Jump to content

धीरूभाई अंबाणी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(धीरूभाई अंबानी या पानावरून पुनर्निर्देशित)

धीरजलाल हिराचंद अंबाणी उर्फ धीरूभाई हिराचंद अंबाणी (गुजराती: ધીરુભાઈ અંબાણી ) (डिसेंबर २८, इ.स. १९३२ - जुलै ६ इ.स. २००२) हे गुजराती व भारतीय उद्योजक होते. व्यावसायिक हुशारीने गरिबीतून वर येऊन त्यांनी आपल्या चुलतभावासोबत रिलायन्स उद्योग समूह स्थापला. इ.स. १९७७ साली सार्वजनिक घोषित केलेली रिलायन्स कंपनी विस्तारत जाऊन इ.स. २००७ साली अंबाणी कुटुंबीयांची मालमत्ता ६० अब्ज डॉलर, म्हणजे वॉल्टन कुटुंबीयांपाठोपाठ दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत कुटुंब ठरण्याइतपत हा उद्योग वाढला. []

जीवन

[संपादन]

धीरूभाई यांचा जन्म गुजरात राज्यातील सौराष्ट्रच्या जुनागढ जिल्ह्यातील चोरवाड या गावी डिसेंबर २८, इ.स. १९३२ रोजी झाला. त्यांचे वडील हिराचंद गोवर्धनदास अंबाणी हे प्राथमिक शाळेत शिक्षक होते तर आई जमनाबेन या गृहिणी होत्या. धीरूभाई हे आपल्या पाच भावंडातले मधले अपत्य.

धीरूभाई शिक्षणात सर्वसामान्य विद्यार्थी होते. त्यांचे इंग्रजीचे ज्ञान चांगले तर गणित कच्चे होते. इ.स. १९४९ साली आपले १० वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण करून धीरूभाई नोकरीच्या शोधात एडन येथे गेले. तेथे बर्मा शेल कंपनीची उपकंपनी म्हणून काम करणाऱ्या ए. बेस नावाच्या कंपनीत धीरूभाई मासिक ३०० रुपये पगारावर पेट्रोल पंपावर नोकरी करू लागले. ही कंपनी लहान मोठ्या अनेक उद्योगांमध्ये कार्यरत होती. आंतरराष्ट्रीय कंपनीचा भाग असल्याने तेथे अनेक देशांचे व्यापारी येत असत. तेथेच धीरूभाई यांनी स्वतःची रिफायनरी स्थापन करावी असे स्वप्न पाहण्यास सुरुवात केली.

धीरूभाई त्यांचे वडीलबंधू रमणिकलाल यांच्यासह एडनमध्ये राहत. गुजराती लोकांची आवडनिवड या दोघा भावांना माहीत असल्याने त्यांनी गुजराती खाद्यपदार्थ भारतातून मागवून ते पदार्थ एडनला विकण्यास सुरू केले. थोड्याच दिवसात अंबाणी बंधू लोकप्रिय होऊ लागले. यामुळे ओळखी तर वाढत गेल्या पण व्यापारी धीरूभाईंना प्रत्येकाकडून काहीतरी माहिती मिळत गेली. त्यामुळे त्यांना धंद्याचे गणित मांडता येऊ लागले. आपल्या हुशारी, मेहनत, चिकाटी या गुणांच्या जोरावर धीरूभाई ए. बेस मध्ये कारकून ते सेल्स मॅनेजर या पायऱ्या ओलांडून गेले. आपल्या कामापुरते अरबी भाषेवर प्रभुत्वही धीरूभाईंनी मिळविले होतेच, अनेक मित्रही जोडले. या मित्र परिवारात भारतीय आणि परदेशी असे सगळेच होते. त्यातील सुशीलभाई कोठारी, नटुभाई संघवी आणि हरकिसन पारेख हे पुढे रिलायन्सचे मुख्य मार्गदर्शक, आधारस्तंभच बनले.

