पनामा पेपर्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
ज्या देशातील राजकारणी, सरकारी अधिकारी आणि त्यांचे नातेवाईक यांची नावे या कागदपत्रांमधून उघड झाली आहेत असे देश.[१]

पनामातील मोझॅक फोन्सेका या कायदेविषयक कंपनीशी संबंधित १.१५ कोटी गुप्त कागदपत्रे आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या शोधपत्रकारांच्या एका जागतिक गटाने पनामा पेपर्स या नावाने उघड केली आहेत.[१] या प्रकरणाला जागतिक शोधपत्रकारितेच्या इतिहासातील सर्वात मोठे प्रकरण मानले जात आहे.[२] या कागदपत्रांमध्ये २,१४,००० पेक्षा जास्त ऑफशोअर कंपन्यांबद्दलची विस्तृत माहिती आहे, ज्यामध्ये त्यांचे भागधारक आणि संचालकांची माहितीसुद्धा आहे. यामध्ये जे या कंपन्यांचे भागधारक आणि संचालक आहेत अशा अर्जेंटिना, आइसलँड, सौदी अरेबिया, युक्रेन, संयुक्त अरब अमिराती या देशातील सध्या सत्तेत असणाऱ्या राजकारण्यांची नावे आहेत. त्याचबरोबर इतर ४० हून अधिक देशातील बडे नेते, सरकारी अधिकारी, जवळचे नातेवाईक, जवळचे सहकारी, विविध सरकारांचे प्रमुख आणि उद्योगपतींची नावे आहेत, ज्यामध्ये ब्राझील, चीन, पेरु, फ्रान्स, भारत, मलेशिया, मेक्सिको, पाकिस्तान, इंडोनेशिया, रशिया, दक्षिण आफ्रिका, स्पेन, सिरिया आणि युनायटेड किंग्डम या देशांचा समावेश आहे.[१]

यामध्ये १९७० च्या दशकापासूनच्या कगदपत्रांचा समावेश आसून यातील माहिती २.६ टेराबाइट एवढी आहे. ऑगस्ट २०१५ मध्ये एका अनामित स्रोताने सुरुवातीला ही कागदपत्रे जर्मनीतील ‘सुददॉइश झायटुंग’ या वृत्तपत्राकडे दिली आणि नंतर अमेरिकेतील इंटरनॅशनल कर्न्सोटियम ऑफ इनव्हेस्टिगेटिव्ह जर्नालिस्ट (आयसीआयजे) या गटाकडे दिली. पुढे ही कागदपत्रे ८० देशातील १०७ माध्यम संस्थांतील जवळपास ४०० पत्रकारांना वितरित करण्यात आली आणि त्यांचे विश्लेषण केले गेले. पहिल्या १४९ कागदपत्रांसोबत त्यांतील माहिती ३ एप्रिल २०१६ मध्ये पहिल्यांदा प्रकाशित करण्यात आली आणि त्यासंबंधीत कंपन्यांची संपूर्ण यादी मे २०१६ मध्ये प्रकाशित करण्यात येईल.

पार्श्वभूमी[संपादन]

मोझॅक फोन्सेका या कायदेविषयक कंपनीची स्थापना जुर्गेन मोझॅक आणि रामॉन फोन्सेका यांनी १९७७ साली केली.[३] या कंपनीच्या सेवांमध्ये विदेशातील अंतर्भूत कंपन्या, ऑफशोअर कंपन्यांचे व्यवस्थापन, मालमत्तेचे व्यवस्थापन यांचा समावेश होतो.[४] या कंपनीची जगभरात ४० कार्यालये असून ५०० कर्मचारी आहेत. ही कंपनी जवळपास ३ लाख कंपन्यांसाठी काम करते आणि त्यातील बहुतेक कंपन्या युनायटेड किंग्डम मध्ये आहेत किंवा तिथल्या आयकर विभागाच्या कार्यकक्षेतील आहेत.[४]

कागदपत्रे[संपादन]

पनामा प्रकरण उघड होण्याच्या एक वर्ष आधी जर्मनीच्या सुददॉइश झायटुंग या वृत्तपत्राला गोपनीय स्रोतांकडून यासंदर्भातली कागदपत्रे मिळाली. पुढील एक वर्षाच्या काळात त्यांना २.६ टेराबाईटची कागदपत्रे मिळाली जी मोझॅक फोन्सेका या कंपनीशी निगडीत होती. यामध्ये १.१५ कोटी कागदपत्रांचा समावेश आहे.

या कागदपत्रांमध्ये मुख्यत: ई-मेल्स, पीडीएफ फाईल्स, छायाचित्रे आणि मोझॅक फोन्सेका कंपनीतील १९७० ते २०१६ या काळातील काही उतारे यांचा समावेश आहे. उघडकीस आलेल्या फाईल्सचे स्वरूप पुढीलप्रमाणे आहे: ४८,०४,६१८ ईमेल्स, ३०,४७,३०६ डेटाबेस फॉरमॅटमधील फाईल्स, २१,५४,२६४ पीडीएफ फाईल्स, ११,१७,०२६ छायाचित्रे, ३,२०,१६६ टेक्स्ट फाईल आणि २,२४२ इतर फाईल्स.[५]

कागदपत्रांमधील नावे[संपादन]

