देवीसिंह व्यंकटसिंह चौहान
देवीसिंह व्यंकटसिंह चौहान (२२ मार्च १९११ - मृत्यु डिसेंबर २००४) हे इतिहास ह्या विषयातील एक अभ्यासक होते. त्याचे कार्यक्षेत्र महाराष्ट्रात होते. दख्खनी भाषेचा त्यांनी विशेष अभ्यास केला होता.
देविसिंह चौहान | |
---|---|
जन्म नाव | देवीसिंह व्यंकटसिंह चौहान |
जन्म | २२ मार्च इ.स. १९११ |
शिक्षण | गणित (बी. ए.) आणि विधी यविषयांत पदवी |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | इतिहास, राजकारण, भाषा, साहित्य |
भाषा | मराठी, दख्खिनी हिंदी, हिंदी, उर्दू |
साहित्य प्रकार | भाषाशास्त्र, इतिहास |
विषय | दख्खिनी हिंदी |
चळवळ | संयुक्त महाराष्ट्र चळवळ |
प्रसिद्ध साहित्यकृती | दक्खिनी हिंदीतील इतिहास व इतर लेख |
शिक्षण
[संपादन]देवीसिंह १९३१ साली मुंबई विद्यापीठातून शालान्त (मॅट्रिकची) परिक्षा उत्तीर्ण झाले. १९३८ साली गणित हा विषय घेऊन त्यांनी पदवी ( बी.ए. (ऑनर्स)) संपादन केली. त्यानंतर पुण्याच्या गोखले इन्स्टिट्यूट मधून पदव्यूतर पदवीचा (एम.ए.) अभ्यासही सुरू केला होता.[१] पुढे सन १९४१ मध्ये त्यांनी नागपूर येथून विधी शाखेतील पदवीही मिळविली. [१]
कार्यारंभ
[संपादन]मुंबई विद्यापीठातून शालान्त (मॅट्रिकची) परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर त्यांनी तीन वर्षे हिप्परगा येथे राष्ट्रीय शाळेत शिक्षक म्हणून काम केले. पुढे पुण्याच्या गोखले इन्स्टिटूटमधून पदव्यूतर पदवीच्या (एम्. ए.) अभ्यासासोबत मराठवाडा साप्ताहिकात उपसंपादकाचे कामही केले. त्यानंतर सन १९३८मध्ये शिक्षण सोडून ते स्वातंत्र्यपूर्व काळातल्या हैदराबाद संस्थानाच्या उस्मानाबाद जिल्ह्यातील स्टेट कॉग्रेसच्या संघटनेचे काम करू लागले. त्यासोबतीनेच त्यांनी स्वातंत्र्यपूर्व काळातल्या हैद्राबाद संस्थानाच्या जहागिरीतील सार-कर यांची माहिती गोळा करून ती डॉ.सोहोनी यांच्या सहकार्याने फ्यूडल ऑपरेशन्स इन हैदराबाद या नावे ग्रंथरूप करून प्रकाशित केली. [१] सन १९४१ च्या जुलै महिन्यात उमरगा येथे त्यांनी श्री. तात्याराव मोरे, वि. ना. हराळकर, रामराव राजेश्वरक या आपल्या सहकाऱ्यासह भारत विद्यालयाची स्थापना केली. [१]
राजकीय कारकीर्द
[संपादन]देवीसिंह चौहान यांना सन १९४७ च्या ऑगस्ट महिन्यात स्टेट काँग्रेस पक्षातर्फे झालेल्या सत्याग्रहात कारावासाची शिक्षा झाली होती. पण पोलिसी कारवाईनंतर त्यांची सुटका करण्यात आली. स्वातंत्र्योत्तर काळात ते काँग्रेसचे पूर्ण वेळ कार्यकर्ते झाले होते. सन १९४९ ते १९५२ या काळात ते मराठवाडा प्रदेश काँग्रेसचे चिटणीसही होते. सन १९५२ ते १९५४ या काळात त्यांनी मंत्रिपदही भूषविले होते. त्यानंतर त्यांनी मराठवाड्यातून संयुक्त महाराष्ट्र चळवळीत भाग घेतला. नागपूर कराराच्या वेळी मराठवाड्यातील प्रतिनिधी म्हणून ते उपस्थित होते. पुढे १९५७ च्या मुंबई मंत्रिमंडळात उपमंत्री म्हणून ते सहभागी झाले होते. सन १९६४ ते १९७० या काळात त्यांनी लोकसेवा आयोगाचे सदस्य म्हणूनही कार्य केले होते.[१]
लेखन आणि भाषाविषयक कार्य
[संपादन]स्वातंत्र्योत्तर काळात काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणून वावरताना त्यांनी जहागिरींचा प्रश्न तसेच कुळकायदा यांविषयी अनेक लेख लिहिले. कुळकायद्यावर पुस्तके लिहिली होती. सन १९५७ पासूनच त्यांनी संशोधनावर विशेष लक्ष द्यायला सुरुवात केली होती. त्यांनी मराठी, हिंदी, उर्दू आणि इंग्रजी ह्या चार भाषांत मिळून सुमारे १५० संशोधनपर लेखांची निर्मिती केली आहे.[१]
संशोधनात्मक कामगिरी
[संपादन]भारतीय इतिहास काँग्रेस व अखिल भारतीय प्राच्य परिषद यांच्या इतिवृत्तान्तांवरून देवीसिंह यांचे अनेक संशोधनपर लेख प्रकाशित झाल्याचे आढळते. तसेच पुण्याच्या भांडारकर संशोधन मंदिर या संस्थेच्या आणि मुंबईच्या रॉयल एशियाटिक सोसायटीच्या त्रैमासिक पत्रांतून त्यांनी लेखन केल्याचे आढळते.[१]
ग्रंथसंपदा, संपादने आणि लेख
[संपादन]ग्रंथसंपदा
[संपादन]मराठी
[संपादन]- 'दख्खनी हिंदीतील इतिहास व इतर लेख' (लेख-संग्रह), ग्रंथमाला क्र- २१, वि.गो.खोबरेकर, इतिहास संशोधन मंडळ, मुंबई-१४, म.गो. प्रधान, सत्यसेवा मुद्रणालय, अलिबाग (इ.स. १९७३).
