थिएटर ॲकॅडमी
‘थिएटर अॅकॅडमी’ ही पुण्यामधील एक नाट्यसंस्था आहे. हिची स्थापना २७ मार्च १९७३ रोजी झाली.
विजय तेंडुलकर लिखित घाशीराम कोतवाल हे नाटक १९७२ मध्ये राज्य नाट्य स्पर्धेतून रंगभूमीवर आले. डॉ. जब्बार पटेल यांनी त्याचे दिग्दर्शन, पं. भास्कर चंदावरकर यांनी संगीत आणि कृष्णदेव मुळगुंद यांनी नृत्य दिग्दर्शन केले होते. डॉ. मोहन आगाशे, चंद्रकांत काळे, नंदू पोळ, श्रीराम रानडे, रवींद्र साठे, मोहन गोखले, सतीश आळेकर असे अनेक कलावंत घाशीराम कोतवालमध्ये होते.
राज्य नाट्यस्पर्धेच्या प्राथमिक आणि अंतिम अशा दोन्ही फेऱ्यांमध्ये ‘प्रोग्रेसिव्ह ड्रामॅटिक असोसिएशन’च्या या नाटकाला द्वितीय पारितोषिक मिळाले. मात्र त्यानंतर काही काळाने हे नाटक म्हणजे नाना फडणविसांचे चारित्र्यहनन आहे, समस्त ब्राह्मणवर्गाची केलेली बदनामी आहे, असा सूर पुण्यात उमटू लागला. त्यातून ‘प्रोग्रेसिव्ह ड्रामॅटिक असोसिएशन’-(पीडीए)वर दबाव निर्माण करण्यात आला व नाटकाचे प्रयोग थांबवावे लागले. संस्थेचे अध्यक्ष प्रा. भालबा केळकर यांनी नाटक बंद करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे संस्थेत जुनी पिढी आणि नवी पिढी असा वाद उभा राहिला. परिणामी पी.डी.ए. फुटली. बाहेर पडलेल्या कलावंतांनी २७ मार्च १९७३ रोजी (जागतिक रंगभूमी दिनी) सतीश आळेकर यांच्या शनिवार पेठेतील घराच्या गच्चीवर ‘थिएटर अॅकॅडमी’ या नव्या नाट्यसंस्थेला जन्माला घातले.
घाशीराम कोतवालचे प्रयोग
[संपादन]कुठल्याही दबावाला बळी न पडता नाट्यवेडाने पछाडलेल्या ‘थिएटर अॅकॅडमी’च्या तरुण रंगकर्मीनी घाशीराम कोतवालचे प्रयोग पुढे सुरूच ठेवले. १९८० मध्ये या नाटकाचे युरोपातही प्रयोग झाले. या दौऱ्याला जाण्यावरूनही नाटकाला तीव्र विरोध झाला होता. त्या विरोधालाही न जुमानता राजकीय स्तरावरून झालेल्या सहकार्यातून नाटकाचा दौरा यशस्वीरीत्या पूर्ण झाला. नाटकाला परदेशी प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. कालांतराने हे नाटक मराठी रंगभूमीवरच नाही, तर भारतीय रंगभूमीच्या संदर्भात मैलाचा दगड ठरले. ‘घाशीराम’मुळे ‘थिएटर अॅकॅडमी’चे नाव जगभरात पोहोचले. या ‘थिएटर अॅकॅडमी’ नामक नाट्यसंस्थेमुळे महाराष्ट्रातील तरुण रंगकर्मीना बळ मिळाले आणि अनेक नाट्यसंस्था उभ्या राहिल्या आणि महाराष्ट्राला अनेकानेक उत्तम नाटके मिळाली.
थिएटर अॅकॅडमीने केवळ नाटके केली नाहीत तर नाटकाची पारंपरिक चौकट मोडणारे, रंगभूमीला नवे आयाम देणारे प्रयोग केले. या प्रयोगांतूनच नाटक आणि मरठी नाट्यचळवळ बळकट झाली. या संस्थेतून डॉ. जब्बार पटेल, डॉ. मोहन आगाशे, सतीश आळेकर, चंद्रकांत काळे, रवींद्र साठे, मोहन गोखले, नंदू पोळ, प्रसाद पुरंदरे, श्रीरंग गोडबोले, माधुरी पुरंदरे, आनंद मोडक, अतुल पेठे असे कितीतरी कलावंत-रंगकर्मी मराठी नाटय़-चित्रपटसृष्टीला मिळाले.
थिएटर अॅकॅडमीने रंगमंचावर सादर केलेली नाटके
[संपादन]- अतिरेकी
- आनंद भाविनी (पु.शि. रेगे यांच्या साहित्यकृतींवर आधारित संगीत- रंगमंचीय कार्यक्रम)
- घाशीराम कोतवाल
- डॉल हाऊस
- तीन पैशाचा तमाशा (संगीतिका)
- पडघम
- प्रलय
- बदकांचं गुपित (बा.सी. मर्ढेकरांच्या कवितांवर आधारित दर्जेदार संगीत- रंगमंचीय कार्यक्रम)
- बेगम बर्वे
- महानिर्वाण
- महापूर
- मिकी आणि मेमसाहेब, वगैरे.