या कागदपत्रांमध्ये जगातील एकूण १४० व्यक्तींनी पनामात आर्थिक व्यवहार केल्याचे दिसून आले आहे. त्यामध्ये जागतिक राजकारणी, उद्योगपती, व्यावसायिक, चित्रपट कलावंत, क्रीडापटू आणि अनेक बडय़ा असामींची नावे आहेत. त्यांनी आपली मालमत्ता लपवण्यासाठी, कर चुकवण्यासाठी आणि अन्य लाभांसाठी पनामा, ब्रिटिश व्हर्जिन आयलंड्स, जर्सी, बहामा आणि सेशल्स बेटे अशा कर नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रदेशांमध्ये स्थापन केलेल्या कंपन्यांच्यामार्फत मोठय़ा प्रमाणात पैसा फिरवला असे या कागदपत्रांमधून समोर येत आहे.[२]

अर्जेंटिनाचे सद्य राष्ट्राध्यक्ष मॉरिशिओ माक्रि, आंतरराष्ट्रीय फुटबॉल संघटनेच्या (फिफा) नीतिमत्ता समितीचे सदस्य, फिफाचे माजी उपाध्यक्ष, संयुक्त अरब अमिरातीचे राष्ट्राध्यक्ष खलिफा बिन झायेद अल नह्यान, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष पेट्रो पोरोशेन्को, सौदी अरेबियाचा राजा सलमान, आइसलँडचे पंतप्रधान सिगमुंदूर डेव्हि गुनालॉगसन यांची नावे आहेत.[१]

त्याचबरोबर यामध्ये चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचा मेहुणा, ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरॉन यांचे वडील, मलेशियाचे पंतप्रधान नजिब रझाक यांचा मुलगा, पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांची मुले, अझरबैजानचे राष्ट्राध्यक्ष इल्हाम अलियेव यांचे कुटूंबीय, दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष जॅकॉब झुमा यांचा पुतण्या, कझाकस्तानचे राष्ट्राध्यक्ष नुरसुलतान नझरबायेव यांचा नातू, मोरोक्कोचा राजा मोहम्मद सहावा याची स्वीय सचिव आणि मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष एनरिके पेना निटो यांचा आवडता कंत्राटदार या सर्वांची यामध्ये नावे आहेत.[१]

भारतीयांची नावे[संपादन]

जवळपास ५०० भारतीयांची नावे पनामा पेपर्समध्ये नमूद केलेल्या कंपन्यांशी निगडित असल्याचे दिसून आले आहे. तर २३४ भारतीयांनी आपली पारपत्रे (पासपोर्ट) मोझॅक फोन्सेकाकडे कंपन्यांच्या स्थापनेसाठी आणि अन्य व्यवहारांसाठी आवश्यक दस्तावेज म्हणून जमा केल्याचे आढळले आहे. अभिनेते अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन, डीएलएफचे मालक के. पी. सिंग, इंडियाबुल्सचे मालक समीर गेहलोत, गुंड इकबाल मिर्ची, शिशीर बाजोरिया, अनुराग केजरीवाल, विनोद अदानी यांच्यासह अनेकांचा समावेश आहे. तसेच भारताने विकत घेतलेल्या संरक्षण सामग्रीसाठी युरोपातील कंपनीने भारतीय एजंटना कसे पैसे दिले याचाही त्यात उल्लेख आहे.[२][५]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

संदर्भ[संपादन]

  1. a b c d e "पनामा पेपर्स: द पॉवर प्लेयर्स" (इंग्रजी मजकूर). इंटरनॅशनल कर्न्सोटियम ऑफ इनव्हेस्टिगेटिव्ह जर्नालिस्ट (आयसीआयजे). (आधीच्या मूळ आवृत्तीत त्रूटी जाणवल्याने विदागारातील आवृत्ती दिनांक April 3, 2016 रोजी मिळविली). ५ एप्रिल २०१६ रोजी पाहिले. 
  2. a b c "पनामा कागदपत्रांनी खळबळ ; बेहिशेबी मालमत्तेचा ओघ उघड". लोकसत्ता. ५ एप्रिल २०१६. 
  3. ^ हॅमिल्टन, मार्था (३ एप्रिल २०१६). "पनामिअन लॉ फर्म इज गेटकीपर टु व्हास्ट फ्लो ऑफ मर्की ऑफशोअर सिक्रेट्स" (इंग्रजी मजकूर). इंटरनॅशनल कर्न्सोटियम ऑफ इनव्हेस्टिगेटिव्ह जर्नालिस्ट. (आधीच्या मूळ आवृत्तीत त्रूटी जाणवल्याने विदागारातील आवृत्ती दिनांक April 3, 2016 रोजी मिळविली). April 4, 2016 रोजी पाहिले. 
  4. a b हार्डिंग, ल्युक (३ एप्रिल २०१६). "द पनामा पेपर्स: व्हॉट यु नीड टु नो" (इंग्रजी मजकूर). The Guardian. ISSN 0261-3077. (आधीच्या मूळ आवृत्तीत त्रूटी जाणवल्याने विदागारातील आवृत्ती दिनांक April 3, 2016 रोजी मिळविली). April 4, 2016 रोजी पाहिले. 
  5. a b "'पनामा'प्रकरणी चौकशीसाठी गट स्थापन". सकाळ. ५ एप्रिल २०१६.