे लागतो तसा रक्त बदलावे लागण्याचा धोकाही कमी आहे. अनेक महिला यूएफ्ई करून घेतात व त्याच दिवशी घरीही जातात. यात उपचार केल्या गेलेल्या फायब्रॉइड्‌स मध्ये संसर्ग होण्याचा किंचितसा धोका असतो, परंतु त्यावर प्रतिजैविके देऊन उपचार केले जातात. अलीकडील अभ्यासाद्वारे असे लक्षात आले आहे की यूएफ्ई पश्चात फायब्रॉइड्‌सची बहुधा पुनर्वाढ होत नाही, अर्थात याबाबत मोठ्या प्रमाणात आणि दीर्घकाल केलेल्या निरीक्षणांची गरज आहे. यूएफ्ईने सर्वच फायब्रॉइड्‌सवर उपचार केले जाऊ शकत नाहीत. फायब्रॉइड्‌स या उपचारांना योग्य तो प्रतिसाद देतील याची खात्री करून घेण्यासाठी सर्वच रुग्णांची प्रथम अल्ट्रासाउंड अथवा एमआरआय तपासणी करणे जरुरीचे आहे. डॉक्टर यूएफ्ई करण्यासाठी किरणोत्सार तज्ज्ञांना मध्यस्थ म्हणून पाचारण करतात. यूएफ्ईकरिता सर्वोत्तम उमेदवार अशा महिला आहेत, की जांना

  • फायब्रॉइड्‌स असून त्यामुळे अतिरक्तस्राव आहे.
  • फायब्रॉइड्समुळे वेदना होतात आणि/अथवा मूत्राशयावर किंवा [गुदद्वार|गुदद्वारावर]] दाब आहे.
  • हिस्टेरेक्टोमी करण्याची इच्छा नाही.
  • भविष्यात अपत्यप्राप्तीची इच्छा नाही.
काहीवेळा फायब्रॉइड्‌सचा रक्तपुरवठा थांबवण्याकरिता त्यात सोडलेले कण यूएफ्ईनंतर अंडाशयात (बीजकोश) जाऊन पोचतात. थोडया महिलांमध्ये त्यांचे अंडाशय तात्कालिक अथवा कायमस्वरूपी कार्य करणे बंद करते. यूएफ्ई कशा प्रकारे अंडाशयाच्या कार्यावर परिणाम करते हे जरी तज्ज्ञांना माहीत असले तरी, यूएफ्ई प्रजननावर नेमका काय परिणाम करते याविषयी ते ठाम नाहीत. जर तुम्हाला भविष्यात अपत्यप्राप्तीची इच्छा असेल, तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी या लहानशा, परंतु यूएफ्ईमुळे निश्चित असणाऱ्या अकाली रजोनिवृत्तीच्या धोक्यासंबंधी बोलून घेतले पाहिजे. फारच थोडया महिला यूएफ्ईनंतर गर्भवती झाल्या असल्याने गर्भधारणेच्या काळातील गुंतागुंत वाढते की काय, हे संशोधकांना जाणून घेता आलेले नाही.

एक्सअ‍ॅब्लेट? २००० प्रणाली

[संपादन]

एक्सअ‍ॅब्लेट? २००० हे एक वैद्यकीय उपकरण आहे. त्यात श्रवणातीत ध्वनिलहरींचा (अल्ट्रासाउंड) वापर करून चुंबकीय अनुनाद प्रतिमा (मॅग्नेटिक रेझोनन्स इमेज) मिळवून गर्भाशयातील फायब्रॉइड्‌सचा वेध घेतात व त्यांना नष्ट करतात. ज्यांना अपत्यप्राप्ती झाली आहे अथवा भविष्यात गर्भधारणा करावयाची नाही अशाच महिलांवर हे यंत्र वापरतात. एक्सअ‍ॅब्लेट? २०००. ही एक अ-भेदक शस्त्रक्रिया आहे. ही गर्भाशय सुटे करते आणि मायोमेक्टॉमी, हिस्टेरेक्टॉमी, सावध प्रतीक्षा, संप्रेरक चिकित्सा अथवा युटेरिन फायब्रॉइड एम्बोलायझेशन (यूएफ्ई)ला पर्याय आहे. एक्सअ‍ॅब्लेट दोन प्रणालींचा संयोग आहे. रुग्णाची शरीररचना तपासण्याकरिता व उपचार केल्या जाणाऱ्या फायब्रॉइड्‌स ऊतींचे आकारमान मापण्याकरिता. उष्णता दिल्यावर गर्भाशयाच्या ऊतींचे तापमान नियंत्रित करण्याकरिता चुंबकीय अनुनाद प्रतिमा (मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग – एमआरआय) यंत्र, आणि एकवटलेल्या श्रवणातीत ध्वनिलहरी (अल्ट्रासाउंड)चा झोत वापरतात. हा झोत उच्च वारंवारितेच्या व उच्च ऊर्जेच्या ध्वनिलहरींचा वापर करून फायब्रॉइड्सच्या ऊती तापवितो आणि नष्ट करतो.

बाह्य दुवे

[संपादन]

https://docs.google.com/viewer?a=v&pid=explorer&chrome=true&srcid=0B9-2hmnBdOPQYTAxZTUwMjUtYzUyOC00YWRlLTg1ZTQtZTAwMjI0NmExOTIx&hl=en_US