निर्मला श्रीवास्तव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Shri Mataji Nirmala Shrivastava

निर्मला श्रीवास्तव ऊर्फ निर्मला देवी (२१ मार्च, इ.स. १९२३:छिंदवाडा, मध्य प्रदेश - २३ फेब्रुवारी, इ.स. २०११: जेनोवा, इटली) या सहजयोग ध्यान साधनातंत्राच्या आणि एका नव्या धार्मिक व आध्यात्मिक चळवळीच्या संस्थापक होत्या. त्यांचे अनुयायी त्यांना माताजी या नावाने संबोधत. त्यांचा जन्म साक्षात्कारी अवस्थेतच झाला असल्याची श्रद्धा आहे.[१] 'सहजयोग या ध्यानसाधनेद्वारे लोकांनी आपला आत्मसाक्षात्कार साधावा, यासाठी आणि सह्जायोगाद्वारे जगात शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी निर्मला देवी यांनी आपले सारे आयुष्य व्यतीत केले. सहजयोग शिकवण्यासाठी त्यांनी कोणतेही शुल्क घेतले नाही. १४० देशांत त्यांनी निःशुल्क सेवा दिली.[२]. निर्मला देवी यांनी चले जाव चळवळीत तुरुंगवास भोगला होता. गांधीजी त्यांना प्रेमाने नेपाली या नावाने हाक मारीत.

निर्मला देवी यांनी सहजयोगाच्या माध्यमातून अनेक बिगरसरकारी सामाजिक संस्था उभ्या केल्या. त्यांच्या कार्याची नोंद आंतरराष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली.

कौटुंबिक माहिती[संपादन]

निर्मला श्रीवास्तव यांचा जन्म एका ख्रिश्चन कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव प्रसादराव साळवे आणि आईचे नाव कार्नेलिया होते. वडील प्रसादराव साळवे यांना १४ भाषा अवगत होत्या. आई कार्नेलिया यांचे विवाहपूर्व माहेरचे नाव कार्नेलिया करुणा जाधव. त्या गणित विषयाच्या पदवीधर होत्या.[३] प्रसादराव कायद्याचे पदवीधर होते.[४] त्यांच्या पहिल्या पत्‍नीचे निधन झाले, त्यावेळी त्यांना पाच मुले होती. त्यांनी पुनर्विवाह केला. ही त्यांची दुसरी पत्‍नी म्हणजे निर्मला श्रीवास्तव यांची आई कार्नेलिया. २० जून १९२० रोजी प्रसादराव व कार्नेलिया यांचा विवाह झाला.[५] प्रसादराव आणि कार्नेलिया उभयतांनी भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला होता.

आजी सखुबाई[संपादन]

प्रसादराव यांच्या आईचे नाव सखुबाई साळवे होते. जन्माच्या वेळी त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते आणि नातेवाइकांनी धमकी दिल्याने सखुबाईंना रातोरात गाव सोडावे लागले होते. मध्यरात्री चार लहान मुले आणि पोटातील बाळ (प्रसादराव) यांना घेऊन प्रचंड पावसात आठ किलोमीटर चालत त्या पहाटे उज्जैन रेल्वे स्थानकावर पोहोचल्या. तेथून त्या त्यांच्या भावाकडे पोहोचल्या. ही घटना १८८३ साली घडली.[६]

विवाह आणि वैवाहिक जीवन[संपादन]

निर्मला श्रीवास्तव यांचा विवाह चंद्रिकाप्रसाद श्रीवास्तव उर्फ सी.पी. श्रीवास्तव यांच्याशी झाला. सी.पी. हे तत्कालीन सनदी अधिकारी, ते आय.सी.एस. होते. त्यांचा राणी एलिझाबेथ द्वितीय यांनी 'सर' किताब देऊन बहुमान केला होता. त्यांच्या दोन मुलींची नावे कल्पना आणि साधना अशी आहेत.

शिक्षण[संपादन]

निर्मला श्रीवास्तव यांचे वैद्यकीय शिक्षण लुधियाना येथील ख्रिश्चन मेडिकल कॉलेज आणि लाहोर येथील बाळकराम मेडिकल कॉलेज येथे झाले होते.[७]

कार्यारंभ[संपादन]

निर्मला श्रीवास्तव यांनी 'सहजयोग' कार्याचा आरंभ ०५ मे १९७० रोजी वयाच्या ४७ व्या वर्षी केला. त्यांचे पती सर चंद्रिकाप्रसाद श्रीवास्तव हे लंडन येथे युनायटेड नेशन्स मेरीटाईम ऑर्गनायझेशनचे सहसचिव असताना तेथे एका छोट्या गटात निर्मला श्रीवास्तव यांनी 'सहजयोगातून शांतता'प्रसाराचे काम सु्रू केले.[८]

निर्मलादेवी आणि गांधीजी[संपादन]

निर्मलादेवी १९२५ साली दोन वर्षाच्या होत्या तेंव्हापासून त्यांचे आईवडील त्यांना घेऊन गांधीजींना भेटत असत.[९] निर्मलादेवी यांच्या बुद्धिमत्तेचे तेज आणि त्यांचा धीरोदात्तपणाने पाहून महात्मा गांधी प्रभावित झाले होते. गांधीजीनी त्यांना त्यांच्या हत्येच्या एक दिवस आधी म्हणजे २९ जानेवारी १९४८ रोजी प्रेमाने 'नेपाली' असे नाव दिले होते. निर्मलादेवी त्यावेळी आपली पहिली मुलगी कल्पना हिला घेऊन गांधीजींना भेटण्यास गेल्या होत्या. [१०] [११]

अधिकृत संकेतस्थळ[संपादन]

http://shrimataji.org/

बाह्यदुवे[संपादन]

हेही पाहा[संपादन]

संदर्भ[संपादन]

 1. ^ Who is Shri Mataji?, http://www.sahajayoga.net/learn-sahaja-yoga-who-is-shri-mataji.html
 2. ^ Sahaja Yoga founder Nirmala Devi is dead, http://archive.indianexpress.com/news/sahaja-yoga-founder-nirmala-devi-is-dead/754645/
 3. ^ "संग्रहित प्रत". Archived from the original on 2017-05-28. 2015-10-19 रोजी पाहिले.
 4. ^ "संग्रहित प्रत". Archived from the original on 2016-03-30. 2015-10-19 रोजी पाहिले.
 5. ^ "संग्रहित प्रत". Archived from the original on 2016-03-30. 2015-10-19 रोजी पाहिले.
 6. ^ "संग्रहित प्रत". Archived from the original on 2016-03-30. 2015-10-19 रोजी पाहिले.
 7. ^ Life : Biography, http://shrimataji.org/site/life/biography-from-nirmala-srivastava-to-shri-mataji.html Archived 2017-05-28 at the Wayback Machine.
 8. ^ Life : Biography, http://shrimataji.org/site/life/biography-from-nirmala-srivastava-to-shri-mataji.html Archived 2017-05-28 at the Wayback Machine.
 9. ^ "संग्रहित प्रत". Archived from the original on 2016-03-30. 2015-10-19 रोजी पाहिले.
 10. ^ Who is Shri Mataji?, http://www.sahajayoga.net/learn-sahaja-yoga-who-is-shri-mataji.html
 11. ^ "संग्रहित प्रत". Archived from the original on 2016-03-30. 2015-10-19 रोजी पाहिले.