इ.स. १९५१ साली धीरूभाई यांचे वडील हिराचंद अंबाणी यांचे निधन झाले. आई जमनाबेन यांच्या पुढाकाराने धीरूभाईंचा विवाह जामनगरच्या कोकिलाबेन पटेल यांच्याशी मार्च इ.स. १९५४ मध्ये झाला. विवाहानंतर धीरूभाई आणि कोकिलाबेन यांनी एडनला संसार थाटला. लग्नानंतर तीन वर्षांनी मुकेश यांचा जन्म झाला. धीरूभाईंना आधीपासूनच दुसऱ्याची नोकरी करण्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय असावा असे वाटत होते. आपला स्वतंत्र व्यवसाय भारतातच उभा करावा हेही धीरूभाईंनी पक्के केले. शेवटी ३१ डिसेंबर इ.स. १९५८ला धीरूभाईंनी एडन कायमचे सोडून दिले आणि ते आपल्या कुटुंबीयांसह भारतात परतले.

इ.स. १९५९ साली धीरूभाई यांनी १५,०००/- रुपयांची गुंतवणूक करून मशीदबंदर मुंबई येथे त्र्यंबकलाल चंदरजी दामाणी (नात्याने दूरचे मामा) यांच्यासह ६५:३५ अशी भागीदारी करून रिलायन्स कमर्शियल कॉर्पोरेशनची स्थापना केली आणि ते मसाले (मिरी, लवंग, सुपारी, सुंठ, तमालपत्र, हळद, काजू इ.) आणि रेयॉन कापडाचा व्यवसाय करू लागले. मामा त्र्यंबकभाई हे स्लीपिंग पार्टनर होते. खरे काम भारतात धीरुभाई आणि एडनमध्ये ज्येष्ठ बंधू कारभार सांभाळू लागले.

मुंबईला आल्यावर धीरूभाई सर्व कुटंबीयांसह अशा भुलेश्वर येथे एका चाळीत राहू लागले. या चाळीत सुमारे ५०० कुटुंबे रहात होती. पहिले अपत्य मुकेश अंबानी याचा जन्म एप्रिल इ.स. १९५७ मध्ये, धीरूभाई यांचे दुसरे अपत्य अनिल याचा जन्म जून इ.स. १९५९ मध्ये, थोरली मुलगी दीप्ति हिचा जानेवारी १९६२ मध्ये तर धाकटी मुलगी नीना हिचा जन्म १/नोव्हेंबर/१९६४ रोजी झाला. मोठे भाऊ रमणिकभाई यांनी १९६१ पर्यंत एडनचा धंदा आणि स्वतःची नोकरी दोन्ही सांभाळले. मग मात्र धीरूभाईंचा वाढता व्याप बघता तेही भारतात परतले आणि धीरूभाईंसह धंद्यातच रमले. शिवाय लहान भाऊ नटुभाई यांचे शिक्षण पूर्ण झाल्यामुळे तेही कामास मदत करू लागले.

इ.स. १९६६ साली धीरूभाई अंबाणी यांनी अमदावाद जवळच्या नरोडा येथे अत्याधुनिक टेक्स्टाईल मिलची सुरुवात केली. हे पाऊल त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरले. इ.स. १९७१ साल धीरूभाईंसाठी प्रगतीचे वर्ष ठरले. भारत सरकारचे निर्यात धोरण अनुकूल होते, त्याचा फायदा उचलत धीरूभाईंनी आपले कापड रशिया, सौदी अरेबिया, पोलंड, झांबिया, युगांडा इ. देशांमध्ये निर्यात करण्यास सुरुवात केली. दर्जेदार माल आणि वाढती बाजारपेठ यामुळे धीरूभाई यशाच्या पायऱ्या चढू लागले.[] इ.स. १९७५ साली जागतिक बँकेने 'विकसनशील देशांमधील सर्वोत्कृष्ट प्रकल्प' म्हणून नरोडाच्या प्रकल्पाची निवड केली.