- 'मराठी आणि दक्खिनी हिंदी', प्रकाशक - महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा, पुणे.
- 'भारत इराण संश्लेष, भाग- १', प्रकाशक - महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा, पुणे.
- 'भारत इराण संश्लेष, भाग- २', प्रकाशक - महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा, पुणे.
- ‘फूलबन : इब्न निशातीकृत’(१९६५)
- ‘जंगनामए आलिम अलीखान : हुसेनकृत’ (१९६८)
- ‘तारीखे इस्कंदरी : नुस्त्रतीकृत’ (१९६९)
- ‘पर्णालपर्वत ग्रहणाख्यान : जयराम पिण्डे कृत’ (१९७०)
- ‘इब्राहीमनामा : अब्दुलकृत’ (१९७३)
- ‘शूलिक आणि प्राकृत’ (१९८८)
- ‘ऋग्वेद : समस्या आणि उकल’ (१९८८)[२]
इंग्रजी
[संपादन]१) ‘Understanding Reveda’ (१९८५)
२) 'फ्यूडल ऑपरेशन्स इन हैदराबाद' (१९३९)
हिंदी
[संपादन]१. अब्दुल देहलवीकृत इब्राहीमनामा, क्र-३, संचालक, पुराभिलेख व पुरातत्त्व विभाग, मुंबई-३२, शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय, मुंबई- ४, शके १८९५ (इ.स. १९७३), १४+ २३५.
२. नवरसरागमाला
३. श्री जयरामपिण्डेविरचित पर्णालपर्वतग्रहणाख्यानम्, प्रकाशक - ग.वा. करमरकर, महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा, पुणे-३०, गो.प. नेने, राष्ट्रभाषा मुद्रणालय, पुणे-३०, शके १८९२ (इ.स. १९७०-७१). ६+८+१+१७२+२.
४. मुल्ला नुस्रतीकृत तारीखे- इस्कंदरी, शके १८९० (इ.स. १९६९), प्रकाशक - ग.वा. करमरकर, महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा,पुणे-३०, गो.प. नेने, राष्ट्रभाषा मुद्रणालय,पुणे-३०. [३]
संपादने
[संपादन]- ते काही काळ ‘संग्राम’या पुण्याहून निघणाऱ्या वृत्तपत्राचे संपादक होते.
- त्यांनी ‘मराठवाडा’साप्ताहिकाचे उपसंपादक म्हणून कार्य केले होते.
लेख
[संपादन]पुरस्कार
[संपादन]- देवीसिंह चौहान यांना ‘मराठी आणि दक्खिनी हिंदी’ (१९७१) या ग्रंथासाठी १९७२-७३चा महाराष्ट्र शासनाचा राज्य पुरस्कार मिळाला होता.
- त्यांच्या ‘भारत इराणी संश्लेष, भाग- १’ (१९७३) या ग्रंथास १९७४-७५चा महाराष्ट्र शासनाचा राज्य पुरस्कार मिळाला होता.
संदर्भ
[संपादन]- ^ a b c d e f g देवीसिंह व्यकंटसिंह चौहान, दख्खनी हिंदीतील इतिहास व इतर लेख, समाविष्ट- मलपृष्ठावर दिलेला परिचयपर मजकूर, प्रका- वि.गो.खोबरेकर, इतिहास संशोधन मंडळ, दादर, मुंबई-१४, प्रथम संस्करण, १९७३.
- ^ जोशी, सु.ग. डॉ. देवीसिंग चौहान गौरव ग्रंथ.
- ^ मुल्ला नुस्रतीकृत तारीखे-इस्कंदरी अर्थात उमराणीचे युद्ध, भा.इ.सं.मं ग्रंथमाला क्र-५८, अनुवादक - मु.मा. जगताप, समा-निवेदन (?), शके १८९० (इ.स. १९६९), प्रकाशक - ग.वा. करमरकर, महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा, पुणे-३०, गो.प. नेने, राष्ट्रभाषा मुद्रणालय,पुणे-३०, ३.