पुराचुंबकीय कालमापन पद्धती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

पुराकालमापनाची चुंबकीय पद्धत (इंग्रजी: Archaeomagnetic dating, अर्किओमॅग्नेटिक डेटिंग ) या पद्धतीत एखाद्या प्राचीन अवशेषात अथवा वस्तूत दीर्घ कालावधीनंतरही शिल्लक राहिलेल्या चुंबकत्वाचे मापन केले जाते. पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राची दिशा त्याचप्रमाणे त्याची तीव्रता हे दोन घटक कालांतराने बदलत जातात हे शास्त्रज्ञांना माहिती असलेले तत्त्व आहे. गाळात किंवा गाळयुक्त मातीत चुंबकीय खनिजे असतात. ती माती एका विशिष्ट तापमानापर्यंत तापविल्यावर त्या मातीतील खनिजांना चुंबकीय क्षेत्राची दिशा व तीव्रता ही वैशिष्ट्ये प्राप्त होतात. थंड झाल्यावरही त्या मातीच्या वा मातीतील पदार्थाच्या चुंबकीय क्षेत्राची दिशा व तीव्रता कायम राहते. या दिशेचे व तीव्रतेचे मापन केल्यास त्या मातीच्या वस्तूचे वय ठरविता येते.
पृथ्वीच्या पोटात चालू असलेल्या घडामोडी, पृथ्वीला मिळणाऱ्या सौरशक्तीत होणारे बदल, तसेच पृथ्वी स्वतःच्या आसाभोवती ज्या वेगाने फिरते त्या वेगात होणारा बदल, यामुळे पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रात भूतकाळात अनेक बदल झालेले आहेत. या बदलणाऱ्या चुंबकीय क्षेत्राची नोंद शास्त्रज्ञ, विशेषतः भूगर्भशास्त्रज्ञ करीत असतात. पुरातत्त्वशास्त्रीय उत्खननात मिळालेल्या वस्तू, खनिजे आणि अस्थी यांच्यात शिल्लक राहिलेल्या चुंबकत्वाची दिशा व तीव्रता यांचे मापन करून त्यांच्या काळाची माहिती मिळविता येते.