इ.स. १९७७ साली धीरूभाईंनी रिलायन्सचे रूपांतर पब्लिक लिमिटेड कंपनीत केले. लहान लहान गुंतवणूकदारांकडून भागभांडवल पैसा गोळा करणारे धीरूभाई भारतातील पहिले उद्योगपती ठरले. त्यांच्या पहिल्याच प्रयत्‍नासाठी सुमारे ५८,००० लोकांनी आपले पैसे गुंतविले. इ.स. १९७८ साली धीरूभाई कापड व्यवसायात पूर्णपणे उतरले. त्यांनी विमल या नावाने कापड विक्रीस सुरुवात केली. साधारणपणे दिवसाला एक या सरासरीने धीरूभाईंनी इ.स. १९७७ ते इ.स. १९८० या काळात देशभरात विमलची शोरूम थाटली.

इ.स. १९८१ साली मुकेश अंबाणी अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठातून शिक्षण संपवून भारतात परतले तर इ.स. १९८३ साली अनिल अंबाणी अमेरिकेतील वॉर्टन स्कूल येथून आपले शिक्षण पूर्ण करून भारतात आले.

इ.स. १९९९-२००० मध्ये रिलायन्सने २५,००० कोटींची गुंतवणूक करून जामनगर, गुजरात येथे जगातील सर्वात मोठी रिफायनरी सुरू केली तसेच इ.स. २००० मध्ये २५,००० कोटींची गुंतवणूक करून इन्फोकॉम क्षेत्रातही प्रवेश केला. धीरूभाईंचा दबदबा सर्वत्र जाणवू लागला. टाईम्स ऑफ इंडियाने शतकातील श्रेष्ठ चार व्यक्तींपैकी धीरूभाई एक आहेत असे गौरवोद्गार काढले, तर फिक्कीने २० व्या शतकातील साहसी पुरुष म्हणून धीरूभाईंचा गौरव केला.

जून २४ इ.स. २००२ या दिवशी धीरूभाईंना मेंदूत रक्ताची गाठ झाल्याने पक्षाघाताचा तीव्र झटका आला. त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले. पण उपचारांना यश आले नाही. अखेर जुलै ६ इ.स. २००२ या दिवशी धीरूभाई अंबाणींचे निधन झाले. शेवटचे ११ दिवस ते कोमामध्ये होते.

धीरूभाई अंबानी यांचे विचार

[संपादन]

● माझ्या यशाचे रहस्य म्हणजे माझी महत्त्वाकांक्षा आणि इतर लोकांचे मन जाणून घेणे.[१]

● योग्य उद्योजक जोखीम घेण्यामुळे जन्माला येतात.[२]

● संकटातही आपले ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न करा. अडचणींना संधींमध्ये रूपांतर करा. शेवटी तुम्हाला यश मिळेल.[३]

विकिक्वोट
विकिक्वोट
धीरूभाई अंबाणी हा शब्द/शब्दसमूह
विकिक्वोट, या मुक्त मराठी अवतरणकोशात पाहा.

धीरुभाईंच्या जीवनावरील पुस्तके

[संपादन]
  • पुरुषार्थाची प्रतिमा : धीरुभाई अंबानी 6(मूळ गुजराती, लेखक दिनकर पंड्या; मराठी अनुवादक गिरीश दाबके)
  • प्रवास एका जिद्दीचा (मुरलीधर एन. चयनी)

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Biography in Marathi : प्रेरणादायी जीवनचरित्र". biographymarathi.com. 2021-03-18 रोजी पाहिले.
  2. ^ Pahwa, Varun. "Dhirubhai Ambani Success Story: The Rise of a Billionaire" (इंग्रजी भाषेत). 2022-03-05 रोजी पाहिले.[permanent dead link]

बाह्य दुवे

[संपादन]